‘‘मला हे मान्य नाही. मी नाही हे लग्न करणार. अमोल तू काहीच कसं बोलत नाहीस? तुझं आणि माझं ठरलं होतं ना की आपल्या लग्नाचा खर्च निम्मा निम्मा करायचा. मग आता ..’’
रविवारची सकाळ होती. खरं तर नमिता खुशीत होती. तिच्या भावी नवऱ्याला अमोलला ३-४ वेळा भेटली होती ती. आणि तिला तो एकदम आवडला होता. तिच्या सगळ्या अपेक्षांमध्ये तो अगदी फिट्ट बसला होता. त्यानंतर आज त्याचे आई-वडील आणि काही नातेवाईक लग्नाची बोलणी करण्यासाठी आले होते. तिचं म्हणणं होतं, ‘इतर नातेवाईक कशासाठी? जे आहेत ते आई-वडील आणि तो. फार तर त्याचा मोठा भाऊ यांनीच फक्त ठरवायला काय हरकत आहे? पण अमोल म्हणाला होता, ‘‘अगं असू दे. त्यानं काय फरक पडतो? नंतर आपणच आहोत ना!’’
बोलता बोलता लग्नाची बोलणी सुरू झाली. अमोलचे मोठे काका म्हणाले, ‘‘प्रथेप्रमाणे लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच करायचा आहे. शिवाय फोटोचा खर्चपण येईलच त्यात. आणि..’’ त्याचे काका अनेक गोष्टींची त्यात भरच घालत गेले.
हे ऐकल्यावर नमिता अवाक् झाली. आधीच तिचं आणि अमोलचं या बाबतीत बोलणं झालं होतं. आणि त्यानं ते मान्यही केलं होतं. तिनं अपेक्षेने अमोलकडे पाहिलं. पण अमोलने मान खाली घातली होती. काय समजायचं ते नमिता समजून चुकली. ती म्हणाली, ‘‘मुलगी शिकलेली पाहिजे, नोकरीही करणारी हवी आणि शिवाय लग्नाचा खर्चही सगळा आम्हीच करायचा? मला हे अजिबात पटत नाही.’’ आणि तिनं ते लग्न मोडल्याचं जाहीर केलं.
०
लग्न साजरं करणं, लग्नाचा मोठ्ठा सोहळा करणं या प्रकाराचं मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. आठ-आठ दिवस लग्न साजरं करणं, त्यासाठी मोठाले हॉल भाडय़ाने घेणं, मेहेंदीसाठी स्वतंत्र हॉल, शिवाय त्या दिवशी संगीत, घरचं केळवण, ग्रहशांतीची पूजा, लग्नाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन आणि मग लग्न असा भरगच्च आठवडय़ाचा कार्यक्रम म्हणजे लग्न, असा एक समज मोठय़ा प्रमाणावर रुजत चालला आहे असं दिसून येतं. अशा प्रकारच्या लग्नसोहळ्यात काय प्रतीचं समाधान मिळत असेल, हा विचार करण्यासारखा प्रश्न. खूप लोकांना जेवू-खाऊ घालणं यातला आनंद मी समजू शकते. पण सजावटीवरचा खर्च अनेकदा लाखोंच्या घरात जाताना दिसतो.
त्यातून जेव्हा हा खर्च किंवा या तऱ्हेचं लग्न ‘बाय चॉइस’ असेल तर तेही ठीक आहे, पण जेव्हा हा खर्च लादला जातो तेव्हा मात्र वधूपित्याची अवस्था गंभीर होते. मुलीच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज फेडण्यातच उरलेलं आयुष्य संपून जातं.
किती तरी वेळा असंही दिसतं की, लग्न साधेपणानं करावं, असा आग्रही सूर लावणारी मुलं-मुली कमी नाहीत पण अनेकदा याबाबतीत आई-वडील आणि त्यांचे पाल्य यांच्यात एकमत होताना दिसून येत नाही. आर्यनच्याच घरातला हा संवाद पाहा-
‘‘आम्ही लग्न करतोय हे अख्ख्या जगाला सांगायची काय गरज आहे? आपली अगदी घरातली माणसं आणि तिच्या घरातली माणसं आणि आम्हा दोघांचे जवळचे मित्र-मत्रिणी असा जास्तीत जास्त शंभर माणसांचा गोतावळा असावा. माझ्या लग्नामध्ये मला नाही एन्जॉय करता आलं तर काय उपयोग आहे? परत ही माणसं कधी भेटत नाहीत, इतकंच काय दिसतसुद्धा नाहीत. ज्यांना मी आवडतो अशीच माणसं माझ्या लग्नाला यावीत असं ठामपणाने वाटतं मला. आणि माझ्या लग्नाचा खर्च मला करायचा आहे. मला तो खर्च तिच्या बाबांच्या अंगावर नाही टाकायचा. मला इतकाच खर्च जमणार आहे करायला. सजावटीचा खर्च मला वाया गेल्यासारखा वाटतो. त्यापेक्षा ते पसे आमच्या पुढच्या आयुष्यासाठी ठेवायचे आहेत.’’ इति आर्यन.
‘‘अरे आपल्या घरातलं हे पहिलंच कार्य. आणि तू तर आमचा एकुलता एक मुलगा. परत इतक्यात काही व्हायचं नाही घरात. आणि लग्न एकदाच तर होत असतं. खूप वर्षांत कुणाला बोलावलं नाहीये घरी,’’ आर्यनचे बाबा.
‘‘अरे कसली दळभद्री लक्षणं ही तुझी! अरे माझी हौस नको का व्हायला? मला मिरवण्याची संधी कशी मिळणार? आणि तिचे आई-बाबा करायला तयार आहेत. ही परंपराच आहे. मुलीचा जन्म झाला त्याच वेळेपासून सुज्ञ आई-वडील साठवायला लागतात पसे मुलीच्या लग्नासाठी,’ आर्यनची आई.
सध्या प्रत्येक गोष्टीचा सोहळा करायची, सेलिब्रेशन करायची चुकीची प्रथा पडत चालली आहे. मुलींच्या साडय़ा, शरारा, मुलांच्या शेरवानी-सुरवार आदी कपडे यांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. मांडवशोभा म्हणून काय काय गोष्टी करायच्या यावर विचार करण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.
लग्न एकदाच होणार आहे असं म्हणत म्हणत अनेक अनावश्यक गोष्टी केल्या जातात. खूप महागाच्या साडय़ा घेतल्या जातात. आणि नंतर त्या नेसायची वेळही फारशी येत नाही.
निमंत्रणपत्रिका, फोटोचे मोठे मोठे अल्बम्स, व्हिडीओ शूटिंग या सगळ्यासाठी अनेक लाख रुपये खर्च होताना दिसतात. हौसेला मोल नाही हेच खरं.
काही वर्षांपूर्वीपर्यंत मेकअप ही फक्त मुलींची – वधूंची मक्तेदारी होती. पण आता मात्र ती वधू आणि तिच्या घरातल्या एक २०-२५ बायका सगळ्या जणींना सजवायला ब्यूटी पार्लरच सज्ज असतं. इतकंच नाही तर त्याची तयारी साखरपुडय़ापासून सुरू असते. आणि आता मेक-अप करण्यात मुलंही अजिबात मागे नाहीत. आता त्यांनाही सजवायला ब्यूटीपार्लरवाले तत्पर असतात. आणि त्याचाही खर्च अनेक हजारांमध्ये असतो.
१९७५ च्या सुमारास स्त्रीमुक्ती चळवळीने जोर धरला होता. नंतरच्या काही वर्षांमध्ये लग्न झाल्यावर माहेरच्या घरातून सासरी जाताना काहीही न्यायचे नाही, अशी एक प्रथा त्या वेळच्या लग्नेच्छू मुलींमध्ये रुजली होती. कमीत कमी खर्चात लग्न करायचे, अशीही धारणा त्या काळी होती. हळूहळू काळ बदलत गेला. मात्र लग्नाचा खर्च मुलीच्या आई-वडिलांनीच करायचा या प्रथेमध्ये फारसा बदल झालेला दिसून येत नाही. आजही अनेक सुशिक्षित घरांमध्येदेखील लग्नाचा खर्च मुलीच्या आई-वडिलांनी करायचा ही प्रथा पाळली जात आहे.
‘लग्नाची बैठक’ बसते तेव्हा बिनदिक्कतपणे, ‘आमची ५०० माणसं जेवायला असतील. आणि बाकी काही म्हणणंच नाही आमचं, पण आमच्या इभ्रतीला साजेसं लग्न करून द्या, म्हणजे झालं,’ असं बिनदिक्कतपणे वरपक्षवाले कसं सांगू शकतात? असा मला प्रश्न पडतो.
आम्ही घेतलेल्या एका कार्यशाळेमध्ये या विषयावर मुलं-मुलींना आपली मतं मांडायला सांगितली तेव्हा इथेही पालकांचा पगडा फार मोठय़ा प्रमाणावर असलेला दिसून आला. आणि काही प्रमाणात तर मुलं स्वत:ची सोय पाहतात असं दिसून आलं. अंकित म्हणाला, ‘‘प्रथेप्रमाणे तिच्या वडिलांनी खर्च केला तर आम्हाला हनिमूनसाठी परदेशी जाता येऊ शकतं.’’
त्यावर सरिता, रुचा अशा काही मुलींनी टीकेची झोड उठवली. आज मध्यमवर्गात आणि उच्चमध्यमवर्गात तरी मुलं आणि मुलीही भरपूर पसे मिळवतात. अशा वेळी स्वत:च्या लग्नाचा किमानपक्षी अर्धा खर्च तरी करायला काय हरकत आहे?
बदलत्या काळात नवीन आयुष्य सुरू करताना कुणाच्याच आई-वडिलांना इतकं खर्चात टाकायला नको. हा विचार पुढे यायला हवा. या काळात निम्मा निम्मा खर्च करायची प्रथा रुजायला हवी आणि त्यासाठी लग्नेच्छू मुलामुलींनी पुढाकार घ्यायलाच हवा.
chaitragaur@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा