जीवन जगणे ही एक कला आहे. त्याचा मुख्य पैलू म्हणजे चांगले विचार व चांगल्या गोष्टींचे चिंतन सतत मनात असू द्यावे. अखंडपणे निर्मळ आणि प्रसन्न मन असणं ही अवस्था प्रयत्नपूर्वक साध्य करायला हवी. वाईट गोष्टी, दु:खद घटना, अपमान अशा नकारात्मक गोष्टीच सतत आठवण्याची मनाची खोड असते. दु:खद घटना घडली तरी ती जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारावी लागते. आणि मागे टाकून जगायला सुरुवात करावी लागते. अपमान, सूड, क्रोध या भावना पुष्कळदा प्रतिक्रियात्मक असतात.
सद्गुरू वामनराव पै यांनी जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली. या तत्त्वज्ञानात अध्यात्म आणि मानसशास्त्राचा संगम घडवीत त्यांनी कार्यप्रवणतेवर भर दिला. दैववाद, नैराश्य, बुवाबाजी या गोष्टी हद्दपार करून आपण आपले जीवन घडवू शकतो, या सूत्राचा वारंवार उद्घोष केला. ‘आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत,’ हा सिद्धान्त म्हणजे त्यांच्या शिकवणुकीचा गाभाच म्हणता येईल. आपण आपलं मन सशक्त करीत नेलं तर आपलं साध्य प्राप्त करणं कठीण नाही हे आवर्जून सांगतांना वामनराव पै यांनी एका सुंदर सुभाषिताचा दाखला दिला आहे. –
भाग्यस्य दैन्यस्य न को२पि दाता। स्वयंही कर्ता स्वयमेव भोक्ता । ।
मानानुकूलेच धन निर्धनेच। मनाही साक्षात् भगवत् स्वरूपम ।।
आपल्याला भाग्य किंवा दुर्दशा देणारं दुसरं कुणी नसतं. आपणच ते घडवतो, आणि आपणच त्यानुसार भोगतो. लक्षावधी विचार आपल्या मनात स्फुरत असतात. हे विचार सकारात्मक असतील तर त्यापासून स्फूर्ती येऊन आपला संकल्प सकारात्मक होतो. त्याचा उच्चार करून त्यानुसार कृती करण्याचं बळही आपल्याला मिळतं. वैभव मिळवणं किंवा दरिद्री राहणं हे प्रत्येक व्यक्तीच्या विचारांनुसार घडतं. मन साक्षात परमेश्वर असतं ते याच अर्थी की जसे विचार आपण करू तसं दान आपल्या झोळीत पडतं.
ज्या संकल्पना आपण दृढतेने मनात धारण करतो, ज्या विचारांचा अंगीकार करतो, ज्या तत्त्वांवर विश्वास ठेवतो, ते सर्व आपले भाग्य घडवीत असतात. ज्या विचारांची आपण आपल्या बहिर्मनात वारंवार उजळणी ते विचार आपल्या अंतर्मनात प्रवेश करतात. आपले विचार अचूक आणि विज्ञाननिष्ठ असावेत, यासाठी सत्याची कास धरणं गरजेचं असतं. वैश्विक मनाचा ज्ञानाचा खजिना अपार असतो. आपल्या अंतर्मनाची त्याच्याशी जुळणी होणं आणि या दोहोंशी आपण सुसंवाद राखणं जर घडलं तर आपल्याला जीवनाची अचूक वाट सापडते.
आपले विचार बहिर्मनातून अंतर्मनात स्थापित होतात. हे विचार विधायक, शांतीपूर्ण, जगाशी सुसंवादित्व राखणारे असतील तर अंतर्मनाच्या शक्तीमुळे या विचारांनी आपल्या जीवनात विलक्षण परिवर्तन घडून यायला सुरुवात होते. आपल्या आसपासची परिस्थिती अनुकूल होऊ लागते. आपल्यातील सर्वोत्तम ते प्रगट होऊ लागते. समस्यांमधून वाट काढणेही जमू लागते आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्मनातूनच शक्तीचा पुरवठा होऊ लागतो.
या संदर्भात आपल्याला ध्रुव, भगीरथ यांच्यापासून अनेक व्यक्ती आठवतात. भगीरथ म्हटल्यावर ‘आधुनिक भगीरथ’ असं ज्यांना म्हटलं जातं ते राजस्थानचे राजेंद्र सिंह यांची साहजिकच आठवण होते. त्यांना लोकांचे पाण्याअभावी होणारे हाल, कष्ट पाहवेनात. यावर उपाय हवाच या विचाराने ते झपाटले गेले. त्यासाठी त्यांनी अभ्यास आणि संशोधनात स्वत:ला झोकून दिले. राजस्थानात अनेक तलाव होते. त्यांना ‘जोहड’ म्हणत असत. ते आता बुजले होते. त्यांनी या बुजलेल्या तलावांच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला वाहून घेतलं. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांनी राजस्थानातील अनेक गावांमधला पाण्याचा प्रश्न मिटला. त्यांनी एका उद्दिष्टाचा ध्यास घेतला. तो थेट अंतर्मनापर्यंत पोहोचला. तिथूनच तो पूर्णत्वाला नेण्याचे बळ मिळाले. विचार, कल्पना, भावना यांची प्रचंड शक्ती आपल्या ठायी असते. त्यांचा वापर आपण विधायक तऱ्हेने केला तर समाधानी आनंदी जीवनाचा लाभ होतो. या शक्तीचा निर्बुद्धपणे किंवा विकृतपणे उपयोग केला तर जीवन दूषित होऊन जाते. जीवनात साडेसाती निर्माण होते ती या शक्तीच्या गैरवापरामुळे. साडेसाती निर्माण करणारा शनी आपल्या विचारांमध्येच दडलेला असतो. विचार सशक्त असतील तर कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं सामथ्र्य अंगी येतं. मग तो कालखंड दु:खाचा न वाटता आपल्या कृतिशीलतेला आव्हान देणारा ठरतो. संकटांशी झगडताना, नव्या संधी समोर येऊ लागतात. आपल्या जागृत कृतिशीलतेमुळे त्या संधींमधून उत्कर्ष होऊ लागतो. म्हणजे साडेसाती खरं तर भाग्याची ठरते. आपण जर संकटांनी खचून गेलो, उमेद हरवून बसलो, तर संकटे आपल्या मानगुटीवर बसतात. हतबल होत जाता जाता आपले विचार नैराश्याने ग्रस्त होतात. अशा वेळी माणूस दैववादी बनतो. माझ्या नशिबातच दु:ख, त्रास, संकटे लिहून ठेवली आहेत, हा विचार मनात पक्का झाला की तो अंतर्मनात प्रवेश करतो. तिथून तो तशाच घटनांना आपल्याकडे आकर्षित करतो. म्हणजे पुढे आणखी संकटे वाढून येतात. ही साडेसाती आपण स्वत:च आपल्यावर ओढवून घेतलेली असते. या जगात सर्वाभूती एकच चैतन्यशक्ती वास करीत असते. आपण जे कर्म करू त्याचे इष्टानिष्ट फळ आपल्या झोळीत टाकण्याचे निसर्गदत्त कार्य ती बजावत असते. क्रिया तशी प्रतिक्रिया आपोआप उमटते. सद्गुरू वामनराव पै यांनी असं म्हटलं आहे, ‘मानवाचा इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून क्रिया तशी प्रतिक्रिया या चैतन्य शक्तीच्या स्वभावधर्मानुसार मानवी जीवनात घडणाऱ्या घटना असतात. हे लक्षात घेऊन माणसाने बुद्धीचा नीट सदुपयोग करण्याचे ठरविले तर त्यातून मानवी हित आणि कल्याण साधले जाईल. आपण जसा विचार करतो, कृती करतो ते अंतर्मनात नोंदविले जाते. अंतर्मनाची शक्ती निसर्गनियामांनुसारच कार्यरत राहते. याचे नीट आकलन न झाल्याने मन अशांत आणि असमाधानी राहते. आपल्या विचारांची दशा आणि दिशा आपल्याला ठरविता आली की अशांती व असमाधानाचे विचार अंतर्मनात नोंदवले जात नाहीत. त्यामुळे तशी प्रतिक्रियाही उमटत नाही.’
जीवन जगणे ही एक कला आहे. त्याचा मुख्य पैलू म्हणजे चांगले विचार व चांगल्या गोष्टींचे चिंतन सतत मनात असू द्यावे. अखंडपणे निर्मळ आणि प्रसन्न मन असणं ही अवस्था प्रयत्नपूर्वक साध्य करायला हवी. वाईट गोष्टी, दु:खद घटना, अपमान अशा नकारात्मक गोष्टीच सतत आठवण्याची मनाची खोड असते. दु:खद घटना घडली तरी ती जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारावी लागते आणि मागे टाकून जगायला सुरुवात करावी लागते. अपमान, सूड, क्रोध या भावना पुष्कळदा प्रतिक्रियात्मक असतात. अमुक व्यक्तीने आपले ऐकले नाही, त्याची प्रतिक्रिया म्हणजे राग. अमुक व्यक्ती मला हवे तशी वागली नाही की त्याची प्रतिक्रिया म्हणजे अपमान. ती प्रतिक्रिया आपण नाकारली, त्याऐवजी समजुतीचे विचार मनात आणले तर क्षुब्धता ओसरते. जाणीवपूर्वक नकारात्मक भावना दूर सारण्याचा सराव फार महत्त्वाचा असतो. बहिर्मनातील सकारात्मक, प्रसन्न विचार हळूहळू अंतर्मनात उतरतात. तिथे मूळ धरतात आणि काही काळाने जीवनाच्या पडद्यावर साकार होतात.
वामनराव पै म्हणतात की जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे सामथ्र्य चिंतनात असते. सुख-समृद्धीची इच्छा तर सगळेच धरतात, पण ती आपल्याला मिळणार नाही असा विचार बहिर्मनात मागे कुठेतरी घुटमळत असतो. त्यामुळे आपण कृती करण्याचे टाळतो, संधी नाकारतो, मग अंतर्मनातून शक्तीचा पुरवठा कुठून होणार? जगण्याचा पाया सद्विचार, प्रसन्नता, आणि सकारात्मकतेचा असला की अंतर्मनाच्या शक्तीचे पाठबळ मिळू लागते.
अंतर्मनाची किमया
जीवन जगणे ही एक कला आहे. त्याचा मुख्य पैलू म्हणजे चांगले विचार व चांगल्या गोष्टींचे चिंतन सतत मनात असू द्यावे. अखंडपणे निर्मळ आणि प्रसन्न मन असणं ही अवस्था प्रयत्नपूर्वक साध्य करायला हवी.
आणखी वाचा
First published on: 13-09-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mind job