लहान मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांविरोधात लढण्यासाठी तिने माध्यम वापरलं व्हिडीओ फिल्म्सचं. मुलांना हसत खेळत सांगता येईल, अशा स्वरूपाचे कळसूत्री बाहुल्यांचे माहितीपट व टीव्ही कार्यक्रम तयार करत मुलांमध्ये जनजागृती करण्याचं शिवधनुष्य तिने उचललं. तिचे हे कार्यक्रम जवळपास ५० लाख शालेयपूर्व मुलांपर्यंत पोहोचत आहेत. घर-परिसर स्वच्छता, आजार- त्यांची लक्षणं व घ्यावयाची काळजी, वृक्षतोडीचे घातक परिणाम अशा अनेक विषयांवर तिचे माहितीपट आहेत, यातून संस्कृती आणि नीतिमूल्यं याबद्दलचे वस्तुपाठही घालून देण्याचा प्रयत्न करणारी इथिओपियाच्या ब्रुक्टाविट टिगाबू, हिच्याविषयी..
‘आम्ही लहान मुलांना रुचतील, पचतील असे साधे साधे टीव्ही शोज करतो. परंतु त्यायोगे आम्ही गंभीर, स्वास्थ्यविषयक आणि सामाजिक समस्यांवर तोडगे शोधण्याचा प्रयत्न करतो’, हे शब्द आहेत ब्रुक्टाविट टिगाबूचे. व्हिडीओ फिल्म्सद्वारे लहान मुलांना स्वास्थ्यविषयक प्रशिक्षण देऊन  इथिओपियातील बालमूत्यूच्या भीषण समस्येचं निराकरण करण्याचा आगळावेगळा मार्ग या कल्पक मुलीनं शोधून काढला आहे.
दरवर्षी इथिओपिया या देशात पाच वर्षांखालील तीन लाखांपेक्षा अधिक मुलं मृत्युमुखी पडतात. त्यातील ७० टक्के डायरिया, हिवताप, न्यूमोनिया, गोवर आणि कुपोषण यामुळे घडतात. अशा प्रकारे हकनाक घडणारे मृत्यू टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे मुलांना लहान वयापासूनच स्वास्थ्यविषयक प्रशिक्षण देण्याचा, असं ब्रुक्टाविटचं ठाम मत आहे. इथिओपियाच्या राजधानीचं शहर- अडिस अबाबा- येथे तिचं बालपण गेलं.  लहानपणी तिला सततच आजूबाजूला गरिबी आणि रोगराई याची नित्य नवी रूपं दिसत असत. तिचं म्हणणं आहे की अजूनही अनेक मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना उत्तम दर्जाची वैयक्तिक स्वच्छता आणि पिण्याचं स्वच्छ पाणी या गोष्टीचं रोगप्रतिबंधासाठी किती प्रचंड महत्त्व आहे, हे कळत नाही. अजूनही तिच्या डोळ्यासमोर लहान मुलांचे जे मृत्यू घडताना दिसतात, ते स्वच्छतेबाबत खबरदारी घेऊन सहज टाळता येतील, असं तिचं मत आहे.
आज टिगाबू २८ वर्षांची आहे. गरीब परिसरात ती लहानाची मोठी झालेली असल्यामुळे इथिओपियातील गरीब समाजाला सर्वसाधारण आरोग्यशास्त्राबाबत काहीही प्रशिक्षण मिळालेलं नसतं, ही गोष्ट तिला चांगलीच माहीत आहे. बालमृत्यूचं प्रमाण घटून,  मुलांना अधिक मोठं आणि निरामय आयुष्य लाभावं, या दृष्टीनं मुलांना स्वास्थ्य प्रशिक्षण देण्याचा वरपांगी साधा वाटणारा परंतु अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त मार्ग तिनं शोधून काढला. २००५ साली तिनं तिचा पती शेन एट्झेनहौझर याच्या मदतीनं टीव्ही कार्यक्रमांची निर्मिती करणारी ‘बिझ किड्स वर्कशॉप’ नावाची कंपनी चालू केली. ही कंपनी शालेयपूर्व वयाच्या मुलांसाठी टीव्ही कार्यक्रम आणि प्रशिक्षण देणारे अनुबोधपट तयार करते. त्यायोगे इथिओपियातील तीन ते सहा वर्षे वयाच्या मुलांच्या प्रशिक्षणातली त्रुटी दूर करण्यात तिनं यश मिळवलं आहे.
इथिओपियात सात वर्षे वयापुढील मुलांनाच फुकट शिक्षण दिलं जातं. शालेयपूर्व वयाच्या मुलांना बालमंदिरामध्ये किंवा खासगी बालवाडय़ांमध्ये पाठवणं फारच थोडय़ा आईबापांना परवडू शकतं. त्यामुळे बरीचशी लहान मुलं घरीच राहतात आणि रस्त्यांवर खेळतात. एकदा मुलं सात वर्षांची होऊन गेली की त्यांच्यावर आरोग्यशास्त्रविषयक संस्कार करण्याच्या दृष्टीनं फारच उशीर झालेला असतो. लहान वयातच मुलं संस्कार ग्रहणक्षम असतात. त्या वयात त्यांच्या मनावर बिंबवलेल्या गोष्टी ती आयुष्यभर लक्षात ठेवतात. त्यामुळे याच वयाच्या मुलांना डोळ्यापुढे ठेवून टिगाबू त्यांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांना स्वास्थ्य प्रशिक्षण देण्याचं दुहेरी काम तिच्या टीव्ही फिल्म्सद्वारे यशस्वीरीत्या पार पाडतेय.
या संदर्भात माझं मन ४० वर्षांपूर्वीच्या माझ्या अमेरिकेतील वास्तव्य काळाकडे वळलं. त्यावेळेस अमेरिकेतील पीबीएस (पब्लिक ब्रॉडकास्टिंग सव्‍‌र्हिस) ही नानफा तत्त्वावरची वाहिनी मुलांसाठी सेसमी स्ट्रीट, इलेक्ट्रिक कंपनी आणि मिस्टर वॉजर्स नेबरहुड हे तीन कार्यक्रम दिवसभर प्रसारित करीत असे. पहिल्या दोन कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या पपेट्स (कळसूत्री बाहुल्या) गंमतजंमत करता करता मुलांना विविध प्रकारच्या गोष्टी शिकवत असत. तिसऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मिस्टर रॉजर्सन हे मुलांना रुचेल, पटेल अशा शब्दांमध्ये आणि सावकाश गतीनं त्यांच्याशी विविध विषयांवरच्या गप्पा मारता मारता त्यांच्यावर अनेक प्रकारचे सुसंस्कार करत असत. मुलांचं मनोरंजन आणि त्याचबरोबर हसत खेळत शिक्षण प्रशिक्षणही घडत असे.
टिगाबूची संकल्पना त्याच धर्तीवर बेतलेली दिसते. तिनं बनवलेली पहिली टीव्ही फिल्म २००७ साली प्रक्षेपित करण्यात आली. त्या फिल्मचं नाव होतं, ‘त्सेहाई लव्हज लर्निग.’ या कार्यक्रमातील प्रमुख प्रबोधनकार पात्र आहे त्सेहाई नावाची हँड पपेट. त्सेहाई याचा इथिओपियातील अधिकृत भाषेत आम्हारिक भाषेत अर्थ होतो- सूर्यप्रकाश. जुन्या पिवळ्या मोजापासून बनविलेली त्सेहाई ही हँडपपेट आहे एक चौकस बुद्धीची, कुतूहलपूर्ण मोठ्ठय़ा डोळ्यांनी सर्वत्र पाहणारी, सहा वर्षांची पिटुकली निष्पाप बालिका. ती मुलांशी संवाद साधते. तिचे कुटुंबीय, मित्र, आई, वडील, आजी, आजोबा, एक वयस्कर कासव, एक कुत्रा आणि एक मेंढी यांच्यासमवेत त्सेहाई मुलांशी गप्पा मारते. गप्पा मारता मारता ती मुलांना अस्वच्छ पाणी पिण्यातले धोके समजावून सांगते. घराभोवती केरकचरा-उकिरडा निर्माण करणं  किंवा वृक्षतोड करणं कसं घातक आहे, हे समजावून सांगते आणि त्याचबरोबर संस्कृती आणि नीतिमूल्यं याबद्दलचे वस्तुपाठही घालून देते.
इथिओपियातला अशा धर्तीवरचा हा पहिलाच टीव्ही कार्यक्रम होता. तो केवळ इथिओपियातील लोकांना डोळ्यापुढे ठेवून बेतलेला होता. हा कार्यक्रम बनवताना टिगाबूला अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. इथिओपियात खास मुलांसाठी कार्यक्रम बनवणं खूपच खर्चीक असतं आणि सुरुवातीला तो कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी टीव्ही वाहिन्यांची मनधरणी करून मोठय़ा प्रयत्नांनी त्यांचं मन वळवावं लागलं. परंतु एवढय़ा अडचणींना तोंड दिल्यावर मात्र टिगाबूच्या कष्टाचं सार्थक झालं. ‘त्सेहाई लव्ह्ज लर्निग’ हा कार्यक्रम रातोरात संपूर्ण देशात अत्यंत लोकप्रिय झाला. या कार्यक्रमाचं प्रत्येक प्रक्षेपण २८ ते ५० लाख मुलं पाहतात. ग्रामीण भागांमध्ये फारच थोडय़ा लोकांच्या घरात टीव्ही असतो. अशा जागी, सार्वजनिक स्थळी या कार्यक्रमाचं प्रक्षेपण केलं जातं. स्वास्थ्य सेवा पुरविणारी चिकित्सालयं आणि पर्यायी शिक्षण देणारी केंद्रसुद्धा या कार्यक्रमाचं मुद्दाम प्रक्षेपण करतात, तर निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या जनतेसाठी हा कार्यक्रम डीव्हीडी आणि व्हीसीडीवर उपलब्ध करून दिला जातो.
‘त्सेहाई लव्हज लर्निग’ या मालिकेचा प्रत्येक भाग स्वत: टिगाबू आणि तिचा पती लिहितात. तो लिहिण्यापूर्वी ते स्वास्थ्य तज्ज्ञ आणि मानसशास्त्र तज्ज्ञ यांच्या मदतीनं त्यांचा संदेश अत्यंत प्रभावीपणे पोहोचला जावा, याची पुरेपूर काळजी घेतात. हँडपपेटचा वापर करणं कार्टून फिल्म बनविण्यापेक्षा हे खूपच स्वस्त पडतं. त्यामुळे या देशात ते आर्थिकदृष्टय़ा परवडू शकतं. आम्ही मुलांना पेलतील अशाच धर्तीचे कार्यक्रम बोलतो. परंतु या साध्या कार्यक्रमांद्वारे आम्ही त्यांची गंभीर स्वरूपाच्या स्वास्थ्य- समस्यांशी आणि सामाजिक समस्यांशी ओळख करून देतो. डायरिया, एड्स/ एचआयव्ही अशा रोगांचा  प्रतिबंध आणि निवारण करण्याबाबत सोप्या- समजेशा शब्दांत पण प्रभावीपणे त्यांना प्रबोधन देतो. त्याचबरोबर निष्ठा, सत्यप्रियता अशा सद्गुणांबाबतही हसतखेळत त्यांच्यावर संस्कार करतो. मला वाटतं त्यामुळेच वयानं थोडय़ा मोठय़ा मुलांनासुद्धा आमचा कार्यक्रम आवडतो. मोठय़ा मुलांसाठी आम्ही त्यात अधिक गहनता आणतो.
या कार्यक्रमाच्या दहा मिनिटांच्या प्रत्येक एपिसोडपूर्वी त्या कार्यक्रमात चर्चिल्या जाणाऱ्या मुद्दय़ांची झलक दाखविणारं एक गाणं प्रक्षेपित केलं जातं आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होतो. शक्य असेल तेव्हा या कार्यक्रमाद्वारे दिला जाणारा संदेश अधिक प्रभावीपणे मुलांच्या मनावर ठसविण्याच्या उद्देशानं, कुणीतरी विशेष पाहुणा कार्यक्रमात हजेरी लावतो. इथिओपियातला लँग डिस्टन्स ट्रॅक रनर स्टार- हेली ग्रेबेलाझी एका कार्यक्रमास उपस्थित राहिला होता.
२०१० साली व्हिझ किड्स कंपनीनं आणखी एक कार्यक्रम- रिअ‍ॅलिटी शो सुरू केला. तो ‘त्सेहाई लव्हज लर्निग’एवढाच लोकप्रिय झालाय. या कार्यक्रमाचं नाव आहे-  Involve Me  (मला सहभागी करून घ्या). या कार्यक्रमाद्वारे एक सत्य अधोरेखित  करण्याचा प्रयत्न केला जातोय की मुलांना व्यक्त होण्याची संधी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमात टीनएजर्सना आमंत्रित करून स्वत:च्या आयुष्यातील घटना आणि  त्याद्वारे त्यांनी घेतलेला बोध, यावर त्यांना बोलण्याची संधी दिली जाते. त्यासाठी प्रत्येकाला एक मिनिटाचा अवधी दिला जातो. मुलांनीच इतर मुलांसमोर केलेलं आत्मानुभव कथन अत्यंत उद्बोधक ठरतं.
मुलांना शिक्षण देण्याची टिगाबूनं शोधलेली साधी सोपी पद्धत अत्यंत यशस्वी ठरलीय. त्याचं रूपांतर रेडिओ प्रक्षेपणासाठीसुद्धा घडविण्यात येतंय आणि ते अडीच कोटी मुलांना ऐकता येणार आहे. टिगाबूला रोलेक्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तो निधी वापरून ती ‘त्सेहाई लव्हज लर्निग’चे आणखी सहा एपिसोड्स तयार करणार आहे. त्यात ती डायरिया आणि मलेरियासंदर्भात जनजागृती करून या रोगांची कारणं आणि लक्षणं मुलांच्या निदर्शनाला आणून देणार आहे. त्याचबरोबर या रोगांचा  प्रतिबंध तसेच रोग झाल्यास त्यावरचा इलाज याबाबतसुद्धा प्रबोधन करणार आहे. याखेरीज रोलेक्स पुरस्काराचा निधी वापरून ती एक सर्वेक्षण घेणार आहे आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या मुलांच्या मनावर त्याचा काय प्रभाव पडला आणि जिथे हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जातो, तिथे बालमृत्यूचं प्रमाण घटलं आहे की नाही, याचा आढावा घेणार आहे.
इथिओपियाच्या जवळच्या देशांमध्येसुद्धा याच प्रकारच्या समस्या आहेत. तेथील मुलांना ‘त्सेहाई लव्हज लर्निग’ या कार्यक्रमाचा लाभ घेता यावा, या हेतूनं टिगाबूनं हा कार्यक्रम स्थानिक आम्हारिक भाषेखेरीज अन्य भाषांमध्ये- सोमाली, टिग्रिन्या, सुदानमधली अरेबिक- डब करून घेतली आहे. ती म्हणते, ही केवळ इथिओपियापुरती  समस्या नव्हे; ही संपूर्ण आफ्रिका खंडापुढची समस्या आहे.
तिनं घेतलेल्या सर्वेक्षणाद्वारे, हा कार्यक्रम बालमृत्यूचं प्रमाण घटत असल्याचं सिद्ध व्हावं, याच सदिच्छा आणि शुभेच्छा! केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे, हा मूलमंत्र जपत जोमानं काम करणाऱ्या टिगाबूला आपण सुयश चिंतू या!

Story img Loader