उषाताईंना किडनीच्या आजारामुळे रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता त्यांच्या चेकअपसाठी नेफ्रॉलॉजिस्ट (किडनी विकारतज्ज्ञ) डॉ. ओक आले. त्या वेळी त्या डोळे मिटून निपचित पडल्या होत्या. डॉक्टरांनी चौकशी केली. ‘केव्हापासून याच स्थितीत आहेत?’ नर्सने उत्तर दिले, ‘सकाळी ७ वाजल्यापासून.’
डॉक्टरांनी उषाताईंचे डोळे उघडून पाहिले. बुब्बुळं नियंत्रणात नव्हती. त्यांनी हात हातात घेतले आणि हळूच सोडून दिले. हात धाडकन खाली आले. डॉक्टरांनी त्यांच्या हाताला चिमटे काढले, पायाच्या तळव्यांना खाजविले. गुदगुल्या करण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद मिळेना. डॉक्टरांनी नर्सकडे पाहिले. उषाताईंची कन्या-सून हजर होतीच. या सर्वाकडे डॉक्टरांनी एकदा नजर टाकली आणि ते निघून गेले. पाठोपाठ नर्सही गेली.
पाच-सात मिनिटांनंतर डॉक्टर परतले. त्यांनी उषाताईंच्या हजर असलेल्या नातेवाईकांना एकत्र बोलाविले, म्हणाले, ‘हे पाहा! लपवून ठेवण्यासारखे काही नाही. ताईंची नाडी स्लो झाली आहे. त्यांचा मेंदूवरचा ताबा गेलाय आणि श्वासोच्छ्वास घेण्यासही त्रास होत आहे. थोडक्यात त्या कोमामध्ये गेल्या आहेत. यावर एक उपाय म्हणजे त्यांना ‘आय.सी.यू’मध्ये अॅडमिट करणे आणि व्हेंटिलेटरवर ठेवणे.
‘पण डॉक्टर.. एकदम हे कसे झाले?’.. भाऊसाहेब.
‘ते सांगण्यात आता वेळ घालवूया नको. परिस्थिती लक्षात घ्या. रुग्ण मिनिटा-मिनिटाला सीरियस होत चाललाय?’ डॉक्टर म्हणाले.
‘मग काय करूया?’ मुलगा बिपिन.
‘त्यांना या रुग्णालयातून हलवायला पाहिजे. कारण येथे ‘आय.सी.यू.’मध्ये कॉट् रिकामी नाही. शिवाय या हॉस्पिटलात व्हेंटिलेटर मशीन नाही. त्या दोन्ही सोई जेथे असतील तेथे त्यांना अॅडमिट करायला पाहिजे.
‘डॉक्टर व्हेंटिलेटर म्हणजे आर्टिफिशियल ना?.. बिपिनची शंका.
‘होय! श्वासोच्छ्वास घेता येत नाही म्हणून कृत्रिम देणे. या सर्वासाठी खर्चही तसाच येणार. तुमच्या ओळखीचे कुठले हॉस्पिटल, नर्सिग होम असेल तर सांगा. मात्र त्यांच्याकडे आय.सी.यू. विथ व्हेंटिलेटर असलेच पाहिजे?’ डॉक्टर.
‘डॉक्टरसाहेब, आम्ही आयत्या वेळी कुठे पाहणार?’ बिपिन.
‘मग मी २/३ ठिकाणी फोन करतो. मिळाली तर डिपॉझिट व इतर फॅसिलिटी घेण्यासाठी पैशाची सोय हवी. ती सोय आहे ना?’ डॉक्टरांची शंका.
‘पण डॉक्टर, अंदाजे किती लागतील?’ भाऊसाहेब
‘ते मी कसे सांगणार? पण सुरुवातीला अॅडमिट होताना कमीत कमी ५० हजार तरी हवेत. तेही कॅशमध्ये.’ डॉक्टरांची स्पष्टोक्ती.
भाऊसाहेबांच्या डोळ्यासमोर जवळ जवळ अंधारच पसरला. त्यांनी मुलाकडे बिपिनकडे पाहिले. मुलीकडे पाहिले. या दोघांकडेच पुढील जबाबदारी होती, पण त्यांचा आवाका भाऊसाहेबांना माहीत होता. त्यांनी स्वत:ला सावरले. डॉक्टरांना म्हणाले, ‘डॉक्टरसाहेब! मी कुटुंबप्रमुख आहे. (उषाताईकडे पाहात) हिने आणि मी जवळ जवळ ४० वर्षे संसार केला. संघर्ष केला. दिवस चांगले म्हणण्यापेक्षा बरे आले. आम्ही दोघेही समाधानी आहोत. गेले वर्षभर भरपूर उपाय व उपचार पण आयुष्याची दोरी जेवढी असते, तितकीच ती असणार आहे. हिचे आयुष्य एवढेच आहे, अशी आम्ही समजूत करून घेतलीय. पुढचं जे काही व्हायचं असेल ते होऊ दे! अगदी शांतपणे आम्ही सहन करण्याचा प्रयत्न करू, पण आता पुढचा खर्च नको. तो पेलणे शक्य नाही. आमची आर्थिक ताकद संपलीय आता.’ भाऊसाहेबांनी बिपिन व मुलीकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला.
डॉक्टरांनी चमकून भाऊसाहेबांकडे पाहिले आणि सहजपणे त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘बघा साहेब! तुम्ही म्हणता ते मला पटतंय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण केलं आणि शेवटी व्हायचं ते झाले, अस समजूया. पण तुमच्या मनाला काही दिवसांनी एक प्रश्न पुन:पुन्हा त्रास देणार. तो प्रश्न म्हणजे, अरे डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आय.सी.यू. आणि व्हेंटिलेटरची सोय केली असती तर कदाचित ही वाचू शकली असती. थोडा खर्च आला असता. आतापर्यंत थोडा का खर्च आला? तो आपण केला ना! मग आणखीन खर्च केला असता तर, उषा घरीही येऊ शकली असती. या प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर नाही. तेव्हा मी तुम्हास परवडेल असे एखादे नर्सिग होम पाहतो. जेथे आय.सी.यू. व व्हेंटिलेटर आहे. बिपिन आणि ताई तुमचं काय म्हणणं आहे?’ डॉक्टरांनी मुलांकडे पाहात विचारले.
बिपिनने बहिणीकडे पाहिले. दोघांनीही असाहाय्यपणे माना डोलावल्या आणि डॉक्टरांना ओके म्हणून मानेनेच खुणावले. डॉक्टरांनी मोबाइलवरूनच दुसरीकडे कशी सोय होईल याची चौकशी सुरू केली. दरम्यान, भाऊसाहेब मुलांच्या जवळ आले. त्यांनी दोघांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘बघा! आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. मी माझा निर्णय घेतलाय.’
एवढय़ात डॉक्टर लगबगीने आले आणि म्हणाले, ‘चला तुम्हाला परवडेल अशी एक सोय झालीय. नर्सिग होम लहान आहे, पण त्यांच्याकडे व्हेंटिलेटर आहे. डिपॉझिटची सोय लवकरात लवकर करा. तोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिशनचं पाहतो.’
दरम्यान, डिस्चार्ज घेण्यापूर्वी या रुग्णालयाचे बिल पूर्ण करायचं होतं. त्यासाठी बिपिनची धावपळ सुरू होती. बिपिन बिलच्या काऊंटरपाशी गेला. तेथे त्याला २५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. बिपिनने भाऊसाहेबांकडे पाहिले. ते म्हणाले, ‘ठीक आहे, माझ्याकडे ५० हजार आहेत. येथे २५ हजार भर. उरलेले त्या नर्सिग होममध्ये अॅडमिट होताना भरू. बाकी पुढचे पुढे पाहू.’
..आणि उषाताईला आय.सी.यू. व व्हेंटिलेटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये नव्याने अॅडमिट झाल्या तेव्हा त्या कोमातच होत्या. प्रकृतीत काहीच फरक नव्हता. फक्त व्हेंटिलेटरमुळे श्वासोच्छ्वास सुरू होता. एवढेच.
असे दोन दिवस गेले. हॉस्पिटलमध्ये २५-२५-२५ हजार रुपयांच्या टप्प्याने डिपॉझिट भरणे सुरूच होते. तिसऱ्या दिवशी मात्र भाऊसाहेबांनी धीर सोडला. त्यांना राहवेना. त्यांनी दोन्ही मुलांना, सुनेला जवळ बोलावले. दोघांच्याही खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, ‘आपण सर्वानी भरपूर मेहनत घेतली. नाही! नाही! म्हणत असतानादेखील व्हेंटिलेटपर्यंत मजल मारली. पण तिचे वय लक्षात घेता यापुढे ती आणखीन काही सहन करील असे वाटत नाही. कारण व्हेंटिलेटरमधून बॅक आऊट होण्याचे प्रमाण फारच थोडे असते आणि यदाकदाचित कुणी बरे झालेच तर पुढे नको ते विकार, साइड इफेक्ट उद्भवतात. कुणाची स्मृती जाते. कुणाला अॅटॅक येतो. कुणाला पॅरालिसिस होतो. कुणाला काय? आणि कुणाला काय? तेव्हा बॅक आऊट होण्याऐवजी येथून आऊट होणेच योग्य होईल.’ भाऊसाहेबांना पुढचा अंदाज आला होता..
इतक्यात नर्स धावतच आली आणि भाऊसाहेबांकडे पाहात ती म्हणाली, ‘व्हेंटिलेटरवर तुमचाच पेशंट होता नां! सीरियस झालाय!’ ..
chaturang@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा