डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकाच घरात राहाणाऱ्या किंवा अगदी जवळचं नातं असलेल्या दोन व्यक्तींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णत: वेगळा असू शकतो. त्यामुळे त्यांचं वागणं भिन्न असू शकतं. पण ते समजून घेतलं नाही तर नात्यात कडवटपणा तर येतोच, पण त्यात दरीही निर्माण होते आणि आपण आपल्याच माणसांना परकं  करून टाकतो. म्हणूनच एकमेकांना मानसिक अवकाश देणं हे नातं सुदृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल असतं.

‘‘वडील गेल्यावर माझी आई आमच्या पूर्वीच्या घरात एकटीच राहते. मी उपनगरात पत्नी आणि मुलीबरोबर राहतो. आई ८३ वर्षांची आहे. तिला आता पहिल्यासारखं काम करणं झेपत नाही. तब्येतीच्याही कुरबुरी चालू झाल्या आहेत. तिनं आमच्यासोबत राहावं म्हणून मी खूप आग्रह करतो. पण ती हेकेखोर आहे. पूर्वीच्याच घरात राहण्याचा हट्ट ती काही केल्या सोडत नाही. मी लांब राहात असल्यामुळे तिच्या प्रकृतीला काही झालं तर लगेच धावून जाऊ शकत नाही. कधी डॉक्टरांकडे जाताना ती शेजाऱ्यांना बरोबर घेऊन जाते. इतरांना वाटेल की मी आईकडं पाहात नाही. पण आईनं हे स्वत: ओढवून घेतलं आहे. मला माझं घर सोडून तिच्याबरोबर राहणं शक्य नाही. हल्ली तर या विषयावर मला बोलायचंच नाही, असं म्हणून संवादाचे सर्व दरवाजे तिनं बंद करून टाकले आहेत. तिच्याशी कसं वागू हेच मला समजत नाही.’’ प्रताप सांगतो.

यशचे आईवडील सांगतात,‘‘आमचा एकुलता एक मुलगा यश सध्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतोय. तो अभ्यासात चांगला आहे, पण वागणं मात्र बेशिस्त आहे. टाळेबंदीपासून तर ते अधिकच बिघडलं आहे. सतत दार लावून स्वत:च्या खोलीत बसणं, फोनवर बोलत राहाणं, रात्री जागरण करणं, सकाळी उशिरा उठणं, आंघोळीला वेळकाळ नसणं, कपडय़ांचा पसारा घालणं, हा त्याचा नित्यक्रम आहे. तो धड मोकळेपणे बोलत नाही. मित्रमत्रिणींबद्दल विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं देतो. बाहेर गेला असेल तर चटकन फोन उचलतही नाही. समुपदेशकाकडे जायलाही तयार होत नाही. उलट तुम्हालाच समुपदेशनाची गरज आहे, असं उद्धटपणे आम्हालाच ठणकावतो. त्याला कसं सुधारावं हेच आम्हाला कळत नाही.’’

प्रताप आणि यशच्या आईवडिलांप्रमाणे आपल्याही जीवनात काही जिवलग व्यक्ती असतात की त्यांनी वेगळं वागलं पाहिजे असं आपल्याला तीव्रतेनं वाटतं. त्यांनी वेगळं वागावं यासाठी आपण जितके जास्त प्रयत्न करतो, तितक्या अधिक त्या स्वत:च्या वागण्यावर हटून बसतात किंवा अधिकच बिथरतात. मग प्रताप आणि यशच्या आईवडिलांसारखं त्यांच्याशी कसं वागायचं हा प्रश्न आपल्याला पडतो. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपण आईला आणि यशला पुरेसा मानसिक अवकाश देत आहोत का, याची पाहणी प्रतापला आणि यशच्या आईवडिलांना करावी लागेल. कारण प्रतापची आई आणि यश हे वेगवेगळ्या पिढय़ांचं प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांच्या समस्या मुख्यत: ‘मानसिक अवकाशा’शी निगडित आहेत.

मानसिक अवकाश ही संज्ञा सर्वप्रथम भाषाशास्त्रात मानसिक प्रकियांसंदर्भात वापरली गेली. दैनंदिन व्यवहारात ती ‘वैयक्तिक अवकाश’ म्हणजे स्वातंत्र्य किंवा खासगीपणा जपणं या अर्थानं वापरली जाते. मानसशास्त्रात या संकल्पनेवर आधारित अनेक प्रारूपं निर्माण झाली आहेत. मानसिक अवकाश म्हणजे इतरांपेक्षा भिन्न दृष्टिकोन किंवा मतं जोपासण्यास अवकाश मिळणं. ज्याप्रमाणे आपल्याला शारीरिक अवकाशाची, म्हणजेच अन्य व्यक्तीबरोबर किमान शारीरिक अंतर पाळण्याची गरज असते, तशीच मानसिक अवकाशाचीही असते. मानसिक अवकाश देणं म्हणजे अन्य व्यक्ती, अगदी ती जिवलग असली तरी ती आपल्यापेक्षा मानसिकदृष्टय़ा भिन्न आहे, हे मान्य करणं. म्हणजेच तिच्या सुखदु:खाच्या, मौजमजेच्या, जीवन जगण्याच्या कल्पना आपल्यापेक्षा पूर्णत: वेगळ्या असू शकतात आणि त्या वेगळ्या असण्याचा त्या व्यक्तीला असलेला अधिकार मान्य करणं होय. मग ती आपली पोटची मुलं असोत, नाहीतर आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलो ते आईवडील असोत. कितीही जिवलग व्यक्ती असली तरी त्यांची जडणघडण, त्यांचं वातावरण, त्यांचे दृष्टिकोन हे आपल्यापेक्षा वेगळे असणं अपरिहार्य आहे, हे समजून त्या व्यक्तीच्या स्वतंत्र अस्तित्वाची दखल घेणं, हे मानसिक अवकाशात अभिप्रेत आहे.

मानसिक अवकाशाची संकल्पना तत्त्वत: पटली तरी आचरणात आणणं अवघड असतं. व्यक्ती जितकी जवळची तेवढा मानसिक अवकाश देणं आपल्याला जड जातं. कारण जवळच्या व्यक्तीची मानसिकता आपल्यासारखीच असली पाहिजे, असं आपण गृहीत धरतो. ते आपल्यापेक्षा मानसिकतेत काही गोष्टींत किंवा संपूर्णत: भिन्न आहेत, हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु प्रयत्नांनी ते जमू शकतं. प्रतापनं आईला आणि यशच्या आईवडिलांनी यशला मानसिक अवकाश दिला तर त्यांच्या समस्येतून मार्ग निघू शकतो. त्यासाठी पुढील उपाय ते आचरणात आणू शकतात.

भिन्न मानसिकतेचा नि:संदिग्ध स्वीकार- प्रतापच्या आईनं प्रतापपेक्षा आणि यशनं त्याच्या आईवडिलांपेक्षा वेगळं जग पाहिलं आहे. तसंच त्यांचे अनुभवही भिन्न आहेत. जिवलग असले तरी ते त्यांची प्रतिकृती नाहीत. त्यामुळं मानसिकता भिन्न असणं अटळ आहे. या भिन्नतेचा प्रतापनं आणि यशच्या आईवडिलांनी  स्वीकार केला, तर त्यांचा वेगळेपणा त्यांना खुपणार नाही. उलट मानसिकता भिन्न असणं याचा अर्थ ते स्वतंत्र विचार करत आहेत आणि आपले दृष्टिकोन डोळे बंद करून स्वीकारत नाहीत, असा घेऊन ते त्याचं स्वागत करतील.

प्रतापला आणि यशच्या आईवडिलांना हे कळेल, की मानसिक अवकाश देणं म्हणजे इतरांचा वेगळं असण्याचा अधिकार मान्य करणं. त्यांच्या वागण्याला पसंती देणं असा नव्हे. पसंती-नापसंतीचा अधिकार आपल्याला आहे. पण इतरांचा वेगळं वाटण्याचा अधिकारच जर आपण मान्य केला नाही, तर ते आपलं ऐकून घेण्याच्या पायरीपर्यंतही येणार नाहीत. मानसिक अवकाश त्यांना संवादाचे बंद झालेले दरवाजे उघडायला मदत करेल आणि संवादाच्या पुढल्या पायरीवर ते त्यांची पसंती-नापसंती नोंदवू शकतील. आपण नापसंती दर्शवली तरीही त्याप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे असं बंधन जिवलग असले तरी घालता येणार नाही, याचंही भान ते ठेवतील. एका मानसशास्त्रज्ञानं म्हटलं आहे, अन्य व्यक्तींना, अगदी प्रियजनांनाही चुकण्याचा अधिकार आहे. तुम्ही तो त्यांना द्या, अथवा न द्या, तो ते बजावणारच. मग तसं असेल तर त्या अधिकाराचा स्वीकार करणं जास्त संयुक्तिक आहे.

दुसरी बाजू समजून घेणं- प्रत्येक व्यक्तीला, अगदी आपल्या दृष्टीनं पूर्णत: चुकीचं वागत असलेल्या व्यक्तीलाही स्वत:ची एक बाजू असते. ती ऐकून घेण्याची मनोभूमिका मानसिक अवकाश तयार करते. या मनोभूमिकेतून प्रतापनं आईची बाजू ऐकली तर ती कदाचित असं म्हणत असेल, ‘‘या वास्तूत मी संसार उभा केला आहे. तिच्याशी माझे भावनिक अनुबंध जोडले गेले आहेत. मी िहडतीफिरती असेतोवर मला ही वास्तू सोडून जायचं नाही. इथे मला जो मोकळेपणा आणि स्वतंत्रता वाटते, तसं प्रतापच्या घरी वाटणार नाही. तिथं त्याच्या तंत्रानं वागावं लागेल. मला परावलंबी व्हायचं नाही. होईल तेवढं माझं मी करेन. माझा भार प्रतापवर पडलेला मला आवडणार नाही. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी निघाल्या तर शेजाऱ्यांकडे मी हक्कानं मदत मागू शकते, तेवढे आमचे ऋणानुबंध आहेत. शिवाय किरकोळ तक्रारींसाठी प्रतापला लांबून बोलावणं मला नको वाटतं. ‘आईची काळजी घेत नाही’ म्हणून लोक नावं ठेवतील, या विचारानं प्रताप अस्वस्थ होतोय. पण इतरांपेक्षा मला काय वाटतंय हे तो का समजून घेत नाही?’’

यशच्या आईवडिलांनी मनोभूमिका अनुकूल केली, तर त्यांना यशची बाजू कळू शकेल. तो कदाचित असं म्हणत असेल, ‘‘आईबाबा माझ्यावर सतत पहारा ठेवतात. मी कधी उठतो, कधी आंघोळ करतो, कधी झोपतो, कधी खातो यावर त्यांची सक्त नजर असते. मित्रमत्रिणींबद्दल खोलात जाऊन चौकशा करतात. बाहेर गेलो तरी लगेच फोन करत बसतात. टाळेबंदीच्या काळात तर हे फारच वाढलं आहे. मला त्यांची ही पाळत असह्य़ होते. मी मिनिटामिनिटाला काय केलं हे त्यांना सांगणं मला नको वाटतं. म्हणून मी दार लावून बसतो, त्यांच्याशी कमीतकमी बोलतो. रात्री जागरण आणि उशिरा उठणं, हे माझंच नाही तर माझ्या पिढीचंच वेळापत्रक आहे. ते पाळून मी जर अभ्यास करत असेन तर त्यांचा का आक्षेप असावा? मी अशी कुठली गर गोष्ट केली आहे, की त्यांनी माझ्यावर सततचा पहारा ठेवावा? त्यांनी माझ्याबद्दलची संशयी वृत्ती बदलून माझ्यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. यासाठी त्यांनी समुपदेशकाकडं गेलं पाहिजे असं मी सांगितलं, त्यात काय चुकीचं आहे?’’ जर दुसरी बाजू समजून घेतली तर प्रतापची आई आणि यश हे हेतुपुरस्सर विरोधी वागत नाहीत किंवा आपल्याला मुद्दाम त्रास व्हावा म्हणून वागत नसून ते त्यांच्या दृष्टिकोनानुसार वागत आहेत, हे प्रताप आणि यशच्या आईवडिलांना कळून येईल आणि त्यांच्या नात्यात आलेला कडवटपणा कमी होईल.

टीकेचा सूर न लावणं- जेव्हा आपण इतर व्यक्तींनी बदललं पाहिजे म्हणून झटून प्रयत्न करत असतो, तेव्हा त्या व्यक्तीनं तिच्या वर्तनात बदल करावा अशी नुसती अपेक्षाच ठेवत नाही, तर तिनं बदल केलाच पाहिजे, अशी हटवादी मागणीही करतो आणि त्या व्यक्तीशी बोलताना आपण नकळत टीकेचा सूर लावतो. म्हणूनच प्रताप आईला हेकेखोर म्हणतो किंवा यशचे आईवडील त्याला उद्धट आणि बेशिस्त म्हणतात. थोडक्यात ते असा संदेश देतात, की आम्ही योग्य आहोत आणि तू चूक आहेस. या संदेशामुळे प्रतापची आई आणि यश दोघंही बदल करण्याऐवजी आम्ही कसे बरोबर आहोत, हे दाखवण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतात आणि कोण चूक, कोण बरोबर या चढाओढीत मुळात बदल का करायला हवा किंवा कसा हे प्रश्न मागे पडतात. तसंच टीकेमुळे दुखावले जाऊन ते संवादही बंद करतात. प्रतापची आई मला या विषयावर बोलणंच नको म्हणते किंवा यश बोलणंच टाळतो. प्रतापनं आईला आणि यशच्या आईवडिलांनी यशला मानसिक अवकाश दिला, तर ते त्यांना बरोबर-चूक अशा तराजूत तोलणार नाहीत. भिन्न मानसिकता म्हणजे चुकीची मानसिकता असा निष्कर्ष काढून टीकेचा सूरही लावणार नाहीत. तसं झालं, तर दोन्ही पक्षांमधला तणाव निवळू शकेल आणि संवादाच्या नवीन वाटा तयार होतील.

जेव्हा प्रताप आईला आणि यशचे आईवडील यशला मानसिक अवकाश देतील, तेव्हा त्यांच्यातलं नातं अधिक सुदृढ होईल. त्यांचं मन:स्वास्थ्य तर सुधारेलच, पण त्यांना स्वत:लाही मानसिक अवकाश मिळेल आणि तो आपल्याला इतरांच्या मानसिक अवकाशावर काम करायला अवकाश देत आहे, याचाही शोध त्यांना लागेल.