हीनाकौसर खान पिंजार

‘‘आपके पतीने आपको ऐसेही भेज दिया, अकेली? दोस्त के घर रूकनेपर कुछ कहाँ नहीं, भरोसा कर लिया?’’ भरपूर आश्चर्यानं तो विचारत होता. ‘दोस्तकेही तो घर रूकी हूँ, उसमे पतीके भरोसे या परेशानीकी क्या बात?’ मी सहजपणे म्हणाले. पण तो गप्प झाला. परशहरात मित्राकडे एखादी स्त्री अशी मुक्काम करू शकते हे न पचलेल्या समाजाचा तोसुद्धा एक घटक होता. त्याच्या चुप्पीत ते सारं सामावलं होतं.

घरात आम्ही तिघी बहिणी. आयुष्यातल्या काही ठरावीक काळापर्यंत आई-वडिलांचं त्यावर निश्चितच नियंत्रण होतं. मात्र त्यात कुठलाही जाच नव्हता. पप्पा शिक्षक, पण शिस्तीचा अतिरिक्त आग्रहही कधीच नव्हता. घरात तिऱ्हाइतासारखं राहून कामांच्या ऑर्डरी देणं हा त्यांचा स्वभाव नव्हता आणि आजही नाहीच. उलट भाज्या निवडणं, घर झाडून काढण्यापासून ते शनिवारच्या दुपारच्या वेळी आठवडय़ाचे कपडे धुऊन टाकण्यापर्यंत पप्पांना काम करताना पाहिलं. दिवाळी-उन्हाळ्यात मम्मीकडे शिवणकाम जास्त असायचं तेव्हा तर ते तिला शिवणकामातही काही किडूकमिडूक मदत करायचे. आजही ते अनेकदा सकाळी झाडू घेऊन घर स्वच्छ करायला लागतात. कपडे वाळत घालतात आणि कधी तर माझ्या मुलानं शी केली की तीही धुतात. केवळ घरकामात मदत करून पप्पा थांबले नाहीत तर आईकडे तिच्या पशांचा हिशेबही कधी मागितला नाही. माझ्या घरातल्या सर्वच चाचींना हे आर्थिक स्वातंत्र्य राहिलं आणि घरकामात पुरुषांची मदत नव्हे तर सहभागच राहिलाय. लहानपणी तर पप्पांना चिडवायचेही की तुम्ही ना मम्मी असायला हवं होतं. अर्थात आत्ता विचार केल्यावर लक्षात येतं की असं वाटणं हेदेखील एक तऱ्हेचा भेदभावच!

पुढे पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकत असताना बेंगळूरुला स्टडीटूर जाणार होती. पुणे स्थानकातून ‘उद्यान एक्स्प्रेस’ पकडायची होती. त्या वेळी मम्मी आणि माझ्या दोन बहिणी स्थानकात सोडायला आल्या होत्या. मम्मीनं शिक्षकांना सांगितलं की ती पहिल्यांदाच इतक्या लांब चाललीय, तिच्यावर लक्ष ठेवा, ‘‘मावशी, आम्ही आहोत की, आणि ती काय लहान आहे का आता,’’ असं मित्र-मत्रिणींनीच आईला सांगितलं. माझ्या आयुष्यातली ती पहिली आणि शेवटची घटना. त्यानंतर मी कित्येकदा वेगवेगळ्या शहरात, आडगावात नाहीतर अगदी मोबाईलला रेंजच मिळत नाही अशा दूरदूरच्या राज्यात एकटीने प्रवास करू लागले पण त्यानंतर बसस्टॅण्डवर सोडण्याचे लाड कुणी केले नाहीत. हां, घरी परतल्यावर बसस्टॉपपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या घरी चालत-दमत यावं लागेल म्हणून तिथं घ्यायला आधी माझे वडील आणि आता माझा जोडीदार मात्र नियमित येतात. तुम्हाला हवं तिथं उडू देण्याची आणि परतल्यावर घरातली ऊब देण्याची हातोटी माझ्या घरच्या माणसांना चांगलीच उमगलीय हे दरवेळेस पटत राहतं.

पत्रकारितेत आल्यावर मला ‘साधना साप्ताहिका’ची फेलोशिप मिळाली होती. त्यासाठी मी मुस्लीमबहुल भागांत फिरून आले. एके संध्याकाळी तो रिपोर्ताज लिहीत बसले होते. तिथं माझे आजोबा आले आणि मी लिहिलेला अर्धाकच्चा लेख वाचू लागले. वाचून झाल्यावर ते त्यांच्या स्वभावानुसार आनंदून खळाळत उठले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, ‘‘चांगलं लिहितेस. अबी डरनेका न. आग्गे बढने का.’’ यावर मी काय बोलणार? फक्त स्मित केलं. माझा हा लेख छापून आल्यावर माझ्या आजोबांनी, पप्पांनी आनंदून सर्वाना तो दाखवला. आज पत्रकारितेतल्या दहा-अकरा वर्षांनंतरही माझा लेख माझ्या नावासह प्रसिद्ध झाला की पप्पांना अजूनही आनंद होतो. त्यांच्या दृष्टीने मुस्लीम जगातल्या ‘अवघड’ मुद्दय़ांवर मी काही लिहिलं की त्यांना काळजी वाटते. ते तसं बोलूनही दाखवतात, पण म्हणून मी ते लिहिणं बंद करावं असं त्यांनी कधी सुचवलंही नाही.

पत्रकारितेत पूर्णवेळ रिपोर्टिंग सुरू झाल्यावर माझ्याकडे ‘न्यायालय’ हे क्षेत्र आलं. तोवर पुण्यातल्या माझ्या संस्थेत तो प्रांत कुठल्याही मुलीकडे दिला गेला नव्हता. गुंडप्रवृत्तीची माणसं येतात अशा ठिकाणी आपण मुलींना पाठवावं का, अशी कथित काळजी वरिष्ठांपुढे एक दोघांनी मांडली. त्यावर विश्वास खोड सरांनी मला न्यायालयात नेऊन तिथल्या सहकाऱ्यांशी भेट घालून दिली. ‘जमेल तुला’ हा विश्वास दिला. न्यायालयाच्या बातमीसाठी आवश्यक असणाऱ्या शब्दांची उजळणी करून घेतली. काळजी करणाऱ्या सहकाऱ्यांपेक्षा ‘तू बिनधास्त उडी घेऊन बघ’ म्हणणारे सहकारी अधिक जवळचे झाले.

बातमीदारीमध्ये ‘महिला’ असं बीट खरंतर नसतं. पण स्त्रीभोवतालातलं काही आलं की ते आपसूक स्त्रियांकडे ढकलून द्यायची सवय असते. अशा वेळी अर्थातच पुरुष सहकाऱ्यांसोबत वाद व्हायचे. समवयस्कांवर तर चिडचिडही व्हायची. अशा वेळी माझा सहकारी व जवळचा मित्र राहुल कलाल म्हणायचा, ‘‘तू त्या मुलाखतीकडे किंवा बातमीकडे स्त्रियांचा प्रश्न म्हणून का पाहतेस? म्हणजे स्त्रीपुरुष असं तुझ्या डोक्यातच आहे म्हण की, आणि जोवर तुम्हाला स्त्रियांची दुखणी अधिक कळत राहतील तोवर ते सगळं तुमच्याकडेच येत राहणार. ते आम्हालाही कळू लागलं की आम्ही ते करू. तेव्हा तुम्ही दुसरं काहीतरी करा.’’ त्याचं म्हणणं डोक्यात लख्ख प्रकाश टाकून गेलं. पुढे याच राहुलनं मोठा खटाटोप करून आरोग्य आणि सॅनिटरी नॅपकिनचं एक सर्वेक्षण मिळवलं आणि त्यावर बातमीची मालिका केली. आरोग्याचे प्रश्न मांडताना स्त्रियांविषयी सहानुभूती असली तरी त्यात उपकारमूल्य येणार नाही याची काळजी तो घ्यायचाच आणि कधी तरी मीच ‘आम्ही स्त्रिया, तू पुरुष’ असं काही म्हणाले, की तो गोड हसून, ‘एका दिवसात काय बदलणार असतं. तू तरी बदलशील का, हॅव पेशन्स’ म्हणत गप्प करायचा.

पत्रकारितेमुळं भवतालातही खूप निरनिराळे अनुभव येऊ लागले. मागच्याच वर्षी हरयाणातल्या मुलींची स्थिती व पालकांची मन:स्थिती अभ्यासण्यासाठी तिथं गेले होते. तिथं सोनिका बिजरौनिया ही फुटबॉल कोच भेटली. सोनिका खेळाच्या स्पर्धासाठी बाहेरगावी फिरते. घर तिची सासूच सांभाळते. ती सोनिकासाठी त्यांचं मूळ गाव सोडून तिच्या बदलीच्या ठिकाणी अलखपुरा इथं आलेली.

सोनिका अलखपुराच्या दोनशे मुलींची कोच आणि समुपदेशकही. तिचा नवरा सांगत होता, ‘अब थोडा कम हुवा है, वरना पहले तो लडकीयोंकी परेशानी सुनकर सोनिकाही रो पडती थी.’ त्या दोघांमधलं नातं फार मजबूत आणि सुंदर होतं. मुलींना गर्भातच मारणाऱ्या या राज्यात असंही काही तरी आश्वस्त करणारं दिसत होतं तेव्हा वाटलं की आपण एकाच वेळी किती वेगवेगळ्या शतकात जगत असतो.

काही वेळा तर मला माझी स्वत:चीही कमाल वाटते. मी एकदा असंच घरात पसारा टाकून खूप सकाळी घराबाहेर पडले होते. घरी परतले तेव्हा घर अगदी चकाचक होतं. मी कौतुकानं अश्पाकला, माझ्या नवऱ्याला म्हटलं, ‘थँक्स! तू घर किती स्वच्छ केलंस.’ आणि त्यानं माझ्याकडे अविश्वासानं पाहिलं. म्हणाला, ‘घर तो मेरा भी है ना.. फिर थँक्स कैसा?’ मलाही जाणवलं, ‘खरंच, आपल्याही खोलात कुठंतरी रुजलेलंच असतं ना, की घरचं मी टाकून दिलेलं काम माझ्याच वाटचं. खरंतर तो असं अनेकदा ‘स्वच्छता मोहीम’ राबवतो. घर आवरणं त्याच्याच खात्यातलं काम आहे तरीही त्यानं ते केलं की मी त्याला ‘थँक्यू’ म्हणतेच. त्यात त्याच्या ‘मदती’चा अगर ‘पुरुष’ म्हणून आभार मानणं असं नसून त्यानं केलेल्या कामाची दखल घेणं असा भाव असतो. आपल्या कामाची दखल घेतली जावं, असं प्रत्येकालाच वाटतं की! तसंच मी त्यादिवशीही म्हणाले. दरवेळी तोही सरावानं ‘यू आर वेलकम’ म्हणायचा, पण त्यादिवशी ‘घर माझंही आहेच’ असं म्हणून त्यानं कामाची अदृश्य वाटणीच मिटवली.

एक असाच भन्नाट अनुभव सांगण्याचा मोह होतोय. पुस्तकाच्या कामानिमित्त दिल्लीतल्या ‘वसंतविहार’ भागात जायचं होतं. कॅब करायचं ठरवलं. कॅबचा विशी-बाविशीचा चालक म्हणाला, ‘मॅडम आपके मोबाईलमें जितना अमाऊंट है उतनाही दे दो, बस मं ये राईड कॅन्सल करता हूँ. चलेगा?’ त्याला भाडय़ाची रक्कम स्वत:कडे ठेवायची होती. पण मी ती रिस्क घेऊ शकत नव्हते. गप्पांत कळलं, तो हरियाणाहून रोज अपडाऊन करत होता. त्यानं मला विचारलं, ‘आप मैरिड है?’ मी प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. थोडय़ा वेळानं तोच बोलू लागला, ‘हमारमें बहोतही जल्दी सादी कराते है. घरवाले मेरेभी पीछे पडे है. पर मंने भी कह दिया जबतक ढंग का कमा ना लूँ. साद्दी-वाद्दी का सोचना भी नहीं. पर हमारी बिरादरी में ना बहुत जल्दी सादी होती है. मेरे साथ के तो बाप बन गयें है. तो बस ऐसेही पुँछ लिया, आप मरिड हो?’

त्यांनं प्रस्तावनेसह पुन्हा प्रश्न केला. मी ‘हो’ म्हणाले, ‘‘आप मुंबई के है क्या, नहीं थोडी देर पहले मुंबई के जुबानका कुछ बोल रही थी. आप यहाँ घुमने आयी हो? आपके कोई रिश्तेदार है यहाँ?’’ त्याच्या प्रश्नांत कुतूहल होतं. मीही मग त्याला मोकळेपणानं सांगितलं, ‘मेरे दोस्त के यहाँ रूकी हूँ!’’

‘‘अच्छा! जिन्होंने आपको कॅबतक छोडा उनके यहाँ? आपके पतीने आपको ऐसे भेज दिया, अकेली? दोस्त के घर रूकनेपर कुछ कहाँ नहीं, भरोसा कर लिया?’’ भरपूर आश्चर्यानं तो विचारत होता. ‘‘दोस्तकेही तो घर रूकी हूँ, उसमे पतीके भरोसे या परेशानीकी क्या बात?’’ मी सहजपणे म्हणाले. पण तो गप्प झाला. परशहरात मित्राकडे एखादी स्त्री अशी मुक्काम करू शकते हे न पचलेल्या समाजाचा तोसुद्धा एक घटक होता. त्याच्या चुप्पीत ते सारं सामावलं होतं. मी तर अश्पाकला अनेकदा माहितीसाठी पुढचं प्लॅनिंग सांगत असले तरी तो म्हणतो, ‘‘तुझं पक्क झालं की सांगत जा. इतक्यात का सांगतेस?’’ आमच्यासाठी ते इतकं सहज आहे.

थोडय़ा वेळानं तोच म्हणाला, ‘‘मॅडमजी, हमारे बिरादरी में तो लडकी का घुंगट उपर जाये तो पिटना शुरू कर देते है. पर म अपनी बिवीपर ऐसेही भरोसा रखूँगा, मं तो ज्यादा सीखा नहीं. पढाईमें मन ना लगा. हम तो यहाँ-वहाँके रास्ते काटकर लोगों को मंजिल तक पहुंचाते है पर खुद ठहरे भटके हुए!’’  तेवढय़ात माझं ठिकाण आलं. निघताना तो म्हणाला, ‘‘वैसे मॅडमजी, आपने राईड काटने मना क्यों किया? आपको ठगनेका डर लगा, है ना? वोभी सही बात है. अनजान शहरमें कैसे किसपर भरोसा होगा? मुझेभी पुनामुंबईमें कोई ऐसा कहे तो मं ‘आदमी’ होकर भी एैसे ना करने दूँगा!’’

अनजान शहराचा मुद्दा सांगता-सांगता त्यानं मला आणि त्याला एका समान पातळीवर आणून ठेवलं होतं. मनात आलं, ‘वैसे भी यहाँ-वहाँके रास्ते काटकर हमें भी तो इन्सान बनने की मंजिल तक पोहोचना है!’

greenheena@gmail.com

chaturang@expressindia.com