रझिया पटेल

स्त्री चळवळ ही शोषणमुक्तीचा समग्र वैचारिक पाया असणारी चळवळ आहे. कोणतेही शोषण, त्यातले प्रश्न एकमेकांशी जोडलेले असतात. स्त्री चळवळ, ही अन्य शोषितांचाही आवाज बनू शकते. इतका आवाका तिच्यात आहे.

स्त्रीचळवळीशी जोडले जाण्याआधी मी स्वत:च्या सभोवतालच्या परिस्थितीबाबत अस्वस्थ होत होते. एक आंदोलन मनात सुरू झालेलं होतं. एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून किती तटबंद्या, किती अवहेलना, किती दुय्यमत्व सहन करावं? हे असं का आहे समाजात? असे अनेक प्रश्न मनात उभे राहात होते. या सर्व परिस्थितीत शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तकातील पाठांतून माझ्यापर्यंत पोहोचलेल्या दोन स्त्रियांनी माझ्या मनावर प्रभाव टाकला. त्यातील एक म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी. त्यांनी स्त्रीचं केवळ दु:ख मांडलं नव्हतं, तर स्त्रीच्या मनगटातही ताकद असते आणि ती पूर्ण ताकदीने उभी राहू शकते याची जाणीव करून दिली. समाजातल्या उतरंडीची जाणीव ‘देखा महारवाड्यात कशी मानसाची दैना, पोटामधी पडे आग, चुल्हा पेटता पेटेना’ त्यांच्या या कवितेतून झाली, आणि ‘सोन्यारुप्याने मढला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा पानाफुलामधी राजी, अरे बालाजी इठोबा दोन्ही एकज रे देव, शिरीमंती गरिबीनं केला दुजाभाव’ यातून वर्गजाणीव झाली. ‘बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या.’ या त्यांच्या कवितेने मला अंधश्रद्धेतून कायमचं मुक्त केलं. असाच प्रभाव शालेय पाठ्यपुस्तकातील राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ याचा. या नाटकातील सिंधुपेक्षा त्यातील गीता या व्यक्तिरेखेचा माझ्या मनावर प्रभाव पडला. गीता कष्टकरी वर्गातील आहे. नाटकात सिंधुवरील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात ती तिला आधार देताना म्हणते,‘‘तो देव कुठं दडी मारून बसला आहे कुणास ठाऊक? त्याला हा अन्याय दिसत नाही.’ तेव्हा शालेय वयात या दोन विचारांनी मनावर प्रभाव टाकला. पुढे मी ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ या समग्र सामाजिक परिवर्तनाची भूमिका असलेल्या युवक संघटनेत सहभागी झाले. संघटनेत स्त्री-पुरुष समतेच्या तत्त्वाला मान्यता होतीच.

मी सर्वप्रथम स्त्री चळवळीशी जोडली गेले ती ‘समान नागरी कायदा हवा की जेंडर जस्टीस लॉ’ या मुद्द्यावर. हा मुद्दा जरी अजून फार पुढे सरकलेला नसला तरी त्या वेळी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर आक्रमक आणि मुस्लीमविरोधी भूमिका घेणाऱ्या हिंदुत्ववादापुढे आणि मुस्लीम व्यक्तिगत कायद्याचे राजकारण करणाऱ्या मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांपुढे आव्हान उभं करणं या दृष्टीने आणि सर्वच भारतीय स्त्रियांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने स्त्री चळवळ महत्त्वाची होती. साहजिकच त्यानंतरही स्त्री चळवळीसोबत माझा निरंतर सहभाग सुरू राहिला. माझ्या दृष्टीने स्त्री चळवळ ही स्त्री प्रश्न केंद्रस्थानी असलेली एक शोषणमुक्तीचा समग्र वैचारिक पाया असणारी चळवळ आहे. कोणतेही शोषण, त्यातले प्रश्न एकमेकांशी जोडलेले असतात, शोषण-अन्यायाची मोठी व्यवस्थाच असते. स्त्री चळवळ, ही अन्य शोषितांचाही आवाज बनू शकते. इतका आवाका तिच्यात आहे. व्यापकता आणि सर्वसामावेशकतेतून ही चळवळ पुढे जाऊ शकते. जागतिक स्तरावर १९७५ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून घोषित झाले त्यानंतर ‘स्वायत्त स्त्री संघटना’ आणि विविध स्त्री चळवळी मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाल्या. त्या आधी राजकीय पक्षांशी संलग्न आणि इतर सामाजिक स्त्री संस्था काम करतच होत्या, परंतु १९७५ मध्ये स्वायत्त स्त्री चळवळी संपूर्ण देशात कार्यरत झाल्या. त्यातून स्त्री प्रश्नविषयक जागृती आणि चैतन्य निर्माण झालं. स्त्रीच्या दुय्यमत्वाचा वेध घेणं, प्रश्न विचारणं यातून वातावरण ढवळून निघालं होतं. स्त्री चळवळीने स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवर ठिकठिकाणी आंदोलनं उभी केली. यातून समाजात चर्चा सुरू झाली आणि प्रश्नही उपस्थित व्हायला लागले, हिंदी भाषिक राज्यात तर ‘औरते ये सब करेगी तो रोटी कौन बनाएगा?’ असा प्रश्नही काही पुरुषांनी उपस्थित केला. पण ही काही स्त्री विरुद्ध पुरुष अशी लढाई नाही, ती समता आणि न्यायाची लढाई आहे. समाज त्यातून ढवळून निघाला, स्त्रीवादी चळवळीने समाजाला एका पुढच्या टप्प्यावर नेलं, हे मान्यच करायला हवं.

सध्याच्या काळात स्त्री चळवळीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. केवळ स्त्री-पुरुष समतेचेच नाही, तर सर्वांना समानतेचे, न्यायाचे आणि धर्मनिरपेक्षतेचे वचन देणाऱ्या संविधानाच्या मूल्यावर घाला येतोय. धर्माचे राजकारण करणाऱ्या, लोकशाहीविरोधी शक्ती प्रबळ होत आहेत. राज्यसत्तेचे नियंत्रणही वाढत चालले आहे. एकूण आजच्या काळात स्त्री चळवळीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा आव्हानांच्या काळातही स्त्री चळवळ विखुरली असली तरी तग धरून उभी आहे, हे महत्त्वाचे आहे.

स्त्रीवादी चळवळीचे सामाजिक योगदान म्हणजे मथुरा बलात्कार प्रकरणाविरोधात दिलेला प्रखर लढा. हुंडाबळीच्या,कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात दिलेले लढे. त्यातून स्त्रियांच्या हिताचे, त्यांना न्याय देणारे कायदे राज्यसत्तेला करावे लागले. ‘बलात्कारविरोधी कायदा’,‘हुंडाबंदी सुधारणा कायदा’,‘गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा’, ‘कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा’ असे अनेक कायदे करण्यात आले. स्त्रियांमध्ये आत्मभान आले. स्त्री चळवळीने स्त्रीमुक्तीचा भारतीय वारसा नेमका काय आहे त्याचाही धांडोळा घ्यायला सुरुवात केली. अगदी बौद्धकालीन थेरीगाथां- पासून ते स्त्री संत आणि लोकसाहित्यापर्यंत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्त्री-पुरुष समता आणि स्वातंत्र्य या विषयीचा विचार समजून घेऊन पुढे आणायचा प्रयत्न केला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य चळवळीच्या प्रवासात स्त्रियांनी दिलेल्या योगदानाबाबत मांडणी सुरू झाली. सोबतच स्त्रीप्रश्नांभोवती स्त्री चळवळीने जनआंदोलने उभी केली. यातून सर्वसामान्य स्त्री या चळवळीशी जोडली गेली.

मी जेव्हा चळवळीत आले तेव्हा पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करताना ‘संघर्ष वाहिनी’च्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरात मला सामावून घेण्यात त्या घरातील स्त्रियांचा मोठा वाटा होता. चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा आधार या स्त्रियांनी दिला. स्त्री चळवळ म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नांची चळवळ, इतका सरधोपट अर्थ या चळवळीचा न राहता समाजातील जातीय विषमता, धर्मनिहाय प्रश्न यांच्यावरही मंथन सुरू झाले. त्यातून दलित ‘विमेन स्पीक डिफरंटली’ हा टप्पा आला. स्त्री चळवळीला आणखी जास्त सर्वसमावेशक आणि विषमतेबद्दल जास्त चिकित्सक व्हावे लागेल याचा तो धडा होता. मुस्लीम, ख्रिाश्चन आणि इतर धर्मीय स्त्रियांवरही या चळवळींचा प्रभाव पडला. फ्लेविया अॅग्नेस यांचा कौटुंबिक हिंसेविरोधातील लढा यातूनच आला किंवा १९८२मध्ये ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’मधून आम्ही मुस्लीम स्त्रियांवरील सिनेमा बंदीचा यशस्वीपणे दिलेला लढा ही त्याची काही उदाहरणे आहेत. परंतु अलीकडच्या काळात या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुस्लीम स्त्रियांनी उभे केलेले आणि देशभर पसरलेले शाहीनबाग आंदोलन. मुस्लीम स्त्रीसमोर केवळ तलाक, बहुपत्नीत्व हेच प्रश्न आहेत, या धारणेच्या पलीकडे जाऊन ती समाजाचंच नेतृत्व करू शकते याचे ते एक मोठे उदाहरण आहे. भारताचे संविधान मुस्लीम स्त्रीच्या लढ्याचा आधार आहे आणि त्या आधारे ती हा लढा व्यापक करू शकते हेही त्यातून दिसले.

भारतातच नव्हे तर जगभरातील स्त्री चळवळींचे अनेकविध टप्पे पुढील स्त्री चळवळीला दिशादर्शक आहेत, परंतु आज जगभरातच उजव्या शक्ती वाढताना दिसत आहेत. धर्मांचा राजकारणासाठी, विशेषत: सत्ता मिळवण्यासाठी केला जाणारा वापर, बाजारवाद, उपभोगवाद, युद्धे यांचे थैमान सुरू आहे. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ याचा उन्मत्तपणे उद्घोष केला जातो आहे. ज्यांना व्यवस्थेने कमकुवत केले आहे त्यांना चिरडून टाकण्याचं राजकारण सुरू आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. एकीकडे विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञानाचा बोलबाला होतो आहे, पण शोषण ‘हायटेक’ होते आहे. आम्ही मुस्लीम स्त्रियांबरोबर काम करताना तलाकच्या प्रश्नाबाबत आधी तोंडी, नंतर पोस्ट कार्ड, मग तार, पुढे फोन आता मोबाइल अशा चढत्या क्रमाने तलाक देण्याची काही प्रकरणेही दिसली. गर्भचिकित्सेचे तंत्रज्ञान गर्भलिंग निदानापर्यंत पोचून गर्भातच मुलीची हत्या व्हायला लागली. बाजार व्यवस्थेने निर्माण केलेला उपभोगवादही स्त्रीचा बळी घेतो आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तीव्र झाला आहे. हे एकीकडे तर दुसरीकडे आक्रमकपणे धर्माच्या, जातीच्या नावाने स्त्रियांचे ध्रुवीकरण करून त्यांना प्रतिगामित्वाचे वाहक बनवले जात आहे. तेव्हा आजच्या काळात आव्हाने अधिक गंभीर आहेत.

अशा परिस्थितीत शिथिल झाल्यासारखी वाटणारी स्त्री चळवळ अंतर्गत चिकित्सा, वैचारिक पाया आणि सर्वसामावेशकतेच्या आधारे आजच्या आव्हानांशी लढू शकते. अमेरिकेत अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर त्यांच्या एकूण हडेलहप्पी धोरणाच्या विरोधात आवाज उठवणारी एक स्त्री आहे हा योगायोग नाही. ‘वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रल’च्या लेडी बिशप मरिआन एडगर यांनी हे धाडस दाखवले. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते स्त्रीवादी चळवळीने उपस्थित केले आहेत. आजच्या काळात हे महत्त्वाचे आहे.

raziap@gmail.com

Story img Loader