शिवबाला सोळाव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पडले, पण या स्वप्नाच्या पूर्तीकरिता सन्याची, पर्यायाने शस्त्रनिर्मितीची नितांत गरज होती. ही गरज पशाच्या अभावी पुरी झाली नसती. स्वराज्याची निर्मिती किती तरी पटीने कठीण झाली असती. अशा अवघड वेळेला तोरण्याच्या पायथ्यापाशी असलेल्या गुप्त धनाचे स्वप्न शिवरायांना पडले आणि नेमके त्याच जागी मोहोरांनी भरलेले घडे सापडले अशी स्वप्नांची ऐतिहासिक महती आहे.  स्वप्नांचा हा मागोवा घेणारी लेख मालिका.
मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा!
स्वप्नांतील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?
सुप्रसिद्ध गीतकार सुधीर मोघे यांच्या या काव्यपंक्ती आपल्या सगळ्यांच्या मनातील स्वप्नांबद्दलचे कुतूहल यथार्थपणे वर्णन करतात. निद्रेसंदर्भातील प्रत्येक व्याख्यानानंतर, मग ते डॉक्टरांकरिता असो अथवा सर्वसामान्यांकरिता असो, अमेरिकी असो की भारतीय, सर्वच श्रोत्यांकडून स्वप्नांसंबंधी प्रश्न हमखास विचारला जातोच.
स्वप्नांबद्दलचे हे कुतूहल साहजिकच आहे. अगदी पुरातन काळामध्ये बुधकौशिक ऋषींना पडलेले स्वप्न ‘रामरक्षास्तोत्र’ या नावाने प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक काळात, शिवबाला सोळाव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पडले. या स्वप्नाच्या पूर्तीकरिता सन्याची, पर्यायाने शस्त्रनिर्मितीची नितांत गरज होती. ही गरज पशाच्या अभावी पुरी झाली नसती. स्वराज्याची निर्मिती किती तरी पटीने कठीण झाली असती. अशा अवघड वेळेला तोरण्याच्या पायथ्यापाशी असलेल्या गुप्त धनाचे स्वप्न शिवरायांना पडले आणि त्याच जागी मोहोरांनी भरलेले घडे सापडले अशी स्वप्नांची ऐतिहासिक महती आहे.
पुढील लेखांमध्ये आपण स्वप्नांसंदर्भातले अनेक प्रश्न अभ्यासणार आहोत. या पहिल्या लेखामध्ये जनसामान्यांमध्ये कुठली स्वप्ने पडतात? प्राण्यांना स्वप्ने पडतात का? याचा परामर्श घेऊ या. पुढच्या लेखात स्वप्नांचा अर्थ वेदकाळापासून ते आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी लावायचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल माहिती असेल. या अर्थ लावण्याचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात कसा करता येईल याबद्दल विवेचन आणि शेवटच्या लेखात स्वप्नांचा मेंदूच्या कार्यरचनेशी संबंध आणि स्वप्नांचे विकार या संबंधात चर्चा असेल.
स्वप्न म्हणजे नक्की काय? याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद असला तरी या लेखापुरते स्वप्न, दिवास्वप्न आणि झोपेत चालणारे फुटकळ विचार यात फरक केला आहे. स्वप्न पाहणे म्हणजे झोपेमध्ये अनुभूती / विचार अथवा भावना या प्रत्यक्षात घडत असल्याचा भास होणे. बहुतांश स्वप्नांमध्ये स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींची भूमिका ही त्यात भाग तरी घेणारी असते अथवा एक प्रेक्षक म्हणून असतेच. तसेच कुठली तरी कृती चालू असते. मग ती बघणे असेल अथवा पळणे / चालणे असते आणि इतर व्यक्तींबरोबर संवाद असेल, तसेच बहुतांश स्वप्नांमध्ये स्वत:खेरीज एक तरी व्यक्ती किंवा प्राणी असतातच.
 स्वप्नांचा अभ्यास
सर्वसामान्य माणसाची स्वप्नं कुठल्या प्रकारची असतात, त्यात कुठल्या भावना असतात या प्रश्नांवर संशोधन झाले आहे, त्यात भाग घेणाऱ्या लोकांचे प्रामुख्याने दोन गट पडतात. पहिल्या गटामध्ये लोकांना ‘स्लीप लॅब’मध्ये रेम (रॅपिड आय मोशन) झोपेतून (साखरझोपसदृश झोप) उठवले जाते आणि कुठली स्वप्ने पडली होती याचा अभ्यास केला जातो, तर दुसऱ्या गटात घरी झोप झाल्यानंतर सकाळी स्वप्ने लिहून काढणारे लोक असतात. स्नायडर या संशोधकाने १९६० ते १९६७ या सात वर्षांच्या दरम्यान ‘स्लीप लॅब’मधला दीर्घ अभ्यास केला होता. यात ६३५ स्वप्नांचा आढावा घेतला होता. तब्बल ५८ पुरुष आणि स्त्रिया यांनी त्यात भाग घेतला होता.
बहुतांश लोकांची(त्यात मानसोपचार
तज्ज्ञदेखील आले.) स्वप्नांच्या आशयाबद्दलची जी समजूत असते त्यांच्यापेक्षा वेगळाच निष्कर्ष निघाला. परीक्षेत नापास झालो आहे, सार्वजनिक ठिकाणी अर्धनग्न अथवा उघडे आहोत, अचानक दात नाहीसे झाले आहेत, पसे सापडणे, आकाशातून  खाली पडणे, अशा प्रकारची स्वप्ने फक्त ११ टक्के लोकांनाच पडली.
बरीचशी स्वप्ने ही आदल्या दिवशी घडलेल्या घटनांची तंतोतंत उजळणी होती. स्वप्नांमध्ये असलेल्या भावनांचा अभ्यास बेथेस्डा ब्रुकलीन इथल्या ‘स्लीप लॅब’मध्ये करण्यात आला. यात ९ पुरुष आणि ८ स्त्रियांनी भाग घेतला. एका रात्रीत रेम झोपेच्या काळात चार वेळा त्यांना उठवून भावनांचा परामर्श घेण्यात आला. बऱ्याचशा स्वप्नांमध्ये भावना (राग, हर्ष, उत्कंठा इ.) या यथोचित होत्या. सर्वात जास्त आढळलेला दोष म्हणजे भावनांचा अभाव. (जर तशी परिस्थिती प्रत्यक्ष घडत असताना ज्या भावना असत्या त्यांचा अभाव असणे.) नकारात्मक भावना (राग, द्वेष, मत्सर) या सकारात्मक भावनांपेक्षा (आदर, प्रेम) दुपटीने आढळल्या. रेम झोपेप्रमाणेच नॉन-रेम झोपेतदेखील स्वप्ने पडतात. ही स्वप्ने झोपेच्या उत्तरार्धात आणखी गडद होत जातात.
घरच्या वातावरणातील स्वप्ने
कॉलीन्स या मानसशास्त्रज्ञाने १८९३ साली त्याच्या स्वत:च्या सहकाऱ्यांच्या (जे स्वत:देखील तज्ज्ञ होते.) स्वप्नांचा अभ्यास केला. कुठल्याही गोष्टीचा पद्धतशीर अभ्यास करणे ही पाश्चात्त्यांची खोडच आहे. त्यानुसार स्वप्नांच्या १० निकषांवर आधारित हॉल-हॅनडे कॅसल अशी कोडिंग व्यवस्था निर्माण करण्यात आली. स्वप्नांमधील व्यक्ती; हालचाली, तीव्रता, आकार इत्यादी बाबींची काटेकोर नोंदणी आणि त्यांचे मूल्यांकन या पद्धतीत होते. त्यातून वेगवेगळ्या व्यक्तिसमूहांच्या (मग त्या व्यक्ती भारतातल्या असोत किंवा आफ्रिकेतील असो) स्वप्नांच्या अभ्यासात एकसूत्रता (युनिफॉर्मिटी) आली. काही संशोधकांनी नाइटकॅप नावाचे तंत्रज्ञान वापरले. घरी झोपले असताना डोळ्यांच्या हालचाली आणि डोक्याची स्थिरता याची माहिती लॅपटॉपकडे जाते. रेम स्लीप आली, की भोंगा वाजतो आणि स्वप्नांतून उठवले जाते. गंमत म्हणजे घरात पडलेली स्वप्ने आणि लॅबमधील स्वप्ने यात फारसा फरक दिसत नाही.
वयपरत्वे होणारे स्वप्नांतील फरक
बाल्यावस्थेतील स्वप्न आणि पौगंडावस्थेतील स्वप्ने यात मोठा फरक पडतो. मात्र त्यानंतरच्या काळात अगदी वृद्धावस्थेत पडणारी स्वप्ने यात खूप कमी फरक असतो. लहानग्यांच्या स्वप्नांचा पहिला अभ्यास स्वित्झरलँडमध्ये झाला. यात २७११ स्वप्नांचा समावेश होता. वय वष्रे तीनपासून १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश होता. सतत पाच वष्रे मागोवा घेण्यात आला.
आश्चर्याची बाब म्हणजे ३ ते ५ वयोगटात खूपच कमी (२७ टक्के) स्वप्ने पडतात असे आढळले. सगळ्यात जास्त स्वप्ने प्राण्यांची पडतात आणि आक्रमक स्वप्ने ज्यात मारामारी, शारीरिक इजा असतात, ही सगळ्यात कमी होती.
पौगंडावस्थेतील मुलांच्या स्वप्नात नातेवाईकांचे प्रमाण कमी होते, तर मुलींच्या स्वप्नात त्यांचे घर, आई, बाबा यांचे प्रमाण वाढते. शहरी लोकांपेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची झोप गाढ असते, असा एक समज आहे. त्यामुळे त्यांची स्वप्ने कदाचित वेगळी असतील, असा अनेकांचा गरसमज असतो. या समजाला आव्हान देणारा अभ्यास १९९०च्या दशकात केला गेला. साऊथ अमेरिका, आफ्रिका येथे राहणाऱ्या ग्रामीण लोकांचा यात समावेश होता. मागे उल्लेखलेली हॉल – व्हॅन डे कॅसल ही निकष पद्धती अवलंबली तेव्हा त्यांच्या स्वप्नांमध्ये आणि पुढारलेल्या देशात राहणाऱ्या लोकांच्या स्वप्नात विशेष फरक नसल्याचे जाणवले, किंबहुना स्त्रियांमध्ये लंगिक अत्याचार असणारी भीतीदायक स्वप्ने तिपटीने आढळली.
प्राण्यांनादेखील स्वप्ने पडतात का? याचे उत्तर होय असे आहे. कुत्रे पाळणाऱ्या बऱ्याच लोकांनी पाहिले असेल, की झोपले असताना कुत्र्यांच्या पायांची हालचाल होत असते अथवा ते विव्हळण्याचा आवाज करतात. २००१ साली मॅसेच्युसेट इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उंदरावरील प्रयोगात सिद्ध झाले की, उंदीरदेखील जटिल स्वप्ने पाहतात. या प्रयोगात उंदरांच्या हिप्पो कॅम्प्स या मेंदूच्या भागाचे आलेखन करण्यात आले. जेव्हा हे उंदीर जागेपणी ‘चीज’च्या शोधात गुंतागुंतीच्या वळणातून वाट काढतात तेव्हा हे आलेखन विशिष्ट पॅटर्न दाखवते. तसाच पॅटर्न झोपले असताना त्यांच्या रेम झोपेत दिसतो. अर्थात उक्रांतीनंतर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना यात काही नवल नाही. त्यांच्या मते उंदीर, कुत्रा, हत्ती, माकडे असे सस्तन प्राणीच नव्हे, तर अगदी साप, बेडूक आदी खालील वर्गातील प्राण्यांनादेखील स्वप्ने पडू शकतात.
सारांश: बरीचशी स्वप्ने ही विसरली जातात आणि त्यांच्यामध्ये थोडाफारच फरक असतो. याचमुळे अनेक लोकांना स्वप्ने म्हणजे काही तरी धूसर, गूढ असा गरसमज होतो.
(पुढच्या भागात -१ मार्च – स्वप्नांचा अर्थ आणि त्याचा उपयोग )

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा