आदित्य जवळकर
तर, ही गोष्ट आहे ९०च्या दशकातील. भारताचे ‘ग्लोबल’ वगैरे होण्याचे दिवस ते. पश्चिमी वाऱ्याचे झोत जाणवू लागले होते. ‘लडका और लडकी सिर्फ दोस्त नहीं हो सकते’ या छापाचे विचार काहीसे मागे पडू लागण्याचे दिवस. पदवीची भेंडोळी घेऊन मी त्या वेळी नोकरी शोधत होतो. ठिकठिकाणी अर्ज करून पोस्टमनची वाट बघणं हा नित्यक्रम होऊन बसलेला. आजही तो दिवस मला लख्ख आठवतो. सकाळी अकराची वेळ असावी. दारावर पोस्टमन आला होता. तेव्हा आईनेच दार उघडलं आणि मला हाक मारली, ‘‘अरे ऐकलंस का? शरयूचं पत्र आहे…
मी चरकलो! शरयूचं पत्र? हातातलं काम तसंच टाकून मी धावतच गेलो. पाहतो तर ते पत्र नव्हतंच, पत्रिका होती. शरयूची लग्नपत्रिका! आई तिच्या कामासाठी आत निघून गेली. मी स्तब्धपणे ती पत्रिका न्याहाळत राहिलो. जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये जसं पत्रातच संबंधित घटना दिसू लागतात, अगदी तसंच मला त्या लग्नपत्रिकेमध्ये माझ्या कॉलेजचा काळ दिसू लागला…
वादविवाद स्पर्धेची अंतिम फेरी… माझ्या विरुद्ध शरयू बोलणार होती. तिला मी पहिल्यांदा पाहिलं ते तेव्हाच. टपोऱ्या डोळ्यांची उघडझाप करत तावातावानं बोलणाऱ्या शरयूला हरवण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. मग मुद्दामच भाषण विसरल्यागत करत मी ती स्पर्धा शरयूला जिंकू दिली. माझ्या मित्रांच्याच नव्हे तर प्राध्यापकांच्याही ही गोष्ट लक्षात आली. मात्र स्पर्धेच्या नियमांसमोर कुणीच बोलू शकलं नाही. त्या दिवशी स्पर्धा हरूनही मी काही तरी मोठं मिळवलं होतं.
हेही वाचा…इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
त्या स्पर्धेनंतर माझी आणि शरयूची मैत्री जमली. सुरुवातीला केवळ लांबूनच हात दाखवत निरोप घेण्याइतपत सीमित असलेल्या आमच्या भेटी मग वारंवार घडू लागल्या. संध्याकाळी एकत्र चहाला जाणं, लेक्चरला दांडी मारून नाटक-सिनेमाला हजेरी लावणं यातून ही मैत्री अधिकच खुलली. आम्हा दोघांनाही कवितांची आवड होती. त्यामुळे कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, सुरेश भट आदी कवींचा आमची मैत्री फुलवण्यात बराचसा हातभार लागला. तिच्यामुळे तिच्या मैत्रिणींशीही माझी ओळख होऊ लागली. माझ्या वागण्या-बोलण्याला आपोआपच सकारात्मक पैलू पडत गेले. आणि तो काळच असा होता की मुलं-मुली धिटाईने सोबत फिरत असत.
आमच्यातील निखळ मैत्रीचे एक-दोन प्रसंग आवर्जून सांगावेसे वाटतात. मी अभ्यासामध्ये जेमतेमच होतो. नापास होणार नाही एवढाच अभ्यास मी करायचो. एकंदरीत अभ्यासाच्या बाबतीत चालढकलपणा करायची मला सवय लागली होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. एका परीक्षेमध्ये अगदीच काठावर पास झालो. ते निकालपत्र घरी दाखवणं शक्यच नव्हतं. घरच्यांनी चांगलाच मार दिला असता.
तो मजेशीर दिवस आठवला की, आजही हसू येतं. त्या दिवशी मी घरी निघालो. भीती वाटत होती. काय सांगायचं घरी? विचारलेल्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं? याची उजळणी चालली होती. इतक्यात कुठून तरी शरयू समोर येऊन उभी राहिली. ती अभ्यासात हुशार होतीच. तिला उगाच किती मार्क्स पडले, विचारून स्वत:चा अपमान करून घ्यायला नको म्हणून मीच मार्ग बदलला. तिने बहुतेक ते ओळखलं असावं. म्हणूनच की काय तिने मला थांबवलं नाही. माझ्या घरचे कडक शिस्तीचे आहेत हे तिलाही ठाऊक होतं.
मी थोडं उशिरानेच घरी पोहोचलो. तेव्हा समोर शरयूला बसलेली पाहून उडालोच! ही पठ्ठी माझ्याआधी माझ्या घरी येऊन बसली होती आणि गप्पांच्या ओघात माझ्या आईला सांगूनही टाकलं की यंदा तिच्यासकट सर्वांना परीक्षेत कमी मार्क्स मिळालेत आणि कसं ती उद्या सरांशी भांडणार आहे, वगैरे… वास्तविक तिला उत्तम गुण मिळाले होते. पण मला जास्त बोलणी बसू नयेत म्हणून तिने हा सगळा खटाटोप केला होता. नंतर आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा हसत म्हणाली, ‘एक पार्टी हवीय या बदल्यात, कळलं का? आणि महाशय, आता तरी अभ्यासाला लागा…!’ तिच्या धमकीवजा सल्ल्याने पुढे मी खरंच गांभीर्याने अभ्यासाला लागलो.
हेही वाचा…बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
आता आठवायला लागलं की, एखादी मालिकाच लिहून होईल इतक्या आठवणी आणि प्रसंग मन:पटलावर उमटतात. तळजाई, पर्वती, सिंहगड ही आम्हा दोघांचीही आवडती ठिकाणं होती. आम्ही काय आणि कशाबद्दल बोलत असू हे आता त्या जागांनाच ठाऊक. पण आमच्या गप्पांना अंतच नसायचा.
शरयूला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मनात फक्त एवढीच भावना होती की, आपलीही अशी मैत्रीण असावी. तिच्याशी खूप खूप गप्पा माराव्यात, त्या गप्पांमध्ये तिला खळखळून हसवावं. पण हळूहळू मला तिच्यातील काही गुण आवडायला लागले. ती धीट आणि बिनधास्त होती आणि आहे. मला आठवतं, पर्वतीवर एकदा आम्ही असेच गप्पा मारत बसलो आणि वेळेचं भानच राहिलं नाही. अंधार पडू लागला तसे आम्ही घाईघाईत निघालो. इतक्यात तिथल्या पोलीस हवालदारानं आम्हाला अडवलं आणि आमची फिरकी घ्यायला सुरुवात केली. ‘‘कोण तुम्ही? इतक्या उशिरा काय करताय दोघंच… आई-वडील हे सगळं करायला पाठवतात का…?’’ वगैरे.
मी जरा वरमून प्रसंग सावरण्याच्या प्रयत्नात होतो. इतक्यात शरयू पुढे झाली. त्या हवालदारासमोर तिने चक्क माझा हात धरून म्हटलं, ‘‘ओ काका, भलतंच काय बोलताय? नुकतंच लग्न ठरलंय आमचं. असे-तसे वाटलो काय आम्ही तुम्हाला? आणि झाला थोडा उशीर तर काय करणार?’’ तो पोलीस चपापला. मला पुढे खेचत तिने मला ढोसलं. आम्ही पटकन तिथून सटकलो. पुढे गेल्यावर मला टपली मारत शरयू खोडकरपणे म्हटली, ‘‘अरे, जरासा डॅम्बीसपणा येऊ देत तुझ्यामध्ये…!’’ नंतर किती तरी वेळा आम्ही तो प्रसंग आठवून हसत होतो. आजही कधी पर्वतीवर गेलो की ती जागा आणि तो किस्सा हमखास आठवतो.
नंतर तर असा एकही दिवस जाईना की आमची भेट होत नव्हती. जणू एकमेकांची सवय होऊ लागली होती आम्हाला. आमचं हे नातं निश्चितच पुढे जाणार असे संकेत वाटायला लागले. माझं आणि शरयूचं एकमेकांच्या घरीही जाणं-येणं असल्यानं दोघांच्याही घरी काही प्रमाणात ‘कल्पना’ येऊ लागली होती. माझ्या दोस्त राष्ट्राला तर आमचं आता जुळलंय याची खात्रीच होती. आता लवकर नोकरीला लागून मग पुढची बोलणी करावी, असा माझा सर्वसामान्य विचार होता. पण… पदवीच्या अंतिम परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या वेळी झाली तेवढीच आमची धावती भेट! ‘लवकरच भेटू या’ म्हणत आम्ही निरोप घेतला. आमच्या वाटा तेव्हा वेगळ्या झाल्या त्या जणू कायमच्याच. त्यानंतर काही दिवसांत थेट आली ती तिची लग्नपत्रिकाच!
‘‘अरे, काय लग्नपत्रिकेत तुझं नाव शोधतोयस का?’’ आईच्या मिश्कील टिप्पणीने मला भानावर आणलं. आठवणींची रेल्वेगाडी आचका देत थांबली.
माझ्या मनात त्या वेळी मात्र अनेक विचार पिंगा घालत होते. मीच सांगायला उशीर केला, की आपणच नको ते मनोरथ चढवले? एवढा मोठा निर्णय घेताना एकदाही तिनं मला कळवू नये? पण सगळे विचार आणि प्रश्न नेटानं बाजूला सारून मी तिच्या लग्नाला गेलो होतो. तेव्हा लग्न समारंभ अगदीच साधे असायचे. हल्लीचा भपकेबाजपणा आणि निरर्थक आव आणण्याची प्रथा नव्हती. मी शरयूला भेटलो. क्षणभर मनात कोलाहल झाला. तिने तिच्या नवऱ्याची ओळख वगैरे करून दिली. हसून अभिनंदन करत मी बाहेर पडलो.
मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होतो. गुमानपणे काही दिवसांत नोकरीला लागलो. पुढे काही वर्षांत माझंही लग्न झालं. (योगायोग असा की माझ्या पत्नीचं नावही ‘शरयू’ आहे. नियतीदेखील कसे विचित्र दान पदरात टाकत असते.)
काळ वेगानं पुढं सरकत राहतो. त्यानंतर मी आणि शरयू कित्येक वर्षं संपर्कात नव्हतो. आपापल्या संसारात आम्ही रमून गेलो. करोना साथीच्या काळात अचानक एके दिवशी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. माझा संपर्क क्रमांक कुणाकडून तरी मिळवून शरयूने माझ्याशी संपर्क साधला होता. मागच्या साऱ्या घटना विसरून आमच्यामध्ये नव्यानं दोस्ती झाली. आमची जुनी मैत्री आता पुन्हा नव्यानं बहरली. दोघेही चाळिशीकडे झुकू लागलो होतो. कधीकाळी एकदम ऐन तारुण्यात भेटलो होतो. आता आम्ही हल्ली एकमेकांच्या चंदेरी होत जाणाऱ्या केसांवरून वगैरे थट्टा करतो. मग फोनवर मारलेल्या गप्पा असो किंवा प्रत्यक्ष भेटून बोलणं, एकमेकांना आपली सुख-दु:खं सांगितली की आपसूकच मोकळं वाटतं.
संवाद आणि निरपेक्ष भावना हे कुठल्याही मैत्रीचे आधारस्तंभ असतात. मात्र माझ्या मनात खोलवर कुठे तरी ही खंत होती की, आमचं नातं मैत्रीपुरतंच सीमित राहिलं, ते जर थोडं पुढं गेलं असतं तर? तिच्या मनात कधीच ‘तशी’ भावना निर्माण झाली नसेल काय? मला एकदा तरी या साऱ्याचं स्पष्टीकरण हवं होतं. विवाहित स्त्री- पुरुषामध्ये मैत्री असली की समाजाच्या भुवया आपसूकच उंचावतात. शेवटी कितीही झालं तरी ‘स्त्री-पुरुष मैत्री’ हा वादाचा विषय राहिला आहे. तो आजही फारसा समाजमान्य नाही. ही मैत्री असणं कितपत योग्य आहे? तिचे याबाबत काय विचार आहेत? मला जाणून घ्यायचं होतं.
हेही वाचा…… मोहे शाम रंग दई दे
हिंमत करून मी एकदा मनातील सारे प्रश्न तिच्यासमोर मांडले. मिश्कील हसत तिने अगदी सहज मला समजावलं. तिचे ते शब्द प्रत्येक पुरुषाने ऐकावेत असेच होते. मला म्हणाली, ‘‘अरे, महाविद्यालयात असताना तुझ्या मनात माझ्याविषयी जी भावना निर्माण झाली, तसं मला कधी वाटलंच नसेल का? आम्हा मुलींना सगळं कळत असतं. मी खूप आधीच सगळ्याचा विचार केला होता. मुलगा आणि मुलगी यांच्यात मैत्र असू शकत नाही, यावर माझा विश्वास नाही. पण होतं काय की लग्नानंतर मित्राचा ‘नवरा’ होतो आणि मैत्रिणीची ‘बायको’ होते. लग्नाच्या नात्यात मग व्यवहार येतो, काहीशी औपचारिकता येते. मला ते सारं आपल्या दोघांत नको होतं, आजही नकोय. आज आपण अगदी कधीही भेटून बोलू शकतो. मी माझ्या नवऱ्याबद्दल, तू तुझ्या बायकोबद्दल बिनधास्त बोलू शकतो, एकत्र हसू शकतो, हक्कानं भांडू शकतो, या सगळ्याला नात्याचं वलय कशाला हवंय? जे आहे ते छान आहे. म्हणतात ना, प्रत्येक डोहाचा तळ गाठलाच पाहिजे असं नाही. आपलं नातं त्या डोहासारखं खोल आणि अथांग असायला हवं… जिथं कधीही जाऊन केवळ शांत बसता येईल, असा एखादा तरी मैत्रीचा डोह असावा ना रे…?
मला त्या दिवशी जाणवलं, शरयू माझ्यापेक्षा अधिक समंजस आहे. कित्येकदा आपण फक्त एका समाजमान्य चौकटीपुरताच विचार करत असतो. पण आमच्यातील निखळ मैत्रीचं रहस्य तिनेच उलगडून दाखवलं. तिच्या शब्दांनी मन पिसासारखं हलकं झालं. आमच्या मैत्रीचे बंध अधिकच दृढ झाले aditya786 jawalkar@gmail.com