आयुष्यात कुठेही न अडणाऱ्या दोन स्त्रिया, एक आधुनिक तंत्रज्ञान न शिकताही स्वबळावर सुखाचा संसार करणारी, तर दुसरी आपला संसार सांभाळत दुसऱ्याच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवून तंत्रज्ञानाच्या आधाराने अर्थकारण सांभाळणारी. स्त्रियांचं हे स्वयंसिद्धत्व सुधाकररावांसारख्यांना अचंबित करतं कारण त्यांच्याशिवाय त्यांचं मात्र पावलोपावली अडत असतं…

सुधाकरराव आणि सुधाताई चार दिवसांसाठी मुंबईत आपल्या मुलाकडे जातात आणि दुसऱ्याच दिवशी सुधाताई ह्रदयविकाराच्या झटक्याने अचानक जातात काय, सगळंच विपरीत!

तसे सुधाताईंचे वयदेखील फार झाले नव्हते. नुकतीच त्यांनी वयाची साठी पार केली होती. मुलाच्या संसारात आपण लुडबुड करायची नाही, त्यांचे आयुष्य त्यांनी स्वतंत्ररीत्या जगावे, हा विचार त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न करतानाच मनोमन स्वीकारला होता. म्हणूनच सुधाकरराव आणि सुधाताई मुलाच्या लग्नानंतर आपल्या कोकणातल्या घरीच राहात होते, पण कोणाच्या ध्यानीमनी नसताना हे अचानक असे अघटित घडले.

सुधाताईंचे दिवसकार्य उरकून सुधाकरराव परत आपल्या कोकणातल्या घरी आले. खरं म्हणजे, मुलगा आणि सून त्यांना सोडायला तयार नव्हते, पण सुधाकररावांना फार काळ मुंबईत राहणे शक्य होणार नव्हते. कोकणातले घर असे एकाएकी कायमचे बंद करणे ही गोष्ट मोठी अडचणीची ठरली असती. आणि म्हणून सुधाकररावांनी थोड्याच दिवसांत आपले गाव गाठले. पहिले काही दिवस विषण्ण अवस्थेत गेले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांची अगत्याने विचारपूस केली. पत्नीच्या आठवणींनी त्यांचे मन अस्वस्थ होत असे. मात्र गावातल्या खूप दिवसांच्या वास्तव्यामुळे गावात त्यांचे चांगले संबंध तयार झाले होते. शेजाऱ्यांनी पहिले काही दिवस आवर्जून त्यांना जेवण आणून दिले. विचारपूस केली.

कधी कधी सुधाकररावांना वाटे, आता येथे एकटे राहणे नको. जावे आपल्या मुलाकडे मुंबईला. लगेच दुसरा विचार येई की, नको आपण इतके दिवस मुलापासून दूर राहिलो, आता तेथे आपले जगणे सहज शक्य होईल असे वाटत नाही. मुळात आपल्याला त्या घराचा लळाच लागलेला नाही. इथे गावात आपले चांगले बस्तान बसले आहे. जेवणाचा फक्त प्रश्न आहे, परंतु आता गावातसुद्धा जेवणाचे डबे मिळतात. त्यामुळे तीदेखील मोठी अडचण ठरणार नाही. इथेच शांत, एकांत जीवन जगू या. पुढे मागे पाहू. तशी वेळ आलीच तर मुंबईला जाण्याचा विचार करता येईल. आपल्याला उर्वरित आयुष्य एकट्याने काढायचे आहे, हे मात्र निश्चित, असे म्हणत त्यांनी स्वत:ची समजूत घातली.

मात्र आपल्याला अजिबातच स्वयंपाक करता येत नाही, याची नुसतीच खंत नव्हे तर चिंताही त्यांना आता भेडसावू लागली. गावातच कुणाकडून तरी तयार जेवणाचा डबा मिळेल, पण त्यावर किती दिवस अवलंबून राहाणार? बायको होती तोपर्यंत, स्वत:चे पोट भरण्यापुरते तरी तिच्याकडून काहीतरी शिकून घ्यायला हवे होते, असे त्यांना वाटून गेले. यापुढे जीवनात येणाऱ्या अवलंबित्वाची त्यांना कल्पनाही करवेना. जेव्हा असे विचार येत तेव्हा ते निग्रहाने त्यांना दूर लोटत, पण मनाच्या तळाशी बुडवलेला हा विचार मध्ये मध्ये डोके वर काढल्याशिवाय राहात नसे.

त्यांना, सुधाताईंशी पूर्वी, वेळोवेळी झालेल्या खटक्यांची आठवण झाली. ‘तू बँकेचे व्यवहार समजून घे’, म्हणून ते त्यांना सारखा आग्रह करीत, आणि त्या त्यांची विनंती धुडकावून लावीत नसत, पण पद्धतशीरपणे कानाआड करीत. ते तिला, मनातल्या मनात, अडाणी ठरवून मोकळे होत. कोणत्या भरवंशावर त्या तसं म्हणत माहीत नाही, पण त्या नेहमी म्हणत, ‘‘माझं काहीएक अडणार नाही.’’. ते तिला म्हणत, ‘‘अगं, खात्यात पैसे असून अडचणीच्या वेळी ते तुला काढता येणार नाहीत. आणि दुसऱ्या समोर हात पसरायची वेळ येईल. त्यासाठी तरी शिकून घे.’’ पण, खरोखरच अगदी मरेपर्यंत सुधाताईंचे त्यामुळे काहीच अडले नाही. सुधाकरराव पंधरा-पंधरा दिवस कामानिमित्ताने बाहेरगावी असत, तरीही मुलाबाळांसह त्या खेडेगावातील संसार व्यवस्थित निभावून नेत. ‘तुम्ही स्वयंपाक शिकून घ्या’, असे मात्र सुधाकररावांना त्या कधीच म्हणाल्या नाहीत. त्यांना बहुतेक हे सुचवायचे असावे, की कोणी कोणाला उपदेश करून आणि सल्ले देऊन काही उपयोग होतोच असे नाही, या गोष्टी ज्याच्या त्यांनी समजून घ्याव्यात, तशाच घ्यायच्या असतात. जे काही शिकायचे असेल त्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यावा आणि काय शिकायचे ते शिकून घ्यावे.

एके दिवशी सुधाकरराव स्वयंपाक घरातल्या ओट्याकडे पाहात उभे होते. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू अगदी हाताच्या अंतरावर तयार होत्या, पण सुधाकररावांना स्वत:चे पोट भरण्याइतपतही त्यातून काही तयार करता येणार नव्हते. इतक्यात शेजारच्या कुसुमताई आल्या. म्हणाल्या, ‘‘मालतीबाईंना विचारू का, तुमचं जेवण करून देण्यासाठी? गेल्या वर्षी नवरा अचानक गेला तेव्हापासून त्या स्वयंपाकाची कामे करतात. काय करणार? त्या फार शिकलेल्या नाहीत, वयदेखील झालंय, अशा वेळी आता नोकरी कोण देणार? दोन मुलं पदरात आहेत. कोणाला जेवण करून हवे असले तर ते करून देतात. आणि आपला उदरनिर्वाह चालवतात.’’

सुधाकररावांना मोठाच दिलासा मिळाला. चार पैसे मोजून का होईना, घरचे अन्न मिळण्याची सोय होऊ शकते या विचाराने ते थोडे सुखावले. केवळ पोळपाट, लाटणे इतक्याच भांडवलावर, अनंत अडचणींना तोंड देत आपला संसार सावरणाऱ्या आणि तो सर्वार्थाने उभा करणाऱ्या स्वयंसिद्ध स्त्रियांना त्यांनी मनोमन हात जोडले. त्यांनी मालतीबाईंना जेवण करण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून आपल्या घरी बोलावले.

दुसऱ्या दिवशी त्या सुधाकररावांकडे आल्या आल्या, सुधाकररावांनी त्यांच्या मेहनतान्याचा विषय काढला. मालतीबाई म्हणाल्या, ‘‘उद्या मी माझ्या बँकेची माहिती तुम्हाला देईन, जे काही ठरेल, ते माझ्या खात्यात जमा करा. मला लागतील तेव्हा मी कार्ड वापरून पैसे काढते. हातात पैसे असलेच की उगाचच खर्च होतात. त्याला लगेच पाय फुटतात.’’ सुधाकरराव चकितच झाले. त्यांच्या मनात आलं, ‘काय म्हणावं या बायांना!

कसलेही नवे तंत्रज्ञान आत्मसात न करताही, अखेरपर्यंत आपला संसार सुखाने चालवणारी एक माझी पत्नी आणि दुसरी हातातल्या फक्त पोळपाट, लाटण्याच्या आधारे, आपला संसार सांभाळत दुसऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारी स्त्री, तंत्रज्ञानाचा आधार घेऊन, आपले अर्थकारण सांभाळू पाहात आहे. आणि मी मात्र, स्वत:चे पोट भरण्याइतकेसुद्धा कौशल्य इतक्या वर्षांत माझ्या बायकोकडून आत्मसात करू शकलो नाही!’

सुधाकररावांनी स्त्री शक्तीला आणि स्त्रियांमध्ये दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अशा व्यवहारी शहाणपणाला मनोमन हात जोडले.