सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी आपापल्या परीने मेहनत करतच असतो. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. मी माझ्या मुलींना माझ्या बुद्धीप्रमाणे उत्तम माणूस बनवण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या दोघी ज्या प्रकारचं जीवन जगत आहेत ते बघून खूप समाधान वाटतं. पण मला हे कबूल करावं लागेल, की मी लाख प्रयत्न केले असते, पण मुलींनी माझ्या प्रयत्नांना साथ दिली नसती तर हे मुळीच शक्य झाले नसते.
मीआणि माझे यजमान, आम्ही दोन वर्षांपूर्वी युरोपला फिरायला गेलो होतो. आठ देश फिरलो. तिथला नीटनेटकेपणा, सगळीकडची स्वच्छता, सौंदर्यपूर्ण सगळ्या गोष्टी पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि आपल्याकडील सध्याची परिस्थिती पाहून खेद पण वाटला. त्यांची श्रीमंती जणू जीवनातल्या प्रत्येक अंगातून ओसंडत होती. आज आमच्याकडेही खूप पैसा आहे. परंतु नीटनेटकेपणाऐवजी अव्यवस्था, स्वच्छता आणि टापटीपेऐवजी अस्वच्छता आणि विस्कळीतपणा आणि सुंदरतेऐवजी बकालपणा व श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन पसरले आहे. आपल्याकडील अलीकडचा आरंभशूरपणा, कोणत्याही गोष्टीतील अव्यवस्थितपणा पाहून मनात विचार आला की आपल्याकडची सौंदर्य दृष्टी कुठे गेली? आपला देश स्वच्छ आणि सुंदर दिसावा याकरिता लागणारी तळमळ कुठे गेली? भारताच्या इतिहासात आपण पूर्वीच्या कलावंताबद्दल-कारागिरांबद्दल खूप वाचले आहे. पूर्वीच्या लेण्यांमधून, चित्रांमधून त्यांची कला पाहिली आहे. मग आता ते सगळं कुठे गेलं? आणि वाटलं की आपण युरोपिअन सांस्कृतिक इतिहास वाचावा का? म्हणजे कळेल की त्यांच्या आणि आपल्या मानसिकतेमध्ये एवढा फरक कसा आहे?
काही दिवसांपूर्वी माझी मोठी मुलगी-मधुर जी लंडनमध्ये राहते, ती आली होती. तिच्याशी मी या विषयावर चर्चा केली. तेव्हा तिने तिच्या लहानपणची गोष्ट सांगितली की, ‘आई हे सगळं खूपच साधे आहे. तुला आठवतं? तू आम्हाला लहानपणापासून रस्त्यावर कचरा टाकू नका असे सांगत आलीस. तसंच जर सगळ्या पालकांनी लक्ष दिलं आणि मुलांनी जर ऐकलं तर आपल्याकडेसुद्धा दृश्य वेगळं दिसू शकतं.’ हे ऐकून मला खूप समाधान वाटलं आणि मी खरंच त्यांच्या बालपणात गेले. त्या वेळी माझ्या मुलींना माझा खरंच जाच वाटला असेल.पण त्याची फळं चांगली मिळाली.
एकदा माझ्या दोन्ही मुली आपल्या मैत्रिणींबरोबर आईस्क्रीम खायला गेल्या होत्या. त्या जेव्हा घरी परत आल्या, तेव्हा याच माझ्या मुलीला रडू आवरत नव्हतं. सगळ्या मैत्रिणींनी आईस्क्रीम खाऊन काडी आणि आईस्क्रीमचा कागद तिथेच फेकून दिला होता. पण या दोघी जेव्हा काडी आणि कागद हातात धरून राहिल्या तेव्हा सगळ्यांनी त्यांना खूप चिडवलं होतं. ‘आता काडी आणि कागद पण खाणार का?’ मुलींना एकीकडे माझी शिकवण कचरा तिथेच टाकू देत नव्हती आणि मैत्रिणींचं चिडवणं पण आवडत नव्हतं. घरी आल्यावर जेव्हा मधुर रडत रडत मला हेच सांगत होती की तुझ्यामुळे मला आज मैत्रिणींनी असं चिडवलं होतं. मग मी तिला समजावलं की तू बाहेर जर आज काडी आणि कागद फेकून आली असतीस तर मला कळलं पण नसतं. पण ज्या अर्थी तसे न करता तू घरी घेऊन आलीस, त्या अर्थी मी सांगितलेलं तुला पूर्ण पटलेलं आहे. मग आपण दुसरा काय करतो त्याचा विचार का करायचा? पण त्या नंतर माझ्या मुली शाळेत येता-जाता बसची तिकिटेसुद्धा खिशात भरून आणत असत. कधीही त्यांनी रस्त्यावर टाकली नसणार याची मला खात्री आहे. याचा परिणाम असा झाला की, जी मित्रमंडळी प्रथम त्यांना यावरून चिडवत असत, ती पण हळूहळू बदलून स्वत: तर रस्त्यावर कचरा टाकीनाशी झालीच, पण दुसऱ्यांनाही सांगू लागली.
मुलींच्या शाळेत जेव्हा स्पर्धा घेतल्या जात तेव्हा मला असं वाटे की मुलींनी पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरावं, त्यासाठी लागणारी मेहनत पूर्णपणे करावी. मग यश नाही मिळालं तरी हरकत नाही. त्यावेळची एक आठवण. माझी धाकटी मुलगी रीमा. हिच्या शाळेत गाण्याची स्पर्धा असो किंवा वक्तृत्व स्पर्धा. मग मला दुसरं तिसरं काही सुचत नसे. मी सारखी तिच्या मागे लागून तिची तयारी करून घेत असे. त्या वेळेस एकदा मला ती म्हणाली होती की सगळ्या गोष्टी तू एवढय़ा सीरियसली का घेतेस? मला माहित आहे की त्यावेळी तिच्या वयाला माझं सारखं मागे लागणं तिला जाचक होत असेल. पण आज तिला त्याची एवढी सवय झाली आहे की कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊनच ती सगळ्याची तयारी करते आणि आज त्यामुळेच शिक्षण संपल्यावर पहिल्या पाचच वर्षांत ती तिच्या करियरमध्ये कुठल्या कुठे जाऊन पोचली आहे, आणि हे बघून खूप समाधान आहे.
काही काही गोष्टी करताना आपले शेजारीपाजारी आपल्याला निश्चितच हसत असतील. रीमा पाचवीत होती. मला वाटे की मुलांना (मुलींनाच नव्हे) कोणतेही काम करताना लाज वाटू नये. (म्हणूनच तर स्काऊट, गाईडची ‘खरी कमाई’ची कल्पना आहे.) म्हणून मी तिला एका दिवाळीला आकाशकंदील बनवून विकायची कल्पना मांडली. तिने पण ती उचलून धरली. दरवर्षी ती २०/२५ आकाशकंदील बनवत असे. तिच्यासाठी ते काम खूप कष्टाचे होते. म्हणून मला पण तिच्या मदतीला बसावं लागत असे. अनेक लोकांनी मला नावे ठेवली. १० रुपयांसाठी मुलीला कंदील कसली बनवायला लावते? हिला काय कमी आहे? प्रश्न कमीजास्त असण्याचा नाही. कुठल्याही प्रकारचे काम करताना लाज वाटू नये हेच मला शिकवायचे होते आणि यासाठी चारपाच दिवस चिकाटीने एका जागी बसण्याची सवय तिच्या मनात आणि शरीराला लागावी हीच इच्छा. नाही तरी हल्ली पालक, मुलं टीव्हीसमोरून उठत नाहीत ही तक्रार करत असतात. का नाही ते मुलांना नवीन नवीन उपक्रमांची ओळख करून देत? पहिल्या वर्षी आकाशकंदील करताना तिच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणाली, ‘आई, मला एक कळलं, माणूस कुठलं न कुठलं काम करून आपल्या पोटापुरता पैसा नक्कीच कमाऊ शकतो.’ पाचवीच्या मुलीला झालेला साक्षात्कार काय कमी आहे का? म्हणून आजही माझ्या मुली आपापल्या क्षेत्रात मोठय़ा हुद्यावर पोचल्या आहेत, तरीही मी शिवलेले कपडे ऑफिसात घालून जायला त्यांना लाज वाटत नाही. कारण त्यांना कष्टाची जाणीव आहे व त्याची कदर पण आहे.
प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी आपापल्या परीने मेहनत करतच असतो. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. मी माझ्या मुलींना माझ्या बुद्धीप्रमाणे उत्तम माणूस बनवण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या दोघी ज्या प्रकारचं जीवन जगत आहेत ते बघून खूप समाधान वाटतं. पण मला हे कबूल करावं लागेल, की मी लाख प्रयत्न केले असते, पण मुलींनी माझ्या प्रयत्नांना साथ दिली नसती तर हे मुळीच शक्य झाले नसते.
पेराल तरच उगवेल!
सु ' जा ' ण ' पा ' ल ' क ' त्वप्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी आपापल्या परीने मेहनत करतच असतो. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. मी माझ्या मुलींना माझ्या बुद्धीप्रमाणे उत्तम माणूस बनवण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या दोघी ज्या …
First published on: 29-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother taught good behaviour to her daughters