नवरा-बायकोंत एका विषयावर वाद सुरू होतो आणि वाद वाढत जातात. पुष्कळदा ही भांडणं ‘तुझे-माझे’ आई-वडील, ‘तुमच्या-आमच्या’ सवयी, ‘आमच्याकडे असं नसतं!’ अशाच मुद्दयांवर फिरत भरकटत जातात आणि वादाचं मूळ कारण बाजूला पडतं. थोडं तटस्थ होत, मूळ कारण समोर ठेवून भांडणाचा विषय ठरणारे प्रश्नच बदलून पाहिले तर?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘या रविवारी काश्मिरी पुलाव खायला दोघं या!’ या सोनियाच्या मेसेजवर, ‘मी येते, अनिश टूरवर आहे,’ असं प्रीतीनं कळवलं. प्रीती आणि सोनिया दोघी मैत्रिणी. सोनियानं सौरभच्या प्रेमात पडून लग्न केलं, त्यात प्रीतीचाही हातभार होता. नंतर लगेचच प्रीतीचंही लग्न झालं, पण चौघांचं भेटणं असायचंच अधूनमधून.
प्रीती सोनियाच्या घरी पोहोचली, तेव्हा तिथे वातावरण तंग होतं. ‘सौरभच्या वाढदिवसाला, आठ दिवस गावी राहायला या,’ म्हणून सौरभच्या आईनं बोलावलं होतं. आणि ‘लग्न झाल्यापासून तीन वर्ष तुझा वाढदिवस आणि दिवाळी गावीच करतोय. यंदा दोन दिवस दोघंच कुठेतरी जाऊ या,’ असं सोनिया म्हणत होती.
प्रीती आली, तशी दोघं तिला आपापली कैफियत सांगू लागले. ‘‘माझी इच्छा काहीही असो, आईनं बोलावलं की हा श्रावणबाळ जाणारच. मग निघताना दर वेळी आईंच्या डोळयातून गंगा-यमुना वाहू लागणार, हा इमोशनल होऊन मुक्काम वाढवणार. हे आतापर्यंत जमलं, पण आता नव्या ब्रांचमध्ये मला ते अवघड आहे.’’ सोनिया म्हणाली.
‘‘ हे फक्त निमित्त बरं का प्रीती! हिला गावी यायचंच नसतं. दरवेळचा सीन आहे हा.’’
‘‘मला तिथे जास्त राहायला बोअर होतं.’’
हेही वाचा : बुद्धी-मनाचा तोल!
‘‘अगं, इतक्या लांब गेल्यावर राहिल्यासारखं वाटायला नको? मी तक्रार करतो का तुझ्या माहेरी यायला?’’
‘‘माझं माहेर इथेच आहे. तू एखादा दिवस येतोस आणि त्यातही जावयाचाच तोरा असतो. सुनेचं तसं नसतं. गावी मला एकटं वाटतं.’’
‘‘माझ्या घरचे काय छळ करतात तुझा?’’
‘‘छळ नाही, पण प्रत्येकजण आपल्याला ‘जज्’ करतोय याचा ताण वेगळा असतो. तुझ्या माणसांचे टोमणे आणि ‘लूक्स’ तुला कुठे कळतात? तसंही तिथे तुझं माझ्याकडे लक्षच कुठे असतं? आई, वहिनी खा-खा खाऊ घालतात. पेंडभाजी, उकडशेंगोळे, धपाटे.. नावं तरी कसली! आणि पदार्थ किती मसालेदार.. अॅ सिडिटी वाढवणारे.’’
‘‘ए, आमच्या पदार्थाना नावं नाही ठेवायची. मी तिथे जाऊन प्रेमानं खातो. तू शिकून करून घाल म्हणून नवरेगिरी करतोय का?’’
‘‘करूनच बघ तू! अगं प्रीती, ‘वर्क फॉर्म होम’ असताना मला मदत करता येत नाही. केली तरी त्यांना पटत नाही. त्या दिवशी आईंना कांदा चिरून दिला, तर ‘या भाजीला असा नाही चिरायचा,’ म्हणत त्यांनी नवा कांदा चिरला. ’’
‘‘खरंच आहे ते!’’ सौरभनं तिला चिडवलं.
‘‘म्हणून तर म्हणतेय, तूच एकटा जा.’’
‘‘अगं, मस्करी केली. तुझ्या हाताला चव आहे. आजचा पुलाव किती भारी झालाय!’’
‘‘तुमच्याकडच्या मस्करीमुळे किती ‘हर्ट’ व्हायला होतं ते तुला कळतच नाही. याचा तिथला गोतावळा जमला, की माझ्या इंग्लिश मीडियमवरून चेष्टा, नाही तर शहरी वागण्यावर इनडायरेक्ट टोमणे मारायचे! हाही यांनाच सामील असतो. काहीही बोललं तरी हे लोक ‘तुमचं काय बुवा..’ म्हणायला मोकळे. आम्हाला प्रॉब्लेम्स नसतात का? इथले ताण त्यांना कळत नाही. याला त्यांच्या कमेंट्स काहीच वाटत नाही. मला राग येतो तरी बोलू शकत नाही. चार दिवसांसाठी जाऊन ‘उद्धट सुने’चं लेबल नकोच.’
हेही वाचा : सांधा बदलताना : जुडे वाद-संवाद तो हितकारी…
‘‘अगं, त्यांना सांगून कळणार आहे का? कायम गावातच राहिलेल्यांना शहरातल्या घाईचा अंदाज नसतो सोनिया. दोघं जाऊ या! तुझ्याशिवाय मला करमत नाही.’’ सौरभनं मस्का मारल्यावर सोनिया उसळलीच.
‘‘अजिबात नाटकीपणा करू नकोस. तिथे हा रोज मध्यरात्रीपर्यंत मित्रांबरोबर असतो. हा त्यांना ‘भारी’ वाटतो. मोठेपणा मिळतो. मग साहेब रमतात तिथेच. मी घरातल्यांशी किती वेळ आणि काय बोलणार? आधी मी अबोल, त्यात त्या बोअरिंग सासू-सून मालिका ‘कंपल्सरी’ पाहण्याची शिक्षा.’’
‘‘अगं, लहानपणीचे रोजचे मित्र किती महिन्यांनी भेटतात. नॉस्टेल्जिया असतो..’’
‘‘यांच्या लहानपणीच्या मजा मला बालिश वाटतात. दर वेळी परत परत त्याच आठवणी तास-तास उगाळायच्या, पण माझ्यासाठी वेळ नाही. कायम त्याच्या घरचे आणि मित्र पहिले. किती गृहीत धरायचं मला? ’’
यावर सौरभलाही राग आला.
‘‘हो. मी पण त्यांच्यातलाच आहे. तुला गावठी सासरच्यांशी आणि मित्रांशी संबंध ठेवायची इच्छा नाहीये, कळतं मला.’’
‘‘असं मी कधी म्हणाले? मनातलंच ऐकतोस का स्वत:च्या?’’
हमरीतुमरी सुरू झाल्यावर मात्र प्रीतीमध्ये पडली. ‘‘तुम्ही दोघंही मूळ मुद्दा बाजूला ठेवून भलत्याच गोष्टींवर भांडताय! एकमेकांवर आरोप करून निरुत्तर करण्याची स्पर्धा आहे का इथे?’’ दोघांनाही उत्तर सुचलं नाही.
‘‘वाढदिवसाला गावी जायचं की दोघांनीच फिरायला जायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. ते सोडून आईचं ‘इमोशनल’ वागणं, गावाकडचे पदार्थ, कांदा कसा चिरायचा, इंग्लिश मीडियम, मित्र, शहरी-गावठी.. कुठे कुठे फिरून आलात. असल्या असंबद्ध गोष्टी मध्ये आणून नेहमी भांडता ना?’’
‘‘हो!’’ दोघंही विचारात पडले.
प्रीती म्हणाली, ‘‘मी आणि अनिशही पहिली तीन वर्ष असेच कशा-कशावरून भांडायचो. एके दिवशी आमच्या लक्षात आलं, की दर वेळी तेच भांडून प्रश्न सुटत नाहीच, उलट दोघंही जास्त दुखावतो. महिनोंमहिने तेच ते चक्र फिरत राहतं. हा ‘पॅटर्न’ थांबवायला काही तरी बदलावं लागेल.’’
‘‘काय बदलायचं?’’ सोनियानं विचारलं.
‘‘तिथल्या तिथे फिरवत ठेवणारे प्रश्नच थोडे बदलले तर?.. सौरभ बघ हं, तिथे एकटं वाटतं म्हणून यायचं नाहीये, असं सोनिया स्पष्ट सांगतेय, तर ‘तिला कशामुळे एकटं वाटतंय?’ हे न शोधता, ‘माझ्या घरचे छळतात का? मस्करी ‘लाईटली’ का नाही घेत? असे तुझे प्रश्न आहेत. ‘तिला गावी यायचंच नसतं,’ अशी तुझी ठाम खात्री असल्यामुळे, तिनं तिच्या भावना सांगूनही तू दुर्लक्ष करतोयस. मग ती आणखी दुखावते.’’ ‘‘असं म्हणतेस?’’ सौरभ विचारात पडला.
हेही वाचा : ‘एका’ मनात होती..! ‘एकटाच असतो गं मी!’
‘‘आता प्रश्न बदलून पाहू. तुझ्या माणसांबरोबरचा तुझा ‘कम्फर्ट झोन’ तीस वर्षांचा आहे. सोनियासारख्या अंतर्मुख असणाऱ्या बाईला चार-आठ दिवसांच्या सहवासात तो आपलासा करता येईल का? त्यातही त्यांच्या जोडीनं तूही तिची टर उडवत असताना? मग तिला त्यांच्यात सामावून घेण्यासाठी तू काय करू शकशील?’’
‘‘काय करणार? मला नाही सुचत.’’
‘‘तू सोनियाच्या माहेरी जातोस, तेव्हा ती चार-चारदा येऊन तुला हवं नको पाहून जाते ना? तशी तिचीही तुला दखल घेणं जमेल का? तुझा गोतावळा तिला अजून परकाच आहे. ती रुळेपर्यंत त्यांच्यासमोर तिची मस्करी टाळणं, कधी तरी वेळेवर घरी येणं, अवघड असतं का रे? ’’
‘‘अगदी माझ्या मनातलं बोललीस प्रीती. हेच मी सांगते, पण..’’ सोनिया.
‘‘रागाच्या भरात तुझ्याकडून तेच पुन:पुन्हा बोललं जात असेल, तर त्यातला अर्थ संपतो सोनिया. सौरभही तुझ्याकडे त्याच्या घरच्यांसाठी स्वीकाराची भावना मागतोय. तूही ती समजून घे. ‘गावाकडचे लोक असे कसे? काय बोलू त्यांच्याशी?’ हे तुझ्या मनातले प्रश्न बदलून बघ. ‘ ‘मी अबोल आहे’, ‘मला माझ्या पद्धतीचा स्वयंपाकच येतो,’ असले माझे ‘कम्फर्ट झोन’ मी किती वर्ष कुरवाळणार आहे? त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेऊन कधी मस्करी, कधी दुर्लक्ष, कसं जमेल?’ असे तुझे बदललेले प्रश्न असू शकतात.’’
‘‘बरोबर. आम्ही दोघंही आपापल्या ‘कम्फर्ट झोन’ आणि अपेक्षांना धरूनच विचार करत होतो. बोललेल्या शब्दांवर वाद घालत होतो. भावना ऐकतच नव्हतो. आता वेगळा रस्ता नक्की सापडेल.’’ सोनिया म्हणाली.
‘‘येस! ठरलं. यंदाचा माझा वाढदिवस फक्त आपल्या दोघांचा. नंतर मी गावी जाईन. तू..’’ असं सौरभ म्हणाल्यावर सोनिया खुलली आणि म्हणाली, ‘‘मीपण वीकएंडला जोडून रजा मिळेल तशी गावी येते.’’
‘‘खरं किती सोपं होतं! पण आम्ही दोघंही ‘माझ्याच मनासारखं व्हायला पाहिजे’ या हट्टाभोवती गोल गोल फिरत भांडत होतो. त्याची तू ‘इतिश्री’ केलीस ’’ सौरभ म्हणाला.
‘‘वेल डन!’’ प्रीती हसत म्हणाली.
neelima.kirane1@gmail.com