मयूर आडकर
अनेकांची लहानपणापासून मैत्री असते. मुलगामुलगी यातला भेद समजायच्या आत झालेली ही मैत्री निखळ, निरागसच असते अनेकदा. मात्र नात्यांच्या पलीकडे जात त्यातला स्नेह सातत्याने जपावा लागतो. वेळ आली तर मैत्रिणीचं ‘माहेर’ही व्हावं लागतं.

‘‘अण्णा गेला, पप्पा गेले आणि आता आईसुद्धा, आता मला माहेरच उरलं नाही रे!’’ अश्विनीचं हे वाक्य माझ्या मनाला अनंत यातना देणारं होतं. तसंही मुलींचे लग्नापूर्वीचे निखळ, निरागस हट्ट,अधिकार गाजवण्याचे दिवस लग्नानंतर कमी-अधिक प्रमाणात अनेक कारणांनी हळूहळू संपतच जातात, पण आयुष्यातील त्या रंगीबेरंगी दिवसांच्या आठवणी पुन्हा जगण्यासाठी माहेर आणि माहेरची माणसं असतात, पण जेव्हा तीच उरली नाहीत तर?

shrikant pangarkar
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश; ‘या’ पदावर केली नियुक्ती!
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : सच्ची साथसोबत
Raj thackeray Mamledar misal, Raj thackeray Thane,
राज यांच्या ‘चवदार’ भेटीत कार्यकर्त्यांची मने मात्र कडू !
Accusation between BJP and Thackeray group over 37 acre plot Mumbai
भाजप, ठाकरे गट यांच्यात आरोपप्रत्यारोप; ३७ एकरच्या भूखंडावर शिवसेनेचा डोळा- शेलार
ulta chashma
उलटा चष्मा: ‘पुन्हा संधी’ नकोच!
Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
Union Minister Muralidhar Mohol friend visit in Kolhapur pune news
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…

अश्विनी गवंडी, माझी लहानपणापासूनची मैत्रीण. आजही मी तिला त्याच नावानं, पिंकी म्हणूनच हाक मारतो. माझ्यापेक्षा ती एक वर्षाने लहान. भांडुपच्या ‘भगवती निवास’मधली शेजारी. आम्हा दोघांच्या आई सख्ख्या शेजारी आणि मैत्रिणी. कांजूरमार्गच्या ‘जीवन विकास शाळे’त मी मोठ्या शिशु वर्गात होतो, तेव्हा ती छोट्या वर्गात होती. शाळेत जाताना माझी आई आम्हा दोघांना सोडायची आणि न्यायला अश्विनीची आई यायची. ‘‘चालताना हात अजिबात सोडायचा नाही, इथे-तिथे दुकानांकडे बघत न जाता, नाकासमोर सरळ चाला, असा आदेश दोघींचाही असायचा, पण आम्ही ते कधी फारसं मनावर घेतलं नाही. शाळा ते घर हा रोजचा पंचवीस मिनिटांचा पायी प्रवास म्हणजे आमच्यासाठी धमाल मस्तीचा असायचा. आजही आठवला तरी खळखळून हसायला येतं.

हेही वाचा : जेंडर बजेटिंग : विनियोगावर ठरणार यशापयश!

माझे वडील प्रचंड शिस्तीचे, तर तिचे वडील शिघ्रकोपी, पण ते दोघेही आमचे लाड करायचे. शाळेत जाणं असो, एकत्र अभ्यास करणं, खेळणं आणि गप्पा मारणं असो आम्ही दोघं कायम सोबत. शाळेत जाताना, ‘आज डब्यात काय आणलंय?’ हे विचारून आम्ही मधल्या सुट्टीत एकमेकांच्या वर्गात जाऊन आमच्याकडे असलेला खाऊ एकमेकांना द्यायचो. आमच्या डब्यांची ही देवाणघेवाण अनेकांसाठी मत्सराचा विषय होता. एकदा मात्र आमच्या परबबाई मला रागावल्या, ‘‘शाळेत असताना तिला पिंकी-पिंकी नको करू, तिचं नाव अश्विनी आहे. अश्विनीच हाक मार’’, असा प्रेमळ दम दिला. तसंही माझं ऐकून काही मुलं तिला ‘पिंकी-पिंकी’ करत चिडवायचे, मग मी तिला शाळेत ‘अश्विनी’ आणि घरी ‘पिंकी’ असा ऑन-ऑफ होऊन हाक मारायचो. तशा मला मैत्रिणी खूप होत्या, पण अश्विनी माझी सगळ्यांत जवळची आणि पहिली मैत्रीण. मी पाचवीत गेलो. शाळा सकाळची झाली. गवंडी कुटुंब भगवती निवासमधलं घर विकून कांजूरमार्गला मोठ्या घरात राहायला गेलं, पण साथ सुटली नव्हती. कारण, त्यांचं घर शाळेच्या अगदी बाजूलाच मुख्य रस्त्यावर होतं. अश्विनी चौथीत असल्याने तिची शाळा दुपारची असायची. पण मी मात्र मधल्या सुट्टीत खाऊ खायला त्यांच्याच घरी जायचो. तिची आई फार प्रेमळ. ती वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊचे डबे भरून ठेवायची. त्यामुळे एकत्रित असणं कायम होतं. अश्विनी, तिचा भाऊ नरेश (अण्णा), माझी दोन्ही भावंडं, आमच्यात खूप चांगली मैत्री होती. इतकंच नव्हे, तर आमचे दोन्हीकडचे नातेवाईकही एकमेकांना चांगले ओळखत असत. आम्ही वयानं वाढलो, तरी आमचं वागणं-बोलणं आजही निरागस, निखळ आणि मोकळं-ढाकळं आहे. अश्विनी पहिल्यापासूनच फार बडबडी. एखादी गोष्ट तिला कळली की, सगळीकडे पसरलीच म्हणून समजायचं. पण, मी शाळेत मार खाल्ल्यापासून ते माझ्या अनेक उचापतींबाबत तिने कधीच तिच्या वा माझ्या घरी कळू दिलं नव्हतं.

एकदा शाळेत विज्ञानाची प्रयोगवही आणली नाही म्हणून मला वर्गाबाहेर ओणवं उभं केलं होतं. पायाला-पाठीला रग लागली की, उभं राहणं साहजिकच असतं, ते करू नये आणि केलं तर लगेच कळावं म्हणून पाठीवर लाकडी फूटपट्टी ठेवली होती. अश्विनीनं तिच्या वर्गातून मला पाहिलं होतं. आता ही गोष्ट घरी कळणार आणि बाबांचा मार खावा लागणार, हे नक्की होतं. दुपारी घरी येऊन तातडीनं अभ्यास पूर्ण केला. संध्याकाळी खेळून घरी आलो, जेवलो, झोपायची वेळ झाली. तरीही घरचं वातावरण शांत होतं. मला दिलासा वाटला. दुसऱ्या दिवशी शाळेत अश्विनी भेटली. तिच्याशी नजर भिडवण्याची माझी हिंमत नव्हती, पण काल घडलेल्या प्रकाराची वाच्यता तिनं कुठे केली नसल्याचं लक्षात आलं. घरी माझी इज्जत कायम होती. त्यामुळे मी तिला ‘थँक्यू’ म्हणणार इतक्यात तीच म्हणाली, ‘‘शिंदे सर असेच आहेत, शिस्तीचे. जे ते सांगतात ते करत जा म्हणजे शिक्षा देणार नाहीत!’’ तक्रार करण्याऐवजी मला तिनं समजून घेतलं, ही बाब मला सुखावून गेली. माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर वाढला.

हेही वाचा : सेंद्रिय तांदळाचा शाश्वत सुगंध!

एकूणच गवंडी कुटुंब दिवाळी खूप जोरदार साजरी करायचं. फटाके, कपडे आणि खेळण्यांची चंगळ असायची. राहायला आम्ही दूर असलो तरी अनेक रविवार आणि सुट्टीच्या काळात अश्विनी खेळायला घरी यायची. तिथं शेजारी खेळायला-बोलायला समवयस्क कुणी नव्हतं. दर दिवाळीला ती मुबलक फटाके आणि फराळ घेऊन यायची. मग आम्ही त्यांचे-आमचे फटाके एकत्र करून फोडायचो. मला मनुके आवडत असल्याने मी फराळातल्या लाडूवरच्या मनुका तेवढा वेचून खायचो. ‘‘आता तो लाडू कोण खाणार?’’ असं रागवत, तो लाडू अर्धा-अर्धा करून आम्ही खायचो. अगदी अलीकडेपर्यंत आमच्यातील फराळाची देवघेव कायम होती. मे महिन्यात गावाहून आल्यावर शेंगदाण्याचा लाडू, मालवणी खाजा घेऊन यायची. इतकंच नाही, तर जवळ राहत असताना तिला वाढलेलं जेवणाचं ताट घेऊन जेवायला आमच्याचकडे यायची आणि मग आम्ही एकत्र जेवायचो.

एकदा तिच्या एका मैत्रिणीचं प्रेमप्रकरण तिच्या घरी कळल्यावर, त्या मैत्रिणीच्या आईने हिलाच जबाबदार धरलं. तेव्हा मी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिलो. त्यामुळे पुढे फार काही घडलं नाही. माझी दहावी पूर्ण झाली. तेव्हा शाळेपेक्षा अश्विनीचं घर सुटल्याचं मला जास्त वाईट वाटलं. तिची अखंड बडबड, विनोद सांगणं आणि त्यानंतरच्या सात मजली हास्यापासून मी दुरावलो होतो. कॉलेज आणि अभ्यासाच्या कसरतीत त्यांच्याकडे येणं-जाणं कमी झालं. तेव्हा आतासारखी संपर्क यंत्रणा नव्हती. टेलिफोन होते, पण तेही बिल जास्त येण्याच्या धास्तीने गप्पा वगैरे मारता येत नव्हत्या. अश्विनीची भेट व्हायची ती कधी तरी सोमवारच्या बाजारात किंवा गणेशोत्सवात. आमच्या दोघांच्या घरी गणपती यायचे. तुमचं डेकोरेशन-आमचं डेकोरेशन अशा चढाओढीच्या गप्पा व्हायच्या. मी बी.कॉम. झालो. नोकरीच्या शोधात होतो. तेव्हा अश्विनीची आई, तिच्या लग्नाची बातमी घेऊन घरी आली. ‘‘मुलगा चांगला आहे, सरकारी नोकरीत आहे, इतकं चांगलं स्थळ का सोडा, म्हणून लगेच होकार कळवला.’’ माझी आईसुद्धा ‘हो’ ला ‘हो’ करत होती. पण, मला मात्र हे लग्न खूप लवकर होत आहे, असं वाटलं. त्याला इलाज नव्हता, कारण तिच्या आई-पप्पांमध्ये सतत भांडणे होत होती. त्यामुळे मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त व्हावं, असं तिच्या आईला वाटणं स्वाभाविक होतं. अश्विनी केळवणाला आली तेव्हा लग्न ठरल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. कपडे-दागिने मज्जाच मज्जा…या सगळ्यांत ती खूप खूश होती. लग्नानंतर ती नवऱ्यासोबत आमच्या घरी आली. गजानन खोत अतिशय आस्तिक व प्रेमळ माणूस. त्या कुटुंबाशी जुजबी ओळख होतीच. आता संपूर्ण खोत कुटुंबही आमचे चांगले स्नेही झाले. अश्विनीचं सासर माझ्या घराजवळच असल्यानं सर्व उत्सवांना, कार्यक्रमांना खोत कुटुंब यायचं. तेव्हा तिची भेट व्हायची. ती सासुरवाशीण आहे, हे ती आणि मी दोघेही विसरायचो आणि आमचा बालपणातला तोच अल्लड बडबडीचा कार्यक्रम सुरू व्हायचा. आमच्या मैत्रीचं बालिश रूप आम्ही आजही सोडलेलं नाही. त्या मैत्रीला कोणतंही दुसरं रूप नाही. आम्ही भेटतो-बोलतो तेव्हा आम्ही तेच लहानपणीचे अश्विनी आणि मयूर असतो.

हेही वाचा : माझं मैत्रीण होणं!

गेल्या वर्षी आमच्या ‘जीवन विकास शाळे’च्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे एकत्रित स्नेहसंमेलन झालं. बऱ्याच काळाने तिथे अश्विनी भेटली. सर्वांच्या एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय? या गप्पा सुरू असताना, आम्ही दोघे मात्र आमच्या नेहमीच्या मूडमध्ये खिदळत होतो. बऱ्याच वर्षांनी भेटल्यावरही आम्ही पूर्वीसारख्याच गप्पा मारत होतो. अनेकांना आमच्याकडे पाहून आश्चर्य वाटलं.

बालपणीचा काळ सुखाचा…तो खरंच सुखाचा काळ होता. आर्थिक स्थिती जेमतेम असली, तरी सुखाची श्रीमंती होती. मनमोकळं वातावरण होतं. कुणीही कुणाच्याही घरी पूर्वपरवानगीशिवाय यायचं-जायचं. खेळण्यावर बंधन नव्हतं अन् कोणीच अभ्यासाला जुंपलेलं नव्हतं. सण-उत्सवप्रसंगी भेटीगाठीवर भर असायचा. पाहुणे-रावळे यायचे. एकूण सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण सार्वजनिक कार्यक्रमातून व्हायची. आता तंत्रज्ञानामुळे संपर्क साधनं वाढली, संवाद सहज होऊ लागलाय. स्त्री-पुरुष मैत्रीला स्वीकारलं जातं, पण वेळेची उणीव आणि एकाकीपण वाढलंय. स्त्री-पुरुष मैत्रीला एकांगी दृष्टिकोनातून पाहिले जाणाऱ्या त्या काळात आमची मैत्री बहरली ती आजतागायत.

मी कांजूरमार्ग-भांडुप सोडून डोंबिवलीत स्थिरावल्याला आता १५ वर्षं झाली, पण अनेक उत्सव व कार्यक्रमांमुळे अनेकांसोबत असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. अश्विनीला दोन मुलं आहेत. मोठा पदवीधर होऊन फोटोग्राफर म्हणून काम करतो आहे, तर धाकटा पदवीचे शिक्षण घेत आहे. दहा वर्षांपूर्वी अण्णा- तिचा भाऊ एकाएकी वारला. करोना काळात पप्पा गेले. आणि गेल्या महिन्यात तिची आईही गेली. आपली प्रेमळ माणसं अशी सोडून जातात, तेव्हा मनाला खूप यातना होतात. पण, इथे तर अश्विनीचं संपूर्ण माहेरच संपलं होतं. त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मी तिला भेटायला गेलो तेव्हा कधी नव्हे इतकी अश्विनी गंभीर झाली होती. आपण पोरके झाल्याच्या धक्क्यातून तिला सावरता येत नव्हतं. तिचे पती आणि सासर उत्तम आहे, पण शेवटी माहेर ते माहेर असतं.

हेही वाचा : सांधा बदलताना : मन करा रे थोर!

आज आम्ही प्रौढत्वाच्या टप्प्यावर आहोत. आजवर आमच्या मैत्रीला आम्ही, आणि अगदी शाळेत किंवा चाळीत कुणीच कुठलंच लेबल लावलं नाही. पण आज मात्र मी या मैत्रीला वेगळ्या रूपात पाहातोय. आता मी अश्विनीचा मित्र तर आहेच, पण ‘माहेरही’ आहे.

mayuradkar@gmail.com