गेली १६ र्वष विकलांगांसाठी काम करणाऱ्या मीराताई लाड आज ८२ व्या वर्षीही तरुणाला लाजवेल अशा निष्ठेने आणि तन्मयतेने ‘आधारघर’ चालवत आहेत. आज ‘आधारघरा’त ३० ते ३५ बिछान्याला खिळलेले व २५ ते ३० थोडं फार हिंडू-फिरू शकणारे रुग्ण आहेत. त्यांची आजीवन सेवा करण्याचे असिधाराव्रत घेतलेल्या मीराताईंचे अनुभव त्यांच्याच शब्दांत.
राजीव व रजन माझी जुळी मुलं वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी अचानकपणे हे जग एकापाठोपाठ एक सोडून गेल्यामुळे पुढे मी   अनेक विकलांगांची आई बनले, हा माझ्याबद्दलचा समज पूर्णपणे बरोबर नाही, ते एक निमित्त झालं एवढं मात्र नक्की! खरं तर मुलं १३/१४ वर्षांची असतानाच म्हणजे १९७५ मध्येच मी ठरवलं होतं की, चुलीच्या दगडांवरचा माझा स्वयंपाक संपला की बाहेर पडायचं. माझा हा निर्णय मुलांना व त्यांच्या वडिलांना पक्का ठाऊक होता. पुढे नियतीने समोर उभे केलेले दु:खाचे डोंगर ओलांडताना हाच निर्धार माझ्या कामी आला.
  माझ्या समाजवादी विचारसरणीचं मूळ माझ्या माहेरच्या संस्कारात आहे. माझं बालपण बेळगावात गेलं. मी दोन वर्षांची होते नव्हते तेव्हा माझे वडील गेले. त्यांच्या मागे माझ्या अशिक्षित आईने आम्हा चार बहिणींना मोठय़ा जिद्दीनं वाढवलं, शिकवलं. माझं माहेरचं नाव मीरा सुंठणकर. राष्ट्रसेवादलाच्या संस्कारांनी मला ‘मी व माझं घर’ याच्यापलीकडे पाहायला शिकवलं. यामुळेच पुढे १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण आम्ही उभयतांनी अनेकदा रक्तदान करून साजरे केले.
    १९५५ ते १९६२ अशी ७ र्वष मी गिरणगावातील चिकित्सक समूहाच्या शिरोडकर शाळेत शिकवत होते. पुढे १९८२ साली दैवानं सगळं पारडं फिरवलं आणि केवळ ४ महिन्यांच्या अंतराने माझ्या हुशार, गुणी मुलांनी वेगवेगळय़ा कारणांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या डोळय़ांसमोर पूर्ण काळोख पसरला. माझ्या जिवलग मैत्रिणीच्या मुलाने, डॉ. सतीशने पनवेलजवळ कार्यरत असणाऱ्या कुष्ठरोग निवारण समितीचं (कु.नि.स.) नाव सुचवलं आणि ‘बघून येऊ या तर’ म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रथम पाऊल टाकलं तो दिवस होता १८ ऑगस्ट १९८३. त्या दिवशी पाऊस नुसता कोसळत होता. कमरेपर्यंत आलेल्या पाण्याची पर्वा न करता आम्ही नदी पार केली. तिथे पोहोचल्याक्षणी माझ्या मनाने कौल दिला, ‘तुझा शोध आता संपला.’
कै.स.म. प्रभुगुरुजींनी १९५३ मध्ये पनवेल शहरात कु.नि.स.ची स्थापना केली. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी स.का.पाटील यांनी त्यांना पनवेलजवळील नेरे गावातील ‘गाढी’ नदीकाठची ७० एकर जागा दिली. त्याशिवाय ५२ एकर जागा प्रभुगुरुजींनी त्या काळी स्वत: घेतली. पुढे या १२२ एकरच्या प्रदेशाला ‘शांतिवन’ हे नाव दिलं गेलं. प्रभुगुरुजी पनवेलपासून शांतिवनापर्यंत ९ ते १० कि.मी रोज चालत येत. येताना काखेला लावलेल्या आपल्या पिशवीतून औषधं व खाण्याच्या वस्तू वाटेतल्या कुष्ठरुग्णांना देत. १९८३ साली मी इथे आले तेव्हा प्रभुगुरुजी येथे नव्हते. पुढच्या काही फेऱ्यांत प्रकाशभाई मोहाडीकरांची भेट झाली. माझे विचार जाणून घेतल्यानंतर त्यांनी मला समितीत येण्यासंबंधी विचारलं. पण तेव्हा श्री. लाडांच्या नोकरीची ४/५ र्वष बाकी होती आणि त्यावेळी आम्ही दोघांना एकमेकांच्या आधाराची गरज होती.
१९८९ मध्ये श्री. लाड निवृत्त झाले आणि आता पुढचं सगळं आयुष्य कुष्ठरुग्णांसाठी व्यतीत करायचं असं ठरवून आम्ही दोघं शांतिवनात आलो. लाड दीड-दोन र्वष इथं राहून पुन्हा पाल्र्याला गेले. त्यांचा पहिल्यापासून अध्यात्माकडे ओढा होता. त्यामुळे त्यांनी आपलं पुढचं आयुष्य गुरूंच्या वाङ्मयाच्या प्रसाराला वाहून घेतलं. परंतु त्यांचा मला संपूर्ण पािठबा होता. एवढंच नव्हे तर त्यांनी आयुष्यभराची पुंजीही डोळे मिटून माझ्या स्वाधीन केली.
शांतिवनात मी कायमची आले तेव्हा म्हणजे १९८९ मध्ये कुष्ठरुग्णांची संख्या शंभरावर पोहोचली होती. गांधीवादी विचारवंत अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या इथे फेऱ्या होत. त्यांनी कु.नि.स. ने इतर वेगवेगळय़ा क्षेत्रातही काम करावे यासाठी आराखडा तयार केला. त्यानुसार गोविंदराव शिंदे, भाऊसाहेब धामणकर अशा तळमळीच्या कार्यकर्त्यांनी कार्यवाही केली आणि शांतीवनात निसगरेपचार केंद्र, आदिवासी आश्रमशाळा, दोन गोशाळा, रुग्णांनी चालवलेले छोटे व्यवसाय, वृद्धाश्रम असे उपक्रम सुरू झाले. या सर्व ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली. वृद्धाश्रमात फक्त हिंडत्या-फिरत्या वृद्धानांच ठेवायचं हा संस्थेचा नियम होता. परंतु काही घटना अशा घडल्या की ज्यामुळे संस्थेने नियमांना मुरड घालून माणुसकीला अग्रक्रम दिला. त्या कहाण्या अशा..
एकदा वृद्धाश्रमातील एक वयोवृद्ध गृहस्थ पाय घसरून पडले आणि त्यांच्या खुब्याचं हाड मोडलं. त्यांना जागेवरून हलणंही अशक्य झालं. ते अविवाहित होते. इतर पाशही नव्हता. त्यामुळे नियम वाकवणं अथवा त्यांना एखाद्या धर्मशाळेत नेऊन टाकणं एवढाच पर्याय समोर होता. त्यावेळी संस्थेने निर्णय घेतला की, होता होईल तेवढी त्यांची सेवा करायची आणि तशी केली.
दुसऱ्या एका विधवा स्वयंपाकीणबाईना वृद्धत्वामुळे काम होईनासं झाल्यावर त्यांच्या मालकिणीने, सुमतीबाई सामंत यांनी इथे आणून ठेवलं. त्याही शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिल्या. पुढे त्या बाईंना भ्रम झाला. मी सुमतीताईच्या मदतीने त्यांना उठवायची, बसवायची, कॉटशेजारी खुर्ची ठेवून आंघोळ घालायची, जेवू-खाऊ घालायची. त्यांनाही संस्थेने शेवटपर्यंत सांभाळलं.
तिसरी केस माधव भावेची. या २६ वर्षांच्या तरुणाला कंपनीने चांगल्या कामाचं बक्षीस म्हणून नवी मोटारबाईक दिली. त्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व काम आटपून हा बाईकवरून घरी निघाला आणि वाटेत ट्रकने जोरदार धडक दिली. धट्टाकट्टा तरुण मुलगा क्षणात विकलांग झाला. काही वर्षांनी त्याचे वडील वारले तेव्हा आईला वृद्धाश्रमात घेताना संस्थेने माणुसकीला जागत माधवलाही प्रवेश दिला. या घटना जवळून पाहताना माझ्या मनात नव्या विचारांचं ‘बी’ रुजलं, विकलांगांना मग ते तरुण असोत वा वृद्ध त्यांना कायमचं राहण्यासाठी एक मायेचं घर हवं.
माधवच्या आईच्या डोक्यात सतत एकच प्रश्न असे.. माझ्यामागे याला कोण सांभाळणार? एकदा गप्पांमध्ये त्या अगतिक मातेने पुन्हा तोच प्रश्न मला अगदी कळवळून विचारला. पुढे म्हटल्या, ‘तुम्ही सांभाळाल त्याला?’ त्यांना दिलासा मिळावा म्हणून मी म्हटलं, ‘हो, सांभाळेन की!’ माझ्या त्या एका वाक्याने त्या निश्चिंत झाल्या असाव्यात. कारण त्यानंतर काही कारणाने त्यांना पुण्याला जावं लागलं. पण त्यांनी आपल्या नणंदेला सांगून ठेवलं होतं की, माझं काही बरं-वाईट झालं तर माधवला शांतिवनात मीराताईंकडे पोहोचवायचं. त्यानुसार ६ महिन्यांतच माधव परत आला. माधवच्या आईला बरं वाटावं म्हणून मी तसं बोलले होते, पण माझी काहीच तयारी नव्हती. खरं तर एखाद्या ग्रामीण भागात मुलांच्या नावाने दवाखाना सुरू करायचं माझ्या मनात होतं. पण माधवच्या परत येण्याने माझ्या विचारांना वेगळं वळण लागलं. त्यानुसार विकलांगांना शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळण्यासाठी ‘आधारघर’ या माझ्या मनातील योजनेसंदर्भात मी कु.नि.स. शी चर्चा केली. संस्थेने आनंदाने संमती दिली. जागा दिली. याआधी म्हणजे १९८४ मध्ये आम्ही ‘राजीव-रजन लाड ट्रस्ट’ हा सार्वजनिक ट्रस्ट स्थापन केला होताच. या ट्रस्टच्या अखत्यारीत काम करायचं ठरलं आणि माझ्या जगण्याला ‘जीवनहेतू’ मिळाला.  
कोणतंही नवं काम माझ्या मुलांच्या जन्मदिनी म्हणजे २० नोव्हेंबरला सुरू करावं असं मला वाटलं. म्हणूनच माधवला मी तोपर्यंत वृद्धाश्रमातील एका खोलीत ठेवलं. या उपक्रमाची कुणकुण लागताच माझ्या एका मैत्रिणीने तिच्या विकलांग आईला इथं आणलं. या दोघांना घेऊन ‘रामकृष्ण निकेतन’ या आमच्या वृद्धाश्रमात २० नोव्हेंबर १९९७ ला प्रायोगिक तत्त्वावर राजीव-रजन आधारघर सुरू झालं. काम बोलू लागलं तसं रुग्ण वाढू लागले.
  प्रवेशासाठी दोन वर्ग केले. एक शुश्रूषा व औषधोपचार यांचा माफक खर्च परवडू शकणारे आणि दुसरे ज्यांनी आपलं उभं आयुष्य समाजाकरता, देशाकरता किंवा एखाद्या कलेसाठी समर्पण केलंय, त्यांची विकलांग स्थितीत समाजाने सेवा करायला हवी असे. या दुसऱ्या प्रकारच्या रहिवाशांसाठी ट्रस्टने कु.नि.स.च्या संमतीने आधारघरात १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.
 सेवेचं काम जमू लागल्यावर इमारत बांधण्याचा विचार पुढे आला. लाड ट्रस्टचा भक्कम आधार होताच. शिवाय माझी एक बहीण शांतीताई कृष्णन हिने कृष्णन यांच्या निधनानंतर आपलं घर विकून आलेला पैसा माझ्या स्वाधीन केला. म्हणाली, ‘मला आमचं पेन्शन पुरेसं आहे. या पैशांचा विनियोग तू आपल्या ट्रस्टसाठी कर (शांताताईने अलीकडेच म्हणजे सात सप्टेंबरला आधारघरातच प्राण सोडला. आपुलकीचा आणखी एक धागा तुटला.)
अशा प्रकारे ९८-९९ मध्ये कौटुंबिक गंगाजळीतून आधारघराच्या इमारतीचं काम मार्गी लागलं. १४ बेडस्चा हॉल, ८ न्हाणीघर व शौचालय, ४ स्वतंत्र खोल्या, शिवाय स्वयंपाकघर, कोठीची खोली व छोटं ऑफिस अशी टुमदार वास्तू उभी राहिली. पुढे या रचनेत चहूबाजूंनी भर घालत अधिक प्रशस्त, भरपूर सूर्यप्रकाश व मोकळी हवा आत येईल, नाना प्रकारच्या फळझाडांनी वेढलेली बघितल्याबरोबर प्रेमात पडावं अशी नवी वास्तू आर्किटेक्ट विजय घोटगे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाराला आली.
आज आधारघरात ३० ते ३५ बिछान्याला खिळलेले व २५ ते ३० थोडं फार हिंडू-फिरू शकणारे रुग्ण आहेत. इथे येणाऱ्यांना आम्ही शेवटपर्यंत सांभाळतो. हे काम अतिशय आव्हानात्मक आहे. ज्यांना हाताने जेवता येत नाही त्यांना भरवावं लागतं. काहींचा नैसर्गिक विधींवरचा ताबा गेलेला असतो. अशांना हल्ली आम्ही डायपर बांधून ठेवतो. त्यांना आंघोळ घालताना व्हिलचेअरवर अलगद उचलून ठेवावं लागतं. कुणी मला विचारतं, सतत हे काम (बेडपॅन देणं) करताना घाण नाही वाटत? मी म्हणते, ‘‘घाण वाटणं लांब राहिलं. उलट हे काम करताना आपल्या चेहऱ्यावर असे भाव हवेत की, ‘यात काय मोठंसं?’’ तरच या मंडळीना आश्वस्त वाटतं.  
आधारघराची वास्तू उभी राहिल्यावर म्हणजे १९९९ साली पहिले १५ दिवस मी जिद्दीने अहोरात्र काम केलं. संपूर्ण रात्र डोळय़ांत तेल घालून तत्पर राहायचं आणि सकाळ होताच पहिला चहा टाकण्यापासून पुन्हा सुरुवात करायची. शेवटी १६ व्या दिवशी आमचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते ‘बाबूराव मादेगी’ यानी मला अडवलं. म्हणाले, ‘आजची रात्र मी काम करणार’ दुसऱ्या दिवशी त्यांचा पहिला प्रश्न होता, ‘सलग १५ दिवस आणि रात्र काम करण्याची ऊर्जा तुम्ही आणलीत तरी कुठून?’ त्यावेळी माझं वय होतं ६७ व रुग्णांची संख्या होती १४. आज ८२ व्या वर्षीही एखाद्या रुग्णाची चालता चालता त्याच्या नकळत विष्ठा पडली तर कोणालाही हाक न मारता मी ती स्वत: उचलून टाकते. आपण जे शिकवतो, सांगतो ते आचरणात असलं पाहिजे यावर माझा कटाक्ष असल्याने हे सगळं आपसूकच घडतं.
      ‘आधारघरा’च्या रहिवाशांसाठी गाण्याचे, मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन समाजातील संवेदनशील मंडळी मधून मधून इथं येत असतात. पण इथल्या रुग्णांची बसण्याची, ऐकण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यांना स्वस्थ पडून राहण्यात जे सुख वाटतं ते इतर कशातही वाटत नाही. त्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी आठवडय़ातून दोन वेळा डॉ. राजेंद्र पटेल येतात. त्यांच्या औषधाइतकेच त्यांचे मायेचे शब्दही जादू करतात. गरज भासेल तेव्हा डॉ. सतीश साखळकर आणि डॉ. मनोज भाटवडेकर या तज्ज्ञांची मदत मिळते.
  विकलांगांचं सारं काही करण्यासाठी कार्यकर्ते मिळणं आणि मिळाल्यावर ते टिकणं ही एक अवघड गोष्ट आहे. त्यांची निवड करताना प्रेमाने व काळजीपूर्वक सेवा करण्याची मानसिकता हाच निकष या माणसांना सांभाळून ठेवणे ही एक कला आहे, त्याचबरोबर त्यांना मनाप्रमाणे मानधन देता येत नाही, ही खंतही आहे. तरीही आज १९ सेवाभावी कार्यकर्ते ‘आधारघरा’ला सेवा देत आहेत. बहुतेकांची राहण्याची व्यवस्थाही संस्थेतच केली आहे. इथे काम केलेल्यांपैकी तिघांनी प्रेरणा घेऊन याच परिसरात नवे विकलांगाश्रम सुरू केले आहेत. आज समाजाला अशा आधाराची अत्यंत गरज आहे, म्हणून या पारंब्यांविषयी मला समाधान वाटतं.
गेली १६ र्वष विकलांगांसाठी काम करत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार, संजीवन पुरस्कार, पनवेल भूषण आणि इतर सन्मान वाटय़ाला आले पण विकलांगांच्या आणि त्यांच्या आप्तांच्या डोळय़ातील कृतज्ञता हाच मोठा पुरस्कार असं मला वाटतं.  आधारघरासारख्या उपक्रमाची निकड लक्षात घेऊन ‘लाड ट्रस्ट’ने अलीकडेच पुणे-अहमदनगर रस्त्यावर खरेवाडी (शिक्रापूर) या गावात ३ एकरांचा भूखंड खरेदी केला आहे. त्या ८/१० कि.मी. परिसरात दवाखाना नसल्याने त्या ठिकाणी आम्ही प्रथम धर्मादाय दवाखाना सुरू केला आहे. आता तिथे आधारघराची वास्तू उभी करायची आहे. हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी जनताजनार्दनाने साहाय्य करावं अशी प्रार्थना आहे.
    (शब्दांकन- संपदा वागळे)
संपर्क- शांतिवन ‘नेरे’ गाव, पनवेल.
दूरध्वनी- ०२१४३-२०५४०२, ०२१४३- २३८१३१.
पुणे विभाग – ९५५२५२२१३२.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Borgaonkarwadi parking lot, Kalyan,
सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात
100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
Story img Loader