हल्ली आम्ही आणि आमच्या लेकी-सुना आपापल्या अर्धागांना नावाने पुकारतो. तेही अगदी सहजपणे. आता नव्याकोऱ्या वधूंना उखाण्यांत नाव घेण्यातील गंमत वाटत नाही. ‘हाऊ सिली’ असं म्हणतात त्या! मग एखादी नवरी, वडील मंडळींचा मान राखून इंग्रजी मराठीची भाषिक हाणामारी करून वेळ साजरी करते.
आपला भारत देश खरोखर खेडय़ात वसला आहे. ‘खेडय़ाकडे चला’ असं तो एक महान आत्मा सांगून गेला आहे, ते उगीच नाही. तो अनुभव या नाव घेण्याच्या प्रथेतही पुनश्च येतो. कारण खेडय़ापाडय़ातल्या बऱ्याच बायका, नवऱ्याला नावाने हाक मारत नाहीत. यजमानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांना मान देण्यासाठी ‘मालक’ वा ‘धनी’ असे उल्लेख करतात. नाहीतर त्यांचा हुद्दा जो काही असेल तोच त्यांचं नाव होऊन जातं.
घरोघरी मंगळागौर, वटपौर्णिमा, नवरात्र, सवाष्णी, हळदीकुंकू असे ‘लेडीज ओन्ली’ कार्यक्रम आवर्जून केले जातात. तेथे पुरुषांना ‘नो एन्ट्री’! त्यामुळे ही बायामाणसं त्याचा पुरेपूर लाभ उठवतात आणि रंगात येऊन, काही वेळा ‘ए’ सर्टििफकेटचे म्हणजे अॅडल्ट ओन्ली असे उखाणे घेण्याचा चान्स घेतात. त्या उखाण्यात नवऱ्याबद्दल तक्रार किंवा प्रेमळ नाराजी किंवा क्वचित चुकून आदरयुक्त भीतीही दाखवण्यात येते. असा हा मिष्कील पण ‘नवरसमिश्रित’ कार्यक्रम तमाम पुरुषवर्ग मिस करतो म्हणून आज फक्त उखाण्यांवर बोलू..
त्यासाठी मी चक्का एका खासदारणीच्या हळदीकुंकू कार्यक्रमातच घुसलेय. हे जिल्ह्य़ाचं ठिकाण आहे. पाटील खासदारांचं घर आहे. त्यामुळे सर्व थरांतल्या भगिनी नटूनथटून आल्या आहेत. बऱ्याचजणी एकमेकींच्या मत्रिणी आहेत. मत्री वर्षांनुवर्षांची आहे. साहजिकच गॉसििपगचा फड उत्तम जमला आहे.
पाटलीणबाई खासदारांची पत्नी! तशी बऱ्यापकी मॉडर्न, कारण ती होती हुजूरपागा शिक्षित! तिला छान छान कल्पना सुचायच्या. या सगळ्या बायकांची ही बडबड अशीच अखंड चालू राहणार हे ती जाणून होती. हळदीकुंकू दिलं, वाणाचे डब्बे दिले. तिळगूळ डब्ब्यात ठेवला गेला. तशी पाटलिणीनं सर्वाचं लक्ष स्वत:कडे वेधण्याचा प्रयत्न केला. त्या गप्पांच्या भरात आलेल्या बायकांचं लक्ष वेधणं काही खायचं काम नाही हे तिला लक्षात आलं. शेवटी तिनं देवाची घंटा हातात घेऊन खणाखणा वाजवली. कलकलाट कमी झालासे वाटताच, उंच आवाजात म्हणाली, ‘ऐका हो ऐका मत्रिणींनो! आता मी सर्व मत्रिणींना विनंती करते की प्रत्येकीने उखाणा घेऊन स्वत:च्या ह्य़ांचं नाव घेतलंच पाहिजे. हा आग्रह म्हणा, विनंती म्हणा की जबरदस्ती म्हणा, पण उखाण्यात नाव हे घेतलंच पाहिजे.’या अनाउन्समेंटने तेथे पिनड्रॉप सायलेन्स पसरला!
त्या क्षणापर्यंत अखंड बडबडणाऱ्या बायका आवंढा गिळून चुळबूळ करू लागल्या. एवढं टेन्शन आलं त्यांना की काहीतरी थातुरमातुर कारणं शोधून पळून जायचं निमित्त त्या शोधू लागल्या. पण असं होणार याचा अंदाज पाटलीणबाईला होताच. तिनं बजावलं, ‘पळून जायचा प्रयत्न करायचा नाही. ’
मग प्रत्येक बाई शेजारचीला आग्रह करू लागली,
‘ए, तू आधी घे.’
‘अहो, तुम्ही घ्या नं नाव.’
मग ही ‘पहले आप’ची गाडी पुढे ढकलण्यासाठी मॉडर्न, धीट, स्मार्ट अशा, थोडक्यात म्हणजे ‘आगाऊ’ विनयाने धीटपणे सुरुवात केली. विनया-विनयची जोडी गुटर्गू म्हणून प्रसिद्ध होतीच. विनया म्हणाली,
‘रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
विनयराव एवढे हॅडसम, पण डोक्याला टक्कल!’
बायकांत हास्यकल्लोळ उठला. या उखाण्याने हॉलमधील वातावरण एकदम मोकळंढाकळं झालं. पाठोपाठ नाशिकच्या माहेरवाशिणीने नाव घेतलं,
‘सातारचे पेढे, नाशिकचा चिवडा,
वसंतरावांची निवड, हा माझाच निवाडा’
यावर, काशीआजींनी लग्गेच टिप्पणी केली,
‘हे बरं आहे बाई तुमचं, हल्लीच्या मुलींचं! आम्हाला नव्हती हो निवाडय़ाची संधी!’ गोऱ्या गोऱ्या काशीआजींचे आजोबा दिसण्यात अंमळ थोडे मायनसमध्येच होते नं! त्यांची ती बोच आली होती अशी ओठांबाहेर! हं.. आलिया भोगासी!
जिल्ह्य़ाच्या गावी कोर्टाचे कारकून म्हणजे केवढी ऐट! त्यांच्या बायकोने ऐटीत उखाणा घेतला,
‘आला वारा, गेला वारा, रुपया घ्या पारखून,
आमचे सुरेशराव आहेत, न्यायदरबारी कारकून!’
लगेच कलेक्टर ऑफिसच्या हेडक्लार्कच्या बायकोने नाक वर केलेच,
‘झुंजूमुंजू झालं, दारासमोर घातला सडा,
हलवला पारिजातक, पडला फुलांचा सडा,
फुलांचा केला हार, हार घ्या पारखून,
राजाभाऊंच्या हाताखाली राबतात शंभर कारकून!’
गावातल्या गोऱ्यापान, घाऱ्या नजरेच्या भिकंभटांचा प्रवचनात हातखंडा. ते बोलताना अभिनय पण छान करायचे. त्यामुळे त्यांच्या कीर्तन-प्रवचनाला भरपूर गर्दी व्हायची. विशेषकरून बायकांची. त्यांच्या पत्नी उमाबाईंच्या मनाला ही गोष्ट कुरतडायची. त्यांनी ती उखाण्यात दाखवायचा चान्स सोडला नाही. त्या म्हणाल्या,
‘चिंचा आवळे खाऊन नाकाला झाली सर्दी,
भिकंभटांच्या प्रवचनाला बायकांची हीऽऽऽ गर्दी!’
सरोजताई बदली होऊन नुकत्याच पुण्याहून आल्या होत्या. त्या म्हणाल्या,
‘पुण्याला आहे प्रसिद्ध विद्य्ोचं पीठ,
वामनराव नेतात मला, गाडीवरून डब्बलसीट!’
दुसरी पुणेकरीण म्हणाली,
‘मुळा-मुठेच्या संगमावर वसले आहे पुणे,
अशोकरावांच्या संसारात नाही कश्याला उणे!’
त्या गावच्या पाणीटंचाईला सुवर्णा वैतागली होती. पण नवऱ्यावर मात्र जाम खूष होती. ती लाजत, लाजत म्हणाली,
‘विहिरीचं पाणी ओढून हात झाले वाकडे,
संभाजीरावांच्या ओठांवर मिशांचे आकडे!’
तिथल्या आज्या पण खुदुखुदु हसू लागल्या. आपले काम आटोपून निघालेली कामवाली यमुनाबाई पण हसत असलेली बघून तिलाही आग्रह झाला नाव घेण्याचा. आधी तिचा चेहरा पडला पण स्वत:ला सावरून घेत ती उद्गारली,
‘वरसा-वरशाला करीत होते वटपोर्णिमेला आरती,
गोिवदराव गेले वरती, मला मातुर ठेवली खालती!’
गावातल्या निर्वासित कॉलनीत अनेक वष्रे राहणारी चंदा सिंधीण हा सर्व कार्यक्रम छान एन्जॉय करत होती. तिलाही स्फूर्ती आली. ती तिच्या फाळणी-स्पेशल िहदीत उखाणा घेती झाली,
‘पेशवेपार्कके िपजडेमे रख्खा है बंदर,
वैसेच मेरे भागूभाई है मेरे कलेजेके अंदर!’
एक नंबरची आळशी म्हणून रुक्मिणी सगळ्यांनाच माहीत. ती नाव घ्यायला चालढकल करतेय असं वाटताच विनयानं टोकलं तिला,
‘ए, आळस सोड, नाव घे.’
मग रुक्मिणी सरसावली,
‘महादेवाला बेल, विष्णूला तुळस,
विठ्ठलाचं नाव घ्यायला कसला हो आळस?’
खाऊनपिऊन ऊतू जाणारी म्हणजेच खायापित्या घरची गरगरीत यशोदा हसतमुख होती. स्वत:चं हेल्थी आकारमान जाणून होती. ती गालातल्या गालात हसून म्हणाली,
‘करीत होते वेणीफणी, समोर होता आयना,
शिरपतरावांनी मिठी मारली, पर मी त्यांत मावंना!’
हे ऐकल्यावर वात्रट अन थट्टेखोर नववधूंना स्फुरणच चढलं. सगळ्याच जणी त्यात दंग झाल्या होत्या. वेळेचं भान राह्य़लं नव्हतं. पण तेवढय़ात घरचे मालकच घरात परतल्याची चाहूल मालकिणीला लागली. आता या साऱ्या वात्रट मत्रिणींनी सुज्ञपणे घरी जावं हे कसं सूचित करावं बाई? तेव्हा, खासदारीणबाई चलाखपणे शेवटचा उखाणा घेती झाली,
‘चांदीचं पातेलं, पातेल्यात ठेवलाय खवा,
खासदारसाहेब घरी आले, आता तुम्ही जावा!’
माझ्या मनात एक विचार आला तो मला सांगितलाच पाहिजे. पुरुषांचा असा नाव घेण्याचा उखाण्यांचा कार्यक्रम ठेवला तर? आजही बहुतेक घरोघरी प्रत्येक नवऱ्याचा एकच उखाणा ठरलेला असतो. तो म्हणजे, भाजीत भाजी मेथीची. हा उखाणा करणारा मेथीप्रेमी असणार नक्की. नाहीतर लग्नाच्या पंचपक्वान्नांच्या पंगतीत कडू मेथीची आठवण, तीही तरुणपणी, कशाला हवी? की भावी संसारसुखाची भविष्यदर्शक असा कडू मेथीचा सिम्बॉलिक उल्लेख असतो?
असो, असो, असो.
आता मी पुरे करते, बोलत नाही अती
चला तुमची रजा घेते, आनंदची जयमती!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा