नचिकेत क्षिरे
आपले प्रश्न मित्राला सांगणं आणि मैत्रिणीला सांगणं यात खूप फरक आहे. अनेकदा मित्र ते ऐकूनही न घेता उडवून लावतो, पण मैत्रीण मात्र काळजीपूर्वक ऐकते. त्या क्षणी ‘त्याला’ तेवढंच तर हवं असतं. घट्ट मैत्रीण अशीच असते. फार अपेक्षा न ठेवणारी, अगदी तो तिचा वाढदिवस विसरला तरी फक्त शिव्या घालून मोकळी होणारी. मुख्य म्हणजे अशी मैत्रीण, जिचं त्याच्या आयुष्यात असणं बायकोनं स्वीकारलेलं असणारी.. काय आहे या मैत्रीतलं चुंबकत्व?
‘‘कोणत्या सिनेमाला गेली आहे रे?’’ माझ्या मैत्रिणीचं ‘स्टेटस’ बघत बायकोनं विचारलं. नेमका माझ्याही हातात मोबाइल होता आणि मीपण तेच ‘स्टेटस’ पाहत असल्यामुळे मला प्रश्न कशाबद्दल आहे ते लगेच कळलं. ‘‘माहिती नाही बुवा!’’ मी उत्तर दिलं. ‘‘का? आज बोलणं झालं नाही वाटतं?’’ आवाजात जरा तिरसट स्वर असला, तरी त्यात कुठलाही द्वेष वा मत्सर नव्हता हे मला नक्की माहिती होतं.. कारण बायकोचा मूळ स्वभावच असा आहे, की ती आयुष्यात कोणाचाही द्वेष किंवा मत्सर करत नाही.
एका संध्याकाळी बराच वेळ मैत्रिणीशी गप्पा रंगल्या होत्या. तास-सव्वा तास फोन झाल्यावर गॅलरीतून घरात आलो, तेव्हा आईनं रोखून बघत म्हटलं, ‘‘लग्न, मुलं झाली तरी कशाला हवी रे मैत्रीण? इतका वेळ काय बोलायचं? बायको आहे ना घरी?’’ तिच्या वयाच्या मानानं ती खूप पुढारलेली असूनही तिनं हा प्रश्न विचारला! ‘सिलसिला’ आणि ‘कुछ कुछ होता हैं’ या दोन सिनेमांच्या दरम्यान जन्म झालेली आमची पिढी. शाळेत असताना मुलींशी साधं बोलायलाही जमायचं नाही. जरा कोणी मुलींशी जास्त बोलताना दिसलं, की आमच्या परिसरात अशा मुलांना ‘बायल्या’ म्हणून चिडवायचे. पुढे कॉलेजमध्ये याच्या उलट झालं. तेव्हा संधी मिळालीही आणि मुलींशी बोलायला आवडूही लागलं. अर्थात ते आवडणं वेगळया अर्थानं होतं. त्यात अद्याप निखळ मैत्रीचे भाव नव्हते. अजूनही मुलांना मित्र आणि मुलींना मैत्रिणी अशीच परंपरा होती. मोठया शहरातले काही ठरावीक भाग याला नक्कीच अपवाद होते, पण एकंदरीत भारतात अजून परिस्थिती बदललेली नव्हती. फरक झाला समाजमाध्यमं आल्यावर. शाळेतली, कॉलेजमधली परिचित मुलं-मुली ‘ऑनलाइन’ भेटायला लागली. त्यात फायदा असा झाला, की समोरासमोर बोलायची लाज वाटणाऱ्यांना आता ऑनलाइन बिनासंकोच बोलता येऊ लागलं. त्यातच समाजातसुद्धा लहान मुलांमध्ये मित्र-मैत्रिणी हा भेद कमी होऊन मुलं-मुली एकत्र खेळणं, बागडणं सुरू झालं होतं. या सगळयाचा परिणाम होऊन माझ्या पिढीतल्या लोकांतही मुलांना मैत्रिणी आणि मुलींना मित्र मिळायला लागले.
हेही वाचा : ‘भय’भूती : भीती माणसांचीच!
मला असं वाटतं, की मैत्री किती जुनी आहे, यापेक्षा ती कोणत्या परिस्थितीत झाली, यावर ती किती घट्ट होईल, हे ठरतं. मी आणि माझी मैत्रीण एकमेकांना खूप आधीपासून ओळखत असलो, तरी आम्ही जवळ अशा वेळी आलो, जेव्हा आम्ही दोघंही आयुष्यातल्या अत्यंत अवघड परिस्थितीतून जात होतो. दोघंही दु:खात असलो, तरी एकमेकांना रडगाणं ऐकवण्यापेक्षा आमच्या अनेकविध विषयांवर गप्पा व्हायच्या. आणि कदाचित त्याचमुळे आमचं नातं फुलत गेलं, कारण बोलायला विषयांची कमतरता कधीच नव्हती. आमची ‘लाँग डिस्टन्स फ्रेंडशिप’ होती, त्यामुळे मोबाइल फोन हे संपर्काचं एकमेव साधन होतं. रात्री उशिरापर्यंत गप्पा, दिवसाही मधून मधून बोलणं, असं सारखं व्हायचं. आमच्या त्या अवघड परिस्थितीतून दोघंही स्वतंत्रपणे, पण सुखरूप बाहेर आलो. आता आम्ही समदु:खी नव्हतो, पण तरीही आमच्या नात्यात कुठलाही दुरावा आला नाही. उलट नातं आणखीनच
घट्ट झालं.
‘लग्न, मुलं झाली तरी कशाला हवी रे मैत्रीण? इतका वेळ काय बोलायचं असतं? बायको आहे ना घरी?’ या आईच्या प्रश्नाला मी तेव्हा काहीच उत्तर दिलं नव्हतं.. पण अशा अनेक गोष्टी असतात, ज्या थेट बायकोशी किंवा नवऱ्याशी बोलल्या तर त्यांना ताण येऊ शकतो, कदाचित ते थोडी विपरीत प्रतिक्रिया देतील याची आपल्याला भीती असते. एक उदाहरण देतो- माझ्या मैत्रिणीला एकदा एका माणसानं चुकीच्या पद्धतीनं अॅलप्रोच केलं होतं. बोलण्याच्या नादात तिला तेव्हा ते समजलं नाही, पण नंतर लक्षात आल्यावर ती घाबरली. आपण काहीच चुकीचं बोललो नाही, पण त्या व्यक्तीनं ते रेकॉर्ड करून त्याचा गैरफायदा घेतला तर काय होईल? अशी तिला भीती वाटायला लागली. काय होऊ शकतं, याची पडताळणी करण्यासाठी तिनं आधी मला फोन लावला. काय करायला हवं, काय नको, यावर आमची बरीच चर्चा झाल्यावर ती जरा शांत झाली. नंतर तिनं तिच्या नवऱ्याला सगळं काही सांगितलं. एकदा माझ्या ‘एक्स’ बायकोशी माझं खूप जोरात भांडण झालं होतं, त्या वेळी मन मोकळं करण्यासाठी मी याच मैत्रिणीला फोन केला. त्या गोष्टी, त्या क्षणी मी बायकोला सांगितल्या असत्या, तर कदाचित तिला त्याचा त्रास झाला असता. अर्थात काही वेळानं मी शांत झाल्यावर बायकोला सगळं सांगितलंच. काही गोष्टी अशा असतात, ज्या त्या क्षणी तरी जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगणं जास्त योग्य असतं.
हेही वाचा : इतिश्री : ‘आईगिरी’चं ‘बेबीसिटिंग’
मग प्रश्न येतो, हा मित्र मुलगा असू शकतो ना! आपलं लग्न झाल्यावर दुसऱ्या मुलीशी का एवढी जवळीक?.. मला तरी काही गोष्टी मी मैत्रिणीकडेच बोलू शकतो असं वाटतं. मुलांच्या मूळ स्वभावामुळे त्यांच्याजवळ अशा गोष्टी बोललो तर ते थेट शिव्याच घालतील अशी माझी समजूत आहे.. कदाचित ती चुकीचीही असेल, पण मला तसं वाटतं. एखादी गोष्ट त्या क्षणी विसरायची असेल, तर मी मित्रांशी बोलतो. त्यांच्या शिव्या, ‘जाऊ दे ना बे!’ अशी वाक्यं, यांमुळे क्षणात दु:ख, ताण, भीती दूर पळते. पण काही घटना अशा असतात की त्यातून फक्त क्षणिक मुक्ती नको असते. अशा वेळी मला व्यक्त व्हायचं असेल, तर मी मैत्रिणीशी बोलतो. व्यक्त होण्यासाठी त्यापेक्षा दुसरी योग्य जागा मला अजून सापडलेली नाही.
एवढी जवळीक असल्यावर तिच्याबद्दल वेगळे विचार न येणं, शारीरिक आकर्षण न वाटणं हे शक्य आहे?.. मला वाटतं हे अशक्य आहे. मी एक मुलगा आहे आणि ती मुलगी. त्यामुळे आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. पण आपल्याला आपल्या सीमा माहिती असल्या, आपण त्यावर ठाम असलो, की अशा नात्यांमध्ये गुंतागुंत न होता निखळ मैत्रीचं नातं टिकून राहतं. माझ्या आजूबाजूला मी अनेक असे लोक बघितले आहेत, जे मैत्रीच्या नावाखाली अनेक गोष्टी करतात. त्यांना त्यात कदाचित काही वावगं वाटत नसेल.. पण त्यांचे संसार एका नाजूक धाग्यावर लटकलेले असतात, तो धागा कधीही तुटण्याची शक्यता असते. ‘ती दोघं घरी न सांगताच फिरायला जातात, सिनेमाला जातात,’ असं काहीबाही कोणी दुसऱ्या कोणाबद्दल सांगितलं, की मला आमच्या मैत्रीचा खूप अभिमान वाटतो. ‘आमच्यात शारीरिक संबंध नाहीत. मग लपून भेटण्याला बायकोला धोका दिला असं कसं म्हणायचं?’ असं मी काही जणांकडून ऐकतो. आपल्या बायकोचा/ नवऱ्याचा आपल्यावर खूप विश्वास असतो. हल्ली आपल्या सगळयांना आपल्या ‘लाइफ पार्टनर’कडून स्वातंत्र्य मिळालेलं असतं. त्या स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराचारात होऊ नये,असं मला तरी वाटतं. बाकी सगळे लोक सुज्ञ आहेत.
हेही वाचा : माझं ‘सीझर’ होईल का डॉक्टर?
जर क्वचित कधी अचानक माझ्या बायकोनं माझा मोबाईल फोन मागितला आणि मी तिला तो दिला नाही, ज्या दिवशी मला माझ्या ‘चॅट’ डिलीट कराव्याशा वाटतील, त्या दिवशी माझं खूप काही तरी चुकतं आहे, हे मला कळायला हवं. आमच्या मैत्रीत या सीमा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. मी तिच्या नवऱ्यासमोर आणि ती माझ्या बायकोसमोर अगदी मनमोकळया गप्पा करू शकते. काहीही लपवण्यासारखं आमच्यात नव्हतं आणि नसेल.
आता असा प्रश्न येतो, की मग एवढं सगळं करण्यापेक्षा आपल्या बायकोला किंवा नवऱ्यालाच आपला मित्र/ मैत्रीण का बनवू नये?.. (या विषयावर आम्ही ‘सिमेंटिंग वेडिंग विथ मॅरेज’ हा पॉडकास्ट केला होता. तो युटय़ूबवर उपलब्ध आहे.) हल्ली मुली म्हणतात, ‘मला नवरा अगदी मित्रासारखा हवा’. लीना परांजपे या एक ‘मॅरेज कोच’ आहेत, त्या ठामपणे सांगतात, ‘बायको ही बायकोच असते, तुमची सख्खी मैत्रीण नाही. नवरा हा नवराच असतो, तुमचा बेस्ट फ्रेंड नाही!’ हे वाक्य आताच्या मॉडर्न जगात वादग्रस्त होऊ शकेल, पण यामागचं कारण बघू या- दोन माणसं जेव्हा लग्न करतात, ते आपल्याला सोबत संसार करायचा आहे हे ठरवून करतात. त्यात दोघांच्या एकमेकांकडून काही अपेक्षा असतात. अशा अपेक्षा मित्र-मैत्रिणीत असतातच असं नाही. याचंही एक उदाहरण- मैत्रिणाचा वाढदिवस आहे आणि मित्र तो विसरला. मैत्रीण काय करेल? तर मला असं वाटतं, ती मित्राला फोन करून दोन शिव्या घालेल आणि त्याला ताबडतोब भेटायला बोलावेल. इथे जर नवरा बायकोचा वाढदिवस किंवा इतर कोणता महत्त्वाचा दिवस विसरला, तर तिची प्रतिक्रिया काय असेल? ‘नवरा मित्रच आहे,’ असं मानून, त्याला फोनवर शिव्या घालेल, की रुसून-फुगून बसेल? तिचं रुसणं स्वाभाविक आहे, कारण आपल्या नवऱ्याकडून/ बायकोकडून अपेक्षा असतात आणि असायलाच हव्यात. त्यामुळे लग्नाच्या सुरुवातीला- किमान १०-१५ वर्ष तरी एकमेकांचे मित्र बनण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, असं लीना परांजपे स्पष्टपणे सांगतात आणि मला ते पटतं. एकदा तुमचं नवरा-बायको म्हणून नातं खूप छान फुललं, तुम्ही एकमेकांवर नि:स्वार्थ प्रेम करायला लागलात, की नवरा-बायको एकमेकांचे ‘बेस्ट फ्रेंड्स’ नक्कीच होऊ शकतात.
हेही वाचा : चांदणे शिंपीत जाशी..
या सगळयांमुळेच मी आणि माझी मैत्रीण, आमच्यात घट्ट मैत्र आहे. दोघांचे स्वभाव भिन्न आहेत. माझ्या डोक्यात स्पष्टता असते, तिच्या डोक्यात अजिबात नाही. ती ‘आउटगोइंग’ आहे, मी तेवढा नाही. अशा अनेक गोष्टी भिन्न असल्या, तरी मित्र चुंबकासारखेच असतात! विरुद्ध बाजू एकमेकांना आकर्षित करतात, तसंच आमचं आहे. आम्ही एकमेकांना ‘कॉम्प्लिमेंट’ करतो.
तर असं आहे आमचं मैत्रीपुराण! लग्नानंतरही पुरुषाला मैत्रीण आणि स्त्रीला मित्र असू शकतात आणि त्यांची मैत्री अगदी निखळ असू शकते, यावर माझा विश्वास आहे. तुमचं काय म्हणणं?..
nkshire@gmail.com
‘लडका-लडकी कभी दोस्त नही बन सकते’, हा हिंदी चित्रपटातला टिपिकल डायलॉग. तो काळाच्या कसोटीवर टिकलाय, की आजच्या पिढीनं तो चुकीचा ठरवलाय? पुरुष वाचकहो, तुम्ही सांगायचंय! आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंसं वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंसं वाटलंय? अर्थात भिन्निलगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? महत्त्वाचं, या सदरात फक्त पुरुषांनीच आणि तेही आपल्या मैत्रिणीविषयी, त्या नात्याविषयी मनमोकळेपणानं लिहिणं अपेक्षित आहे. आम्हाला पाठवा ते अनुभव तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह ५०० किंवा १००० शब्दांत. आमच्या ईमेलवर – chaturang.loksatta@gmail.com