माध्यम सुनावण्यांची ‘अग्निपरीक्षा’? हा विजया जांगळे यांचा (५ एप्रिल) लेख वाचला. लेखिकेने ‘ट्रायल बाय मीडिया’ अर्थात ‘माध्यम सुनावणी’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर उदाहरणांसहित उत्तम भाष्य केलेले आहे, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! ‘दूरदर्शन’बरोबरच माध्यमांची प्रबोधनाच्या जबाबदारीची भूमिका अस्तंगताला गेली आणि माध्यमे ही अलीकडे केवळ मनोरंजनाची साधने झालेली आहेत. ‘दूरदर्शन’वरील ७च्या बातम्या प्रेक्षक खास वेळ काढून पाहायचे कारण, त्यांनी कमालीची विश्वासार्हता कमावली होती. मनोरंजन वाहिन्यांबरोबरच बातम्यांच्या वाहिन्याही २४ तास झाल्या, परिणामी ‘टीआरपी’च्या स्पर्धेत बातम्यांची विश्वासार्हता संपवत त्यांनी सवंग मनोरंजकतेचा अगदी कळस गाठला. ‘हमारे विश्वसनीय सूत्रोंसे पत्ता चला है’ ‘नाव न सांगण्याच्या अटींवर …’ या विधानाखाली काय वाटेल त्या अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. याचा सारा दोष खरं तर तपास यंत्रणांवर जातो. वार्तांकनातील बातमीचा ‘सोर्स’ सांगायचे बंधन वार्ताहरावर नसले तरीही फौजदारी गुन्ह्यात एखादी व्यक्ती तपास यंत्रणेपासून तपासाशी संबंधित माहिती दडवत असेल तर तिला नोटीस अथवा समन्सने पोलीस ठाण्यात बोलावून, प्रसंगी तिला अटकही करून तिच्याकडून तपासासंबंधातील माहिती मिळवण्याची, प्रसंगी तपास कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल तिच्यावर खटलाही दाखल करण्याची तरतूद फौजदारी कायद्यात आहे. याचा योग्य आणि परिणामकारक वापर या ‘मीडिया ट्रायल’चा फाजीलपणा मर्यादित करण्यात उपयुक्त ठरू शकतो. -अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (पूर्व)
स्त्रियांचे महत्त्वपूर्ण योगदान!
‘बाईपणाचे सार्थक’ हा डॉ. मीना वैशंपायन यांचा लेख (५ एप्रिल) ‘महिला सबलीकरणा’ची उत्तम माहिती देणारा ठरला आहे, पूर्वी स्त्रियांची भूमिका सर्वत्र फक्त चूल व मूल अशीच होती, परंतु आधुनिक पाश्चात्त्य स्त्रीवादाचा उल्लेख, १८८० ते १९२० या कालावधीत केलेल्या प्रयत्नांमुळे स्त्रियांना मताधिकार मिळाला व वारसा हक्कातही महत्त्वाचे स्थान मिळाले, त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात युद्धभूमीवरही स्त्रियांनी यशस्वीपणे कामगिरी केली, तर त्याच वेळी शांतता काळातही त्या उत्तम काम करू शकतात, याची जाणीव निर्माण झाली, यानंतरच सर्वत्र स्त्री स्वातंत्र्याचा हुंकार उमटू लागला, याबाबत भारतात सन्माननीय राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, अण्णासाहेब कर्वे अशा अनेकांचे स्त्री सबलीकरणाचे कार्य क्रांतिकारी ठरले व त्यातूनच आजच्या अत्यंत कर्तृत्ववान स्त्रियांनी भारताच्या विकासात दिलेल्या योगदानाची जागतिक इतिहासालाही नोंद घ्यावी लागली आहे. -प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे</strong>
‘मनातलं कागदावर’ तुमच्याचसाठी
वाचक मंडळी, हे सदर केवळ आणि केवळ तुमच्या मनातल्या विचारांना कागदावर… छे, आधुनिक जगात संगणकावर उतरवण्यासाठीच. आयुष्य चारी दिशांनी आपल्याला शिकवत असतं. ते अनुभव आपल्याला कुणाला तरी सांगावेसे वाटतात. काय मिळालं त्यातून ते व्यक्त करावंसं वाटतं. ते कधी गंभीर असतं तर कधी गमतीशीर. काही वेळा मात्र नुसतंच मन भरून येतं… मनमुक्त होतं… काही तरी सुचवत जातं… मांडावंसं वाटतं ते सगळं. तुमच्याही मनात येतात अशा काही गोष्टी? मग आम्हाला लिहा. विषयाचं बंधन नाही, परंतु शब्दमर्यादा ८०० ते १०००. जागेच्या उपलब्धतेनुसार तुमचे लेख प्रसिद्ध केले जातील. कृपया याबाबतीत पत्रव्यवहार करू नये. आमचा ईमेलआयडी chaturang@expressindia.com अथवा chaturang.loksatta@gmail.com