पल्लवी मतकरी

‘चतुरंग’ पुरवणीत गेल्या वर्षी, २०१८ मध्ये ‘तिच्या नजरेतून तो’ हे सदर तुम्ही वाचलं. आजचा ‘तो’ आजच्या ‘ती’ला कसा वाटतो. पारंपरिक चौकटीपलीकडे ‘तो’ गेला आहे का, यावर अनेकींनी आपले अनुभव मांडले आणि त्यातून बदलत्या पुरुषाचं स्वरूप कळत गेलं. त्या आधीच्या वर्षी २०१७ मध्ये ‘त्याच्या नजरेतून ती’ हे सदर तरुण लेखकांनी लिहिलं. त्यांच्या स्त्रीविषयक जाणिवा त्यातून व्यक्त झाल्या. त्याचंच पुढचं पाऊल यंदाचं सदर ‘मी ची गोष्ट’. यात तरुण लेखिका आपलं स्वत:चं स्त्री असणं काळाच्या ओघात बदलत गेलंय का, आजची स्त्री म्हणून त्यांना काही वेगळे  अनुभव येत आहेत का, याचा शोध घेणार आहेत.  स्त्रीत्वाच्या बदलत्या संकल्पना सांगणारे हे  सदर दर पंधरवडय़ाने.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’

असं ऐकलंय, की आपल्या मेंदूची वाढ फॉरमेटिव इयर्समध्येच बरीचशी  पूर्ण होते. या नंतर तुम्ही त्यात माहितीची, विचारांची भर घालू शकता, पण त्यात काही मूलभूत स्वरूपाचे बदल संभवत नाहीत. व्यक्तिमत्त्वाचंही बहुधा असंच काही असावं. आपण कोण आहोत, काय आहोत हे ठरतं, ते पहिल्या काही वर्षांतच. नंतरच्या काळात शिक्षणानं, अनुभवानं, कधी संगतीनंही फाइन टय़ुनिंग होत असेल, पण त्याचा मूळ ढाचा बदलत नाही. माझ्या बाबतीत तरी हे खरं आहे. मी कोण आहे याचा एक डिफॉल्ट मोड फार पूर्वीच तयार झालाय आणि तो अजून तसाच आहे. मला वाटतं माझ्या वडिलांचा तो तसा होण्यात मोठा हात आहे.

डॅड म्हणायचे, की रात्री झोपताना दर माणूस स्वत:ला आरशात पाहतो आणि दिवसभरात घडलेल्या गोष्टींचा विचार करतो. जर त्याच्या हातून काही चूक घडलं असेल, तर तो त्या आरशातल्या माणसाच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. खरं सांगायचं, तर हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, तेव्हा मला त्यात काही विशेष वाटलं नव्हतं. ‘कॉमनसेन्स’, असं वाटलं. पण आर्किटेक्चर प्रोफेशनमध्ये आल्यावर, विशेषत: कॉर्पोरेट सेक्टरमधे काम सुरू केल्यावर, अंगावरच्या जबाबदाऱ्या वाढायला लागल्यावर हळूहळू त्यांच्या म्हणण्याचा अर्थ कळायला लागला. आजही झोपताना आरशातल्या माझ्या नजरेला नजर देताना डॅडची आठवण आल्याशिवाय राहात नाही. आता कोणत्याही क्षेत्रात जबाबदारीच्या जागेवर काम करताना कधीतरी चुका होणारच, त्या होणारच नाहीत असं नाही, पण प्रसंगी या चुकांची जबाबदारी घेण्याची, त्यांचा विचार करत राहण्याची, आपल्या कामात किंवा प्रसंगी स्वत:च्या दृष्टिकोनातही लागतील ते बदल करण्याची ताकद मला डॅडने दिली.

खरं म्हणजे या व्यवसायात मी आले तिही त्यांच्यामुळेच, पण योगायोगाचाही त्यात मोठा भाग होता. ते मुळात नेव्हीत होते आणि मलाही डिफेन्समध्येच जाण्यात रस होता. पण त्या दिवसात मुलींच्या या क्षेत्रातल्या सहभागावर बऱ्याच मर्यादा होत्या. अलीकडल्या काही वर्षांत हे सगळं बदललंय, पण त्या दिवसात ते शक्यच नव्हतं. मग काय करायचं, हा प्रश्नच होता. बारावी झाल्यानंतर अ‍ॅडमिशन संदर्भात फिरताना ते मला म्हणाले, ‘इथे शेजारीच एक आर्किटेक्चर कॉलेज आहे. करायचंय का तुला?’

माझी ‘आर्किटेक्चर’ म्हणजे काय, इथपासून सुरुवात होती. पण काही वेळा आपण ‘राईट प्लेस अ‍ॅट द राईट टाईम’ असतो ना, तसा काहीतरी हा प्रकार होता. एकदा अ‍ॅडमिशन घेतल्यावर हे क्षेत्र माझं कधी झालं मला कळलंही नाही. आज बावीस र्वष मी ज्या क्षेत्रात काम करतेय, ते मला अ‍ॅडमिशन फॉर्म घेण्याआधी तासभर माहीतसुद्धा नव्हतं, यावर माझाही आता विश्वास बसणं कठीण आहे. बाकी ते कॉलेज, म्हणजे ‘रचना संसद’चं ‘अ‍ॅकेडमी ऑफ आर्किटेक्चर’, मला फारच मानवलं. क्षेत्र आवडलं हा एक फायदा आणि सीनिअर असलेला गणेशही तिथे भेटला, जोडीदार झाला. हा दुसरा फायदा.

माझ्या आयुष्यात अशा योगायोगाने बरीच माणसं भेटली, ज्यांनी मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माझं डोकं चालतं ठेवलं. कोणी हे सांगितलं की, समोरच्याला आपण बोलण्याची संधीच दिली नाही, तर आपण त्याची आपल्याशी सहमती दाखवण्याची संधी काढून घेतो, तर कोणी हे दाखवलं, की कोणताही पेच हा आपण त्याच्याकडे कसं पाहतोय, यावर अवलंबून असतो. दृष्टिकोनातला थोडासा बदलही आपल्याला नवे मार्ग दाखवतो. फक्त ते स्वीकारण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. मी जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडले, तेव्हा पहिली काही र्वष एका एनजीओबरोबर, स्लम रिडेव्हलपमेन्टच्या प्रोजेक्ट्सवर काम करत होते. पण त्यानंतर अचानकच पूर्ण वेगळ्या दिशेला, हाय एण्ड घरं बनवणाऱ्या कॉर्पोरेट्स, डेव्हलपर्सबरोबर काम करायला लागले. ‘लोढा’, ‘मिहद्रा’, ‘कल्पतरु’, ‘ऑबेरॉय’, ‘लवासा’ आणि आता ‘रुणवाल’ बिल्डर्सकडे चीफ आर्किटेक्ट होईपर्यंत ही इण्डस्ट्री मी फार जवळून पाहिली. स्लम रिडेव्हलपमेण्ट आणि ही नंतरची कामं, ही एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळ्या प्रकारची होती. प्रोजेक्ट्सशी संबंधित असणाऱ्यांची भूमिका, क्लायन्टेल, त्यांच्या गरजा, त्यांची पाश्र्वभूमी, प्रत्येकाच्या अपेक्षा, सहभागी कन्सल्टन्ट्सचा अनुभव आणि त्यांच्याबरोबर साधला जाणारा संवाद, या सगळ्याच बाबतीत आधी आणि नंतर यांच्यात काहीच साम्य नव्हतं. पण मला या बदलाचा त्रास जाणवला नाही. मला वाटतं आपण सगळंच माहीत असल्याच्या आविर्भावात राहिलं नाही, दुसऱ्याला विचारण्याची, बोलण्याची तयारी दाखवली, तर सगळ्यांचेच प्रश्न सोपे होतात. त्यांचेही आणि आपलेही. अर्थात, दरवेळी सगळंच सोपं असतं असं नाही. विशेषत: बिल्डिंग इण्डस्ट्री हे पुरुषप्रधान क्षेत्र असल्याने काही अडचणी या येतातच. आजवरच्या प्रवासात त्या आल्याही.

यातली एक नेहमीची अडचण, जी माझ्यासारख्या अनेकांना आली असेल, ती म्हणजे एकच वय आणि अनुभव असतानाही स्त्री-पुरुष व्यावसायिकांमध्ये केलं जाणारं डावं-उजवं. हे उघडपणे केलं जात नाही, त्यामुळे स्त्रियांना त्याला उघड विरोध करताही येत नाही. पण अगदी फी किंवा पगार ठरवण्यापासून ते सल्ला स्वीकारताना दिसणाऱ्या मोकळेपणापर्यंत ही अढी असते. एक खरं, की बहुतेकदा ही अढी जाणूनबुजून आलेली नसते. आपल्यावरल्या पारंपरिक संस्काराचा ती एक भाग असते आणि जसे तुम्ही एकत्र काम करता, तसं त्या कामामधून तुमची किंमत आपोआपच समोरच्याला कळते, पण त्याला वेळ लागतो. आणि हा वेळ काही ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असतो. दुसरी अडचण म्हणजे काही कामं ही स्त्रिया करणारच नाहीत, असं लोकांच्या डोक्यात पक्कं असतं. फिरतीची कामं, गावाबाहेर काही दिवस राहावं लागेल अशी कामं, स्त्रिया कशी करणार? विशेषत: त्यांचं लग्न झालं असेल, मुलं असतील, तर हा प्रश्न उगाचच कठीण होऊन जातो. काम करणारी जर स्त्री असेल तर गृहीत धरलं जातं, की तिची घराबरोबर, मुलांबरोबर भावनिक गुंतवणूकच इतकी असेल, की तिला अधिक काळ घरापासून दूर राहाणं शक्यच होणार नाही. याउलट पुरुषांना उलट बाबतीत गृहीत धरलं जातं, त्यांना घरापासून दूर राहाणं सहज शक्य होईल अशी समजूत करून घेऊन. प्रत्यक्षात हा दोन्ही बाबतीत अन्याय आहे. करिअरला महत्त्व देणारी स्त्री आणि घराशी भावनिकरीत्या अधिक बांधलेला पुरुष असू शकत नाही का? मग त्यांनी काय करावं?

मला जेव्हा जेव्हा असा प्रश्न आला तेव्हा मला वेगळं सांगावं लागलं की, माझ्या करिअरबद्दलचे निर्णय मी स्वत: घेऊ शकते. माझं घर आणि मी काय ते बघून घेऊ, त्याला मध्ये आणण्याची गरज नाही. आता इतकं स्पष्ट सांगितलं की समोरचा मानतो, पण तरीही एखादी सूक्ष्म शंका, त्याच्या तोंडावर रेंगाळताना आपल्याला दिसतेच.

मला अनेकदा एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तू मतकरी कुटुंबातली, मग तुला नाटकात काम करावंसं नाही वाटलं, अशा प्रश्नांची मला नेहमी गंमत वाटते. प्रत्येकाला, प्रत्येक गोष्ट कशाला करता यायला हवी? आणि मी तर म्हणेन की केवळ एखादी गोष्ट मला शक्य आहे म्हणून करण्यापेक्षा मी जर स्वत:ची ओळख टिकवून मला आनंद देणारं काम करू शकत असेन तर ते अधिक महत्त्वाचं नाही का? मतकरी कुटुंबाच्या कामाचा जसा मला अभिमान आहे, तसा त्यांनाही माझ्या कामाचा. शेवटी प्रत्येकाला आपलं काम व्यवस्थित करता आलं आणि इतर जे काम प्रामाणिकपणे करतायत त्याविषयी आदर दाखवता आला, तर ते पुरे नाही का?

ही एक गोष्ट आम्ही पाळली आहे. गणेश, आमची मुलगी समा आणि मी, या तिघांनीही. प्रत्येकाने, स्वतंत्रपणे आपल्याला वाटतं ते करावं, दुसऱ्याला शक्य ती मदत करावी, पण त्याच्यावर अवलंबून राहू नये, असं आम्ही ठरवलेलं आहे. माझ्या करिअरचे निर्णय घेताना तो मध्ये पडत नाही, त्याचं लिखाण कोणत्या दिशेने चाललंय यात मी ढवळाढवळ करत नाही आणि समाने कोणत्या विषयात शिकायचंय, काय क्षेत्र निवडायचंय, हे आम्ही संपूर्णपणे तिच्यावर सोडलेलं आहे. ती स्वत: विचार करू शकते, मनात आलेली प्रत्येक गोष्ट बेधडक बोलून दाखवू शकते. आमच्या दृष्टीने हे फार आवश्यक आहे. आमच्या अडचणी आम्ही एकत्र सोडवतो, पण दिशा निवडतो, त्या स्वतंत्रपणे. शेवटी  सगळ्यात ‘बेसिक’ गोष्ट कुठली, तर स्वातंत्र्य. ते घरातल्या प्रत्येकाकडे असणं यापेक्षा अधिक महत्त्वाचं, ते काय?

pmatkari@gmail.com

chaturang@expressindia.com

Story img Loader