राजसी आईचं ते भूतकाळात रमलेलं मोहक रूप पाहून अगदी त्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखी खूष झाली. ‘मदर्स डे’ ला कुणी कुणी काही काही गिफ्ट देऊन आईच्या प्रेमाची आठवण ठेवत असतो. तिनं आईला गिफ्ट दिली माहेरपणाची. एक दिवस फक्त आईचा, आईला हवा तसा. राजसीला जाणवलं आई खूप खूष आहे..
सकाळी सकाळी लेकीचा अमेरिकेहून फोन आला, ‘‘हॅलो, आई, येत्या रविवारी  ‘मदर्स डे’ आहे ना? मी इथून मुंबईच्या ‘स्वीट लेडी’त तुझ्यासाठी एका पॅकेजची ऑर्डर दिली आहे?’’
‘‘पॅकेजची?’’ आईचा प्रश्न.
‘‘अगं ‘स्पा’मध्ये असतात त्या.. बॉडी, हेड मसाज, फेशिअल, मेनिक्युअर, पेडिक्युअर..’’
‘‘कळलं! मग?’’
‘‘मग काय? तू त्या दिवशी तिथे जायचं आणि सगळं सगळं एन्जॉय करायचं!’’  शीतलनं आईला ‘मदर्स डे’साठी घसघशीत गिफ्ट दिलं तेही थेट अमेरिकेतून. ‘नेट’वरून. ऑनलाइन गिफ्ट. आपल्या पासष्ट वर्षांच्या आईच्या आयुष्यात एक वेगळाच अनुभव देणारं गिफ्ट.
‘‘अगं, काय एन्जॉय करू? आत्ता या वयात हे काय करायचं?..’’ आईला पुढे बोलू न देता शीतल ठाम स्वरात म्हणाली, ‘‘बास हं आई! जरा वेगळा अनुभवही घे की. आयुष्यात सगळं स्वत:चं स्वत:ने करत राहिलीस. एक दिवस छान दुसऱ्यांकडून स्वत:चे लाड करून घे की. आणि मसाजने खूप फ्रेशही वाटेल तुला. मस्त स्वत:ला हलकं करणारा अनुभव असतो अगं स्पाचा. आणि बरं का आई, आता तुला पार्लरमध्ये गेलंच पाहिजे, मी ऑलरेडी भरलेले पैसे, वसूल करायला, काय?’’
असला अनुभव कधीही न घेतलेल्या संजीवनी काकूंना गंमत वाटत राहिली. काय करावं? लेकीच्या आनंदासाठी, तिनं आठवण ठेवून ही ‘मदर्स डे’ची दिलेली गिफ्ट अनुभवावी का? त्या संभ्रमात पडल्या. बघू तर जाऊन म्हणत, सोबतीला लेकीच्या प्रेमाची ऊब घेऊन त्या एका वेगळ्या अनुभवासाठी सज्ज झाल्या!

वैदेहीने तर तिच्या आईला एकदम धम्माल गिफ्ट दिली. एका छानशा मॉलमधल्या महागडय़ा रेस्तराँमध्ये सकाळच्या पहिल्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, कॉफीपर्यंतच्या कोर्सचे दहा हजार रुपये तिने भरले आणि ती आईला म्हणाली, ‘‘आज तुला आराम! मेरु कॅब बुक केलीय, पूर्ण दिवस तुम्ही दोघं मस्तपैकी खा, प्या आणि रिलॅक्स व्हा. ‘अलिशान’मध्ये!’’
‘‘अगं पण वैदी, मला आता या वयात इतकं खायला नाही होत गं! कशाला इतकं?’’ आईनं आपला मध्यमवर्गीय पावित्रा घेतला. ‘‘अगं, मग जेवढं खायचं तेवढं खा गं बाई! निदान खाण्यातल्या, सजावटीतल्या व्हरायटीज तरी कळतील. आणि सारखं काय गं वय वय करतेस? आताच सत्तरी तर झाली तुझी! म्हातारपण म्हणजे सर्वसंग परित्याग नसतो. वय झालंय म्हणजे सगळं संपलं असं थोडंच आहे. मनाने ठरवलं तर शंभरीपण हट्टीकट्टी असू शकते. तेव्हा आई फार विचार करू नकोस. मला वाटतं गं, तुझ्यासाठी खूप काही करावं, स्वत: तुला छान छान करून घालावं. ते मी करतेच, पण हा जरा वेगळा चेंज तुम्हा दोघांसाठी. अगं, एखादा दिवस कर चंगळ!’’ मुलीच्या आग्रहापायी हा एक दिवस वेगळा काढायचा असं ठरवलंच मीराताईंनी.

परदेशात असल्याने म्हणा किंवा कामाच्या अतिप्रेशरखाली वेळ काढू न शकल्याने म्हणा. शीतल, वैदेही सारख्यांनी आपापल्या ‘मदर्स’ना निरनिराळ्या ठिकाणी पैसे भरून ‘एन्जॉय’ करायला लावलं पण राजसीने मात्र नवी पद्धत शोधली. तिची आई घरी एकटीच असे. तिने आदल्या दिवशी फोन केला की मी उद्या येतेय. उद्याचा पूर्ण दिवस तू माझ्याबरोबर असणार आहेस. ठरल्याप्रमाणे राजसी पोहोचली. आईला फोन केला. म्हणाली, ‘‘आई, मी आलेय ग खाली टॅक्सी घेऊन, ये!’’ तिची आई खाली आली आणि त्या थेट राजसीच्या घरी आल्या.
 ‘‘हे काय? जावई कुठे माझा! आणि माझी नात?’’ आईने विचारलं.
‘‘ते बाहेर गेलेत, आज तू नि मी फक्त! आई, चल गप्पा मारू, नाश्ता घेऊ, आणि हो, आज नो टी.व्ही., नो मोबाइल!’’ बोलता बोलता राजसीने आईला वांगी-पोहे दिले. ‘‘बघ, कसे झाले ते! तुझी चव नाही येणार याला, पण..’’ राजसी म्हणाली. आपल्याला वांगी-पोहे आवडतात हे विसरूनच गेल्यासारखं झालं होतं त्यांना.  हातात वांगी-पोह्य़ाची प्लेट पाहून मोहिनीताईंना एकदम भरून आलं. ‘‘राजसी अगं, तू वांगी-पोहे केलेस आठवणीने?’’ त्यांनी भराभरा खायला सुरुवात केली. सुरुवातच इतकी छान झाल्यानं मस्त गप्पांना सुरुवात झाली. ‘‘अगं राज, तुला सांगते, मी पाचवीत होते, तेव्हा आमच्या घराच्या मागच्या अंगणात गुरखा राहायचा बरं का! त्याच्याकडे दुधीभोपळय़ाची भाजी बनायची, मस्त जिरं बिरं घालून! तर मला आणि तुझ्या निमामावशीला त्या भाजीचा वास इतका आवडायचा ना की, आम्ही म्हणायचो, ‘हमकू भाजी दो ना दुधी भोपळेकी’ त्याची बायको हसत सुटायची आमची भाषा ऐकून. एका ताटलीत भाजी देऊन म्हणायची, ‘खाओ, जी भरके खाओ!’ किती मज्जा असायची गं तेव्हा!’’
राजसी आईचं ते भूतकाळात रमलेलं मोहक रूप पाहून अगदी त्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखी खूष झाली. ‘मदर्स डे’ ला कुणी कुणी काही काही गिफ्ट देऊन आईच्या प्रेमाची आठवण ठेवत असतो. पण राजसीने विचार केला, आपण जमेल तसं आईला नेहमीच भेटतो, पण आज फक्त तिच्यासाठीच हा दिवस ठेवू या. त्यामुळे तिने नवरा आणि लेकीलाही बाहेर पाठवून दिलं होतं. आता त्या फक्त दोघीच होत्या एकमेकींना.
‘‘अगं राज, तुला ती आपली सुभद्रा भाजीवाली आठवते का गं? ती बघ आपल्याला नेहमीच कोथिंबीर थोडी जास्तच द्यायची.. आलंही टाकायची बरं! अगं तिच्या मुलीचं म्हणजे मोनालीचं लग्न आहे, मला बोलावलंय्! तुमच्या आजच्या मॉलच्या जमान्यात अशी भाजीवाली, वाणी यांच्याशी नाती कुठली जुळायला?’’ आईचं आता खाऊन झालं होतं. मग चहा झाला, जुन्या नातेवाईकांबद्दल आई भरभरून बोलत होती, खूप रिलॅक्स वाटत होती. अगदी माहेरपणाला आल्यासारखी. शिवाय राजसीही अगदी कान देऊन मन लावून तिच्या त्या नात्यागोत्याच्या माणसांचे किस्से ऐकत होती. खरं तर यातले किती तरी नातेवाईक तिने पाहिलेही नव्हते, पण आज राजसीला जाणवलं की, आपण नुसतं ऐकलं त्यांच्याबद्दल तरीही आई केवढी खूष होते. दुपारचं जेवण झालं, दोघीही हात वाळेपर्यंत गप्पा करत होत्या. राजसीच्या बालपणीच्या, तिच्या बाबांबद्दल आणि मुख्यत्वे करून आईच्या शाळा-कॉलेजबद्दल तिच्या प्रोफेसरांबद्दल, मित्र-मैत्रिणींबद्दल आई इतकी मोकळेपणी आणि बिनधास्तपणे बोलत होती की, राजसीला आईचं एक वेगळंच, पण लोभसवाणं रूप दिसायला लागलं. किती मज्जा येतेय् आज आईबरोबर, तिला वाटलं.
रात्रीचं जेवण झाल्यावर राजसी आईला म्हणाली, ‘‘आई, थांबतेस इथेच?’’
‘‘नको अगं! मला तू आज इतकं दिलंयस ना बाळा की, उरलेलं आयुष्यभर पुरेल मला ती शिदोरी प्रेमाची! चल, सोड मला घरी!’’ टॅक्सीत बसल्यावर दोघीही गुमसुमच होत्या. घर जवळ येताच तिचा हात हातात घेऊन आई म्हणाली, ‘‘वेडे, तू तर नेहमीच मला असं प्रेम देतेस! जमेल तसं भेटतेस! मदर्स डे तर रोजच साजरा करतेस, मग आज हे काय फॅड?’’
‘‘फॅड नाही! आज मी फक्त तुझ्यासाठीच होते. आई, खरं तर तू जो खजिना दिलास ना आनंदाचा आयुष्यभरासाठी, त्यासाठी तुला ही भेट!’’ म्हणत राजसीने आईला कडकडून मिठी मारली त्यावरची ‘चेरी’ होती आईची गोड पापी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा