खास मैत्री कशी असावी, याचे काही ठोकताळे नसतात. ती असावी लागते, अगदी आतून. न बोलताही अनेक गोष्टी सांगून जाणारी. मनाचं दाटलं आभाळ मोकळं करणारी. वयाचं भानही न राखता वाढत जाणारी आणि वर्षांनुवर्षं न भेटता, न बोलताही सतत बहरणारी. असते का अशी मैत्रीण? गुलबकावलीच्या फुलासारखी?

‘‘नित्या, बोल जरा इकडे, ओळख कोण आहे?’’ मी पुण्याहून कर्जतला परतत होतो; वेगळेच नि महत्त्वाचे विषय डोक्यात आणि गप्पांतही सुरू होते आणि मोबाइल खिशात किणकिणला. माझा शाळामित्र दिनेश मोबाइलवर बोलत होता. ‘‘काय वैताग आहे रे, तुझा,’’ असं त्याला म्हणेपर्यंत कानावर दुसरा आवाज पडला, ‘‘वैताग काय म्हणतोस रे? मी कधी वैताग असू शकते का?’’ आवाज कानावर पडताक्षणी मी ओरडलो, ‘‘अरे, मीने, अजून जिवंत आहेस?’’ आमची बोलायची भाषा अशीच असे. जवळपास अठरा वर्षांनी मिनीचा आवाज ऐकला होता. ती तिकडून ओरडली, ‘‘मी दिन्याला म्हणालेच होते, तो माझा आवाज ओळखेलच. बघ रे, त्यानं ओळखलं मला.’’

chaturang a normal boy
सांदीत सापडलेले : एक नॉर्मल मुलगा!
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Paranoid Personality Disorder, PPD, personality disorders, behavioral patterns, mental health, psychotherapy, DSM-5, family dynamics, trust issues, mental illness, symptoms, treatment, chaturang article,
स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?
itishree is it possible to change past by travel in time machine
इतिश्री : मिठी की थप्पड?
mazhi maitrin childhood marathi news
माझी मैत्रीण: मैत्रीचं माहेरघर
Kiran Yele | International Friendship Day | male-female friendship| gender dynamics
माझं मैत्रीण होणं!
grandmother, illness, fear, chemotherapy, school, family, courage, support, childhood,
सांदीत सापडलेले: आजारपण!
children, parental conflict, emotional impact, behavior changes, household environment, school, anxiety, family dynamics, chaturang article,
सांदीत सापडलेले: भांडण

तिचा आवाज कसा विसरू शकत होतो? वयाच्या चौथ्या वर्षापासून मधली काही वर्षं वगळता दररोज तिचा आवाज ऐकायचो. तिच्या किंवा माझ्या आईनं डब्यात दिलेला पोळीचा लाडू, त्याच्या तीन फोडी करून आम्ही तिघांनी खायच्या, हे ठरलेलंच. तिसरी ऋता, माझी आत्तेबहीण. मीना आणि मी बालवाडीपासूनचे मित्र. ऋता, मी, वर्षा आणि मीना असा आमचा ग्रुप तेव्हापासून होता. मराठी मुलांची शाळा, कर्जत नं. एकमध्ये आमच्या वर्गात पाच मुली होत्या. बाकीच्या दोघी कोण ते आठवत नाही. विक्रम, गणेश, अतुल, बिपिन, दीपक, दिनेश असे त्यात नंतर अॅड होत गेले. काळाच्या ओघातही आम्ही मित्र कायम एकत्र राहिलो. पाचवीला ‘अभिनव ज्ञान मंदिर’ शाळेमध्ये गेलो, मुलींचे व मुलग्यांचे वर्ग वेगळे झाले. पण मधल्या सुट्टीत मीनाचा व माझा पोळीचा लाडू खाण्याचा कार्यक्रम सुरूच राहिला.

हेही वाचा : गर्दीच्या गारुडात गारद विवेक

मीना तिच्या आईसारखी होती, लहानपणापासूनच उंच, दीपमाळ! तिचा चेहरा आमच्या घरी गौरी येतात, त्यांच्या मुखवट्यासारखा. लांब नाक, मोठे डोळे, लांब वेणी, दाढेवर दाढ असे चार जास्त दात. सदोदित खिदळत असायची. तिच्या शाळेच्या युनिफॉर्मच्या शर्टाला पीनने रुमाल बांधलेला असायचा. आमच्यात त्या वेळी मुलगी-मुलगा भानगड नव्हती. आम्ही सारे एकत्र असायचो. टारगटपणा करण्यात अव्वल, अभ्यासात अव्वल. मीना अभ्यासात थोडी मागे असायची. पण माणसं ओळखण्यात ती पुढे असायची. सर्वाधिक दंगा तिचा. तिला तिच्या दातांवरून कोणी चिडवलं की ती भडकायची, समोरच्याला असा राग द्यायची की बस. नंतर लगेच निवळायची. निरागस चेहऱ्यानं वावरायची.

आमचं कॉलेजही एकच होतं, सीएचएम! मी सायन्सला, ती आर्ट्सला मग कधी तरी मी, दिनेश व ती कॅन्टीनमधल्या सांबारात पोळी बुडवून खायचो. दिन्या तिच्या वेण्या ओढायचा. मग आम्ही प्रॅक्टिकलला व ती तिच्या लेक्चरला जायची. नंतर तिचा आर्ट्सचा ग्रुप बनला. कॉलेज कट्टा गँगची ती सदस्य झाली. तिची गँग वेगळी आमची वेगळी. शबाना तिची मैत्रीण. शबानाबद्दल अनेकांना आकर्षण असायचं, मला त्यात रस नसायचा, कारण शबाना व आम्ही फॅमिली फ्रेंड्स. पण, सतत तिच्याबरोबर राहिल्याने मिनी आमच्यातून थोडी बाहेर गेली.

बारावीला सायन्सला नापास झाल्यावर मात्र मी कॉलेज बदललं. आर्ट्सला गेलो. अनेकांनी हिणवलं, हिणवलं नाही ते मिनीनं. ‘‘बरं झालं, तू आमच्यात आलास.’’ नापास झालेल्या पूर्वाश्रमीच्या हुशार मुलाला आधार मिळाला. काविळीमुळे परीक्षेला न बसल्याने, मिनीचीही एका वर्गात वारी झाली होती.

हेही वाचा : जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!

मी मराठी विषय निवडून विद्यापीठात नंबरात आलो. मिनीनंही मराठी विषय घेतलेला. माझा अभ्यास तयार असायचा. मला शिकवायची आवड. माझे सकाळचे तास आटोपल्यावर अनेकदा संध्याकाळी मीना, वर्षा व सीमंतिनी यांना मी शिकवायचो. एकदा अभ्यासाच्या तंद्रीत खूप उशीर झाला. वर्षूच्या आईनं विचारलं, ‘‘मीना, घरी कशी जाशील? इथंच राहा.’’ माझ्याकडे बाइक होती. म्हणालो, ‘‘मी सोडतो.’’ मीना बाइकवर बसली. ‘‘मीने, नीट धरून बस. नाहीतर अंधारात पडायचीस आणि मला कळायचं नाही.’’ तिनं दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. तिला मी तिच्या घराजवळच्या चौकात सोडलं आणि मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी ती फुणफुणत आली. म्हणाली, ‘‘ती शेजारची वहिनी भेटली होती. म्हणाली, ‘आम्ही रात्री बघितलं. कोणी तरी, कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून बाइकवरून फिरत होतं!’’ ‘‘मग काय झालं त्यात?’’

मिनी म्हणाली, ‘‘अरे, आपल्या दोघांत काहीतरी सुरू आहे, असं तिला सुचवायचं होतं…’’ अरे हो… खरं तर हे ऐकेपर्यंत आम्हाला आमची वयं वाढली आहेत, हे लक्षातही आलं नव्हतं. आणि तसं करण्याला वेगळे अर्थ असतात हेही. ‘‘फूट, खड्ड्यात जाऊ दे तिला.’’ मग मी तिला मुद्दाम दररोज बाइकवरून घरी सोडू लागलो.

पण वय वाढत होतंच, तसं काही गोष्टीही अपरिहार्यपणे घडतच होत्या. मिनीनं एक दिवस तिच्या लग्नाची पत्रिका हातात ठेवली. मी म्हणालो, ‘‘त्याच्याबरोबरच ना? की आणखी कोणी?’’ मला मीनाच्या सर्व गोष्टी माहिती असायच्या. अर्थात तिच्या सर्व गोष्टी सुरळीत होतच नसत. त्याच मित्राबरोबर १७ जून १९९० ला तिचं लग्न झालं, पण त्या वेळी तीन दिवस तुफान पाऊस पडत होता. मुंबई पाण्यात. लग्नाच्या स्थळी बाईसाहेब पोचल्यावर कळलं की, बॅगेची अदलाबदल झालीय. नवऱ्या मुलीची साडी असलेली बॅग गायब. आयत्या वेळी मामानं कुठून तरी पिवळी साडी आणली, आणि हिचं लग्न झालं. हा सगळा प्रकार नंतर कळला. पण त्या वेळी या नव्या नवरीला आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघितल्यावर मी सीमूला म्हणालो, ‘‘लग्न झाल्यावर पोरी वेगळ्याच दिसतात ना?’’ सीमूनं मिनीला हे सांगितल्यावर ती हसली, पण नंतर कधी तरी म्हणाली, ‘‘त्या रात्री मी खरंच आरशात बघितलं, तर मी मलाच वेगळी दिसले.’’

हेही वाचा : प्रगतीसाठी लिंगाधारित समानता!

तिचं लग्न झालंय, हे मी आजही कित्येकदा विसरतो. आमच्या मुंबई विद्यापीठाच्या वक्तृत्व स्पर्धांसाठी मी तिचं नाव पहिल्यांदा सुचवलं, लिहून दिलं. ही बाई स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचली- ‘‘मी परीक्षण करायला आलेय, माझं नाव मीना आगरखेड.’’ हे नाव आयोजकांकडे नव्हतं, कसं असणार? मी लिहून दिलं होतं, ‘मीना कुलकर्णी.’ तिच्या मानधनाचा चेकही त्याच नावानं तयार झाला होता. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या शिव्या मला खायला लागल्या!

एखाद्या ओल्या संध्याकाळी मी मिनीला फोन करतो, ती लगेच विचारते, ‘‘किशोर कुमार ऐकतोयस का रे? गाणं कोणतं? – जाने क्या सोचकर नही गुजरा… हेच ना?’’ किंवा मी व दिन्या एकत्र असताना फोन केल्यावर तिचा प्रश्न असायचा, ‘‘दिये जलते है – सुरू आहे का रे?’’ नेमकं तेच गाणं आम्ही ऐकत असायचो. असं कित्येकदा.

कॉलेजात असताना, जसं सारे जण कविता वगैरे करून पोरींना इंप्रेस वगैरे करायचा प्रयत्न करतात, मीही तसं करत असे. कविता बऱ्या असाव्यात असं मलाच वाटतं, कारण कित्येकदा मीना, मला त्या कवितांची आठवण करून देते व विचारते, ‘‘आता का कविता करत नाहीस? की तिला इंप्रेस करायला कविता लिहायचास?’’ मी तिला उत्तर देतो, ‘‘आता तू फारशी भेटत नाहीस ना, म्हणून कविता लिहीत नाही.’’ खरं उत्तर असतं, त्या काळातल्या कविता हा पोरकटपणा आहे, याचा मला साक्षात्कार योग्य वेळी झाला. मराठीत आज नावलौकिक मिळवून असलेले प्रज्ञा दया पवार, विलास गावडे हे माझे कॉलेजसोबती होते, परिणामी माझी जागा मला लगेच कळली.

हेही वाचा : विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

आमचा १९८९ ला एम.ए. झालेल्या मित्र-मैत्रिणींचा एक व्हॉट्सअप समूह आहे. त्या समूहात वयानं वाढलेले आम्ही सारे वय विसरून असतो. मला वादावादी करायची खुमखुमी आहे. मी वाद घातला व माझ्या अंगावर काही शेकायला लागलं, की मीना लगेच माझी बाजू घेते. मग प्रतिभा, वंदनासारख्या आमच्या मैत्रिणी ताबडतोब कॉमेंट टाकतात, ‘‘बघा, ‘बाल मैत्रीण’ मदतीला धावली.’’ माझी पीएच.डी. अनेक वर्षं रखडली होती. पद्माजा व मी, आम्ही आमचं लांबलेलं संशोधनाचं काम संपवलं व दोघे ‘डॉक्टर’ झालो. आमचा जेवायला जायचा बूट ठरला. माझं ‘लोकरंग’ मधलं ‘ये है मुंबई मेरी जान’ हे सदर लोकांना आवडलं होतं. आम्ही दादरला जेवायला जमलो. मीना सायंकाळी उशिरा कोणत्याही कारणास्तव बाहेर पडत नाही. पण माझी पीएच.डी. सेलिब्रेट करायची म्हणून ही मीरारोडवरून दादरला आली. माझ्या आईचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं, ती मला जसं ‘नीतू’ हाक मारायची तशी हाक देऊन आल्या आल्या तिनं मला घट्ट मिठी मारली. आईसाक्षात समोर उभी राहिली.

एकदा मी माझ्या कॉलेजात पोहोचल्यावर, सक्काळी सक्काळी तिला फोन केला. घेतला तिनं पण म्हणाली, ‘‘थांब जरा, कामात आहे.’’ अचानक मला चाफ्याचा वास आला. मिनीला मी परत फोन केला, ‘‘मीने, पूजा चाललीय का? पूजा करताना माझी आठवण काढलीस का?’’ ती तिकडे हैराण, नेमकं कसं यानं ओळखलं म्हणून. एखाद्या सकाळी तिचा फोन असतो, ‘‘तब्येत कशी आहे रे? काळजी घे.’’ तिनं असं सांगितल्यावर माझी औषधे मी काळजीपूर्वक घ्यायला लागतो. तिचा सिक्स्थ सेन्स जबरी आहे. त्याचा अनुभव आलाय.

माझ्या लेकांबरोबर तर तिचं खास गूळपीठ आहे. त्यानं तिच्याशी पहिल्यांदा बोलताना ‘मावशी’ अशी हाक मारली. ती खळखळून हसत त्याला म्हणाली, ‘‘बरं झालं, आत्या नाही म्हणालास!’’ त्याही पुढचं म्हणजे माझी पत्नी व मीना या ट्रेनमधल्या मैत्रिणी. दोघींची गुपितं वेगळीच असतात. दोघीही परस्परांशी काय बोलतात ते मला सांगत नाहीत आणि आम्ही दोघं काय बोलतो ते आमच्यापुरतं असतं. एकदा आम्ही तिघं ठरवून भेटलो. आमच्या आधीच मीना जिथं भेटायचं ठरलं, तिथं पोहोचली. माझी पत्नी कारमधून उतरली व त्या दोघी सरळ आत निघून गेल्या. मी पार्किंगमध्ये कार लावून, त्या दोघी ज्या जॉइंटवर बसलेल्या तिथं पोहोचलो. दोघींच्या गप्पा अशा काही सुरू झाल्या की अखेर अर्ध्या तासानंतर मी मीनावर वैतागलो- हे काय आपण तिघं आलोयत एकत्र, न् तुम्ही दोघींनी माझा पत्ता कट केलात. बायकोनं दयार्द्र नजरेनं माझ्याकडे पाहिलं, मीनानं हातावर थोडंसं थोपटलं, पुन्हा त्या दोघी शांतपणे गप्पा मारू लागल्या.

हेही वाचा : सांधा बदलताना : निवृत्तीचा काळ सुखाचा…

काहीवेळा असंही झालंय की, फोन कनेक्ट झाल्यानंतरही आम्ही बोलतोच असं नाही. मी तिला सांगतो किंवा ती मला सांगते, ‘चल, फोन ठेव आता.’ पण फोन का केला होतास हे विचारायच्या फंदात आम्ही दोघंही पडत नाही.

मीनी शालेय विद्यार्थ्यांच्या मराठीच्या खासगी शिकवण्या घेते, पण ती उत्तम समुपदेशक आहे. व्यावसायिक समुपदेशक. मला कधी एकटं वाटायला लागलं, काही प्रश्न पडले की, मी पूर्वी आईशी बोलायचो, आता मीनीशी बोलतो. तिलाही अस्वस्थ वाटायला लागलं, की तिचा फोन येतो. हितगुज होतं. दाटलं आभाळ मोकळं होतं…

एक मजेदार गोष्ट सांगू? २००८ मध्ये, मी आणि मीना, पुन्हा भेटल्यानंतर गेल्या सोळा वर्षांत, प्रत्यक्ष असे फक्त चार-पाच वेळाच भेटलो असू. काही वेळा महिनोन् महिने फोनही होत नाही. पण त्यानं फारसं बिघडत नाही. मैत्री टिकून राहायला, तुम्ही सतत भेटत राहण्याची गरज नाही. ती असतेच.

खरीखुरी मैत्रीण सापडणं हे जर गुलबकावलीचं फूल असेल तर ते मला गवसलंय!
nitinarekar@gmail.com