संपदा सोवनी

मेरी क्वांट या जगप्रसिद्ध फॅशन डिझायनरचं नुकतंच १३ एप्रिल रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. साठच्या दशकात स्वच्छंदी वृत्तीचं आणि बंडखोरीचं एक प्रतीक मानला गेलेला ‘मिनी स्कर्ट’ जन्मास घालणाऱ्या डिझायनर म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. हे जिथे घडलं त्या लंडनकडे फॅशनजगत अपेक्षेनं बघू लागलं. ‘फॅशन क्रांती’त महत्त्वाची भूमिका निभावलेल्या मेरी यांच्याविषयी..

maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
mutton chops diwali meeting
चंद्रपूर: स्नेहमिलन दिवाळीचे, जेवणात मटनचॉप्स…निवडणुकीने सणाची व्याख्याच…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
laapataa ladies
Oscars साठी किरण रावने ‘लापता लेडीज’चं नाव बदललं! काय आहे नवीन नाव? चित्रपटाचं पोस्टर आलं समोर
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…

पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ. युनायटेड किंग्डममधल्या शहरांमध्ये- विशेषत: लंडनमध्ये हा काळ तारुण्यानं सळसळणारा, आधुनिकतेचा होता. दुसरं महायुद्ध (१९३९-४५) मागे राहिलं होतं. आताचा काळ होता तरुणांचा आणि ‘टीनएजर्स’चा. जणू काही एक नवी सांस्कृतिक क्रांतीच येऊ घातली आहे असं वातावरण. अशा वेळी पश्चिम लंडनमधल्या ‘चेल्सी’ (Chelsea) या उच्चभ्रू इलाक्यात एक नवंकोरं कपडय़ांचं दुकान उघडलं आणि अल्पावधीतच स्थानिक तरुणींचा तो एक आवडता ‘स्पॉट’ झाला. असं काय होतं या दुकानात?  सुबक, निमुळते पाय दाखवता येईल असे गुडघ्यांच्या वर उंची असणारे स्कर्ट आणि ड्रेस, खांद्यांवर बंद असणारे ‘प्लेफुल’ पिनाफोर, वेगवेगळय़ा रंगांतल्या टाइट्स अशा कपडय़ांचं ते घर होतं.

   यात नवीन काय, असंच आपल्याला वाटेल. पण पन्नास आणि साठच्या दशकात ही फॅशन अत्यंत नवीन आणि आधुनिक मानली जात होती. ‘स्त्रियांनी गुडघे दाखवत फिरू नये’ अशा मताची मंडळी पुष्कळ होती. पायघोळ ए-लाइन स्कर्ट, ‘नी लेंग्थ’ ड्रेसेस हेच वापरण्यावर भर होता. अनेक शाळांमध्ये गुडघ्यांच्या वर उंची असलेले कपडे घालायला बंदी होती. अशा वातावरणात वावरणाऱ्या नवीन विचारांच्या तरुणींना कमी उंचीचे कपडे घालण्याचं आकर्षण नाही वाटलं तरच नवल! चेल्सी भागातलं किंग्ज स्ट्रीटवरचं हे ‘बझार’ नामक दुकान लोकप्रिय होण्याचं हेच कारण असावं.

   हे दुकान ज्या विशीतल्या स्त्रीनं सुरू केलं होतं, ती डिझायनर म्हणजे मेरी क्वांट. ‘मिनी स्कर्ट’ची जन्मदात्री म्हणून तिला ओळखतात. अर्थात फॅशनविश्वात एखाद्या विशिष्ट फॅशनचं जनकत्व कुणाकडे आहे, यावर नेहमी वाद असतात, तसं मिनी स्कर्टच्या बाबतीतही आहेच. एक मात्र खरं, की मिनी स्कर्ट ही फॅशन प्रचंड मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय करणाऱ्या पहिल्या डिझायनर म्हणजे मेरीच. साठच्या ‘यूथफुल’ दशकाचं नामकरणच ‘स्विंगग सिक्स्टीज्’ असं करण्यात आलं होतं. तेव्हाच्या तरुणाईसाठी मिनी स्कर्ट हे काय होतं? त्या आखूड स्कर्टमध्ये तरुणाईच्या स्वातंत्र्याची अनुभूती होती, ती जगासमोर मांडण्याचा उत्साह होता, धाडस आणि बंडखोरी तर होतीच आणि आपल्याकडे लोकांनी- विशेषत: पुरुषांनी वळून बघावं, आपल्या फॅशनची दखल घ्यावी, अशी इच्छा असणारा ‘प्लेफुलनेस’- अवखळपणाही होता. मिनी स्कर्ट ही फक्त लंडनमध्येच नाही, तर संपूर्ण युनायटेड किंग्डम, नंतर अमेरिकेत आणि पर्यायानं जगभरातल्या आधुनिक तरुणाईत स्विंगग सिक्स्टीज् फॅशनची ओळख होऊन गेली.    

‘फॅशन ही मूठभर लोकांसाठी नसते. अनेक लोकांना जे परिधान करावंसं वाटेल, असं काहीतरी करून दाखवणं म्हणजे फॅशनमधली क्रांती,’ असं मानणाऱ्या मेरी क्वांट स्वत:सुद्धा तत्कालीन लंडनमधल्या फॅशनेबल तरुणीचं उदाहरणच होत्या. १९५५ मध्ये ‘बझार’ हे दुकान सुरू करताना मेरी यांना फॅशन व्यवसायातल्या गणितांची मुळीच कल्पना नव्हती. लहानपणापासून मेरी आपली स्वत:ची काही तरी वेगळी स्टाइल तयार करण्याचा प्रयत्न करत. पण व्यवसायानं शिक्षक असलेल्या आई-वडिलांचा त्यांनी फॅशन क्षेत्रात जायला विरोध होता. त्यामुळे मेरी यांना ‘आर्ट स्कूल’वर समाधान मानावं लागलं. तरीही शेवटी त्यांना हवं ते त्यांनी केलंच. ‘गोल्डस्मिथ्स’ कॉलेजमध्ये शिकताना मेरी यांची अलेक्झांडर प्लंकेट ग्रीन यांच्याशी ओळख झाली. दोघं प्रेमात पडले आणि १९५७ मध्ये त्यांनी लग्न केलं. पण त्याआधीपासूनच फॅशनमध्ये करिअर करण्याच्या मेरी यांच्या स्वप्नाला अलेक्झांडर यांचं बळ मिळालं होतं. अलेक्झांडरना व्यवसायाची उत्तम जाण होती. त्यांनी लंडनमध्ये किंग्ज रोडवर एक रेस्टॉरंट सुरू केलं होतं आणि रेस्टॉरंटच्या वरची जागा ‘बझार’ दुकानासाठी मेरी यांना मिळाली.

त्या काळी आतासारख्या एकाच ठिकाणी फॅशनमधलं सर्व काही मिळणाऱ्या दुकानांची संकल्पना नवीन होती. ‘बझार’मध्ये मात्र आखूड स्कर्ट-ड्रेसेसपासून शूज, बेदिंग सूट्स, अ‍ॅक्सेसरीज्पर्यंत सर्व काही मिळत होतं. सुट्टीच्या दिवशी निवांत बाहेर पडायचं, रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आणि भरपूर शॉपिंग करून परतायचं ही संकल्पना तेव्हा नवीन होती. त्यामुळे ‘बझार’ची लोकप्रियता वाढत गेली.  आपण मोठय़ा ब्रँडची खरेदी केलीय हे त्या ब्रँडचं नाव छापलेल्या पिशव्यांच्या रूपानं मिरवणं आता सामान्य गोष्ट झाली आहे. त्या काळी हे दुर्मीळ होतं. पिशव्यांवर ‘बझार’ असं ठळक नाव छापून घेण्याची कल्पना अलेक्झांडर यांनी दिली आणि या पिशव्या खरेदी करून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांच्या हातात ‘स्टेटट सिंबॉल’सारख्या दिसू लागल्या. साठच्या दशकाच्या सुरुवातीलाच ‘जेसी पेनी’ या साखळी दुकानाशी मेरी यांनी करार केला होता आणि त्यांची सुटसुटीत, फ्लेफुल फॅशन अमेरिकेतही सर्वदूर पोहोचली. हे सर्व झपाटय़ानं घडत होतं. फॅशनमधल्या योगदानासाठी मेरी यांना १९६६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. ब्रिटनच्या राणीच्या हातून पारितोषिक स्वीकारतानाही मेरी यांनी क्रीम रंगाचा मिनी स्कर्ट घातला आणि त्याची चर्चा झाली होती!     

 मेरी क्वांट केवळ मिनी स्कर्टपुरत्या किंवा साठच्या दशकापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. मिनी स्कर्ट अजूनही टीनएजर मुली आणि तरुणी आवडीनं वापरतात. पण त्याही पलीकडे मेरी यांनी एक ‘क्लीन कट’ पण तितकाच ‘प्लेफुल’ असं आगळं मिश्रण असलेला ‘गर्ली लुक’ लोकप्रिय केला होता, जो वेगवेगळय़ा स्वरूपात आजच्या फॅशनमध्येही कायम आहे. तरुणीच्या अवखळपणाचं आणि बंडखोरीचं प्रतिबिंब दाखवणारी फॅशन क्रांती मिनी स्कर्टची! काळाप्रमाणे प्रवाही राहिलेल्या फॅशनमध्ये त्या क्रांतीची जन्मदात्री ठरलेल्या मेरी यांचं नाव कायम घेतलं जाईल.