आईला कुठे एकटीला घरी ठेवायचं म्हणून मग पाळीपाळीने एकेका मुलाकडे रवानगी केली जाते. मुलांची सोय होते, पण आईची मात्र गोल गोल राणी.. होऊन जाते. तिचं म्हणणं असतं, ‘‘वय वाढतं तसा त्रास वाढतो. दर खेपेला नव्या परिघाची ओळख करून घ्यायची, त्यात स्वत:ची ओळख निर्माण करायची आणि उभयपक्षी जानपहचान होत्ये न होत्ये तोवर बोचकं उचलून नव्या ठिकाणी जायची वेळ यायची. किती काळ चालणार कोण जाणे!’’
‘‘आई, पुढच्या आठवडय़ात आपल्याला जायचंय.’’ लेक म्हणाली. तेव्हा म्हातारी आई भिंगातून ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करत होती. तिला साहजिकच चटकन काही समजलं नाही. गोंधळून म्हणाली,
‘‘कुठे?’’
‘‘दादाकडे. अंबाल्याला.’’
‘‘एवढय़ात?’’
‘‘हो. या खेपेला जरा पंधरा दिवस अलीकडे आलंय खरं तुझं जाणं, पण काय करणार? आमच्या घराचं सगळं इंटीरिअरचं काम काढलंय आम्ही. सारखी कामाची माणसं ये-जा करणार. धूळ, ठोकाठोकी, सामानाची उचलसाचल याचा तुलाच त्रास होईल म्हणून म्हटलं.’’
‘‘ हो, पण मी नेमकी आताच निरूपणाला जायला लागल्येय ज्ञानेश्वरीच्या. गेल्याच आठवडय़ात सुरू केलंय त्या मॅडमनी. छान सांगताहेत. दोन महिने तरी लागतील म्हणत होत्या. त्याचा सगळ्याचा धागा मध्येच सुटणार माझा.’’
‘‘पुढच्या खेपेला माझ्याकडे आलीस की धर. त्याचं काय एवढं?’’
‘‘आता अंबाल्याला थंडी असेल नाही?’’
‘‘पडेल लवकरच, पण दादाकडे रूम हीटर्स असतील. नसला तर तुझ्यासाठी आणेलही तो एखादा.’’
‘‘नक्कीच आणेल. त्याची फिकीर नाही मला.’’
‘‘असं नुसतं म्हणतेस, पण दर खेपेला आमच्यापैकी एकाच्या घरून दुसऱ्याच्या घरी जाण्याची वेळ आली की शंभर फाटे फोडतेस.’’
‘‘असं करते का मी? सॉरी!’’
‘‘लगेच ‘सॉरी’ नकोय म्हणायला, पण तुला आम्ही इतकं जपतो, चांगल्यात चांगल्या वाहनानं प्रवास करवतो, जरा म्हणून गैरसोय होऊ देत नाही तरी तुझी नाराजी दिसते, याचं जरा वाईट वाटतं आम्हा तिघांना!’’
‘‘तुझ्या ताईला तर मी मागेच म्हटलंय, आता पुन्हा दुबईपर्यंत वरात नको काढूस माझी.’’
‘‘जेमतेम तीन-चार तासांचा प्रवास असेल तो.’’
‘‘कबूल आहे, पण बाकी सगळंच बदलतं. हवा-पाणी-अन्न- रोजच्या सवयी.. सगळंच. दादाकडे सगळं एअरफोर्सचं वळण आहे. तुझा संसार बराचसा बाळबोध. दुबईवाल्यांची तिसरीच तऱ्हा!’’
‘‘मजा आहे की मग तुझी. तोचतोचपणा नाही येणार. दर तीन-चार महिन्यांनी एकदम नवं वळण.’’
‘‘तेही माझ्यासारख्या जुन्या गात्रांनी स्वीकारायचं.’’
‘‘जरा डोळ्यांचा त्रास सोडला तर एरवी बरी असते की तुझी तब्येत!’’
‘‘असते, पण दर खेपेला रूळ बदलले की तिची गाडी जराशी खडखडते. जसजसं वय वाढतंय तसतसा बदलांचा असा सामना करणं कठीण वाटतं.’’
‘‘तू असं बोलत्येस जसा काही तुलाच तिथं जाऊन संसार मांडायचाय. तुला काय, कुठे तरी राहायचं आणि समोर येईल ते खायचं, प्यायचं.’’
‘‘जगायला तेवढं पुरतं? म्हणजे मनापासून जगायला हं! नुसता देह जगवायला तेवढं पुरतं यात शंका नाही.’’
‘‘बघ बाई, आम्हाला जमतं तेवढं करतोय आम्ही बाबा गेल्यापासून. गावी तुला एकटीला कसं ठेवायचं म्हणून फिरवतो आम्हा तिघांकडे आळीपाळीनं! गोल गोल राणीऽऽ’’
‘‘आणि नाकातोंडात बदलाचं पाणी!’’
‘‘बघ बाई, आपल्याकडे आजी राहायची एवढी र्वष.. बाबांची आई गं. तिची वेगळीच तक्रार असायची. नेहमी म्हणायची, या जन्मसावित्री भिंतींमध्ये आपण चिणल्या गेलोय असं वाटतं एकेकदा. जळ्ळं कुठे जाणं नाही आणि येणं नाही.. वैतागून म्हणायची!’’
‘‘म्हणायच्या ना! बाकी त्याचंच काय, आम्हाला तरी कुठे हिंडताफिरता आलं पन्नाशीपर्यंत? साधी अष्टविनायक यात्रा करायची म्हटली तरी दोन-दोन र्वष प्लॅनिंग करावं लागायचं. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भडिमार आणि हातात पैशाची चणचण. नेहमीचीच. तुम्हा तिघांची लग्नं वगैरे झाल्यावर मग हनिमूनच्या ठिकाणी जायचा विचार केला आम्ही.’’
‘‘बरं झालं मुलं घरात नाहीयेत आता. नाही तर त्यांना नक्की वाटलं असतं, आजीचं ‘हे’ फिरलंय म्हणून. काहीच्या काही बोलत्येय.’’
‘‘त्या शब्दाचं सोड गं. मजा केली जराशी. मुद्दा काय, की आताच्यासारखं स्थळदर्शन, पर्यटन, निसर्गप्रेम वगैरे काही आलं नाही आमच्या वाटय़ाला.’’
‘‘तेच आता येतंय ना? मग करा ना एन्जॉय.’’
‘‘कधी? दृष्टी अधू झाल्यावर? हिंडण्याफिरण्याची धमक सरल्यावर?’’
‘‘घ्या! म्हणजे तुम्ही दोन्हीकडून तक्रार करणार! तुमचं म्हणजे काही कळतच नाही.’’
‘‘एवढय़ात तुला कळणारही नाही म्हणा! आणि कळलं तरी बदलण्याची आपली कोणाचीच टाप नाही, पण म्हणून मनात येऊ नये असं थोडंच आहे? एकेकदा सासूबाईंचा हेवा वाटतो. त्या त्यांच्या ओळखीच्या, हक्काच्या परिघातच जगल्या आणि संपल्या. आमच्यासारखा दर तीन-चार महिन्यांनी नव्या व्यवस्थेशी जुळवून घ्यायचा खटाटोप तरी नाही करावा लागला त्यांना.’’
‘‘इतकं त्रासाचं असतं ते?’’
‘‘वय वाढतं तसा हा त्रास वाढतो. दर खेपेला नव्या परिघाची ओळख करून घ्यायची, त्यात स्वत:ची ओळख निर्माण करायची आणि उभयपक्षी थोडी जानपहचान होत्ये न होत्ये तोवर बोचकं उचलून नव्या ठिकाणी जायची वेळ यायची. गेली साताठ र्वष हेच तर चाललंय माझं. पुढे किती काळ चालणार कोण जाणे! गोष्टीतल्या त्या कोणा राजकन्येला सात गाद्यांच्या खालचा वाटाणा टोचायचा, तसं वाटतंय मला हे सगळं.’’
‘‘साधी गादी-उशी बदलली तरी पहिले दोन दिवस झोप येत नाही. असलं किचकट वय आमचं. शरीर जुळवून घेत नाही. मन कुठेच जडत नाही. साध्यासाध्या गोष्टी अंगवळणी पडत नाहीत, लक्षात राहात नाहीत, हरवल्यासारखं वाटतं.. एक का भानगड आहे?.. जेव्हा बदल हवासा वाटे तेव्हा पिंजऱ्यामध्ये डांबले गेलो.. आता स्थैर्य हवंय तर भटकंती नशिबी आली.. सगळी चुकामूकच झाली आमच्या पिढीची.’’ आई स्वत:शीच पुटपुटत राहिली.
‘‘हॅलोऽ कोण ताई ना? अगं, आईच्या समोरच आहे तिचा फोन, पण तिला ऐकू नसेल आला. आजकाल फार तंद्रीत असते ती.. हो. दुबईला ना?.. पाठवू की तुझ्या सोयीनं.. अरे वा! मोठा बंगला घेतला आहेस? नक्की.. नक्की आवडेल आईला तो बघायला..’’    
 mangalagodbole@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा