यतीन कार्येकर

ती आणि मी. आम्ही एकमेकांचे मित्र-मैत्रीण आहोत का? हा लेख बहुधा त्याचाच शोध असेल. ती माझ्यापेक्षा एक्झॅक्टली सात वर्षांनी लहान आहे. तिला मी पहिल्यांदा पाहिलं ते पिनाफोरममध्ये. दोन वेण्या रिबिनीने वर बांधलेली, पायात सॉक्स आणि गुलाबी बूट घालून आमच्या बॅडमिंटन खेळण्यात लुडबुडणारी मुलगी म्हणून. माझी मावसबहीण क्षमाच्या सोसायटीच्या अंगणात आम्ही खेळत असायचो. त्या वेळी ही मध्ये मध्ये येऊन ‘मलाही खेळायला घ्या’ सांगायची. मग तिच्या हातात आम्ही एक प्लॅस्टिकची बॅट आणि फूल द्यायचो. तिच्याशी थोडं खेळायचो, ती थोडक्यात खूश व्हायची आणि आमचा खेळ पुन्हा सुरू व्हायचा.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
Pankit Thakker and his wife Prachi Thakker divorce
प्रसिद्ध अभिनेत्याचा २४ वर्षांचा संसार मोडला, २१ व्या वर्षी वयाने मोठ्या अभिनेत्रीशी कुटुंबियांचा विरोध पत्करून केलेलं लग्न
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Vanita Kharat
“माझा एक बॉयफ्रेंड होता…”, वनिता खरात ९०च्या दशकातील आवडत्या गाण्याचा किस्सा सांगत म्हणाली…
Actor Pankaj Tripathi statement about theatre Mumbai news
रंगभूमी हेच अभिनयाचे मूळ; अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे ठाम प्रतिपादन

पुढे आम्ही कॉलेजात जाऊ लागलो. मग खेळही बंद झाला आणि तिचं भेटणंही. मी बी.एस्सी. किंवा एम.एस्सी.च्या पहिल्या वर्षाला असेन. नाटकांत काम करायचो. चेतन दातार, केदार पंडित आमचा एक ग्रुप होता. यूथ फेस्टिव्हल, उन्मेष, आय.एन.टी. आदी स्पर्धांत आमचं ‘रुपारेल’ जोरात असायचं. त्यात मी गोरा, घारा असल्याने कॉलेजातल्या मुलींत जरा स्टार होतो. नेहमी अवतीभवती काही जणी असायच्या. त्यात एक दिवस एक मुलगी खूप उत्सुकतेनं आली. आमची पूर्वीची ओळख असल्यासारखं हसली. मीही हसलो. तिनं मला विचारलं, ‘‘ओळखलं का?’’ मला ती आठवतच नव्हती. तिनं वेगवेगळी कोडी घातली, अखेर हताश होऊन ती म्हणाली, ‘‘अरे, मी कीर्ती, कीर्ती भेंडे.’’ ट्यूब पेटली.

हेही वाचा : ईतिश्री : थोडीसी बेवफाई?

‘‘ओह, तू क्षमाच्या बिल्डिंगमधली ती चिमुकली!’’
‘‘येस!’’ तिचा चेहरा आनंदला.
ती आपसूकच आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये सामील झाली. ती मुळातच कलाकार घराण्यातली. तिच्या वडिलांचा त्या काळात गाजणारा ऑर्केस्ट्रा होता, ‘यादों की मेहफील’. कीर्तीला हे जग माहिती होतं, पण समजलं नव्हतं. ती बुजरी होती, पण तिला सर्व गोष्टींत उत्सुकता असे. नाटकाच्या ग्रुपमध्ये सुरुवातीला तिला सारे जण छळायचे. कधी कधी चेष्टा-मस्करीही करायचे. तिची बाजू फक्त आम्ही दोघं म्हणजे मी आणि चेतन घ्यायचो. तिला घरून नाटक वगैरेत काम करायची परवानगी एकाच अटीवर मिळाली होती. रात्री उशीर झाला, तर कोणीतरी तिला घरी सोडायचं. वडिलांनी तशी अट घातल्यावर कीर्तीने माझ्याकडे बघितलं. मी मान डोलावली. त्यानंतर अगदी माझं एम.एस.सी. झाल्यानंतरही जोवर ती विविध उपक्रमांत भाग घ्यायची तोवर तिला रात्री तालमी झाल्यानंतर किंवा प्रयोग संपल्यानंतर मी माझ्या बाइकवरून घरी सोडायचो. नुसतं घराखाली नाही, तर दुसऱ्या मजल्यावरच्या तिच्या घरात तिच्या आई-वडिलांच्या हाती सुपूर्द करायचो. तिला न सांगता मी तिचा ‘प्रोटेक्टर’ झालो. आमच्यात ‘कम्फर्ट झोन’ तयार झाला होता. तो आमच्यातल्या काहींना खटकत असे, पण आम्हाला त्याचं फारसं काही वाटत नसे. नंतर केव्हा तरी तिनं सांगितलं की, आजूबाजूचे, मित्र-मैत्रिणी तिला सांगत की, यतीनपासून लांब राहा, पण तिनं ते कधी मनावर घेतलं नाही.

कीर्तीचा आत्मविश्वास हळूहळू वाढत गेला. माझं काही चुकलं तर ती ते स्पष्टपणे सांगू लागली. कधी कधी माझ्या मित्र-मैत्रिणींबद्दल ती आमच्यातल्या वयाचा आडपडदा न ठेवता कॉमेंट करू लागली. माझी एखाद्या मैत्रिणीची निवड चुकली तर ती थेट सांगायची, ‘‘या मुलीपासून सांभाळ हं!’’ अशा वेळी ती माझी ‘प्रोटेक्टर’ व्हायची, न सांगताच.

हेही वाचा : ‘ती’ च्या भोवती : विस्तारलेल्या आईपणाचा प्रत्यय!

पाचेक वर्षांत माझं नाटक, मालिका, चित्रपटांतलं काम वाढत गेलं. ‘रुपारेल’ला जाणं थांबलं. जो तो आपापल्या जगण्याच्या प्रवाहात वाहू लागला. ज्याचा त्याचा प्रवाह ज्याला त्याला सापडत गेला. कीर्तीला तिचा प्रवाह सापडला असावा. नंतर एकदा मी शितळादेवी मंदिरासमोरून चालत जात असताना अचानक जोरात हाक आली, ‘‘यतीऽन.’’ स्कूटीवरून भरधाव जाणाऱ्या दोन मुली थांबल्या. त्यातली एक कीर्ती, दुसरी मानसी केळकर. ज्या रस्त्यावरून मी तिला घरी सोडत असे त्याच रस्त्यावर ती भेटली. मध्ये अनेक वर्षं लोटली होती. एखाद्या स्वल्पविरामासारखी ती गॅप होती. आपलं आयुष्य ही तशी स्वल्पविरामांची मालिकाच असते. तसं एक स्वल्पविराम घेऊन आम्ही तिथं भर उन्हात तासभर गप्पा मारत थांबलो. ती एका बंगाली मुलाच्या, अनुपम घटकच्या प्रेमात पडली. त्याच्याशी तिचं लग्न झालं होतं. ती एका बांधकाम क्षेत्रातील कंपनीत अकाउंट्स विभागात काम करत होती. तिला एक मुलगा झाला होता. असं सारं सारं कळलं.

मध्ये परत काही वर्षं गेली. अचानक माझा मोबाइल किणकिणला. पलीकडून जोरात उत्साहभरला आवाज आला, ‘‘अरे मित्रा, तू औरंगजेब करतोयस. जबरदस्तच!’’ तिचा बोलण्याचा धबधबा सुरू झाला… ‘‘औरंगजेबची भूमिका करताना तू हे वाच, ते वाच. औरंगजेब असा होता, तसा होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तो असा विचार करायचा’’. बोलता बोलता तिनं पुस्तकांची एक लांबलचक यादीच सांगितली. मी दबकून गेलो. ही पिनाफोरमधली मुलगी मला औरंगजेबबद्दलची धडाधडा माहिती देतेय! मी तिला थांबवत म्हणालो, ‘‘कीर्ती, मला पुस्तक वाचायला फारसं आवडत नाही. तूच आता ही जी माहिती दिलीस ती मला शांतपणे समजावून सांग. किंबहुना ही सगळी पुस्तकं तूच वाच आणि मला औरंगजेब शिकव. हेमंत देवधर, विजय राणे मालिकेत माझ्याकडून काय करायचं ते करवून घेतील, तू मला त्याचं अंतरंग उलगडून दाखव’’. मी हे म्हटलं खरं आणि आमच्या मैत्रीखातर तिनं ते लगेच मान्यही केलं. नुसतं वरवरचं नाही, तर दुसऱ्या दिवशी पुस्तकांच्या दुकानात गेली. स्वत:च्या पैशांनी काही पुस्तकं विकत आणली. आतेभावानं दिलेलं जदुनाथ सरकारांचं पुस्तकही अभ्यासलं. या सगळ्यांची माहिती आधी स्वत: करून घेतली आणि मग मला पुरवत राहिली. माझ्या भूमिकेचा एपिसोड बघितल्यानंतर कीर्ती तिची निरीक्षणं सांगत असे. तिने दाखवून दिलेल्या बारकाव्यांमुळे माझी औरंगजेबाची भूमिका अधिकाधिक वेधक होत गेली. खलनायकाची भूमिका करत असताना खलत्वाएवढेच महत्त्व त्या खलनायकाच्या अंगी असलेल्या विविध कलागतींना असतं याची जाण तिनं नव्यानं करून दिली. औरंगजेबाची भूमिका मी चांगली केली, अशी लोकांची प्रशंसा ऐकली की त्यामागची कीर्तीची मेहनत मला आठवते. तिचं श्रेय मोठं आहे.

हेही वाचा : सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा

मी ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेनंतर ‘ताराराणी’ मालिकेत औरंगजेब केला. ‘राजा शिवछत्रपती’मधला औरंगजेब तरुण, मध्यमवयीन, ‘ताराराणी’मधला औरंगजेब हा वृद्ध, काहीसा थकलेला होता, पण आपल्या राज्यकाराभाराच्या मध्यात, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातला प्रौढ औरंगजेब मला करायला मिळाला नव्हता. डॉ. अमोल कोल्हेने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका सुरू केली. त्यात मी औरंगजेब करत नव्हतो. ती हळहळली. मला फोन केला व म्हणाली, ‘‘तुझा इगो वगैरे सोड. तू अमोलला भेट आणि त्याला सांग. मला औरंगजेब करायचाय.’’ मी काही उत्तर देईपर्यंत तिचं तेच सुरू होतं. भडकलेली कीर्ती मला म्हणाली, ‘‘मी तर चॅनेलसमोर जाऊन उपोषण करते.’’ तिला थोपवत मी सांगितलं, ‘‘अगं सगळं जमून आलं होतं, पण चॅनेलचं म्हणणं वेगळं होतं.’’ नेमकं त्याच वेळी ‘राजा शिवछत्रपती’ मालिका पुन्हा दाखवायला प्रारंभ केला होता. परिणामी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतला औरंगजेब माझ्या हातून निसटला. नंतर जेव्हाकेव्हा तिचा फोन यायचा तेव्हा तेव्हा ती हळहळत असायची.

आमच्यामधला मैत्रीचा अवरुद्ध झालेला प्रवाह या निमित्ताने पुन्हा वाहू लागला. मधल्या काळात काय काय घडत गेलं ते एकमेकांना सांगत राहिलो. आयुष्याच्या उतार-चढावाच्या आमच्या पायऱ्या आम्ही एकमेकांना सांगत गेलो. त्यातून आमची मैत्री अधिकाधिक परिपक्व आणि पक्की होत गेली.

संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात मी कृष्णाजी भटाची भूमिका केली होती. त्या भूमिकेचा पैस भन्साळींनी जसा समजावून दिला तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिक कीर्तीनं समजावून सांगितला. बाजीराव पेशव्यांना मस्तानीवरून विरोध करत असलेल्या समाजाची मानसिकता तिनं समजावून सांगितली होती. तिनं मला व्यक्ती म्हणून जवळून पाहिलंय तसंच अभिनेता म्हणूनही पाहिलं आहे. प्रत्यक्ष जीवनातलं तिचं निरीक्षण ती अशा पद्धतीनं समजावून सांगायची की, ते मला अभिनेता म्हणून उपयोगी पडायचं. तिचा माणसांचा अभ्यास दांडगा आहे, तोही अनेकदा मला भूमिका समजून सांगताना लक्षात यायचा.

लहानपणी बुजरी असलेली कीर्ती पुढे नाटकांत काम करू लागली, स्टेजवर गाऊ लागली. आर्थिक स्थैर्यासाठी नोकरी करू लागली. साध्या अकाउंटंट पदापासून बढती घेत घेत ती असिस्टंट जनरल मॅनेजर (सेल्स) पदावर पोहोचली. याचं क्रेडिट ती मला देते. सांगते, ‘‘तू मला ‘नाही’ म्हणायला शिकवलंस, दुसऱ्या कोणी आपल्याला गृहीत धरणार नाही याची काळजी घ्यायला शिकवलंस’’, पण तिच्यात मुळातच गुणवत्ता ठासून भरलेली होती. ती मला सांगे, ‘मला काहीतरी करायचं म्हणून मी दुसऱ्याचा बळी देणार नाही. माझा झेंडा उंच करण्यासाठी दुसऱ्याचा झेंडा मी कापणार नाही, तर माझा झेंडा उंच करण्याचा मी अथक प्रयत्न करीन.’ तिची ही वृत्ती आमच्यातल्या स्नेहाला घट्ट करी.

आता आम्ही नियमित भेटतो. तिचा नवरा अनुपम अफाट गुणवत्ता असलेला तालवाद्या वादक आहे. आर.डी. बर्मनचा फॅन आहे. अनेक शोज करत असतो. त्यानं एकदा आर.डीं.वर एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाला मी पाहुणा होतो. त्या वेळी कीर्तीनं बॅकस्टेजला जे काम केलं होतं. ते सारं नियोजन पाहून मी थक्क झालो. तिला म्हणालो, ‘‘नोकरी सोड आणि तू इंडस्ट्रीत उतर. तुझ्यासारख्यांची गरज आहे.’’.
‘‘शहाणाच आहेस, आम्ही घर घेतलंय, त्याचे हप्ते कोण फेडणार? सुरक्षित जॉब सोडायला मला वेड लागलंय?’’, असं म्हणाली खरी, पण ते तिनं मनावर घेतलंच. जॉब सोडला आणि ती सिनेमा इंडस्ट्रीत घुसली. मी सुचवलं असतानाही माझी कोणतीही मदत किंवा रेफरन्स न घेता कीर्तीनं स्वत:चे पाय या अनिश्चित क्षेत्रात रोवले. तिनं अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटाची इंग्रजी सबटायटल्स लिहिली. ‘नेटफ्लिक्स’वरच्या ‘माई’ या मालिकेच्या, नंतर अभिषेक बच्चनने काम केलेल्या ‘बिग बुल’च्या प्रॉडक्शनमध्ये काम केलं आणि आता ती स्वतंत्रपणे एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये साहाय्यक निर्माती आहे. एका नाजूकसाजूक मुलीचं एका ठाम व्यक्तीत रूपांतर झालेलं पाहून कौतुक वाटतं.

हेही वाचा : स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?

कीर्तीनं या क्षेत्रात यावं हा माझा आग्रह असला, तरी तिचे पाय तिने रोवले. तिनं स्वत:ला सिद्ध केलं. तसं तिचं शिक्षण बी.ए. तत्त्वज्ञान, सेल्स मार्केंटिंगमधलं एम.बी.ए. इतकं आहे, मात्र आयुष्याच्या विद्यापीठात तिनं पीएच.डी.एवढं ज्ञान कमावलंय. एके काळी छोट्या छोट्या गुलाबी बुटांमधली आमच्यामागे धावणारी कीर्ती, माझी मैत्रीण, आज आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रखर आत्मविश्वासानं वावरताना दिसते, तेव्हा तिचं कौतुक वाटतंच, पण जास्त अभिमान वाटतो.

पुरुष वाचकहो, तुम्ही मांडायचे आहेत तुमचे अनुभव! आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंसं वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंसं वाटलंय? अर्थात भिन्नलिंगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? आम्हाला सांगा. महत्त्वाचं, या सदरात फक्त पुरुषांनीच आणि तेही आपल्या मैत्रिणीविषयी, त्यांच्यातल्या नात्याविषयी मनमोकळेपणानं लिहिणं अपेक्षित आहे. आम्हाला पाठवा ते अनुभव तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह ५०० किंवा १००० शब्दांत. आमच्या ईमेलवर chaturang.loksatta@gmai
yateenkary1@gmail.com

Story img Loader