उद्या मातृदिन अर्थात मदर्स डे. प्रत्येकाने आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. तिच्या प्रेमाला, तिच्या त्यागाला, धावपळीला, कष्टाला स्मरावं म्हणून ‘भेट आईची’, ‘आई होण्यापूर्वी’ आणि ‘माझी आई !?’ या काही छोटय़ा छोटय़ा गोष्टी इंटरनेटवरून मिळवलेल्या.
क्षितिज गेले काही दिवस प्रचंड धावपळीत होता. नुकतंच त्याला प्रमोशनही मिळालं होतं. आईला प्रत्यक्ष भेटून सांगू म्हणत होता, पण तेही जमत नव्हतं. इतकंच कशाला आईचा वाढदिवसही तो विसरला. आईनेच फोन केला त्या दिवशी त्याला, इतकंच म्हणाली, ‘सहज फोन केला रे, तुझी आठवण आली.’ रात्री बायकोशी बोलताना त्याला आठवलं, ‘अरे, आज तर आईचा वाढदिवस.’ मग दुसऱ्या दिवशी त्याने अपराधी मनाने फोन केला. आई म्हणाली, ‘खूप दिवस झाले रे तुला बघून. जरा भेटून जा.’ आईचा कंठ दाटल्यासारखा वाटला त्याला, पण पुढच्या नॉन स्टॉप ऑफिसच्या कॉल्समध्ये तो विसरूनही गेला हे.
मग बायकोनेच त्याला आठवण केली वाढदिवस विसरलास निदान उद्याचा ‘मदर्स डे’ तरी विसरू नकोस, जाणं शक्य नसेल तर निदान फुलांचा गुच्छ किंवा गिफ्ट तरी पाठव.’ तो तडक फ्लोरिस्टकडे गेला. खूप छान, छान फुलांचा गुच्छ निवडला, आईच्या घरचा पत्ता त्याच्याकडे देऊन, ‘उद्या अगदी सकाळी मिळेल असं पाहा’, असं पुन्हा पुन्हा बजावून निघाला. पाठी वळून पाहिलं तर एक अगदी पोरगेलासा तरुण सचिंत चेहऱ्याने तिथे घुटमळताना दिसला. कुठल्याही क्षणी तो रडेल असं वाटत होतं. क्षितिजला राहावलं नाही, त्यानं त्याला विचारलं, काही हवंय का?
त्या मुलाने काही क्षण क्षितिजकडे टक लावून पाहिलं आणि त्याची नजर आपल्या मुठीकडे वळली. बराच वेळ तो तसाच आपल्या मुठीकडे बघत राहिला. शेवटी क्षितिजच म्हणाला, ‘काय रे काय झालं़’
‘मला फुलं घ्यायची आहेत, पण पैसे कमी पडताहेत,’ तो इंग्रजीतून बोलत होता. ‘फुलं महाग आहेत. आणि मला तीच घ्यायचीत, कारण तीच आईच्या पसंतीची आहेत.’
‘आईसाठीच हवीत ना फुलं, थांब घेऊ या,’ असं म्हणत क्षितिजने त्याचे पैसे दिले तसं तो मुलगा, नील, प्रसन्नपणे हसला. म्हणाला, ‘खूप खूप थॅक्स आता मला आईबरोबर राहता येईल.’
क्षितिज म्हणाला, ‘ठीक आहे, चल मी सोडतो तुला.’ नीलने त्याला गाडी एका चर्चजवळील स्मशानभूमीकडे न्यायला लावली. म्हणाला, ‘गेल्या वर्षी आई गेली. तिचा वाढदिवस आणि मदर्स डे यंदा एकाच दिवशी आलाय. मला तो तिच्याबरोबर घालवायचाय.’
नील उतरला आणि काहीही न बोलता स्मशानभूमीकडे चालत गेला. एका चौथऱ्याजवळ त्याने ती फुलं ठेवली आणि आईला प्रेमाने जवळ घ्यावं तसं हात फैलावून बसला. क्षितिज किती तरी वेळ ते दृश्य पाहत बसला. मन गलबललं. त्याने ताबडतोब गाडी त्या फ्लोरिस्टकडे नेली आणि त्याला आधी दिलेली गुच्छाची ऑर्डर रद्द करायला सांगितली. आता त्याने आईच्या आवडीची, रंगाची फुलं निवडली, डेफोडिल्स, कार्नेशन, डेलियाच्या रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ घेऊन तो निघाला. आईला फोन केला. म्हणाला, ‘तयार हो. मी अध्र्या तासात पोहोचतोय. आपण बाहेर जाणार आहोत.’
आईने अधीरतेनं विचारलं, ‘ कुठे रे?’
तो म्हणाला, ‘तू तयार तर हो. मी येतोच.’
अध्र्या तासात क्षितिज तिच्या घरी पोहोचला. आईने मस्त टिकल्यांची काळीशार क्षितिजला आवडणारी साडी नेसली होती, छान हेअर स्टाईलही केली होती. क्षितिज आईकडे पाहतच राहिला. आई या वयातही किती छान दिसतेय, फक्त आता वयामुळे सुरकुतलाय चेहरा! तिच्याकडे बघताना त्याला भरूनच यायला लागलं. तसा त्याने तो गुच्छ आईकडे दिला आणि म्हणाला, ‘बीलेटेड हॅपी बर्थ डे आणि उद्याच्या मदर्स डेसाठी.’
‘पण आपण आता कुठे जातोय?’ तिने पुन्हा अधीरतेने विचारलं.
‘आज तू माझी डेट आहेस, आपण डेटिंगवर जात आहोत,’ क्षितिजने मिश्कीलपणे म्हटलं आणि आईने एक ‘धम्मक लाडू’ दिला. दोघंही एका शानदार हॉटेलमध्ये आले. छानशी जागा पकडून दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. इतक्यात मेनूकार्ड आलं. क्षितिज मेनूकार्डवर नजर फिरवत असतानाच त्याची नजर आईकडे गेली. आई भूतकाळात हरवलेल्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होती. म्हणाली, ‘तू लहान असताना मेनूकार्ड माझ्याकडे असायचं आणि काय ऑर्डर करायचं हे मी ठरवायची. आज तू ठरवतो आहेस, गंमत वाटली.’
‘म्हणूनच आज छान एन्जॉय कर. रिलॅक्स हो आणि मला ठरवू देत सारं,’ तो म्हणाला.
दोघांनी मग लहानपणीच्या आठवणी काढत मस्त जेवण घेतलं. मग खास आईसक्रीम पार्लरमध्ये जाऊन दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे स्कूप्स आणि मग संध्याकळी आईचं बरेच दिवसापासून पहायचं राहिलेलं नाटक.. संध्याकाळी तिला तिच्या घरी सोडून क्षितिज घरी आला. आज त्याला खूप खूप समाधान वाटत होतं..
दुसऱ्या दिवशी आईचा फोन आला, दिलखुलास हसत म्हणाली, ‘आज मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आपल्या डेटची कहाणी सांगून जळवलं.’ मग किंचित थांबत म्हणाली, ‘क्षितिज तुला कल्पना नाही तू मला काय दिलंस ते. या क्षणांची, तुझ्या असण्याची मी किती वाट पाहत होते. तू लहानाचा मोठा होईपर्यंत तुझी सततची किलबिल, तुझं माझ्यावर अवलंबून असणं आणि मुख्य म्हणजे तुझं सतत माझ्याबरोबर असणं याचीच सवय झाली होती रे, आता खूप एकटं वाटायला लागलं होतं. मग अशा दिवसाची कल्पना करत दिवास्वप्नात रमायची. आज तू माझं स्वप्न पूर्ण केलंस. आईला शांत केलंस. असाच आनंदी राहा.’
आईने फोन ठेवला आणि क्षितिजच्या लक्षात आलं आपण काय नेमकं हरवलं आहे ते. यापुढे आठवडय़ातून निदान एकदा तरी आईला भेटायचंच, त्याने ठरवलं आणि आपल्या मोबाइलवर रिमाइंडरच लावून टाकला..
भेट आईची
उद्या मातृदिन अर्थात मदर्स डे. प्रत्येकाने आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. तिच्या प्रेमाला, तिच्या त्यागाला, धावपळीला, कष्टाला स्मरावं म्हणून ‘भेट आईची’, ‘आई होण्यापूर्वी’ आणि ‘माझी आई !?’
आणखी वाचा
First published on: 10-05-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mothers day special