विदर्भ साहित्य संघाला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये नुकतेच दोनदिवसीय राज्यस्तरीय लेखिका संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी राज्यभरातील अनेक स्त्री लेखिका उपस्थित होत्या. या वेळी स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीसाहित्य या विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. तसेच काही वादग्रस्त मुद्देही चर्चिले गेले. काय घडलं या संमेलनात हे सांगणारा एक लेख. तसेच याच संमेलनात ‘दृक-श्राव्य माध्यमांमधील स्त्री-प्रतिमा’ या विषयावरील वादग्रस्त परिसंवादातील एक वक्त्या मोहिनी मोडक यांचा माध्यमं, निर्माते आणि प्रेक्षकांनाही स्त्री-प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, हे सांगणारा स्वतंत्र लेख.
प्रेक्षकातील बायकांनाच मालिकांमधील मूर्ख, नटव्या स्त्रिया आवडतात, आजच्या काही आया पोटच्या मुलींना या मायावी विश्वात ढकलताना वाटेल त्या तडजोडी करायला तयार असतात तेव्हा कसली आलीए स्त्री प्रतिमा! नेलपॉलिशचा रंग कुठला असावा हे देखील आता चॅनेल ठरवतं तेव्हा कलाकार-निर्माते-दिग्दर्शकांना दोष देऊ नका.’’ असे खडे बोल चतुरस्र अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी उपस्थितांना सुनावले. निमित्त होतं, ‘दृक्श्राव्य माध्यमातील स्त्री प्रतिमा’ या विषयावर नागपूर येथील राज्यस्तरीय लेखिका संमेलनात आयोजित केलेल्या परिसंवादाचं. अध्यक्ष प्रख्यात अभिनेत्री लालन सारंग यांच्यासह या परिसंवादात स्मिता तळवलकर, दिल्लीच्या डॉ. सुनीता देशमुख तसेच माझाही सहभाग होता. लालन सारंग याही तळवलकरांसह या निष्कर्षांला पोचल्या की, ‘माध्यमातलं स्त्री चित्रण बघवत नसेल तर रिमोट वापरून ते बघणे बंद करा, आहे िहमत?’  दोघीही सुज्ञ, अनुभवी अभिनेत्री आहेत. माध्यमांची त्यांना अंतर्बाह्य़ जाण आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यात निश्चितच तथ्य आहे. ‘वाट्टेल ते दाखवतात’ असे एकीकडे नाक मुरडून म्हणणाऱ्यांना आणि दुसरीकडे चवीने तेच कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्यांनी आरसा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
 परंतु हेही तितकेच खरे की, फक्त ‘रिमोट’ वापरून सुटण्याइतका हा प्रश्न सोपा असता तर अशा विषयावर परिसंवाद-चर्चा करण्याची गरजच भासली नसती. नवोदितांचे जाऊ द्या, ‘देहपातळीवर जगणारी मूर्ख स्त्री’ या रूपात सादर केलं जातंय हे कळत असूनही किती प्रस्थापित अभिनेत्रींमध्ये बुद्धीला न पटणाऱ्या, चुकीचे स्त्री चित्रण करणाऱ्या भूमिकांना नकार देण्याची िहमत आहे? समाजाकडून मिळणारे प्रेम, आदर, कौतुक कलाकारांना आवडते मग त्यांनी पर्यायाने येणारी सामाजिक जबाबदारी झटकून कसे चालेल? येथे त्यांनी समाजकार्य करणे अपेक्षित नाही पण सामाजिक भान जपणे नक्कीच अपेक्षित आहे. ‘देणारे’ शेवटी माध्यम आहे, ‘काय आणि कसे द्यायचे’ याचा विधिनिषेध माध्यमांना असायलाच हवा. कलाकार या माध्यमाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. ‘मागणी तसाच पुरवठा’ आम्ही करतोय असे म्हणून कलाकार त्यांच्या व्यावसायिक हतबलतेचे आणि माध्यमं त्यांच्या सर्जनशीलतेच्या मर्यादांचे खापर सरसकट प्रेक्षकांच्या माथी फोडू शकत नाही. उद्या प्रेक्षकांनी खरोखरच ‘रिमोट’ वापरले तर माध्यमांचे सगळे अर्थकारण कोसळून पडेल. खरंतर माध्यम आणि प्रेक्षकांना एकमेकांची तितकीच गरज आहे. मल्टिप्लेक्सच्या युगात सर्वसामान्य भारतीयाला परवडणारे मनोरंजन म्हणजे टीव्ही. त्याची पोच सर्वात जास्त साहजिकच प्रभाव ही सर्वाधिक त्यामुळे ‘घडवणारे’ तेच आणि ‘बिघडवणारेही’ तेच.
‘उत्तम कलाकृती त्याला म्हणतात जी आपली आयुष्यविषयक जाण वाढवते,’ असं तेंडुलकरांनी म्हटलंय. माध्यमांना ही जाण वाढवायची इच्छा नाही का? ती असेल तर टीआरपीची आíथक गणितं सांभाळूनही चांगले कार्यक्रम देता येतात. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या रुमालाचा रंगसुद्धा त्यांची क्रिएटिव्ह टीम ठरवते, कार्यक्रमात मनोरंजनाचा मसालाही असतो, सुरुवातीचे प्रश्न सामान्य वकुबाच्या व्यक्तीला सोडवता येतील इतपतच कठीण असतात, तरीही त्या कार्यक्रमाला बच्चन हे स्वत:च्या अस्खलित भाषेतून, देहबोलीतून, सांस्कृतिक समज वापरून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. कलाकार, प्रेक्षक, माध्यम आणि सादरीकरणाचा दर्जा यातल्या सुरेख समन्वयाचं हे फक्त उदाहरण आहे. हे जर शक्य आहे तर हेच चॅनेल्स स्त्री प्रतिमांच्या बाबतीत बहुतेक वेळा अवास्तव, विकृत किंवा मूर्ख चित्रण का करतात, हा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
   दृक्श्राव्य माध्यमातून ‘दिसणाऱ्या’ स्त्री प्रतिमेबद्दल युनेस्कोचा अहवाल काही कठोर सत्य मांडतो. जागतिक स्तरावर अशा माध्यमातून ‘स्त्री’ला चार प्रकारांत सादर केले जाते. १) सेक्स किटन म्हणजेच मादक खेळणे २) कुटुंबवत्सल माता ३) चेटकीण (‘भुरळ पाडणारी मायावी विकृत स्त्री’ या अर्थाने) किंवा ४) करिअरसाठी धडपडणारी स्त्री. या अहवालात शेवटी असं म्हटलंय की, येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानता येण्याची शक्यता नाही. येथील दृक्श्राव्य माध्यमांनी पहिल्या तीन प्रतिमांच्या साच्यात अडकवलेली सर्वसामान्य भारतीय स्त्री ही ‘सेक्सडॉल’ नाही आणि कुटुंबासाठी चोवीस तास राबणारी ‘महान त्यागमूर्ती’ही नाही. ती या दोन टोकाच्या प्रतिमांच्या मध्ये कुठेतरी स्वत:साठीदेखील जगू पाहणारी एक ‘हाडामासाची’ व्यक्ती आहे. माध्यमातील तकलादू, अतिरंजित स्त्री प्रतिमा या जित्याजागत्या स्त्रीला क्वचितच स्पर्श करतात. चित्रपटातील आणि नाटकातील स्त्री प्रतिमा हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
  दैनंदिन विवंचनेतून घटकाभर करमणूक म्हणून टीव्ही बघणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना चटपटीत मनोरंजन हवे असते, स्त्रीचे अस्सल चित्रण पाहण्यात त्यांना रस नसतो हे अगदी खरे, पण थोडे कष्ट घेतले तर याचा सुवर्णमध्य काढणे माध्यमांना अशक्य नाही. ‘तू तिथे मी’ मालिकेसाठी बटबटीत लेखन करणारे मांडलेकर, ठरवले तर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’सारखी अप्रतिम पटकथा लिहू शकतात. मुक्ता बर्वे किंवा स्पृहा जोशी चांगल्याच भूमिका निवडतात. सवंग करमणुकीशिवाय पर्याय नसावा असे कोणतेही सांस्कृतिक दारिद्रय़ भारतात नाही, मराठी साहित्यात तर नाहीच नाही. दुर्दैवाने, पूर्वी आपलं वेगळेपण जपणाऱ्या मराठी मालिकाही आता िहदी मालिकांची री ओढू लागल्या आहेत. िहदीतही एके काळी कविता चौधरीची ‘उडान’, निहलानींची ‘तमस’,  विजयाबाईंची ‘लाइफलाइन’ किंवा सई परांजपे यासारख्या दिग्दíशकेच्या निखळ विनोदी अशा दर्जेदार मालिका गाजत. आज बदलत्या काळानुसार प्रेक्षकांना वेगळे काही हवे आहे. पण वेगळे म्हणजे ‘सवंग’ असे समीकरण का लादले जाते आहे?
 मालिकांमधल्या स्त्री प्रतिमा म्हणजे एकता कपूर या एका स्त्रीनेच रुजवलेली आणि आता फोफावलेली भयंकर विषवल्ली. ती म्हणते, ‘‘सामान्य भारतीय स्त्रीची ‘बंगला, गाडी, भारी साडी, दागिने, मोठे कुटुंब’ हीच स्वप्नं मी पडद्यावर दाखवते, यात काय गर आहे. ‘गर हे आहे की येता जाता कटकारस्थानं आणि विषप्रयोग करणारी खलनायिका आणि बावळटपणे मुळुमुळु रडत बसणारी नायिका या दोनच प्रकारच्या स्त्रियांचे अताíकक चित्रण या मालिका करतात. शेकडो मानवी तास वाया घालवून बुद्धीला गंज चढवतात. ‘काय पाहावे’ ही प्रगल्भता नसलेला भारतीय प्रेक्षक हा जगाच्या दोन दशकं मागे आहे, असं ‘कलर्स’ वाहिनीची यशस्वी सुरुवात करणाऱ्या अश्विनी यार्दी म्हणतात. या मालिका स्त्रीच्या प्रगतीचा आलेख त्याहूनही कित्येक दशके मागे अधिक उतारावर घेऊन जात आहेत. अनेक क्षेत्र पादाक्रांत करणाऱ्या, उत्तमोत्तम साहित्यकृतींमध्ये शब्दबद्ध झालेल्या, बचतगटापासून कॉर्पोरेट विश्वापर्यंत झेप घेऊ पाहणाऱ्या ‘नॉर्मल’  स्त्री प्रतिमांना यात कितपत स्थान आहे?
  माध्यमातील राजकीय चर्चामध्ये, एखाद्या अंजुम चोप्राचा अपवाद सोडला तर खेळाच्या चच्रेमध्ये स्त्रियांचा सहभाग अत्यल्प आहे. ‘इंडियाज प्रीमियर सेक्सिस्ट लीग’ या झणझणीत लेखात क्रीडा पत्रकार शारदा उगरा म्हणते, ‘आयपीएल सामन्यांमधून स्टुडिओ गर्ल्स किंवा चीअरगर्ल्सच्या रूपात केलेलं स्त्रीचं प्रदर्शन तिची एकच प्रतिमा समाजाच्या मनावर ठसवतं : लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर.’ (युवराज सिंगने मात्र त्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ हा किताब गँगरेपचा बळी ठरलेल्या निर्भयाला अर्पण करून संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला होता याचाही ती आवर्जून उल्लेख करते.) बहुसंख्य रिअॅलिटी शोजमधून स्वत:ला ‘कचकडय़ाच्या बाहुली’सारखं सादर होऊ देणाऱ्या मुलींची जजेस किंवा सहनिवेदकांकडून सर्रास खिल्ली उडवली जाते. दुर्दैवाने या टवाळीला कित्येक जणी ‘कॉम्प्लिमेंट’ समजतात. या स्त्रियांनी याला ठाम नकार द्यायला हवा, कारण हा शोषणाचाच आधुनिक प्रकार आहे. व्यावसायिकतेच्या नावाखाली माध्यमांनी प्रेक्षकांच्या खालावलेल्या अभिरुचीला खतपाणी घालायचं की त्यांचा बुद्धय़ांक वाढवायचा?
 जाहिरातींमध्ये आजची खरी स्त्री थोडीफार का होईना दिसू लागली आहे. एका दागिन्याच्या कंपनीची पुनर्वविाहाच्या संकल्पनेवरील किंवा एका विवाहविषयक संकेतस्थळाची ‘ती गरज म्हणून नाही तर आवड म्हणून नोकरी करते’ हे हळुवारपणे सांगणारी, अशा जगाबरोबर चालणाऱ्या सकारात्मक जाहिराती दिसू लागल्या आहेत. तरीही कित्येक जाहिरातीतून मॉडेल स्त्रिया उत्पादनाची जाहिरात करतायत की, त्या स्वत:च एक उत्पादन झाल्या आहेत असा प्रश्न पडतो. ईव्हपासून स्त्री ही  ‘object of desire’ आहे, त्यामुळे दाढीच्या रेझरच्या जाहिरातीत ‘सोल्जर फॉर वुमन’सारखे घोषवाक्य वापरले जाते. गोरेपणाच्या हव्यासातून त्या क्रीम्सचा २००८ मध्ये ४०० अब्जावर असलेला बाजार तर आता ६५० अब्जांवर पोचला आहे. दुसरीकडे जाहिरातीतून कपडे धुणारी, फोडण्या देणारी, दमलीच तर क्रीम चोळून पुन्हा पदर खोचून उभी राहणारी (आणि ही सगळी बाईचीच कामे असतात, हे अधोरेखित करणारी) गृहिणी सतत दिसते. (त्यामुळे ‘किरण बेदी’सारख्या स्त्रीलाही मुलाखतीत ‘तुम्हाला कुकिंग आवडतं का’ अशा प्रश्नांच्या पारंपरिक बेडीत अडकवलं जातं.) त्या जाहिराती या स्थानाचं ‘त्याग’, ‘ममता’ वगरे शब्दांनी उदात्तीकरण करून ते दुय्यम स्थानच योग्य असल्याची मखलाशी करतात. जाहिरातींचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग आहे ‘लहान मुलं’. त्यांच्या व्हिडीओ गेम्समधल्या अॅनिमेटेड मदनिका असोत किंवा मुलींच्या हातातल्या ‘झीरो फिगर’वाल्या बार्बी बाहुल्या, नकळत जाहिरातीतून-खेळण्यांतून दिले गेलेले हे ‘संदेश’ या उद्याच्या नागरिकांना स्त्रीकडे पाहण्याची चुकीची आणि जुनीच नजर देत आहेत. ‘बच्चा जो देखेगा वही सीखेगा’ याचं गांभीर्य माध्यमांना आणि माध्यमातील स्त्रीला कळायला हवं.
  रूपर्ट मर्डाकसारखे बहुतेक माध्यमसम्राट अभारतीय आहेत. भारत हा त्यांच्यासाठी एक देश नसून फक्त एक बाजारपेठ आहे. त्यामुळे येथील माध्यमांतून प्रतीत होणाऱ्या स्त्री प्रतिमांशी त्यांना काहीही देणघेणं नसलं तरी एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला, आपल्या कलाकार-तंत्रज्ञांना असायला हवं. माध्यमांशी आपण ग्राहक, प्रेक्षक म्हणून जुळलेले असतो तेव्हा या व्यवस्थेचा एक भाग म्हणून बदलाची सुरुवात आपण स्वत:पासून करायला हवी आणि माध्यमांनाही बदलायला भाग पडेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. गरज पडल्यास अॅडव्हर्टाईजिंग कौन्सिलकडे दाद मागायला हवी. प्रेक्षकांना निवडीचा हक्क आहे आणि तो त्यांनी सजगपणे वापरायला हवा. आíथक समीकरणांबरोबरच आपल्या प्रतिसाद आणि प्रतिक्रियांवर स्त्री प्रतिमांचं भविष्य अवलंबून आहे.     ल्ल

तुम्हाला काय वाटतं?
आजच्या मराठी, हिंदी मालिका स्त्रीच्या प्रगतीचा आलेख त्याहूनही कित्येक दशके मागे अधिक उतारावर घेऊन जात आहेत? तुम्हाला या मालिका बघायला आवडतात का? असतील तर का आणि नसतील तर काय बघायला आवडेल? माध्यमांना काय पर्याय सुचवाल. आम्हाला लिहा ३०० शब्दांत.
आमचा पत्ता- ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा मेल करा.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
woman, dance bar, Dubai, stage show,
स्टेज शो करण्याच्या नावाखाली महिलेला डान्सबारच्या कामात ढकलले, पोलिसांच्या मदतीने महिलेची दुबईतून सुखरूप सुटका
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

Story img Loader