रोजच्या कामाच्या धबडग्यातून, वाचनासाठी अथवा लेखनासाठी जास्त वेळ काढणे अवघड होते, परंतु मूल वाढवणे, त्याला घडवणे हीच आयुष्यातली सगळ्यात उत्कृष्ट कविता आहे, असे मानून मी व्यवसायात व संसारात समर्पित आयुष्य जगले.
           
वयाच्या पंचविसाव्या वर्षी आंतरजातीय विवाहाचा एक वादळी निर्णय मी घेतला. वादळी अशासाठी, कारण पारंपरिक पद्धतीने आयुष्य जगणाऱ्या माझ्या कुटुंबाने तो कधीच मान्य केला नसता म्हणून. घरातून बाहेर पडून मित्रमंडळींच्या मदतीने गिरीश नार्वेकर यांच्याबरोबर माझा विवाह पार पडला. त्यानंतर संघर्ष सुरू झाला तो दोन्ही कुटुंबांकडून मान्यता मिळावी यासाठी. या काळात अनेक विदारक अनुभव आले. त्यावेळेला पुढील ओळी नकळत माझ्याकडून लिहिल्या गेल्या..
जातीने कोण सवर्ण? कोण दलित?
मला काही कळेना
मी जन्माने पददलित
तुम्हा सर्वाची पायधूळ मस्तकी लावूनही
माझं पाप फिटेना..
लग्नानंतर घरात येणाऱ्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी व सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी मी माझा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. खरे तर साहित्याची मला आवड असल्यामुळे एस.एस.सी.नंतर मला बी.ए. करण्याची इच्छा होती, परंतु वडिलांच्या आग्रहामुळे मला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला. त्यामुळे लग्नाआधी मी प्रतिभेचे पंख छाटून बी.एस्सी. पूर्ण केले. लग्नानंतर मी एम.एस्सी. बॉटनी पॅथॉलॉजी व पुढे बी.एड. पूर्ण केले. त्या नंतर जून १९८७ ते मार्च २०११ ही २४ वर्षे गणित व विज्ञान शिक्षिका म्हणून काम केले. हे सर्व करत असताना मला असलेली वाचन व लेखनाची आवड मागे ठेवावी लागली.
नोकरी आणि संसार सांभाळताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. लहान मुलाला एकटय़ाला घरी राहावे लागे, कधी कधी घरी यायला रात्रीचे आठ वाजून जात. तापाने फणफणलेल्या मुलाला शेजारची ताई घरी येऊन डोक्यावर पट्टय़ा ठेवत असे.अक्षरश डोळ्यातल्या अश्रूंना थोपवून संसार व नोकरी ही कसरत पार पाडावी लागे. त्यातच पतीची बायपास सर्जरी झाली. त्यावेळी तर जोगेश्वरी ते चर्चगेटचा प्रवास करून रात्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम करीत असे व सकाळी घरचे सर्व काम आवरून दिवसभर नोकरीची वेळ सांभाळत असे. असे अनेक कसोटीचे प्रसंग आयुष्यात आले.
  रोजच्या कामाच्या धबडग्यातून, वाचनासाठी अथवा लेखनासाठी जास्त वेळ काढणे अत्यंत अवघड होते, परंतु मूल वाढवणे, त्याला घडवणे हीच आयुष्यातली सगळ्यात उत्कृष्ट कविता आहे, असे मानून मी व्यवसायात व संसारात समíपत आयुष्य जगले. आज माझा मुलगा लंडनमधील एका आंतरराष्ट्रीय बॅंकेत उच्च पदावर कार्यरत आहे, त्याचं समाधान आहे. शिवाय जे काही क्षण मिळाले, जपले त्यात मी माझा छंद जोपासला. १९९८ साली ‘पारिजात माझा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्यासाठी माझे पती व मुलगा यांनी खूप प्रोत्साहन दिले. त्याचबरोबरच माझ्या मामी व सुप्रसिद्ध लेखिका     वृंदा दिवाण यांनी प्रस्तावना लिहिली व प्रोत्साहन दिले. संपूर्ण अरिवद गंडभीर हायस्कूलचा परिवार कौतुक करायला पाठीशी होता, त्याचा आनंद आहे.
  एरव्ही शाळेच्या फलकावर विविधप्रसंगी मी नित्य कविता लिहीत राहिले. आज निवृत्तीनंतर मी लिहिलेल्या माझ्या कथा व कविता अनेक मासिकांत व दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. आज माझ्या पाठीशी परिवारातील व बाहेरील अनेक सुह्रद आहेत. त्यामुळे छंद जोपासण्याची प्रेरणा मला मिळते. माझ्या आयुष्यातील काही काळ हरवलेले फार मोठे समाधान माझ्या निवृत्त जीवनात मला मिळत आहे.
अनघा नार्वेकर, जोगेश्वरी, मुंबई    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा