‘व्हिटॅमिन बी वन’च्या माझ्यावरच्याच उपाचारामुळे त्याचं महत्त्व मला माहीत होतंच, या व्हिटॅमिनचा उपचार मी मासिक पाळीच्या दुखण्यावर करायला सुरुवात केली आणि मुलींचं दुखणं एकदम कमी झालं. त्यासाठी केलेल्या संशोधनाविषयी..

मा सिक पाळीतील वेदना, या अतिशय त्रासदायक दुखण्यावर एक अचूक आणि सोपा उपाय कसा शोधून काढला त्याची ही गोष्ट. मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते. १९५६ चा मे किंवा जून महिना असावा. मी पुण्याला प्रॅक्टिस सुरू करून तीन वष्रे झाली होती. खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या केसेस मी आधीसुद्धा तपासलेल्या होत्या. पण या वेळेला कसे कोण जाणे काहीतरी वेगळे झाले हे मात्र खरे. माझ्या मोठय़ा बहिणीची, मालूताईची मत्रीण तिच्या १८ वर्षांच्या मुलीसह माझ्याकडे आली. पाळी सुरू झाल्यापासून पाळी आली की, इतकं पोट दुखायचं, की तीन दिवस ती शाळेत जाऊच शकायची नाही. तिला मळमळायचं, उलटय़ा व्हयच्या, ताप यायचा. कॉलेजमध्येही तसंच होत होतं. पण आता डॉक्टर होण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता. आता दर महिन्याला तीन दिवस कॉलेज बुडवून कसे चालेल?
यावर जे अनेक उपाय केले जातात, ते मला माहिती होतेच. पण ते तात्पुरतेच असतात. किंवा ऑपरेशन करून, गर्भाशयाचे मज्जातंतू मध्ये कापून, त्याचा तुकडा काढून टाकणे (Cottels Operation) हा उपाय पोटदुखी कायमची थांबवतो. पण यातले कोणतेही उपाय पोटदुखीचं मूळ कारण बरं करत नाहीत. मग दुसरं काही करता येईल का? मी विचार करू लागले. खरं तर या Primary Dysmenorrhe मध्ये मज्जातंतूंना सूज येते हे १९२५ सालीच ‘अमेरिकन जर्नल ऑफ सर्जरी’मध्ये प्रसिद्ध झालेलं होतं. मग मज्जातंतूंच्या सुजेवरच का उपाय करून पाहू नये? त्या मज्जातंतूंना सूज असते,  पण कुठलाही जंतुसंसर्ग झालेला नसतो. मज्जातंतूंना सूज येण्याचं एक कारण म्हणजे ‘व्हिटॅमिन बी वन’ कमी असणं असा शोध तर १९३२ साली लागला होता आणि त्याबद्दलचं नोबेल प्राइजही त्या शोधाला मिळालं होतं.
आणि शिवाय मला स्वत:लाच ‘व्हिटॅमिन बी वन’च्या उपचाराचा खूप फायदा झाला होता. १९३६ च्या जूनमध्ये मी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये गेले. गावदेवीला आर्य महिला समाजचं होस्टेल आहे, तिथे राहात होते. मला तिथलं जेवण अजिबात आवडत नव्हतं. मी सारखी आजारी पडायला लागले. घसा धरायचा, ताप यायचा. उजवा पाय दुखायला लागला आणि त्याला सूज आली.  अॅनॉटमीचे प्रोफेसर डॉ. मोटवानींना मी पाय दाखवला. त्यांनी मज्जातंतूंना सूज आली आहे त्यावर औषध घ्यायला पाहिजे, असं सांगितलं. माझी एक मावस बहीण मथुताई उकिडवे गिरगाव बॅकरोडला राहात होती. तिचे यजमान डॉक्टर होते आणि त्या काळात ते शिकायला अमेरिकेला जाऊन आले होते. त्यांनी मला तपासून कंपाउंडरकडून पुडय़ा घेऊन जायला सांगितलं. रोज दोन्ही वेळा भातावर घालून खायला सांगितलं. पंधरा दिवसांत सूज जाऊन पाय दुखायचा थांबला. पुडय़ांमध्ये िपगट रंगाचं औषध होतं. ते काय होतं हे मी त्यांना विचारलं तर तो ‘हातसडीच्या तांदळाचा कोंडा होता’ असं त्यांनी मला सांगितलं-त्यात भरपूर ‘व्हिटॅमिन बी वन’ असतं असंही सांगितलं. त्यांच्याकडे उखळ, मुसळ आणि कांडणारा माणूस होता. ते नेहमी हातसडीचेच तांदूळ खायचे. गिरणीवर सडल्या गेलेल्या तांदळाला जास्त उष्णता लागून व्हिटॅमिन बी वन टिकत नाही हेही सांगितलं. ते कमी झालं की मज्जातंतूंना सूज येते असं सिद्ध झालेलं त्यांना माहीतच होतं. तेव्हापासून मलाही ते माहीत झालं. बेरीबेरी या रोगावर त्याचा उपयोगही सुरू झाला.
 मी तिला ‘व्हिटॅमिन बी वन’ची १०० मिलीग्रॅमची एक गोळी रोज दुपारी जेवल्यावर घ्यायला सांगितलं आणि महिन्यानं परत भेटायला बोलावलं. एक महिन्यानंतर ती आली आणि सांगितलं की पोट अजिबात दुखलं नाही, पण मळमळलं, उलटय़ा झाल्या आणि ताप आला. मग आणखी एक महिना तशाच गोळ्या घ्यायला सांगितल्या. दुसऱ्या महिन्यानंतर ती आली आणि काहीच तक्रार राहिली नाही असं सांगितलं. मग मी तिला आणखी एक महिना गोळ्या घ्यायला सांगितल्या. असा तो तीन महिन्यांचा कोर्स ठरला. यामुळेच मी अशा सगळ्या रुग्णांना ‘व्हिटॅमिन बी वन’ची १०० मिलीग्रॅमची एक गोळी रोज अशा तीन महिने घ्यायला सांगायला लागले. गोळ्या मी लिहूनच देत होते, आणि जे डॉक्टर तिला माझ्याकडे पाठवत, त्यांना तशी चिठ्ठीही देत असे (म्हणजे त्यात काहीही गुप्तता नव्हती.)
ch11
 १९९१ च्या नोव्हेंबरमधे पुण्याला एक ‘ऑल इंडिया अॅडोलसंट ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉकॉलॉजीची कॉन्फरन्स’ होती. त्यात एखादा पेपर वाचावा असं मी ठरवलं. ‘पाळीच्या वेळची पोटदुखी’ हा विषयही निवडला. मी १९८६ मध्येच हॉस्पिटल बंद केलं होतं. पण ३३ वष्रे केलेल्या प्रॅक्टिसमधले आउटडोअरचे आणि इनडोअरचे सगळे पेपर्स माझ्याजवळ होते. (अजूनही आहेत) माझ्या गुरू, कामा हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसर-इन-चार्ज, डॉ. जेरुशा झिराड, यांनीच मला रेकॉर्डस ठेवण्याचं महत्त्व शिकवलं होतं.
माझ्या रेकॉर्डसमधून मी अशा केसेस शोधून काढल्या त्या २०८ निघाल्या. मग प्रथमच त्यांचं विश्लेषण केलं. त्यात ८७ टक्केपूर्ण बऱ्या झालेल्या, ८ टक्के मुलींची तक्रार कमी झाली होती आणि ५ टक्के मुलींवर काहीच परिणाम झाला नाही, असे निष्कर्ष निघाले. इतरांचे निष्कर्ष काय आहेत हे पाहायला मी  ‘ब्रिटिश लायब्ररीत’ गेले. पण तेथे या उपचाराचा उल्लेखही सापडला नाही. लंडन येथून निघणाऱ्या ‘लॅन्सेट’ या मासिकामध्ये या विषयावर  ‘बोर्डिग द ट्रेन’ असा मथळा असलेला एक लेख आढळला. त्यात त्यांनी ‘तुम्ही आगगाडीत बसलात की, ती नेईल तिकडे जावेच लागते. त्याचप्रमाणे तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलात, तर अशा यातना सोसाव्याच लागतात, त्याला काही इलाज नाही’ असा निष्कर्ष काढला होता.
मी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन, तिथली सगळी पुस्तकं आणि जर्नल्स शोधली, पण तिथेही या उपचाराचा उल्लेखही सापडला नाही. त्यामुळे माझ्याशिवाय कोणीही हा उपचार करत नाही, असं लक्षात आलं. ठरल्याप्रमाणे मी परिषदेत माझा निबंध वाचला. तिथे उपस्थित असलेलं कोणीही असा उपचार करत नव्हतं. मग त्यावर बरीच चर्चा आणि ऊहापोह झाला. मग माझ्या उपचारावर एक लेख लिहून तो छापून आणावा, असं मी ठरवलं. ‘लॅन्सेट’ हे जवळजवळ दीडशे वष्रे लंडनहून निघणारं मासिक आहे त्यातच तो छापून आणावा असा विचार करून मी माझा लेख ‘लॅन्सेट’ला पाठवला. त्यांचं मत असं पडलं की शास्त्रोक्त पद्धतीने इंग्रजीत ज्याला ‘डबल ब्लाइंड प्लॅसिबो कंट्रोल स्टडी’ म्हणतात तसा करायला पाहिजे. मग लेख छापण्याबद्दल विचार केला जाईल. ‘लॅन्सेट’चा सल्ला मी मानला आणि ‘डबल ब्लाइंड प्लॅसिबो कंट्रोल स्टडी’ करण्याच्या तयारीला लागले.
 मुली मिळणे सगळ्यात महत्त्वाचे. अशा मुली एके ठिकाणी मिळाल्या तर बरं पडेल, म्हणून मी िहगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या बोìडगमध्ये गेले. तिथल्या सुपरवायझर सुषमा देशपांडे यांना भेटले. त्यांना मी माझा प्रकल्प समजावून सांगितला. पाळीच्या वेळेच्या पोटदुखीवर मी एक औषध देणार आहे. त्यात रोज एक गोळी अशा पाच महिने द्यायच्या आहेत. त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही, याची मी लेखी खात्री देते. असं सांगितल्यावर त्यांनी मुली बोलावल्या. त्यांचा प्रत्येकीचा मी वय, वजन, उंची व पाळीचा इतिहास असं सगळं लिहिलेले कागद तयार केले. त्या एकूण ४४ मुली होत्या. त्यांचे मी दोन गट केले. सारख्या दिसणाऱ्या लहान लहान कॅप्सूल्स आणल्या. तशा ३० कॅप्सूल्स मावतील अशा सारख्या दिसणाऱ्या लहान डब्या आणल्या, २२ डब्यात व्हिटॅमिन बी वनच्या गोळ्या तुकडे करून कॅप्सूलमधे भरून तशा ३० कॅप्सूल्स एका डबीत भरल्या. आणखी २२ डब्यांत साखर (प्लॅसिबो) भरून, एकेका डबीत ३० कॅप्सूल्स भरल्या. प्रत्येक डबीवर रुग्णाच्या नावाचं लेबल चिकटवलं. असे दोन गट केले आहेत, आणि अशा दोन प्रकारच्या कॅप्सूल्स आहेत हे माझ्याशिवाय देशपांडे यांनाही माहीत नव्हतं. (ब्लाइंड ऑब्झर्वर)
अशा पाच महिने (३ महिने व्हिटॅमिन बी वन आणि २ महिने साखर) कॅप्सूल्स घेऊन झाल्यावर मी सुषमा देशपांडय़ांना मुलींच्या दुखण्यात काही फरक झाला आहे का? असे विचारले. त्यांनी त्या मुलींची सभा घेऊन, औषध घेऊन ज्यांना बरं वाटलं आहे, त्यांनी हात वर करा असं सांगितलं. जवळजवळ सर्वच मुलींनी आनंदानं हात वर केले. मग एकेकीला बोलवून परिणाम विचारून, त्यांचं विश्लेषण केलं तर ते माझ्या रेकॉर्डमधल्या २०८ केसेसच्या परिणामांच्या प्रमाणाप्रमाणेच निघालं.
मग परत त्यावर लेख लिहून तो ‘लॅन्सेट’ला पाठवला. तो त्यांनी परत पाठवला, कारण ४४ हा आकडा पुण्याच्या लोकसंखेच्या मानाने फारच लहान आहे म्हणून हे निष्कर्ष ग्राह्य धरता येत नाहीत, असे सांगितले. नाउमेद न होता, मी पुण्याच्या ‘हिंदुस्थान अँटीबायोटिक्स’च्या संख्याशास्त्र विभागात चौकशी केली. त्यांनी ५३० हा आकडा या वयोगटासाठी, पुण्यासाठी प्रातिनिधिक ठरेल असे सांगितले.
आता प्रश्न आला पशाचा. माझं वय तेव्हा ७६ वर्षांचं होतं. मी इंडियन इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चला अर्ज केला असता तर त्यांनी मला लागणारे एक लाख रुपये नक्की दिले असते. पण माझा अर्ज आणि मी करणार असलेलं संशोधन, त्यांच्या निरनिराळ्या विभागांमध्ये जाऊन, ते पास होऊन मला चेक मिळेपर्यंत मी असेन की नसेन आणि असले तरी मला तितकी शारीरिक क्षमता असेलच असं सांगता येत नाही, या विचारात मी द्विधा मन:स्थितीत होते, पण माझा हा प्रश्न गोखले यांनी सोडवला. ते मला म्हणाले ‘तुझ्याकडे एक लाख रुपये आहेत का नाहीत?’
मी म्हटलं,‘आहेत’.
‘मग ते कशासाठी ठेवले आहेस?’
‘ मला नवीन मोटार घ्यायची आहे.’ – मी.
‘ तू ते खर्च कर, मी तुझी मोटार नव्यासारखी करून देतो’. असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याप्रमाणे  ४०-४२ हजार रुपये खर्चून मोटार नव्यासारखी केली आणि मी मुली शोधण्याच्या उद्योगाला लागले. मी पुण्यातल्या नऊ शाळा आणि चार बोìडग्जशी संपर्क साधला.
शाळांच्या मुख्याध्यापिकांना भेटून त्यांना मी माझा संशोधनाचा विषय समजावून सांगून, मला मुलींशी का बोलायचे आहे ते सांगितलं. सर्व शाळांनी सहकार्य करून संपर्काकरता एक एक अध्यापिका नेमली. त्यांनी नववी आणि दहावीच्या मुलीकरता माझी व्याख्यानं ठेवली. विषय अर्थातच  ‘पाळीच्या वेळची पोटदुखी’ मी प्रथम शास्त्रीय माहिती सांगून, त्या वेळी कोणाकोणाचं पोट का दुखतं तेही सांगायची. तो विषय त्यांच्या फारच जिव्हाळ्याचा होता, कारण आदल्या दिवशी भावाबरोबर हिरिरीनं बॅडिमटन खेळणारी मुलगी दुसऱ्या दिवशी  पोटदुखीनं बेजार होते. खेळणं काय, शाळेत जाणंही अशक्य होतं. वेगवेगळी औषधं घेऊन, दुखणं तात्पुरतं आटोक्यात आलं, तरी दर महिन्याला धास्तीच असते. असा निष्कारण आजार आल्यामुळे चडफडण्याखेरीज काहीही करणं हातात नसतं. असं वर्णन केलं की, ते त्या मुलींना लगेच पटायचं. मग त्यावर मी एक औषध देणार आहे, ते पाच महिने घ्यायचं आहे. ज्यांना अशी तक्रार असेल, त्यांनी मला भेटा असं सांगितलं की, त्या उत्साहानं थांबायच्या. काही काही शाळेत तर माझी दोन-दोन व्याख्याने झाली.
मी मदतीला नर्सला बरोबर नेत असे. तिच्याजवळ कागद असत. त्यावर ती मुलीचं नाव, पत्ता, इयत्ता, तुकडी लिहून मुलीच्या पाळीची सर्व माहिती लिहीत असे व मुलीला तिच्या पालकांना द्यायला माझ्या प्रकल्पाची माहिती आणि त्यांच्या पाल्ल्याला असं औषध घ्यायला संमतीपत्र, असं देत असे. बोìडगमधल्या मुलींना मी रात्री आठ-साडेआठला भेटत असे. बोìडग सुपरिंटेंडन्ट स्वत:च परवानगी देत असल्यामुळे त्यांचा काही प्रश्न नव्हता. अशा एकूण ७५० मुली मिळाल्या. त्यातल्या ५५७ पालकांचीच परवानगी मिळाली.
आता ‘जीवनसत्त्व बी वन’च्या गोळ्यांचा प्रश्न आला. इतक्या गोळ्या पुण्यात मिळणे कठीण होते. ग्लॅक्सो कंपनी ‘बेरिन’ नावानं व्हिटॅमिन बी वनच्या १०० मि. ग्रॅ. गोळ्या करत असे. म्हणून मी मुंबईला जाऊन त्यांच्या अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून घाऊक दरात त्या मिळवल्या. त्यांनी बाटलीमागे १८ रुपये कमी घेऊन गोळ्या विकल्या आणि वर ६००० गोळ्या देणगी म्हणून दिल्या.  (दुर्दैवानं त्यांनी आता या गोळ्यांचं उत्पादन थांबवलं आहे.)
मुलींची शाळावार विभागणी केली. मग त्यांचे दोन गट करून पाच महिने गोळ्या दिल्या. दर महिन्याला पाळीची आणि पोटदुखीची नोंद केली. पाच महिने संपेपर्यंत दोन महिने उन्हाळ्याची सुट्टी लागली त्यामुळे औषध संपवून दोन महिने झाल्यावरच औषधांचा काय परिणाम झाला, ते समजू शकले. दहावीचा निकाल शाळेतच लागल्यामुळे त्याच दिवशी त्या मुलींना विचारता आले. बोìडगमधल्या काही मुली परत आल्या नव्हत्या. त्यांचे पत्ते मिळवून, पत्राने त्यांची माहिती मिळवली. ‘महासंकटातून तुम्ही मला सोडवलंत.’ या दुखण्यातून तुम्हीं माझी मुक्तता केलीत.’ अशा आशयाची अनेक पत्रं आली!
याचं संकलन केल्यावर, परत ८७ टक्के पूर्ण बऱ्या, ८ टक्के दुखणे कमी, आणि ५ टक्के फरक नाही, असलाच निष्कर्ष हाती आला.  आता हे सांगूनही खरं वाटणार नाही, पण मी जेव्हा या सगळ्या नवीन अभ्यासावर आधारित लेख लिहून परत ‘लॅन्सेट’ला पाठवला तेव्हा त्यांचं उत्तर आलं की ‘व्हिटॅमिन बी वन’ हे औषध नाही डाएटरी सप्लीमेंट आहे, सबब लेख प्रसिद्ध करू शकत नाही.
 संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना मी ही हकिगत सांगितली. सर्वाचं मत असं पडलं की शक्य तितक्या लवकर मी हा लेख प्रसिद्ध करावा. मी तो लेख ‘इंडियन जर्नल फॉर मेडिकल रिसर्च’कडे पाठवला. त्यात त्यांनी फेरबदल, काटछाट असे करून घेतले आणि ६ एप्रिल १९९६ च्या अंकात तो प्रसिद्ध केला. आता जेव्हा केव्हा इतर शास्त्रज्ञ, डॉक्टर्स या विषयावर लेख लिहितात तेव्हा माझा हा लेख प्राथमिक संदर्भ लेख म्हणून वापरतात.
 या उपचाराचं वैशिष्टय़ असं आहे की, त्याला डॉक्टरची चिठ्ठीही लागत नाही. ते औषधाच्या दुकानातून कोणीही आणू शकतं. त्याची मात्रा जास्त होऊ शकत नाही. आपलं शरीर ते जरुरीपुरतं घेऊन, जास्तीचं बाहेर टाकतं. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होऊ शकत नाहीत. तेव्हा ‘आजीबाईच्या बटव्यातल्या’ औषधाप्रमाणे हा घरगुती उपचार होऊ शकतो आणि मुलींची या नसत्या दुखण्यातून सुटका होऊ शकते.    

health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tokyo subsiding epidurals for pregnant women
वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?
nashik newly married woman suicide loksatta
नाशिक : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
Simple neck massage for headache and dizziness expert advice
डोकेदुखी आणि चक्करचा त्रास कायमचा होईल कमी! फक्त काही मिनिटे करा मानेचा ‘हा’ मसाज, तज्ज्ञांनी सांगितले फायदे
doctors at st george hospital performed urgent surgery and relieved the woman from major pain
गर्भाशयाच्या मुखावरील तांबी मूत्राशयाच्या पिशवीपर्यंत सरकली, शस्त्रक्रिया करून महिलेची त्रासातून मुक्तता
Ramdas Athawale statement on Santosh Deshmukhs murder case
बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले
Health Massage
Health Special: अभ्यंग विधी कसा करावा? त्याचे फायदे कोणते? हा विधी कुणी करू नये?

डॉ. लीला गोखले यांचा ‘वेदनेतून सुटका’ हा लेख त्यांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असून तो प्रायमरी डिस्मेनोरिया अर्थात मासिक पाळी सुरू होण्याच्या काळातील मुलींच्या पोटदुखीवर आहे.

Story img Loader