‘‘लग्नानंतर मी अजिबात देवाची पूजाबिजा करणार नाही. माझा विश्वास नाही देवावर. आत्ताच लग्नाआधी मी त्याला खडसावून सांगणार आहे. सुरुवातीला सगळे हो हो करतात, आणि मग सत्यनारायणाच्या पूजेला तरी बस, नंतर मग ही पूजा ती पूजा, असं सगळं चालू होतं. मला नाही जमणार ते ! अगदी अशीच अट माझ्या मत्रिणीचीपण होती आणि आता २-३ महिन्यांतच ती परत आल्येय आणि घटस्फोटाची केस सुरू झाल्येय..’’
शाल्मली माझ्यासमोर बसली होती. चेहरा रागावलेला. एम. एस्सी. असलेली शाल्मली स्मार्ट, नीटनेटकी, चांगला ड्रेस सेन्स असलेली. चेहऱ्यावर शिक्षण आणि नोकरीनं आलेला आत्मविश्वास होता. हळूहळू मी तिच्या जॉबबद्दल बोलायला सुरुवात केली. आणि तिचा मूड बदलला. ती एकदम खुशीत आली. आम्ही त्यानंतर विविध विषयांवर गप्पा मारल्या. मी तिला सहज म्हटलं, ‘बघ हं, तुला हवं तसं घर मिळालं. तुझ्या मतांना किंमत देणारं मिळालं. त्यांनी कुणीच तुला पूजेचा आग्रह नाही केला. झाले तुझ्या लग्नाला ६/७ महिने. आणि तुझ्या सासूबाई कुठेतरी चार दिवसांसाठी गावाला जाणार आहेत. आणि त्या तुला म्हणाल्या, ‘‘अगं जरा चार दिवस माझ्या देवांना अंघोळ घाल हं..’’ तर..’
शाल्मलीचा मूड एकदम बदलला, ‘‘आधीच सांगितलं होतं पूजा करणार नाही म्हणून.’’
‘‘पण त्या कुठं म्हणाल्या आहेत तुला की पूजा कर म्हणून. त्या तर म्हणाल्या, की अंघोळ घाल.’’ इति मी.
‘‘पण माझा देवावर अजिबात विश्वास नाहीये.’’ शाल्मली.
‘‘त्या विश्वासाने कर असं म्हणाल्याच नाहीयेत, जशी इतर कामे करतेस तशी देवांना अंघोळ घाल. चार दिवसांपकी तीन दिवस काहीच करू नकोस आणि त्या यायच्या दिवशी फुलं बदल. शेवटी महत्त्वाचं काय आहे? तुझी तथाकथित तत्त्वं की त्यांचं मन सांभाळणं? काय वाटतं तुला?’’
शाल्मली गप्प बसली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. म्हणाली, ‘‘खरंच सांगते, असं आजवर कुणी सांगितलंच नाही. मला समजतंय तुम्ही काय सांगताय ते.’’
* * *
नुकतेच आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. पलीकडच्या टेबलवर दोन तरुण मुली बसलेल्या. असतील साधारण २५-२५ वयाच्या. बीअर पीत छान गप्पा चालल्या होत्या. त्यांचं कुठंच लक्ष नव्हतं. माझ्या नवऱ्याचं, महेंद्रचं मात्र त्यांच्याकडे वारंवार लक्ष जात होतं. मी त्याला म्हटलं, ‘‘अरे काय चाललंय तुझं?’’ तर तो म्हणाला, ‘‘काय ना, सध्या मुलींना कोणत्याच कारणासाठी मुलांची गरज भासत नाही. अगदी प्यायलासुद्धा..’’ मला जरा आश्चर्यच वाटलं. ‘‘तुला त्याचा त्रास होतोय की काय?’’ मी म्हटलं.
‘‘अगं तसं नाही. पण आमची गरज त्यांना भासली तर आम्हा पुरुषांना जरा बरं वाटतं. मुली फार स्वतंत्र झाल्या आहेत. ते आम्हा पुरुषांना अजून झेपत नाही.’’ इति महेंद्र.
मला गंमत वाटली नि हसू आलं.
* * *
सध्या सगळीकडे या लग्नाच्या मुलींवर एक आगाऊपणाचा शिक्का बसला आहे. हल्लीच्या मुली ऐकत नाहीत, शब्द खाली पडू देत नाहीत. त्यांना स्वयंपाक येत नाही. त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. त्यांना एकत्र राहण्यात रस नाही. घरातल्या कामाची त्यांना ५०-५० टक्के वाटणी हवी असते. इ.इ.इ. हा सगळा सध्या चच्रेचा विषय आहे. यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मुलींनीच पुढाकार घेऊन या मतांमध्ये आपल्या वागणुकीतून बदल घडवून आणायला हवा. सध्याच्या या मुली खूप शिकलेल्या मिळवत्या आहेत. सिन्सिअर आहेत. विचारांच्या दृष्टीने पूर्वीपेक्षा त्या निराळ्या आहेत. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे साहजिकच लग्नाच्या संदर्भात त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांना त्यांचा नवरा ‘मित्र’ म्हणून हवा आहे. त्यांना त्याच्याकडून आदर हवा आहे. फक्त मला असं वाटतं की अपेक्षा मांडताना आक्रमक होण्याची गरज नाही. सतत ‘अरे ला कारे’ करण्याची आवश्यकता नाही. वरच्या शाल्मलीच्या उदाहरणात जर आपण पाहिलं तर गोष्ट खूप साधी सहज होती. थोडा विचार करण्याची गरज होती. मागे एकदा आमच्या मुलींसाठीच्या कार्यशाळेत आम्ही त्यांना एक वाक्य पूर्ण करायला सांगितलं होतं,
‘‘मला करिअर करायचं आहे म्हणून—-’’
हे पुढचं र्अध वाक्य त्यांनी पूर्ण करायचं होतं. त्या वेळी मुलींनी पूर्ण केलेली उत्तरं अशी होती-
* मला करिअर करायचं आहे म्हणून, घरातल्यांनी मला मदत करावी.
* मला करिअर करायचं आहे म्हणून, माझ्या सासूने मला डबा द्यावा.
* मला करिअर करायचं आहे म्हणून, घरातल्या इतर कामासाठी बाई लावावी आणि तिच्याकडून काम घरातल्या रिटायर्ड माणसांनी करवून घ्यावे.
* मला करिअर करायचं आहे म्हणून माझ्या नवऱ्याने घरातल्या कामातला अर्धा भाग उचलायला हवा.
अशाच प्रकारची उत्तरं साऱ्या जणींनी दिली होती. मी त्यांना विचारलं. करिअर चालू ठेवण्याचा निर्णय कोणाचा? कुणाला करिअर करायचं आहे?
उत्तर आलं, करिअर मला करायचं आहे. मग जर करिअर मला करायचं असेल तर त्यासाठी माझं योगदान काय? घरातल्या सर्वाच्या मदतीने जर मला करिअर करावं लागणार असेल तर ती मदत मागताना माझा स्वर कसा असायला हवा? कोणते शब्द मला योजावे लागतील की जेणेकरून समोरचा माणूस मला आनंदाने मदत करायला तयार होईल? मी ऑर्डर सोडून मला कोणी मदत करेल का? मला अशा ऑर्डर्स दिलेल्या आवडतात का? घरातल्या हक्काच्या माणसांना आपण का गृहीत धरतो? असे प्रश्न मी जेव्हा विचारले तेव्हा सगळ्याजणी अंतर्मुख झाल्या.
श्रेयसी आणि तिची मत्रीण वृंदा दोघी एकदा सहज आल्या होत्या. म्हणाल्या, ‘‘आम्हाला आमचा नवरा आमच्या वडिलांसारखा असायला हवा.’’ वृंदा म्हणाली, माझे वडील खूपच मॅच्युअर आहेत तितकाच मॅच्युअर नवरा मला हवा. हा विचार मला अनेक लग्नाच्या मुलींमध्ये आढळतो. वडिलांच्या प्रत्यक्ष रूपात त्या नवऱ्याची प्रतिमा शोधत असतात.
मी म्हटलं, ‘‘अगं तुमच्या कळत्या वयात तुम्ही आलात त्या वेळी वडिलांचे वय चाळिशीच्या आसपासचे असणार. तुम्हाला जी मॅच्युरिटी अपेक्षित आहे ती चाळिशीची आहे. वडील त्यांच्या लग्नाच्या वेळी इतके प्रगल्भ असतील का? तसा तुमचा भावी जोडीदार आत्ता तुमच्या वडिलांइतका प्रगल्भ असणार नाही. ही परिपक्वता अनुभवांनी आलेली असते.’’ मी जे बोलत होते ते त्या दोघींना पटल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.
श्रेयसी म्हणाली, ‘‘लग्नानंतर माझ्या आई-वडिलांची जबाबदारी त्यानं उचललीच पाहिजे. मी नाही का त्याच्या आई-वडिलांचं करणार? ही माझी अट आहेच. त्याला त्याची मान्यता असेल तरच मी त्याच्याशी लग्न करीन.’’
ही अजून एक अडचणीत आणणारी विचारधारा. काही घरांमध्ये मदतीची गरज असेलही. काही जणींना आपल्या आईला वडिलांना आíथक मदतसुद्धा करावी लागेल. पण सरसकट घरांमध्ये ही परिस्थिती असण्याची शक्यता कमी आहे.
मी त्या दोघींना विचारले, तुमचं लग्न लवकर व्हावं, तुम्हाला चांगलं स्थळ मिळावं या व्यतिरिक्त त्यांना तुमच्याकडून काय हवंय? दोघीजणी गप्प झाल्या. विचारात पडल्या. मी त्यांना म्हटलं, ‘‘अगं त्यांना फक्त त्यांची वारंवार कुणीतरी चौकशी करायला हवी आहे.’’ काय आई कशी आहेस? रोज तुझी औषधं घेतेयस ना? काल मत्रिणीकडे गेली होतीस. मजा आली का?’’ अशा स्वरूपाची चौकशी विचारपूस फक्त हवी आहे. तुमची पिढी नशिबवान आहे. अनेक घरांमध्ये आई-वडील आíथकदृष्टय़ा तुमच्यावर अवलंबून असतातच असे नाही. काही अपवाद असतील. तसंच तुमच्या आई-वडिलांचे लग्न त्यांच्या वयाच्या २२-२५ या वयात झालेले आहे. त्यामुळे शारीरिकदृष्टय़ाही ते फिट असतात. आता तुमच्या लग्नाच्या वेळी त्यांचे करायचे असे काही नसते. आणि असा विचार का नाही की तुम्ही दोघेही नवरा-बायको मिळून दोघांच्याही आई-वडिलांकडे लक्ष देणार आहात. तुमची दोन्ही कुटुंबं मिळून एक कुटुंब होईल. त्यात तुझे पालक, माझे पालक असे काही नसेल. तर ते आपले कुटुंबीय असतील. बघा हं विचार करा.’’
आज या सुशिक्षित मुलींच्या विचारांना फक्त दिशा देण्याची गरज आहे. आणि हे काम घरातल्या पालकांचे आहे ना? काय वाटतं तुम्हाला?
विचारांची दुसरी बाजू
आजच्या मुलींना त्यांच्या लग्नाचा प्रश्न अनेकदा ताण निर्माण करणारा वाटतो आहे, याचं कारण त्या प्रश्नाकडे दुसऱ्या बाजूने न बघण्याची सवय. प्रत्येक गोष्टीत इतरांनी काय करावं यापेक्षा मी काय करू शकते, या नजरेने त्या प्रश्नाकडे बघायला हवं. शेवटी कुटुंब सुखी तर तुम्ही सुखी.. मग स्वत:ला सुखी करण्यासाठी हा वेगळा विचार हवाच..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modern educated girls thoughts need direction from parents