मृदुला भाटकर – jmridula@gmail.com

लग्नाच्या वेळी रमेशकडे सोळा रुपये बँक बॅलन्स होता. घराचा पत्ता नव्हता,  पण मनात ढीगभर प्रेम आणि जिगर होती. त्यामुळेच आमचा चाळीस वर्षांचा संसार ‘सोळा आणे’ झाला. दुसऱ्यावर अन्याय झाला तर त्याविरुद्ध भांडणारी असल्याचा साक्षात्कार मला शाळेत असतानाच झाल्यामुळे कायदा कळण्यासाठी  एलएल.बी.ला प्रवेश घेतला. शाळेत, महाविद्यालयातल्या शिक्षकांनी कविता, कादंबरी आणि राजकीय वाचनाची गोडी लावली.  घरातले आणि शिक्षकांचे संस्कार या पायावर मी पुढे ठाम उभी राहू शकले. महात्मा गांधी ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि  मार्क्‍स ते टॉल्स्टॉय असा वाचनाचा प्रवास केलेला.. पण तरी कम्युनिस्ट असणं जास्त रुचायचं. तेव्हा सुशिक्षित समाजानं राजकारणापासून  फारकत घेता कामा नये, तर त्यात उतरणं ही समाजाची मूलभूत गरज आहे हाच विचार होता..  माजी न्यायाधीश मृदुला भाटकर सांगताहेत, आपला विशी ते तिशीतला प्रवास..

१९७७ ते १९८७ ही माझ्या आयुष्यातील वीस ते तीस वर्षे! त्या काळात माझ्या आजीचा (विमलाबाई बेहेरे) माझ्यावर  खूप प्रभाव होता. मुंगीसारखं काम असायचं तिचं- विणकाम, भरतकामाबरोबर खूप वाचन करायची ती. त्यामुळे राजकीय, सामाजिक विचारांची पक्की बैठक होती तिची.  नागपूरमध्ये असताना, साधारण पस्तिशी-चाळिशीची होती तेव्हा ती, सकाळी १० वाजता चार मुलांची  जेवणं आटोपून खादीची नऊवारी साडी, अंबाडय़ावर बकुळीचा गजरा आणि डोळ्यांवर गॉगल लावून सायकलवरून फंडासाठी पैसे गोळा करण्यासाठी फिरत असे. तिला तिच्या माहेरचा, दाजीसाहेब म्हणजे दत्तो अप्पाजी तुळजापूरकर यांचा रास्त अभिमान होता. घर सांभाळणं, मुलांना मोठं करणं हे स्त्रीचं काम असून तिने तिच्या शिक्षणाचा, वेळेचा उपयोग समाजासाठी करायला हवा, यावर ती ठाम होती. तिच्यामुळेच माझ्या हातात कॉलेजमध्ये असतानाच भगवद्गीता आली. ‘सांख्ययोग’, ‘कर्मयोग’ मी तेव्हापासून वाचू लागले.

कट्टर पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा मला माहेर व आजोळ बेहेरे, तुळजापूरकर व तर्खडकर या घरांमुळे मिळाला, तो पुढे लग्नानंतर भाटकरांमुळे जपता आला. घरी जात, धर्म इत्यादी चौकटी नव्हत्या. घरात मुंज, श्राद्ध, सत्यनारायण आदी विधीही कधी झाले नाहीत. त्यामुळे अनेक प्रथांना, रूढींना तपासून पाहण्याची सवय लागली. शिवाय मनाचा कणखरपणा हीसुद्धा या सर्वाची देणगी.  विशीत असताना वयाने मोठा असलेला एक मित्र मला मिळाला – बापू! चित्रकार गोपाळराव देऊस्कर! जुईलीचे पती. विजयाबाई मेहतांच्या नाटय़ शिबिराला असताना जुईली देऊस्कर भेटली आणि आम्ही मैत्रिणी झालो. त्या वेळेस नेमकं मी ‘सॉमरसेट मॉम’चं ‘मून अँड दि सिक्स पेन्स’ वाचत होते. मनस्वी चित्रकाराची एक वेगळीच दुनिया माझ्यापुढे उघडत होती. मला बापू कळायला त्या पुस्तकाची किंवा ते पुस्तक समजायला बापूंची मदत झाली. बापू मला ‘झपाटा’ म्हणत. एखाद्या संध्याकाळी सोनेरी रंगाचा चष्मा आणि रंगीत अर्धी पॅन्ट घालून वाइन घेता घेता भेदक डोळ्यांनी बापू त्यांच्या आयुष्याबद्दल मला सांगत. ते म्हणायचे, ‘‘मृदुला, जगात दोन शब्दांना पर्याय नाही — ‘हार्ड वर्क’!’’

लहानपणापासून वयाच्या १६—१७ वर्षांपर्यंत मी खूप मैदानी खेळ खेळत असे. लगोरी, ठिक्कर बिल्ला, खोखो, लंगडी, सोनसाखळी, विटीदांडू, डब्बा ऐसपैस अनेक. ठाणे जिल्ह्य़ातर्फे बंगळूरुला जाऊन मी कबड्डी खेळले. पुढे माझी मुंबई विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाली; पण नेमका विशीच्या उंबरठय़ावरच मला ब्रॉन्कायटिस होऊन दम्याचा त्रास सुरू झाला. माझ्या दवाखान्याच्या वाऱ्या सुरू झाल्या. प्रत्येक श्वासाची किंमत समजली. दम्याशी खूप झगडावं लागलं;  पण हळूहळू मी सकाळी उठून चालणं, पळणं, नेचरोपथीने दम्यावर मात केली. महात्मा गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ वाचताना मी १९ व्या वर्षी दूध, चहातली साखर बंद केली, ती आजतागायत! हा आजाराविरुद्धचा झगडा मला पुढे न्यायालयीन कामकाज करताना उपयोगी पडला. पुढच्या काळात आजारपणाची रजा क्वचितच घेतली, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ कामाला देता आला आणि रक्तदाब, मधुमेह, संधिवात आदी आजारांना आत्तापर्यंत दूर ठेवू शकले. खिलाडूवृत्ती आपोआप स्वभावाचा भाग झाली, त्यामुळे यशापयश हे खऱ्या अर्थाने

‘पार्ट ऑफ द गेम’ म्हणून स्वीकारता आलं.

मी १९७७ ला फग्र्युसन कॉलेजमधून पदवीधर झाले. तत्पूर्वी बीएच्या शेवटच्या वर्षांला असताना ‘पुरुषोत्तम करंडक’ कॉलेजला व मला अभिनयासाठीचा केशवराव दाते करंडक मिळाला. त्यानंतर मी १९७७ ला  जूनमध्ये वृत्तपत्र विद्येच्या पदवीसाठी रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा सातत्याने नाटकच करायचं होतं. मग तिथे सुषमा देशपांडे, अरुण बेलरुरे, सोमनाथ ठकार, संध्या टाकसाळे, रमेश मेनन, अरुण खोरे भेटले. महेश एलकुंचवारांचं ‘रक्तपुष्प’ केलं आणि विद्यापीठाला पुन्हा ‘पुरुषोत्तम करंडक’ मिळाला आणि सुषमाला ‘केशवराव दाते करंडक’!

‘फग्र्युसन’तर्फे एकांकिका करत असतानाच माझी रमेश भाटकरशी ओळख झाली. अमोल पालेकर रूपांतरित सुरेंद्र वर्माची ‘सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून सूर्योदयाच्या प्रथम किरणापर्यंत’ ही सुंदर एकांकिका करत असताना तो मला त्या वेळी दिग्दर्शनासाठी मदत करीत असे. ओळखीनंतर बरोबर २५ दिवसांनी संध्याकाळी ५ वाजता, मी रमेशला सांगितलं, ‘‘एक स्त्री म्हणून मला आवडलेला तू पुरुष आहेस.’’ या वेळी हेही स्पष्ट केलं की, म्हणजे प्रेम वगैरे आहे का, तर ते मला माहीत नाही. त्यानेही मी त्याला आवडत असल्याचं सांगितलं. मग रात्री ८ वाजता तीच गोष्ट तशीच्या तशीच माझे वडील प्रताप नारायण बेहेरे (काका) जे तेव्हा पुण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश होते, त्यांना व बहीण नंदिनीला सांगितली.  कारण घरातल्या लोकांवर असलेला विश्वास. काका म्हणाले, ‘‘ठीक. उद्या पहाटे फिरायला चल, तेव्हा बोलू.’’ तिथे त्यांनी मला सांगितले  की, ‘‘तुझा शैक्षणिक आलेख चांगला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तू अजून २१ वर्षांची झालेली नाहीस. तेव्हा, शिक्षण पूर्ण कर, २१ वर्षांची हो, त्या वेळेस विचारीन.’’ मी सांगितलं, ‘‘मी रमेशला भेटणार.’’ ते म्हणाले, ‘‘भेट, पण स्वत:च्या जबाबदारीची जाणीव ठेव.’’ संपलं!

त्यानंतर अडीच वर्षांनी माझ्या २१ व्या वर्षी काकांनी रमेशबद्दल मला विचारलं. मला तेव्हा लग्न करायचं नव्हतं, कारण मला समाजसेवा करायची होती. आजीच्या दोन मैत्रिणी सुशिलाबाई पै आणि प्रेम कंटक यांनी देशसेवेला वाहून घेतलं होतं. मी आज्जीला  सांगितलं की, मी व रमेश लग्न न करता एकत्र राहू. ती म्हणाली, ‘‘राहा, पण उघडपणे रहा आणि स्वत:च्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी स्वत: घे.’’  मी रमेशला, आपण नुसतेच एकत्र राहू, असं म्हटलं, तर तो म्हणाला, ‘‘असल्या विचित्र गोष्टी मी करत नसतो.’’ त्याचा लग्नसंस्थेवर जबरदस्त विश्वास. मग इलाज नव्हता. लग्न केलं. कारण तोपर्यंत मी रमेशच्या पूर्ण प्रेमात होते हे लक्षात आलं होतं.

लग्नाच्या साडय़ांसाठी मला काकांनी हजार रुपये दिले होते. मी त्यात पाचशे पन्नास रुपयांची बनारस, अडीचशेची बंगलोर सिल्क, शंभरची जरीची आणि साठ व चाळीस रुपयांच्या दोन कॉटन, अशा पाच साडय़ा घेतल्या. त्यातल्या सिल्कच्या साडय़ा मी लग्नाच्या पंचवीस वर्षांपर्यंत वापरल्या. लग्न घरीच, सांगलीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या बंगल्यात झालं व आजीने हाताशी आचारी घेऊन लग्नाचा स्वयंपाक केला. त्यामुळे माझ्या लग्नाचा खर्च म्हणजे दागिने, शंभर माणसांचे जेवण, स्वागत समारंभ इत्यादी मिळून अकरा हजार रुपये झाला. तेव्हाही दागिने, कपडे, महाग वस्तू आदींमध्ये फारसा आनंद वाटत नसे. देशातल्या अनेक लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते, ही जाणीव सतत मनात असायची. समाधानाच्या जागा खेळ, नाटक, उत्तम वाचन, लिखाण, संगीत, आवडती माणसं, निसर्ग, प्राणी आणि विशेष करून मांजरी या होत्या. आजही त्यात फारसा बदल नाही.

लग्नाच्या वेळी रमेशकडे सोळा रुपये बँक बॅलन्स होता. घराचा पत्ता नव्हतं; पण मनात ढीगभर प्रेम आणि जिगर होती. त्यामुळेच आमचा चाळीस वर्षांचा संसार ‘सोळा आणे’ झाला. काका म्हणाले होते, ‘‘मृदुला, प्रेम आणि प्रामाणिकपणा यावर संसार नेटका होतो.’’

१९७८ ला पत्रकारितेची पदवी – बी.जे. घेतल्यानंतर मी एलएल.बी.ला प्रवेश घेतला. जगात तीन प्रकारचे लोक असतात. एक- स्वत:वर अन्याय झाला तर गप्प बसणारे. दुसरे- स्वत:वर अन्याय झाला तर त्याविरुद्ध लढणारे आणि तिसरे- दुसऱ्यावर अन्याय झाला तर त्याविरुद्ध भांडणारे. मी तिसऱ्या प्रकारात मोडत असल्याचा साक्षात्कार मला शाळेत असतानाच झाल्यामुळे कायदा कळण्यासाठी तिथे प्रवेश घेतला. लहानपणापासूनच ठाण्याच्या ‘न्यू गर्ल्स हायस्कूल’मध्ये असताना मी खूप वाचत असे. भागवतबाई, देसाईबाई यांनी हातात फार सुंदर पुस्तकं दिली त्या काळात. रुईया महाविद्यालयात पहिल्या वर्षी प्रा. मीना गोखले, इंटरला ‘एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना प्रा. विजया राजाध्यक्ष आणि बी.ए.च्या दोन वर्षांत

डॉ. वी. मा. बाचल या शिक्षकांनी कविता, कादंबरी आणि राजकीय वाचनाची गोडी लावली.  घरातले आणि शिक्षकांचे संस्कार या पायावर मी पुढे ठाम उभी राहू शकले. नेहमी आनंदी राहू शकले. महात्मा गांधी ते सावरकर, मार्क्‍स ते टॉल्स्टॉय असा वाचनाचा प्रवास केलेला.. सगळेच पटायचे.. सगळ्यांच्या कर्तृत्वाने अवाक् व्हायचे.. पण तरी कम्युनिस्ट असणं जास्त रुचायचं. तेव्हा सुशिक्षित समाजानं राजकारणापासून  फारकत घेता कामा नये, तर त्यात उतरणं ही समाजाची मूलभूत गरज आहे हाच विचार होता. विद्याताई बाळांनी लिखाणाला उत्तेजन दिलं. माझ्या कथा ‘स्त्री’ मासिकामध्ये छापल्या. त्यात ‘मोरी’ ही लोकांना आवडलेली गोष्ट. तसेच विनायक चासकर यांनी मुंबई दूरदर्शनवर मी लिहिलेले १९८४—८५ मधे ‘तुला उशीर का होतो’? आणि ‘भरपाई’ हे  दोन टेली प्ले सादर केले.

आज जरी मी न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले असले तरी न्यायाधीश मी चुकून झाले, असं मला वाटतं. मला खरं तर तेव्हा वार्ताहर, अभिनेत्री, दिग्दर्शक, कवयित्री, प्राध्यापक असं सर्व काही व्हायचं होतं. झोळी खांद्यावर घेऊन जीन्स, शर्ट घालून फिरायचं होतं. क्रांतीही करायची होती. म्हणजे काय की कशालाच दिशा नव्हती; पण रोजच्या दिवसाला खूप मोठा अर्थ असायचा. मी लग्नाआधी कधी चहा केला नव्हता की अंथरूण घातलं नव्हतं, घरी नोकर माणसं असायची. आमचा संसार एका खोलीत सुरू झाला तो ६ वर्षे तिथेच होता. त्यानंतर आमचं तिघांचं पहिलं घर झालं. फर्र्र्र आवाज करणारा एक आणि दुसरा वातीचा अशा स्टोव्हवर ४ र्वष स्वयंपाक केला. रमेश ‘ टेल्को’त नोकरी करत असे तेव्हा त्याच्या फर्स्ट शिफ्टला मी दोन वर्षे सकाळी ४ वाजता उठून डबा करून द्यायचे. त्या सगळ्या फुलक्यांवर मध्यभागी स्टोव्हच्या बर्नरवरचा ‘प्रायमस’ असा उलटा शिक्का उमटत असे. हे माझे ‘प्रायमस फुलके’ प्रसिद्ध होते.

दुसरीकडे रमेश रंगभूमीवरही हळूहळू आपली छाप उमटवत होता. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘देणाऱ्याचे हात हजार’, ‘राहू केतू’ आणि ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाटकांचे प्रयोग व  तालमी तो पुण्यातल्या ‘टेल्को’मधून निघून दुपारच्या डेक्कन एक्स्प्रेसने मुंबईला जाऊन करत असे आणि रातोरात पॅसेंजरने पहाटे परत पुण्यात येऊन  आम्हाला भेटून आंघोळ करून थेट ‘टेल्को’त कामावर रुजू होत असे.

एकीकडे माझा अभ्यास सुरू होता, पण दुसऱ्या वर्षीच्या एलएलबीच्या प्रवेशासाठी पैसेच नव्हते. सासर-माहेरहून पैसे मागायचे नाहीत, असं ठरवलेलं असल्यामुळे, रमेशच्या अपरोक्ष मी डोकं चालवून मला लग्नात दिलेल्या चांदीच्या साखळ्या, करंडा, जोडवी, छल्ला असं विकून २५० रुपये आणले आणि फी भरली. तेव्हा ‘टेल्को’त काम करणारी माझी मैत्रीण उज्ज्वला मेहंदळे ही अडीअडचणीला पन्नास-साठ रुपये देणारी माझी बँक होती.

एलएल.बी.च्या दुसऱ्या वर्षांच्या शेवटी मी आई झाले. हर्षवर्धन तीन महिन्यांचा असताना दुसऱ्या वर्षीची वार्षिक परीक्षा होती. अडीच तासांचे रोज दोन पेपर्स – ३ दिवस. दोन पेपरच्या मध्ये अंगावर दूध पिणारं बाळ घेऊन परीक्षा सेंटरवर माझी आई येत असे. मग आमचा दूध पाजण्याचा कार्यक्रम झाला, की हर्षवर्धनशी खेळून मी पुढचा पेपर देत असे. थोडक्यात, त्या वेळी बाळाला घेऊन काम करणाऱ्या मजूर स्त्रिया माझं ‘रोल मॉडेल’ होत्या. मी स्वत:ला ‘कांगारू मम्मी’ समजत असल्यामुळे हर्षवर्धनला सतत खांद्यावर टाकून कॉलेज, परीक्षा, आकाशवाणी, वकिली, नाटक इत्यादी सर्व करत असे. लग्नानंतर शिकताना वेगवेगळे प्रश्न येतात; पण ते त्या त्या वेळी सुटतात. एलएल.बी.च्या तिसऱ्या वर्षीची ‘व्हायव्हा’ (तोंडी परीक्षा) होती. टय़ुटोरिअल्सही राहिले होते. हर्षवर्धनला कुठे ठेवायचं, हा प्रश्न होता. तेव्हा तो १० महिन्यांचा होता. मी सासरी मुंबईला गेले. आई-अण्णांनी हर्षवर्धनला सांभाळलं; पण तोंडी परीक्षा देण्यासाठी एक दिवस पुण्याला येणं गरजेचं होतं. त्यावर माझी जाऊ अंजली म्हणाली, ‘‘तू जा, मी रात्री हर्षवर्धनला पाहते.’’ त्या रात्री तो प्रचंड रडत होता म्हणून तिने अंगावरचं दूध पाजून झोपवलं. हे मी कधीही विसरू शकत नाही. अशा नात्यांनीच स्त्रीची शारीरिक, भावनिक क्षमता वाढते व खऱ्या अर्थानी ‘ती’चा शोध घेता येतो.

१९८२ मध्ये वकिलीची सनद घेऊन मी पुण्यात वकिली सुरू केली. मी येईल तो पक्षकार, त्याप्रमाणे दिवाणी, कौटुंबिक, फौजदारी सर्व न्यायालयात जात असे. त्या काळात माझ्याकडून कायद्याचं फार वाचन झालं नाही, कारण मी तेव्हा त्याबद्दल फार जागरूक नव्हते. म्हणजे मला मी न्यायाधीश म्हणून डायसवर बसल्यावर इतर वकिलांचे युक्तिवाद ऐकताना वकील म्हणून मी किती कमी होते ते लक्षात आलं. त्यानंतर २७ र्वष मान मोडून कायदा वाचला. अ‍ॅडव्होकेट विजय नहार यांच्याकडून मला पुराव्याचा कायदा शिकता आला. त्यांच्या पत्नी डॉ. रोमा नहार यांनी रमेशला व मला आपुलकी व आधार दिला. या कालखंडाच्या शेवटी सुखदेव सिंग व जिंदा यांच्या टाडाच्या खटल्यात मला खऱ्या अर्थाने कायदा आणि फौजदारी कायद्यासाठी लागणारा ‘रोबस्ट कॉमनसेन्स’ कळला. वकिलीत अ‍ॅडव्होकेट सीमा फडणीस, नंदिनी देशपांडे, सुरेश शहा, नीलिमा वर्तक यांच्यासारखे सहकारी मिळाले.

खूप चांगल्या जवळच्या मित्रमैत्रिणी पुढच्या वाटचालीत भेटल्या, भेटतील; पण पंचविशीतलं मैत्र हे आयुष्याचा अविभाज्य भाग असलेलं. पुढेही ते सुदैवाने तसंच राहिलं. माझ्या सगळ्याच मित्रमैत्रिणींबरोबर मी धमाल करत असे आणि आजही करते. मी आयुष्याबद्दल अजिबात गंभीर वगैरे नव्हते. माझ्या तिशीत ७ वर्षांच्या हर्षवर्धनशी माझी फार छान गट्टी होती. रमेशसारखा जबरदस्त विनोदबुद्धी असलेला मजेदार सवंगडी असल्याने आम्ही तिघांनी काही ना काही उपद्व्याप करत तो काळ फार छान घालवला.

विक्रम भागवत हा  जवळचा मित्र पंचविशीत दुरावला; पण परत पन्नाशीत सापडला. नूतन पंडित, जुईली देऊस्कर, अपर्णा देव (पाध्ये), मीनाक्षी तळवलकर, कालिका पटणी, मीना गोखले, सोमनाथ ठकार हे वाटेतले मित्रमैत्रिणी. सुषमा, उज्ज्वला मेहेंदळे या जिवलग सख्याही गद्धेपंचविशीतलीच कमाई.

एकुणात मुलीची बाई होणं, आई होणं हे झाडाला पान, फूल येणं इतकं नैसर्गिक सहज असं मला वाटत असे. हा प्रवास म्हणूनच खूप गमतीचा, आनंदाचा होता; पण स्वत:चं चारित्र्य घडवण्यासाठी मात्र वैचारिक जडणघडण झाली ती वाचनामुळे आणि माणसांमुळे. त्या कालखंडात माणूस, त्यातलं नातं समजून घेता घेता मी स्वत:ला वाचायला शिकले आणि नेहमी स्वत:चा आतला आवाज ऐकत जगणं आणि त्याच्याशी प्रामाणिक राहून वागणं हेच भविष्यात  महत्त्वाचं ठरलं.