निमा पाटील

सात बहिणींचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारताला निसर्गाचं भरभरून वरदान मिळालं आहे. तितकीच तिथली संस्कृतीही समृद्ध. खान-पान, नृत्यसंगीत, पेहराव या सर्वच बाबतीत हे सर्व प्रदेश आपापली वैशिष्टय़ं बाळगून आहेत. पारंपरिक शेतीवर आधारित खेडय़ातलं आयुष्य, त्यातले कष्ट आणि कष्टाचं फळ मिळाल्यानंतर साजरा होणारा आनंद वेगळाच. आधुनिकता हळूहळू हातपाय पसरत असताना आपलं पारंपरिक संगीत जपून ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गेली तीस वर्ष सातत्यानं काम करणाऱ्या मिझोरामच्या लोकगायिका के. सी. रुनरेमसांगी यांचा या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरव केला जात आहे.

Nanaji Deshmukh Panchayat Samiti tops state for Tiroda Panchayat Samiti Sustainable Development Award 2024
नानाजी देशमुख राष्ट्रीय पंचायतराज पुरस्काराने तिरोडा पंचायत समिती सन्मानित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट

त्यांची इथपर्यंतची वाटचाल सोपी नव्हती. परंतु संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या लोकसंगीताची मनापासून असलेली आवड, अविरत कष्ट करण्याची तयारी आणि आधी पिता व नंतर पतीची साथ, यांच्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं. रुनरेमसांगी यांचा जन्म १९६३ मध्ये मिझोराममधल्या सेरछिप जिल्ह्यातल्या केईतुम या लहानशा गावात झाला. साधारण २०० उंबऱ्यांचं हे गाव. वडिलांना गाण्याचा छंद होता, त्यामुळे त्यांनी लेकीलाही अगदी लहान वयापासून गाणं शिकवलं. रुनरेमसांगी चार वर्षांच्या असताना गाणं म्हणायला शिकल्या आणि वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी व्यावसायिक गायन करायला सुरुवात केली.

लहानपणापासून सामूहिकरीत्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या स्थानिक सण-उत्सवांमध्ये रुनरेमसांगी आपली कला सादर करत. शेतीवर आधारित हे उत्सव मिझो संस्कृतीचं खास वैशिष्टय़. त्यातही शेतीच्या विविध टप्प्यांशी जोडलेले तीन सण विशेष महत्त्वाचे. ‘मिम कुत’ हा सुगीचा सण. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मक्याची कापणी होते. या वेळी मृत नातेवाईकांच्या स्मृती कृतज्ञतेनं जागवल्या जातात. शेतातून आलेलं धान्य आधी आप्तेष्टांच्या स्मृतींना वाहिलं जातं आणि मगच त्याचा वापर केला जातो. वसंत ऋतूत साजरा होणारा ‘चापचर कुत’ हा सर्वात हर्षोल्हासाचा सण. आधीच्या पिकांच्या डहाळय़ा कापून त्या जाळल्या जातात आणि त्यानंतर स्वच्छ झालेल्या जमिनीवर नवीन बियाणं पेरलं जातं. याला ‘झूम’ पद्धत म्हणतात. त्याची सुरुवात करताना ‘चापचर कुत’ साजरा केला जातो. या वेळी लोकगीतं गायली जातात आणि त्याच्या तालावर आबालवृद्ध नाचतात. रंगीबेरंगी पोषाख करून नाचगाण्यात रात्री जागवल्या जातात. ‘पॉल कुत’ हा सण सुगीनंतर, म्हणजे साधारण डिसेंबर-जानेवारीमध्ये साजरा केला जातो. सामूहिकरीत्या नृत्य-गायन केलं जातं. आया आपापल्या मुलांना घेऊन सजवलेल्या ओटय़ांवर बसतात आणि एकमेकांना घास भरवतात. या प्रथेला ‘छाँगनॉत’ म्हणतात.अशा वेगवेगळय़ा निमित्तांनी होणाऱ्या कार्यक्रमांमधून रुनरेमसांगींची कला फुलत गेली.

रुनरेमसांगींच्या गाण्यांचा पहिला आल्बम आला तेव्हा त्या केवळ तेरा वर्षांच्या होत्या. वर्ष होतं १९७६. गाण्याचे कार्यक्रम करताना वैयक्तिक आयुष्यातही बदल होत होते. रुनरेमसांगींचं केईतुम गाव त्यांच्या कलेच्या विकासाला पुरं पडणार नव्हतं. मग १९८६ मध्ये त्या ऐझवालमध्ये राहायला आल्या. त्या राहत असलेल्या भागामध्येच त्यांची भेटलाल थन्मवया यांच्याशी झाली. थन्मवया हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. या भेटीगाठींचं रूपांतर मैत्रीत आणि मग विवाहामध्ये झालं. या दाम्पत्याची १८ वर्षांची मुलगी ‘विशेष मूल’ आहे. रुनरेमसांगींच्या आईवडिलांचा कलेला नेहमीच पािठबा होता, पण विवाहानंतर सासरची अपेक्षा पारंपरिक होती. मुलगा नोकरी करतो, तर सुनेनं घर सांभाळावं अशी सासू-सासऱ्यांची अपेक्षा. पण पतीची साथ असल्यामुळे रुनरेमसांगींचा संगीत प्रवास सुकर झाला. या काळात त्यांनी राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या, ऐझवालमधल्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिक अँड फाईन आर्ट्स’ (आयएमएफए) या संस्थेत तीन-तीन महिन्यांचे तीन अभ्यासक्रमही पूर्ण केले. लोकसंगीत आणि लोकनृत्याचं औपचारिक शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९२ पासून याच संस्थेमध्ये त्यांनी मिझो नृत्य आणि लोकसंगीताचे वर्ग घ्यायला सुरुवात केली.

संस्थेत विद्यार्थी घडवण्याबरोबरच रुनरेमसांगी यांनी स्वत:चे कार्यक्रम सुरू ठेवले. मिझो समाजात सर्वात लोकप्रिय असलेल्या ‘चेराव’ या लोकसंगीताच्या महोत्सवात त्या अनेक वर्षांपासून कार्यक्रम सादर करत आहेत. त्याशिवाय ‘खुल्लम’ महोत्सवात रसिक त्यांच्या गाण्याची नेहमीच आतुरतेनं वाट पाहात असतात. मिझोरामबाहेरही त्यांच्या कलेला भरपूर दाद मिळाली. दिल्ली, मुंबई, बंगळूरु अशा मोठय़ा शहरांमध्ये कार्यक्रम करणं आणि रसिकांची दाद मिळवणं हे अनुभव त्यांच्यासाठी आनंद आणि समाधान देणारे होते. भारताबाहेरही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. चीनमधल्या बीजिंग, उत्तर कोरियामध्ये यांगयांग या शहरांमध्येही त्यांना कला सादर करण्याची संधी मिळाली. नुकतीच वयाची साठी पूर्ण केल्यामुळे त्या आता नोकरीतून औपचारिकरीत्या निवृत्त झाल्या आहेत. पण वैयक्तिक पातळीवर अजून खूप काम करायचं आहे, असं त्या सांगतात. आतापर्यंत त्यांच्या गाण्यांचे आठ आल्बम झाले आहेत आणि नवव्या आल्बमची तयारी सुरू आहे. दोन-तीन महिन्यांतच तो तयार होईल. त्यापुढच्या उपक्रमांचीही जुळवाजुळव सुरू आहे.

रुनरेमसांगी यांना आतापर्यंत राज्य सरकार आणि विविध संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. ‘मिझो अॅकेडमी ऑफ लेटर्स’, ‘केईतुम यंग मिझो असोसिएशन’, ‘बाँगकॉन छिम वेंग यंग मिझो असोसिएशन’ या प्रतिष्ठित संस्थांनी त्यांच्या कामाला दाद दिली आहे. त्यांना २०१७ मध्ये मानाचा ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला. सर्व पुरस्कारांचा आनंद आहेच, पण त्यांना मिझोरामचा स्थानिक ‘लेल्टे पुरस्कार’ अतिशय प्रिय! आता ‘पद्मश्री’ पुरस्कारानं त्यांच्या सन्मानामध्ये भर पडली आहे.


कित्येकांना अगदीच अपरिचित अशा भाषेतलं, एका छोटय़ा भूभागातलं लोकसंगीत जगवणं आणि वाढवणं कौतुकास्पद आहेच, परंतु लोकसंगीतात काम करणाऱ्या प्रत्येकाला आशा आणि प्रेरणा देणारीच ही गोष्ट आहे.

Story img Loader