एका बाजूला स्त्रीने गृहकृत्यदक्ष असावे, अशी अपेक्षा केली जात असतानाच तिला – ‘स्त्रीला ऋतुदर्शन झाल्यानंतर तीन वर्षे विवाह झाला नाही तर तिने स्वयंवर करावं. मुलीच्या पसंतीनेच नवरा करावा. योग्य वर मिळत नसेल तर कन्या अविवाहित ठेवावी.’ यासारखे विवाहविषयक सल्लेही मासिकातून मिळत होते हे उल्लेखनीय.
स्त्रियांनी लेखन सुरू केले तरी, सुरुवातीला  लेखन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण मोजकेच होते. त्यामुळे वैचारिक मंथनाची गरज अद्याप संपली नव्हती. वैयक्तिक, सामाजिक आणि पर्यायाने सांस्कृतिक स्थितीचाही कायापालट सुरू झाला होता. परंपरागत जीवनदृष्टी, धार्मिकतेचा पगडा, त्याच दृष्टीतून व्यक्तीकडे, स्त्रियांकडे बघण्याची भूमिका, माणसाचे जीवन नियंत्रित करणाऱ्या रूढी, परंपरा या सगळय़ांतूनच जनमानसाला नवीन युगाचे भान देण्याची धडपड वृत्तपत्र, नियतकालिकांच्या मदतीने होत होती.
साहजिकच स्त्रियांचेसुद्धा मानसिक, भावनिक उद्बोधन आवश्यक होते. एक व्यक्ती म्हणून स्त्रीला स्वत:ची जाणीव करून द्यायची होती. स्त्रियांना सामाजिक दडपणाच्या कोषातून बाहेर पडण्यासाठी प्रेरित करायचे होते. तसेच समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठीसुद्धा स्त्रियांविषयी नवीन जाणीव द्यायची होती. यासारख्या दिशांनी स्त्रियांचे मानसिक उद्बोधन सातत्याने एकाच वेळी अनेक प्रकारे करण्याकडे संपादकांचा कटाक्ष होता.
स्त्रियांनी सुगृहिणी व्हावे. माता, पत्नी, गृहिणीची कर्तव्ये नीट पार पाडावीत. संसारात दक्ष असावे म्हणून ‘सुबोध’, ‘रीतीने वागावे’,‘गृहिणी व तिची लक्षणे’ यांसारखी सदरे बहुतेक प्रत्येक मासिकात तेव्हा असायचीच. स्त्रियांनी शिक्षण घ्यावे, हे जितक्या आग्रहाने सांगितले जायचे तितकेच ‘मुलीने सासरी कसे वागावे’ याविषयीसुद्धा मार्गदर्शन होतेच. शिक्षणाने मुलींचे लक्ष संसारावरून विचलित होऊ नये यासाठी सर्व धडपड होती. परंतु सुगृहिणी होण्यासाठीसुद्धा विद्येची गरज आहे, हे संपादक सांगायला विसरत नव्हते.
  ‘‘पतीच्या सेवेत तत्पर असावे
    सौख्य ते लाभावे अनुपम
    बाळकाशी बोध कराया झटावे
     दयेने वागावे सेवकांसी
करिती ज्या स्त्रिया आचरण ऐसे
सुख वसतसे त्यांचे घरी!
यासारखा उपदेश आणि ‘स्त्रियांचे उद्योग’ सारख्या विषयात – जसे बाहेरील कामास विद्येचे अगत्य पडते. तसेच घरातील कामातही पडते. पैसा मिळविण्यास जसा विचार व बुद्धी लागते. तशी त्यांची अवस्था राखण्यासाठी लागते. इतकेच नाही तर त्यांस घरातील, मुलांबाळांची देखरेख अधिक ठेवावी लागते आणि ती चांगल्या प्रकारे ठेवण्यास विद्येची फार गरज आहे. असा विचारही पाठोपाठ व्यक्त केला जाई. स्त्री शिक्षण चंद्रिका मासिकाने ‘गृहव्यवस्था’ काटकसरीचे महत्त्व यासारखे लेख प्रसिद्ध केले. गृहिणींना तीन महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. १) प्रत्येक काम वेळच्या वेळी करावे. २) प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवावी. ३) प्रत्येक पदार्थाचा योग्य उपयोग व्हावा. अर्थात या सूचना आजही महत्त्वाच्या आहेतच.
स्त्रियांना उपदेश करीत असताना स्त्रियांच्या अधिकाराची स्त्रियांच्या श्रेष्ठतेची जाणीवही करून दिली जात होती. हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. ‘अबला मित्र’मध्ये ‘स्त्रियांचे अधिकार’ या शीर्षकासाठी वेदकाळात स्त्रियांना कोणते अधिकार होते. स्त्रियांना सामाजिक दृष्टीने प्रतिष्ठा कशी होती. स्त्रियांना स्वातंत्र्य विशेषत: विवाहाच्या संदर्भात कसे होते. याविषयी सविस्तर माहिती दिली होती. स्त्रीच्या विवाहाच्या संदर्भातील माहिती फारच महत्त्वाची ठरते- ‘‘विवाहापूर्वी स्त्रीला ऋतुदर्शन झाल्यास त्यानंतर तीन वर्षे विवाह झाला नाही तर स्त्रीने स्वयंवर करावं. वधूवरांच्या पसंतीने विवाह करावा. मुलीला पसंत नसेल तर वर सोडून द्यावा. आपल्याला आवडेल तो नवरा करून घेण्याचा स्त्रियांना हक्क आहे. योग्य वर मिळत नसेल तर कन्या अविवाहित ठेवावी. पण अयोग्य वराला देऊ नये. तसेच आपल्याला आवडलेली मुलगी मुलाच्या गळय़ात बांधू नये.
बदलत्या काळाप्रमाणे मुली विशेषत: सुनांकडे समाजाने जुन्या पारंपरिक नजरेने बघू नये. फक्त घरकामात त्यांना गुंतवून ठेवू नये. पतीने पत्नीचा आदर करावा. तिची योग्यता जाणून पत्नीला शिकवून शहाणे होण्यास मदत करावी. या नवविचारांचा उपदेशही परोपरीने केला जाई. ‘स्नुषापालन’, ‘सासवांना उपदेश’, ‘भ्रताराला उपदेश’,‘पैशासाठी मुलींना विकू नये म्हणून मुलींच्या वडिलांना उपदेश’ अशा माहितीवजा लेखातून सगळय़ांनाच उपदेशाचे डोस सतत पाजले जात. ‘‘स्त्रीने रीतीने वागावे तर पुरुषानेही स्त्रीला गुलामाप्रमाणे किंवा घरगुती नोकराप्रमाणे वागवू नये. एकाने गरिबीने तर दुसऱ्याने उद्धटपणे वागून फार दिवस चालणार नाही.’’ असा इशाराही एके ठिकाणी दिला आहे.
‘स्त्रियांशी सर्वथा नीच मानू नका हो
तयां लागी काही नसे न्यूनता हो।
बळे त्रासुनी त्यांशी गांजू नका हो।
मनापासुनी त्याशी संतोषया हो।
  सासरी असो किंवा माहेरी स्त्रियांचे जीवन अनेक बंधनांमध्ये बंदिस्त होतेच. सासरी गेल्यावर तर तोंड दाबूनच जीवन जगणे भाग होते. अशा वातावरणात स्त्रियांनी कसे शिकावे? तर स्त्रीकडे, तिच्या सासरच्या जीवनाकडे डोळे उघडून मोकळय़ा मनाने बघावे. सासूने सूनेकडे मुलीप्रमाणे बघावे. असा विचार ‘सुमित्र’मध्ये १९५५-५६ मध्ये व्यक्त होत होता. काळाच्या पडद्यावर विचारांतील प्रगत, आधुनिकता विचारात घेण्यासारखी आहे.
‘मुलीने सासरी कसे वागावे’ या लेखात मुलींना सासरी ‘सहा सुऱ्या’ सहन कराव्या लागतात. अशी कल्पना करून लेखक पुढे लिहितात- ‘‘खरोखर सुऱ्या नसल्या म्हणून काय झाले? दिवसभर तिला दु:खकारक शब्दांचे घाव सोसावे लागत असले तर खरोखरच्या सुऱ्यांमध्ये आणि दु:खकारक शब्दांमध्ये अंतर ते काय? सासू-सासरा-दीर-नणंदा आणि जावा यांच्यापासून जे शब्द निघतात त्यांनाच सुऱ्या असे म्हणतात आणि त्या ठिकाणी जाऊन राहणे हेच सासुरे.’’
‘सासवांचा उपदेश’ या लेखात लेखक सूचना देतो. ‘तुमच्या मनांतून जर तुम्हांस म्हातारपणी सुख हवे असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या मुलींना जपता व त्यांची माया करता त्याप्रमाणे तुम्ही आपल्या सुनांवर करीत जा.. त्या लहान असताना जसे तुम्ही त्यांना सुख द्याल किंवा दु:ख द्याल त्याप्रमाणे पुढे तुम्हांस त्यापासून सुख किंवा दु:ख प्राप्त होईल. ‘दोन दिवस सासूचे, दोन दिवस सुनेचे’ याचा अर्थ काय बरे असेल? तुम्हांस माहीत असून डोळय़ांवर पदर का ओढता?
 स्त्री-शिक्षण, समाजसुधारणा या कल्पनांनी समाज भारावला असला तरी समाजात, कौटुंबिक जीवनाच्या स्तरावर नव्या-जुन्याचा संघर्ष चालू होताच. सुधारक विरुद्ध सनातनी असे द्वंद्व समाजात होतेच. त्यामुळेच लेखक, संपादकांनासुद्धा या द्वंद्वाची झळ पोचत असे. क्वचित द्विधा मन:स्थिती व्यक्त होई. त्यातूनच नव्या-जुन्याच्या संघर्षांतून जाणाऱ्या समाज वास्तवाचे दर्शन घडते. ‘अबला मित्र’ मासिकात ‘संयोगिता’चा परिचय करून देताना तिच्या सती जाण्याच्या प्रसंगापाशी लेखक काहीसा घुटमळताना दिसतो. ‘सती जाण्याची चाल दुष्ट व क्रूर समजून सरकारने बंद केली हे चांगलेच झाले. परंतु पतिप्रेमाची परीक्षा कशी कडकडीत होत असे. हे या चालीवरून समजते,’’ असे लिहून लेखन समारोप करताना लिहितो ‘‘असो. शेवटी संयोगितेप्रमाणे आपल्या पतीस संकटात व विपत्तीत धैर्य द्यावे. संतोष वृत्तीने वागून त्याची आपल्यावर कृपा होईल. असे वर्तन ठेवावे.. हेच कुलीन स्त्रियांचे भूषण व कर्तव्य होय. ’’
स्त्रियांना शिक्षण हवेच. परंतु ते गृहकृत्यापुरते मर्यादित. तसेच इंग्रजी भाषा स्त्रियांना शिकवण्याची गरज नाही. असाही विचार क्वचित व्यक्त होई. ‘अबला मित्र’चे संपादक १८७६ मध्ये लिहितात, ‘स्त्रियांना जे शिक्षण द्यायचे ते विशेषत: संसारसंबंधात सुखकारक व आवश्यक गोष्टींचे दिले पाहिजे.’ परंतु इंग्रजी शिक्षणाविषयी ते म्हणतात, ‘सुलभ परिचयातील अशी मराठी भाषा असूनही ती किंवा संस्कृत भाषा सोडून अन्य भाषेच्या योगाने वरील हेतू सिद्धीस नेण्यास झटणे म्हणजे आपले डोळे शाबूत असतानाही दुसऱ्याच्या डोळय़ाने एखादी वस्तू पाहण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. इंग्रजी शिक्षणातून स्त्री-शिक्षणाचा हेतू साधणे हा द्राविडी प्राणायाम आहे!’
यासारखे अधूनमधून व्यक्त होणारे विचार हा व्यक्तीचा दोष नसून काळाचा महिमा, प्रभाव होता. (अर्थातच या सर्व प्रयत्नांना स्त्रियांनी प्रतिसाद देण्यास लवकरच सुरुवात केली.) तरीही सामाजिक बदलांची चिन्हे ही काळाच्या पडद्यावर उमटत होतीच. स्त्रिया विचार करू लागल्या. स्त्रियांची संवेदनशीलता जागी झाली आणि पत्रव्यवहारातून स्त्रिया प्रतिसाद देऊ लागल्या. स्त्रीमनातील अनेक गाठी मोकळ्या होऊ लागल्या.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा