प्रत्येक नकार हा त्या विवाहोत्सुक वराला किंवा वधूला अपराधीपणाच्या खाईत लोटतो. माझं काय चुकलं हा प्रश्न घेर घालून बसतो. संतापाच्या भरात चुकीची पावले उचलली जातात. अनेकदा ‘दगडापेक्षा वीट मऊ’ म्हणून अनेक नकार स्वीकारलेल्या मुली मनाविरुद्ध विवाह करतात. अनेक जण नकार म्हणजे स्वत:चा वैयक्तिक अपमान समजतात. निराश होतात, हे टाळण्यासाठी ‘नकाराचा अर्थ’ जाणून घेणं गरजेचं आहे.
‘‘आज आठ दिवस झाले त्या घटनेला. मला त्यातून बाहेरच पडता येत नाहीये. गेल्या शनिवारी मी आणि संकेत भेटलो बाहेरच एका कॅफेमध्ये. जवळ जवळ तासभर गप्पा मारल्या आम्ही. बोलत असताना असं वाटलं की बहुतेक घडेल यातून काही चांगलं. एकदम छान वाटत होतं. पण.. त्यानंतर पाच दिवसांनी त्यानं नकारच कळवला. मला समजतच नाहीये असं का झालं? मी सारखी सारखी आठवून पाहतेय की आमच्या गप्पांमध्ये मी काय काय बोलले? मी त्याला आगाऊ तर वाटले नसेन ना? मला संकेत आवडला होता. त्याला मी आवडले असेन असंच वाटत होतं मला. आणि त्याने स्वत: फोन नाहीच केला. त्याच्या आईने केला फोन. त्याला करायला काय झालं होतं? आणि नंतर मी चार-पाच वेळा फोन केला तर त्यानं नाहीच उचलला. हिम्मतच नाही त्याच्यात स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायची. आणि नकारच द्यायचा होता तर पाच दिवस कशाला घालवले त्याने? लगेच कळवायचं ना! इतके दिवस कशाला तिष्ठत ठेवलं त्यानं मला! ते पाच दिवस इतके छान गेले ना की वाटलं चला, शोध संपला एकदाचा..!
 * * *
अभिजित आला तेव्हा त्याचं तोंड उतरलेलं होतं. गेल्या महिन्यातच तो लग्न ठरल्याबद्दल पेढे द्यायला आला होता. अगदी खुशीत होता त्या वेळी. त्याला जशी हवी होती तशीच होती अनुया. गहूवर्णी, शिकलेली, मुंबईतच राहणारी. स्वभावाने मोकळी, पण आता मात्र काहीतरी बिनसलं होतं. ‘‘ गौरीताई लग्न मोडलं आमचं. नक्की काय कारण आहे ते काही समजत नाही. पण हनिमूनला कुठे जायचं यावरून आमचे काहीसे मतभेद झाले. तिला कुठेतरी भारताबाहेर जायचं होतं, पण मी तिला म्हटलं की आपण कुठेतरी रेल्वेने जाऊ म्हणजे आपल्याला खूप गप्पा मारायला वेळ मिळेल. भारताबाहेर काय नंतरसुद्धा जाता येईल. तिनं त्यावर खूप चिडचिड केली आणि म्हणाली,’’आत्ताच तू माझं ऐकत नाहीस, नंतर तू काय ऐकणार? मला नकोच हे लग्न!’’ मला कळत नाही की फक्त हेच कारण आहे की अजून काही आहे. आणि हेच कारण असेल तर किती फुटकळ कारण आहे!’’
‘‘पण माझं काय चुकलं असाच विचार माझ्या मनात येतो. आणि तिनं माझा खूप अपमान केलाय, अशीही भावना माझ्या मनात आहे. नकाराची भावना खूपच वाईट आहे. आई तर खूप खचली आहे. नातेवाईकांना काय सांगायचे हा पण प्रश्न आहे. माझ्या पाठचा भाऊ लग्नाचा आहे. त्याच्या लग्नावर तर परिणाम नाही ना होणार अशीही काळजी वाटते. अवघ्या महिन्यावर लग्न आले होते. निमंत्रणपत्रिका पण छापून झाल्या आहेत. आणि काही निमंत्रणेसुद्धा करून झाली आहेत. मला आता लग्नच करायचे नाही.
 * * *
‘‘सलग आठ मुलांनी मला नकार दिलाय. मला आता बघणे-दाखवणे या प्रक्रियेचाच कंटाळा आलाय. मी उत्तम शिकलेली आहे. स्वत:च्या पायावर उभी आहे. दिसायला ही मी वाईट नाही. मला वाटलं होतं माझं लग्न लगेच ठरेल पण का नकार देतायत मला? मला डावललं जातंय, असं वाटतं मला. माझ्या सगळ्या मत्रिणींची लग्ने झाली आहेत. जो भेटेल तो विचारतो, ‘कधी देणार लाडू?’ घरात ही सतत हाच विषय असतो. कोणतंही नवीन स्थळ पाहायचं तर मला आता भीतीच वाटते. ‘फिअर ऑफ रिजेक्शन’ ने रात्र रात्र झोप येत नाही. लग्न हा इतका महत्त्वाचा विषय असू शकतो का? मला उबग आलाय सगळ्याचा. कुठेतरी पळून जावसं वाटतंय. पण कुठे जाणार? मला निराशा आलीय. हर्षद म्हणून एक मुलगा सारखा ई-मेलवर संपर्कात होता. तीन महिने बोलत होतो आम्ही. बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या आम्ही. आणि परवा नकार दिला त्यानं मला. म्हणाला, ‘विचार जुळत नाहीत’. कमाल आहे. तसा मी पण दिलाय दोघांना नकार. त्यातला एक तर ‘ममाज बॉय’ होता. त्याला काहीही विचारलं तर म्हणायचा आईला विचारावं लागेल. बावळट कुठला. पण ‘मला’ नकार मिळतो याचं खूप वाईट वाटतं. मला सवयच नाहीये कधी ‘नाही’ ऐकायची. माझ्या बाबतीत असं काही होईल असं वाटलंच नव्हता मला.’’माधवी फोनवर सांगत होती.
* * *
‘‘मला मुलगा आहे ५ वर्षांचा. त्याच्यासहित स्वीकारणारा नवरा हवाय मला. हे मी सांगितलं की नकारच येतो मला. परवा भेटला एक अमित नावाचा माणूस. स्वत: घटस्फोटित. त्यालाही एक मुलगी आहे, पण तिचा ताबा त्याच्या बायकोकडे. त्यामुळे तो स्वत:ला विनापत्यच समजतो. मला म्हणाला, मुलाची सोय दुसरीकडे नाही का होणार? म्हणजे याला फक्त मी हवी. माझा मुलगा नको. आईला आणि मुलाला तोडायला सांगतोय तो मला. मी विचारलं त्याला की समजतंय का तू काय बोलतोयस ते? तर म्हणतो कसा, तुझ्या मुलाची जबाबदारी मी का घेऊ?
मी म्हटलं अरे पसे आहेत माझ्याकडे. तर म्हणाला, ‘जबाबदारी फक्त आíथक नसते. भावनिक पण घ्यावी लागते. ती ताकद नाही माझ्याकडे.’ एवढा तरणाताठा माणूस आणि म्हणे ताकद नाही. म्हणजे शेवटी माझ्या नशिबी नकारच. ‘‘सुनीती तावातावाने बोलत होती आणि बोलता बोलता ती ओक्साबोक्शी रडायला लागली.
* * *
नकार -अनेक प्रकारचे. मन पोखरून टाकणारे. माणसाला नराश्यात ढकलणारे. हतबल करणारे. नकारामध्ये नाकारलं जाण्याची भावना येते. झिडकारले जाण्याची आणि धुडकावून लावले जाण्याची भावना निर्माण होते. समोरच्या माणसाला आपण नको आहोत असे वाटू लागते. लग्न या प्रकारात तर या नकाराचा अनेकांना वारंवार अनुभव येतो. या अनुभवातून निर्माण होणाऱ्या भावना या नकारात्मकच असतात. चीड, संताप, अपराधीपणा, नराश्य, चिंता, उबग अशा तऱ्हेच्या भावना निर्माण होतात. या भावनांमधून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. वर दिलेल्या सगळ्या उदाहरणांमध्ये या नकारात्मक भावनांचं प्रतििबब स्पष्टपणे जाणवतं.
आता माझे काय होणार? लोककाय म्हणतील? माझीच नव्हे तर कुटुंबाची अब्रू जाईल? नेमकं माझ्याच नशिबी असं का? माझं नशीबच फुटकं?  एकापाठोपाठ न संपणाऱ्या प्रश्नांची मालिका.
प्रत्येक नकार हा त्या वराला किंवा वधूला अपराधीपणाच्या खाईत लोटतो. माझं काय चुकलं हा प्रश्न घेर घालून बसतो. संतापाच्या भरात चुकीची पावले उचलली जातात. अनेकदा ‘दगडापेक्षा वीट मऊ’ म्हणून अनेक नकार स्वीकारलेल्या मुली मनाविरुद्ध विवाह करतात. अनेक वेळा लाडात वाढलेल्या मुला-मुलींना नाही ऐकायची सवय नसते. त्यामुळे ते सर्व तो नकार म्हणजे स्वत:चा वैयक्तिक अपमान समजतात. कधीही लग्नाच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीला भेटायला जाताना नकार येऊ शकतो, याची मानसिक तयारी करणे गरजेचे ठरते. आणि मला आवडलेल्या मुलाने-मुलीने होकार दिलाच पाहिजे, असा अट्टहास असेल तर निराशा पदरी पडू शकते.
आमच्या ओळखीत एक मुलगी आहे. ती दिसायला खरोखरच सुरेख आहे. तिच्या लहानपणापासून आसपासचे सगळे जण तिच्या आई-वडिलांना म्हणायचे, ‘‘ हिच्या लग्नाची तुम्हाला काही काळजी नाही. तिला नक्की मागण्या येतील. तुमच्या मुलीच्या स्थळा वरती उडय़ा पडतील उडय़ा.’’ अशा प्रकारची बोलणीसुद्धा अनेकदा घातक ठरतात. ती मुलगी स्वत:ला अप्सरेसारखी सुंदर मानायला लागते आणि त्यातून तिला कुणा मुलानं नकार दिला तर तिचं भावविश्व उद्ध्वस्त होतं.
    अशा वेळी स्वत:ला वेळीच सावरावं लागतं. जसा मी नकार देऊ शकते-शकतो, तसं समोरच्या माणसाला ही नकार देण्याचा अधिकार आहे, हे मान्य करावं लागतं. जगातली सगळी माणसं वाईट नसतात. एका माणसाचे वागण्यावरून सर्व माणसांची परीक्षा करता येत नाही. काही वेळा निर्णय चुकू शकतात आणि ते दुरुस्त करता येतात. जी काळजी मागच्या वेळी घेतली नाही, ती आता घेता येऊ शकते. या भावनेतून माझे काही चुकलेले नाही, परंतु या घटनेत माझा जो काही अल्प वाटा असेल तो मान्य करायला हवा. जे झालं त्यामुळे चांगले काय झाले, ते शोधायला हवे.
भूतकाळ बदलता येत नाही याचेही भान हवे. आणि या नकारात्मक भावनेमध्ये किती काळ राहायचे ते स्वत:लाच ठरवावे लागते. स्वत:ला एकच सांगावे की असे अनुभव आलेली मी एकटी-एकटा नाही. असे अनेक जण असू शकतात. अशा वेळी विवाह (पूर्व) समुपदेशनाचा ही चांगला उपयोग होतो.
    रश्मी एके दिवस माझ्याकडे आली होती. ती जराशी सावळी होती. आणि तिची उंचीही कमी होती. तिला मुलांकडून वारंवार नकार येत होते. मला म्हणाली, ‘‘मला एखादा बिजवर मुलगा पाहून द्याल का? आता मला कंटाळा आलाय.’’
 ‘‘अगं इतकी का निराश होत्येस? त्या मुलांनी दिलेला नकार हा तुला दिलेला नकार नाही, हा तुझ्या व्यक्तिमत्त्वाला दिलेला नकार नाहीच. त्या मुलांच्या बायकोच्या प्रतिमेच्या चौकटीत तू बसणारी नाहीस, इतकेच.. त्याच्या बायकोबद्दलच्या काही कल्पना असतील. तो त्याच्या विचारांच्या आज्ञेत आहे. तुला त्यात कमीपणा वाटण्यासारखं काय आहे. कुणीतरी असेलच ना ज्याच्या कल्पनेत तुझ्यासारखी व्यक्ती असेल.!’’
म्हणून आलाच नकार तर स्वत:शीच नक्की म्हणावं, ‘तू नही तो और सही.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा