माधुरी ताम्हणे
आयुष्याचा अर्थ शोधताना मला नेहमीच सात आंधळे आणि हत्तीची गोष्ट आठवते. प्रत्येक जण गतानुभवांच्या संचितावर हा गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात प्रत्येकाचं श्रेयस वेगळं! प्रेयसाचा मार्ग वेगळा! त्यामुळे आयुष्याचा अर्थ शोधताना खरंतर प्रत्येकानं स्वत:ची फूटपट्टी वापरणं श्रेयस्कर. अनेकदा आजूबाजूच्या माणसांच्या सुखदु:खाच्या फूटपट्टीवर आपण आपल्या आयुष्याची मोजमापं घेतो किंवा कधी कधी दुसऱ्यांच्या सुखदु:खाची गणितं आपण आपल्या गृहीतकांवर आधारतो. तसं करण्यापेक्षा स्वत:च्या आयुष्याचा अर्थ नेमकेपणानं आणि प्रामाणिकपणे स्वत:च शोधण्याचा प्रयत्न केला तर? हे खरंय की आयुष्याचा अर्थ शोधण्याची प्रक्रिया खरंतर आयुष्य उतरणीला लागतं, तेव्हाच खऱ्या अर्थानं सुरू होते, कारण तोवर आपला दृष्टिकोन, आपली मानसिकता व घटितांचे संदर्भ खूपसे बदलून गेलेले असतात. कधी कधी जीवनमरणाचा वाटलेला संघर्ष अचानक तथ्यहीन वाटू लागतो. तर कधी कधी घडून गेलेल्या घटनांचे तपशील, जे त्या त्या काळात अत्यंत टोकदार वाटलेले असतात, ते कालांतरानं संदर्भहीन आणि अत्यंत फुटकळ वाटू लागतात. मनाचं असं उन्नयन केव्हा घडतं? जेव्हा प्रमिला दळवीसारखी सार्वजनिक शौचालय साफ करणारी एखादी स्त्री मला मुलाखतीच्या निमित्तानं भेटते आणि बोलता बोलता कवितेतून अशी व्यक्त होते- ‘आयुष्यात कधीही हरायचं नसतं. हरलं तरी रडायचं नसतं. जगण्याला जिद्दीनं सामोरं जायचं असतं..’ हा सकारात्मक दृष्टिकोन कधी येतो? इतकी विजिगीषु वृत्ती कशी मनीमानसी निर्माण होते? संघर्षांतून श्रेयसापर्यंत पोहोचवण्यात हीच वृत्ती कामी येत असेल का? असेलही.. कदाचित म्हणूनच, ‘सूर्य उगवणारच नसेल तर अंधारात तारे मोजायचे तरी किती? काळजात काटय़ांचे रान असताना फुलांचे श्वास चुकवायचे तरी किती? फाटक्या देहाला ठिगळ जोडताना काळाची शिवण उसवायची तरी किती?’ अशा माझ्या अत्यंत निराश अवस्थेत, राणूबाईसारखी एखादी देहविक्रय करणारी स्त्री भेटते. स्वत: उपाशी राहून, गिऱ्हाईकानं तिच्यासाठी आणलेला भुर्जी-पाव आणि बिर्याणी पोरांच्या मुखी घालते. अंध:कारमय भविष्याच्या सावल्या भेडसावत असतानाही पोराला ‘मोठ्ठा हपिसर’ बनवण्याचं स्वप्न सांगते. तेव्हा आपल्या मनातल्या स्वप्नांचं थिटेपण जाणवून ओशाळवाणं वाटतं.
माध्यमांच्या निमित्तानं पंचतारांकित विश्वापासून झोपडपट्टय़ांपर्यंत मुशाफिरी केल्यावर, मुलाखतींच्या निमित्तानं अनेकांच्या आयुष्यात खोलवर डोकावल्यावर खरोखर स्वत:च्या आयुष्याचा अर्थ नव्याने उलगडतो. विशेषत:, सुमारे ४००च्या वर भटक्या जनावरांना माणसांच्या (?) तावडीतून वाचवून स्वखर्चानं त्यांचा प्रतिपाळ करणारी फिझा शहा भेटते. रस्त्यावरील अनाथ आणि भुकेकंगाल वृद्धांच्या जखमा साफ करण्यापासून, त्यांच्या मुखी अन्न घालण्यापर्यंत त्यांची निरलसपणे सेवा करणारा संदीप परब भेटतो, स्टेशनवरील बालकांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी जीवाचं रान करणारा विजय जाधव भेटतो किंवा अपंग प्राण्यांसाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे गणराज जैन भेटतात.. तेव्हा मग स्वत:चं सीमित विश्व पुन्हा एकदा तपासून पाहावंसं वाटतं. स्वत:चं कुटुंब, मुलंबाळं, त्यांचं भवितव्य या चौकोनी विश्वातून मन उदात्त श्रेयसाच्या शोधात व्यग्र होतं. आता अशा तळागाळातल्या समाजासाठी काय करता येईल याचा शोध मन आकांतानं करू लागतं. स्वत:च्या आयुष्याचा अर्थ अगदी वेगळय़ाच पद्धतीनं दृगोचर होतो. व्यष्टीतून समष्टीकडे जाण्याचा हा प्रवास आयुष्य अनेकांगानं समृद्ध करतो. नकारात्मक अनुभवांतूनसुद्धा सकारात्मक चांगलं काही हाती लागतं. कोत्या मनोवृत्तीच्या माणसांमधली उदात्त विशालता अचानक मनाला स्पर्श करून जाते. मूर्तीच्या स्वरूपातल्या देवापेक्षा देवत्वाचा प्रत्यय देणारी माणसं पूजनीय वाटू लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता दुसऱ्याच्या पेल्यातलं रंगीबेरंगी पेय पाहून मन डहुळत नाही. नियतीनं आपल्या हातात जो पेला भरून दिलाय, तो अर्धा रिकामा आहे ही खंत पुसली जाते आणि त्या जागी विचार येतो, अरे आपला पेला तर काठोकाठ भरलेला आहे. अर्धा हवेनं.. आणि अर्धा स्वच्छ जलानं. मग अतृप्तीची ओशट असोशी आपोआप संपून जाते. शेवटी तृप्ती ही तात्कालिक भावनिक अवस्था आहे; खरं ना! विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यातल्या केवळ ठिपक्याएवढय़ा अणूमात्र आयुष्यात जगण्याचं उद्दिष्ट गवसणं हे महत्त्वाचं. पुढे तिथवर पोहोचू की नाही ते नियती ठरवेल! पण तिथवरचा प्रवास तर आपण केलाय. अजूनही करतोय हा विचार मनोज्ञ आहे. आणि या प्रवासात अनुभवांच्या अनमोल माणिकमोत्यांनी भरलेली ओंजळ लाभणं, बावनकशी नात्यांशी अनुबंध जुळणं, हाच माझ्या आयुष्याचा माझ्यापुरता मला गवसलेला अर्थ आहे.
madhuri.m.tamhane@gmail.com