स्त्रियांवरील अत्याचारात पुरुषांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर असला तरी आज त्याविरुद्धची जाणीवजागृती पुरुषांमध्ये होते आहे आणि ती करून देण्यात अग्रेसर असणाऱ्या ‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स अ‍ॅण्ड अब्युज’ अर्थात ‘मावा’ या संस्थेला उद्या रविवारी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने व जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्रियांच्या समस्या-निवारणासाठी पुरुषांनी पुरुषांच्या जागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांवरचा हा खास लेख.
पुणे जिल्हय़ातील पुरंदरच्या मावडी कडेपाठार गावात राहणारा सुनील चाचर हा २५ वर्षांचा, प्रथम वर्ष बी.ए.ला असणारा तरुण सहा वर्षांपूर्वी ‘युवा मैत्री’ उपक्रमात सहभागी झाला. वडील नुकतेच वारले होते. गवंडीकाम ते मोगऱ्याची फुलं, गजरे विकण्याचं काम करीत चरितार्थ चालवणारा. इतर मुलांप्रमाणंच त्याचंही आयुष्य. बाहेरची कामं करत असताना घरकाम करण्यात मात्र त्याला संकोच वाटायचा. ‘मावा’च्या निवासी शिबिरात सहभागी झाल्यानंतर सुनील स्वत:ला प्रश्न विचारू लागला. कोणतं काम पुरुषांचं, कोणतं बाईचं हे बव्हंशी पुरुषच कसे ठरवतात? आईच्या मदतीसाठी मी हे काम करायला काय हरकत आहे, हे उमजल्यावर सुनील स्वत:हून भांडी घासणं, जेवण बनवणं यासाठी वेळ देऊ लागला. महाविद्यालयातील समवयस्क मुलग्यांसाठी वर्गात संवाद-सत्र घेऊ लागला. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन छेडछाड, शिवीगाळ ते मासिकपाळीविषयी संवाद  साधू लागला. स्वत:च्या गावातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न जवळून बघितल्यानंतर दोन वर्षांपूर्वी विजय विभाड या सहसंवादकाबरोबर त्यानं ‘मानस एकात्मिक सामाजिक संस्था’ स्थापून गावातील मुलींचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं धडपड सुरू केली. आज सुनील पुणे रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीत राहणाऱ्या १४-१५ र्वष वयोगटातल्या मुलग्यांशी लैंगिक आरोग्याविषयी नियमितपणे संवाद साधतोय. ‘मावा’नं त्यांच्या आयुष्यात घडवलेला हा ठसठशीत बदल.
 असाच एक साताऱ्यातील मेढा गावी राहणारा आनंद जाधव. दोन वर्षांपूर्वी ‘मावा’ व श्रमिक जनता विकास संस्था यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘मानुष’ प्रकल्पाशी जोडला गेला. सत्ता, निर्णय, संपत्तीत, समाजात स्त्रीला कसं वंचित ठेवलं जातं, याविषयी चीड व्यक्त करत असतानाच आपल्या बहिणीचं लग्न घरातील मंडळी वर्षांपूर्वी ठरवत असल्याचं आनंदनं पाहिलं. तिनं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर तिला अनुरूप वाटणाऱ्या मुलाशीच तिनं लग्न करावं याचा आग्रह धरला व त्याप्रमाणं तिचं लग्न झालं. आनंदचे वडील नोकरी करत असून आई गृहिणी आहे. गेल्या एक-दीड वर्षांपासून कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी घरातील सर्व जण एकत्र बसून चर्चा करतील याची काळजी आनंद घेतो.
‘मावा’च्या कार्यशाळा-चर्चासत्रांमध्ये तीन वर्षांपूर्वी सहभागी झालेल्या मुंबईतील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विवेक कुंभारला जेव्हा घरातील सर्व निर्णय घेण्यामध्ये वडिलांचं वर्चस्व जाणवू लागलं. आई घरातील सगळ्यांसाठी झिजत असताना तिला स्वत:च्या पसंतीची नोकरी करायला परवानगी नव्हती. आईच्या हक्कांविषयी ठामपणा व्यक्त करून ती एका बालवाडीत शिक्षिका म्हणून प्रशिक्षण घेतल्यावर काम करण्यासाठी त्यानं प्रोत्साहित केलं. स्वत:चे कपडे धुणं, भांडी घासणं ही कामं तो आणि पुढे त्याचे वडीलही करू लागले. आज विवेक मुंबईतील सहा महाविद्यालयांतील ३० मुलग्यांसोबत खेळ, गाणी, पथनाटय़ं व अनेक नावीन्यपूर्ण माध्यमांद्वारे संवादी गुंतवणूक करून स्त्री-हक्कांविषयी ठोस भूमिका त्यांनी घ्यावी यासाठी जोरकसपणे प्रयत्न करतोय.
सुनील, आनंद व विवेकसारखे २०० हून अधिक तरुण, पुरुष आज स्त्रियांच्या समस्या-निवारणाचा भाग बनताहेत. आणि त्याचं माध्यम आहे, गेली वीस र्वष कार्यरत असणारं मेन अगेन्स्ट व्हायलन्स अ‍ॅण्ड अब्युज – मावा (अर्थात स्त्रियांवरील हिंसा व गैरवर्तनाविरुद्ध पुरुष) ही संस्था. मी व माझ्या सजग, संवेदनशील साथीदारांनी १९९३ साली स्थापिलेल्या संस्थेनं स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. उद्या १० मार्च २०१३ रोजी ‘मावा’ संस्थेला २० र्वष पूर्ण होताहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आमच्या कामाचा हा थोडक्यात आढावा.
२० वर्षांपूर्वीच्या ‘मावा’च्या स्थापनेत खरं तर ‘लोकसत्ता’चाही वाटा होता, हे मुद्दाम इथं नमूद करायला हवं. ‘हवे आहेत असे पुरुष जे मानतात की स्त्रियांना मारहाण करणं चुकीचं आहे. तुम्ही जर स्त्रियांवरील हिंसा प्रतिबंधित करण्यासाठी इच्छुक पुरुष असाल, तर आपल्या नाव, पत्ता, दूरध्वनी संपर्कासह इथे लिहा..’ या सप्टेंबर १९९१ मध्ये इंडियन एक्स्प्रेस-लोकसत्ता-जनसत्ता या एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाच्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या आवाहनास २०५ पुरुषांनी उत्तर दिलं. यामध्ये माझ्यासकट सुमारे ९० जण मुंबईतील होते. यातील आम्ही ३० पुरुष नियमितपणे भेटत राहिलो. स्त्रियांवरील हिंसाचार व संबंधित मुद्दय़ांवर स्वत:ची समज व जाणीव एकमेकांपुढे मांडत स्त्री-संस्था, मानसशास्त्र व इतर तज्ज्ञांचे या मुद्दय़ांवर होत असलेल्या कामाचा आढावा घेत, स्त्री-संस्थांना पूरक व त्याचबरोबर वेगळे, महत्त्वाचे कोणते उपक्रम आपण घेऊ शकतो. यावर साधकबाधक चर्चा करून कृती कार्यक्रम ठरवण्यात आला आणि ‘मावा’चा जन्म व प्रवास सुरू झाला..
नियोजित कृतिकार्यक्रमानुसार पहिला उपक्रम ‘मावा’नं सुरू केला तो वैवाहिक कलह व संबंधित प्रश्न घेऊन संपर्क साधणाऱ्या गरजू पुरुष (व स्त्रियांनाही) समुपदेशन व मार्गदर्शन करण्याचा. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून समाजकार्याची पदवी घेतलेला मी सोडून इतर पुरुषसाथी बँकिंग, इंजिनीअिरग, शैक्षणिक, लघुउद्योग इ. वेगवेगळ्या क्षेत्रांतील असल्यामुळे निर्मला निकेतन – समाजकार्याच्या महाविद्यालयाच्या तत्कालीन उपप्राचार्या कालिंदी मुजुमदार यांनी कष्टानं दिलेलं लघू-प्रशिक्षण घेऊन आमच्यातील २० जण हे समुपदेशन करू लागलो. आजपर्यंत ६००० हून अधिक स्त्री-पुरुषांनी समुपदेशनाचा लाभ (मार्गदर्शन- मानसशास्त्रज्ञ/ लैंगिकतातज्ज्ञ/ कायदेतज्ज्ञांद्वारे) घेतला आहे. वैयक्तिक समुपदेशनाच्या या उपक्रमाबरोबरच दुसऱ्या महत्त्वाच्या उपक्रमाची सुरुवात ‘मावा’नं केली ती म्हणजे समाजात मुलीवरील/ स्त्रियांवरील हिंसा व लैंगिक गैरवर्तनाच्या घटनांची दखल घेऊन त्यावर पुरुष-संस्था म्हणून विशिष्ट, ठोस भूमिका घेण्याविषयी. यात १९९४ साली १९ वर्षीय दीप्ती खन्ना या मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्यानंतर ‘मावा’च्या सर्व कार्यकर्त्यांनी दीप्तीच्या प्लास्टिक सर्जरीकरिता मदतीचं आवाहन अनेक पातळींवर केलं. दीड महिन्यात  ७५ हजार रुपये ‘मावा’नं जमा केले, त्यात नाशिक कारागृहातील कैद्यांनी (पुरुष) त्यांच्या मेहनतान्याची रक्कम एकत्र करून एका हृद्य पत्रासह पाठवलेले १२ हजार रुपये होते. दीप्तीनं जेव्हा हा धनादेश घेतला तेव्हा तिचे शब्द होते, ‘माणूसपण अजूनही जिवंत आहे.’ ती घटना ‘मावा’च्या वाटचालीतील पहिला मैलाचा दगड ठरली, कारण या उपक्रमात नाशिकच्या कैद्यांनाही त्याचं महत्त्व पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
स्त्रियांवर बहुसंख्य वेळा आपल्याच जवळच्या माणसांकडून अन्याय-अत्याचार होत असतात. अनेकदा त्याला प्रतिकार करायला हवा, हे त्या स्त्रीच्याही लक्षात येत नाही की आणि आपण हे चुकीचं करतोय, हे त्या पुरुषांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांनाही जाणवत नाही. म्हणूनच गरज होती ती मानसिकता बदलण्याची. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून जाणीव-जागृती करणं गरजेचं होतं. त्याचदरम्यान आपल्या विभक्त पत्नी- सलमावर अ‍ॅसिड टाकण्यासाठी गुंड पाठवणाऱ्या शागीरचं प्रकरण गाजत होतं त्या निमित्तानं आम्ही, ‘मावा’ च्या कार्यकर्त्यांनी ‘स्त्रीचा नकार सहन न करण्याच्या’ व एकूणच पुरुषांमधील मालकी हक्क या पारंपरिक मानसिकतेला प्रश्न करून विविध पातळींवर चर्चा-प्रबोधन केलं. भँवरीदेवी या समाजकार्यकर्तीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर राजस्थानातील कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या प्रतिगामी निवाडय़ाविरुद्ध पुरुष-सहय़ांची मोहीम व भँवरीच्या समर्थनार्थ जाहीर बैठका घेत, हुंडय़ापायी छळ- एकतर्फी प्रेमातून क्रौर्य-नोकरीच्या ठिकाणी लैंगिक सतावणुकीच्या अनेक घटनांमध्ये ठोस भूमिका घेत, विविध चर्चा-परिसंवाद, निषेध कार्यक्रम घेत ‘मावा’चे कार्यकर्ते ‘स्त्री-पुरुष समतेवर केवळ तात्त्विक भाष्य करणारी आमची संस्था नाही आहे’ हे प्रकर्षांनं व वेळोवेळी दाखवत होते.
स्त्री-पुरुष नातेसंबंध, लैंगिकता, सहजीवन, स्वत:च्या पुरुषत्वाचा प्रवास, पुरुषपणाची कोंडी, घुसमट याबाबत पुरुषांनी मोकळेपणानं व्यक्त व्हावं या हेतूनं १९९६ पासून ‘पुरुषस्पंदनं- माणूसपणाच्या वाटेवरची’ हा वार्षिक अंक सुरू झाला. पुरुष उवाच, पुणे या समविचारी गटासोबत संयुक्तपणे २००६ पर्यंत ‘पुरुषस्पंदनं’ ‘मावा’ने काढले, २००७ पासून ‘मावा’द्वारा स्वतंत्रपणे हे अंक काढले. यातूनच ऑगस्ट २००६ पासून निवडक पुरुषांच्या गटांबरोबर दीर्घ, सातत्यपूर्ण कार्य करण्याच्या उद्देशानं ‘युवा मैत्री’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली.
यात पुणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील सहा महाविद्यालयांत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) उपक्रमात सहभागी असणाऱ्या १८-१९ वर्ष वयोगटातील निवडक ३३ मुलग्यांना स्त्री-हिंसा, स्त्री-पुरुष विषमतेच्या विविध मुद्दय़ांवर संवेदनशील बनवण्यात आलं. ७-८ दिवसांची निवासी कार्यशाळा, युवा मेळावे, शिबिरं, प्रकल्प भेटी आयोजित करून या विद्यार्थी संवादकांना गटचर्चा, खेळ, लोकगीत, चित्रकथा, प्रश्न पेटी, पथनाटय़, लघुपट इ. चा नावीन्यपूर्ण पद्धतीनं वापर करून दीर्घ प्रशिक्षण वर्षभर देण्यात आलं. राजू इनामदार, प्रशांत केळकर, मिलिंद चव्हाण, रवींद्र केसकर या तडफदार कार्यकर्त्यांबरोबर ज्येष्ठ लैंगिकतातज्ज्ञ डॉ. अनंत व शांता साठे, स्त्रीवादी कार्यकर्त्यां मनीषा गुप्ते, नाटककार अतुल पेठे, आरोग्यभान चळवळ चालवणारे डॉ. मोहन देशपांडे या सर्वानी उपक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांना प्रशिक्षण देऊन प्रेरित व प्रोत्साहित केलं.
‘युवा मैत्री’ उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षी प्रशिक्षित संवादक आपापल्या महाविद्यालयातील मुलग्यांशी स्त्री-पुरुषांमधील निकोप नातेसंबंध, पुरुषत्व, लैंगिकता या विषयांवर नियमितपणे संवादसत्रं घेऊ लागली. मुलींची घटती संख्या, लैंगिक शिक्षणावर शाळांमध्ये बंदी, शेतक ऱ्यांच्या आत्महत्या व त्याचा पुरुषत्वाशी संबंध, अ‍ॅनिमिया व स्त्री-आरोग्य या व अनेक संबंधित मुद्दय़ांवर ‘विचारसरी’ नावानं मासिक भित्तिपत्रकं तयार करून ती महाविद्यालयातील ठळक ठिकाणी लावून त्यावर उत्स्फूर्त चर्चा घडवू लागली. हडपसर-सासवड परिसरात घडणाऱ्या मुलींवरील बलात्कार-इतर िहसाचाराच्या घटनांचा एस.टी. स्थानकासारख्या ठिकाणी निषेध कार्यक्रम घेऊन, पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी व वारीनिमित्त जमलेल्या विद्यार्थी-जनसमुदायांमध्ये स्त्री जाणीवविषयक संवेदनशीलता निर्माण करून हजारो युवकांपर्यंत स्त्री-पुरुष समतेचा संदेश पोहोचवू लागली.
सामुदायिक पातळीवर विविध उपक्रमांत पुढाकार घेण्याबरोबरच ‘वैयक्तिक बदल’ संवादकांमध्ये घडवण्यासाठी ‘युवा मैत्री’ अंतर्गत विशेष प्रयत्न करण्यात आले. पुरुषप्रधान व्यवस्थेतून पुरुष म्हणून मिळणारे विशेषाधिकार-फायदे व त्याचबरोबर व्यवस्थेतून येणाऱ्या मर्यादा याविषयी प्रशिक्षण काळात संवादकांनी मांडणी करून स्वत:ला मिळणाऱ्या विशेषाधिकाराचा वापर करून व्यक्तिगत आयुष्यातील स्त्रियांमध्ये (उदा. आई, बहीण, वहिनी) सक्षमता, समानता आणण्यात प्रयत्न करण्यास त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं. स्वयंपाक बनवणं, कपडे धुणं व इतर घरकाम नि:संकोचपणे व सहजपणे करण्यास, मनोरंजन वा इतर बाबींसाठी घराबाहेर जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यास, बहिणीच्या ‘दाखवण्याच्या’ कार्यक्रमास विरोध करणं, आया-बहिणींच्या नावं शिवीगाळ बंद करण्यास ती पुढाकार घेऊ लागली. मुलींची छेडछाड, रक्तपांढरी ते मासिकपाळी यासंबंधी मोकळेपणानं ही मुलं घरातील व्यक्तींशी, मित्रमैत्रिणींशी बोलू लागली.
दोन र्वष सातत्यानं चाललेल्या ‘युवा मैत्री’ उपक्रमाची व्याप्ती हळूहळू वाढू लागली. मुंबईत ‘युवा संवाद’ नावाखाली सहा महाविद्यालयांत २००८ पासून तो कार्यान्वित झाला. जून २००९ मध्ये साताऱ्यातील जावळी तालुक्यात २० र्वष ग्रामीण समुदायाबरोबर कार्यरत श्रमिक जनता विकास संस्था यांच्याबरोबर संयुक्तपणे ‘मावा’नं ‘मानुष’ हा प्रकल्प सुरू केला. १७-१८ र्वष वयोगटातील महाविद्यालयांत शिकणाऱ्या व शेती/ अर्धवेळ नोकरी करणाऱ्या तरुणांबरोबर स्त्री-पुरुष समानता, लैंगिकता, एचआयव्ही/ एड्स व संबंधित मुद्दय़ांवर काम करण्यासाठी गेली ४ र्वष अनेक संवादक तयार झाले आहेत.
गेल्या तीन वर्षांत बुलढाणा, भंडारा व नागपूर जिल्ह्य़ात ‘युवा रुरल’ संस्थेसोबत तालुका व गावपातळीवर स्वयंसेवी तरुणांना प्रशिक्षित करून समवयीन मुलग्यांसोबत स्त्री-पुरुष व लैंगिकतेच्या मुद्दय़ांवर संवाद साधण्याचं कामही सुरू आहे. युवा मैत्रीच्या व्याप्तीचाच एक भाग म्हणून ‘युवा मैत्री’ हेल्पलाइन हा उपक्रम तीन वर्षांपूर्वी मुंबईत सुरू झाला. वयात येणाऱ्या तसंच किशोरवयीन युवकांना नातेसंबंध, लैंगिकता, पुरुषत्व, या संदर्भात असणाऱ्या वैचारिक, भावनिक गोंधळ द्वंद्वमय स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपलं म्हणणं बिनधास्तपणे मांडून मोकळं होण्यासाठी ०२२-२६८२६०६२ ही हेल्पलाइन अवकाश देत आहे. मुंबईत सुरू झालेल्या या हेल्पलाइनवर राज्यातील अनेक ग्रामीण भागातूनही (१६ ते २४ वयोगटातील) मुलांचे आतापर्यंत ७००० कॉल्स या हेल्पलाइननं हाताळले आहेत. आज ‘मावा’चे १०० हून अधिक युवा संवादक राज्याच्या विविध भागांत (विशेषत: ७ जिल्ह्य़ांत) लिंगसमतावादी पुरुषांची संख्या एका दीर्घ प्रक्रियेद्वारा वृिद्धगत, समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. युवकांसाठी पथदर्शी, वैशिष्टय़पूर्ण ठरलेल्या या उपक्रमाची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील अशोका चेंजमेकर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेनं ‘मावा’ला सन्मानित केलंच. केंद्र सरकारनं त्यांच्या http://indiagovernance.gov.in  या वेबसाइटवर ‘युवा मैत्री’ ची केस-स्टडी प्रसिद्ध केलीय.
स्त्रियांवरील अत्याचारांत पुरुषांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर असला तरी आज त्याविषयीची जाणीवजागृती पुरुषांमध्ये होते आहे आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जागृती पोहोचवण्यासाठी अनेक पुरुषच कृतिशील आहेत हे महत्त्वाचं. जागतिक महिला दिनानिमित्तानं त्यात अधिकाधिक भर पडो हीच शुभेच्छा!
संपर्क- मेन अगेन्स्ट व्हायलन्स अ‍ॅण्ड अब्युज
 (मावा)
वेबसाइट-  http://www.mavaindia.org
ई-मेल – saharsh267@gmail.com
भ्रमणध्वनी-९८७०३०७७४८

Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Young people facing mental health problems prevalence of mental stress is highest among youth aged 18 to 25
सर्वाधिक मानसिक ताण १८ ते २५ वयोगटातील तरुणांवर! जाणून घ्या नेमकी कारणे…
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Story img Loader