एम. ए. झाले, नेट सेट झाले. सोबत विद्यापीठातील नोकरीही होती, पण गोंदणभरल्या चेहऱ्याचा  न्यूनगंड मनातून जात नव्हता. त्यातच मला लग्नासाठी स्थळं आली. गोंदण आहे म्हणून एक दोन नकारही मी पचवले. त्या नकारांमुळे आधीचाच न्यूनगंड अधिकच पोसला गेला. हे गोंदण माझा पिच्छा सोडत नव्हतं, पण ..
मी आदिवासी समाजात जन्मलेली मुलगी. आदिवासींच्या संस्कृतीत गोंदणाला फार महत्त्व आहे. माणूस मरताना बरोबर काहीच घेऊन जात नाही. संपत्ती, पैसा सगळं जाग्यावर राहतं तेव्हा काहीतरी बरोबर घेऊन जाण्यासाठी गोंदण काढावं, असा समज आहे. माझे वडील गोविंद गवारी समाजकल्याण खात्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत असल्यामुळे नगर जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी बदल्या होत राहिल्या. वडील सुट्टी घेऊन गावाला घेऊन जायचे. असेच एकदा मी दीड वर्षांची असताना आम्ही गावाला गेलो. मी आमच्या घराण्यातली पहिलीच मुलगी त्यामुळे सगळय़ांचीच लाडकी होते, विशेषत: आजीची. एक दिवस दुपारी सगळे शेतात कामाला गेलेले. आजी आणि मी घरी होते. त्यावेळी दारात एक गोंदण कोरणारी बाई आली आणि ‘अर्धी भाकर द्या’ असे म्हणाली. आजीने तिला भाकरी दिली. पण त्याच्या बदल्यात माझ्या चेहऱ्यावर (कपाळ, हनुवटी, कानशील, नाक) गोंदण कोरून ठेवले हा माझ्या गोंदणांचा इतिहास!
 पुढे मी अकोल्याला (जि. नगर) प्राथमिक शाळेत गेले, तेव्हा इतर मुली चेहऱ्याकडे बघायच्या पण का? ते कळण्याचे वय नव्हते, पण माझ्या चेहऱ्यावर काहीतरी आहे म्हणून मुली बघतात एवढे मात्र लक्षात आले. आतल्या आत मी हिरमुसायला लागले. पण चेहऱ्यावरच्या गोंदणाची लाज वाटायला आणखी काही वर्षे जावी लागली.
साधारणत: वयात आल्यानंतरच मुले-मुली आपल्या असण्या-दिसण्याच्या बाबतीत विशेष जागरूक होतात, तसेच माझेही झाले. मी नववीला जुन्नरच्या अण्णासाहेब आवटे हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. वडिलांची बदली झाल्यानंतर पहिल्यांदाच नगर जिल्ह्य़ातून पुणे जिल्हय़ात आले होते. त्यामुळे सर्व काही अनोळखी आणि नवीन होते. मी शासकीय मुलींच्या वस्तिगृहात प्रवेश मिळविला. येथेही गोंदण असणाऱ्या इतर आदिवासी मुली होत्या. पण आता हळूहळू माझ्या मनात गोंदणाबद्दल तिरस्कार वाटायला लागला होता. एकतर मी चार चौघींसारखी सामान्य! त्यात चेहऱ्यावर गोंदण त्यामुळे आतल्या आत कुढल्यासारखे व्हायचे. पुढे तेथेच कॉलेजमध्ये जाऊ लागले. आता तर गोंदणाचा तिटकाराच येऊ लागला. येनकेनप्रकारेण मी माझे गोंदण झाकण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यात भर जुन्नरमधली स्थानिक आणि इतरही मुले,      आदिवासी मुलींकडे त्यातल्या त्यात होस्टेलमधील मुलींकडे हिणवण्याच्या दृष्टीने बघायची. या मुली चटकन ओळखूही यायच्या गोंदणामुळे. आतल्या आत तुटायला व्हायचे. रस्त्याने जाताना पायाकडे बघून चालायचे, मोठी टिकली लावून कपाळावरचे गोंदण झाकायचा मी प्रयत्न करायची. कधी गोंदलेल्या भागावर फाऊंडेशन लावायची. न्यूनगंडातून असे अनेक प्रकार  मी करत राहिले. त्याचबरोबर गोंदण घालविणारे तंत्र कुठे विकसित झाले आहे का? याचाही शोध चालू होता. एक दिवस मला एका ब्युटी पार्लरमधल्या बाईने एका उपचाराने तुझे गोंदण जाऊ शकते अशी आशा दाखविली. झाले, मी तिच्याकडे जाण्याचा चंग बांधला. त्यावेळी त्याची फी परवडण्यासारखी नव्हती, मी स्कॉलरशिपची वाट पाहत राहिले. एकदाची फेब्रुवारी महिन्यात स्कॉलरशिप मिळाली आणि माझी पावले पार्लरकडे वळली.
गोंदण कोरण्याचा प्रकार साधा नाही ते काढताना असंख्य यातना होतात, सुई त्वचेतून हाडापर्यंत जाते. त्यामुळे खूप रक्त येते. गोंदलेला भाग सुजतो, नंतर ठसठसतो. हाच प्रकार या उपचारामध्ये होता. त्या बाईने कुठलासा रंग परदेशातून मागविला होता, तो त्वचेसारखा रंग सुईमधून ती गोंदलेल्या भागावर सोडणार होती. त्याआधी सुईने गोंदणासाठी वापरलेला हिरवा रंग त्वचेतून काढून घ्यायचा नंतर त्यामध्ये तो त्वचेचा रंग भरायचा. असा सर्व प्रकार. ती सुई माझ्या चेहऱ्यावर कर्र कर्र आवाज करत गोंदणातला रंग काढायची तेव्हा रक्ताचे ओघाळ चेहऱ्यावर यायचे. त्यानंतर मी पावडरचा मोठा टिकला त्या सर्व भागावर लाऊन होस्टेलवर यायची. दुसऱ्या दिवशी मला सणकून ताप यायचा, आजारी पडायची, पण काही झाले   तरी गोंदण काढायचेच या हिमतीने मी सात ते आठ वेळा ते सहन केले आणि गोंदणविरहित चेहऱ्याचे स्वप्न बघत राहिले. पण वाईट गोष्ट म्हणजे एवढे करूनही गोंदण काही गेले नाही.
मनातला न्यूनगंड दिवसेंदिवस वाढतच राहिला. मन आतल्या आत खात राहिले. झुरत राहिले. वरून जरी सर्व काही आलबेल दिसले तरी आरशात पाहिले की निराश होत होते. एक दिवस कुणीतरी सांगितले की एक कपडे धुण्याची पावडर आणि चुना एकत्र करून लावला की गोंदण जाते. झाले मी योग्य दिवस निवडला (आठ दिवस घराबाहेर पडता येणार नाही असा काळ शोधला) मी ती पावडर व चुना एकत्र करून गोंदणावर लावला. त्याने अक्षरश: हाडापर्यंत त्वचा जाळली गेली, पण तेही सहन केले, गोंदण काढायचेच होते ना? पण तेही फक्त सहन करणेच ठरले.
मी अभ्यासात हुशार होते. मैत्रिणीही खूप होत्या. निर्भयही होते, पण चेहऱ्याकडे कुणी बघू नये असे वाटायचे. अशातच मी पदवीधर होऊन एम.ए.साठी पुणे विद्यापीठात गेले. तेथे मुलींनी पहिल्यांदा वेगळा प्राणी आहे, अशाच नजरेने पाहिले, पण माझ्या
मनमोकळेपणामुळे त्यांना आपलीशी झाले. आता गोंदण कधी काढलं? एवढं कशाला काढलं? फारच विचित्र दिसतं बाई! अशा प्रश्नांची सवय झाली होती. याबरोबरच आपण इतर मुलींसारख्या नाहीत ही ‘असुंदरपणा’ची भावनाही घेरत राहिली.
   एम. ए. झाले, नेट सेट झाले. सोबत विद्यापीठातील नोकरीही होती, पण गोंदणभरल्या चेहऱ्यामुळे न्यूनगंड मनातून जात नव्हता. त्यातच मला लग्नासाठी स्थळं आली. गोंदण आहे म्हणून एक दोन नकारही मी पचवले. त्या नकारांमुळे आधीचाच न्यूनगंड अधिकच पोसला गेला. गोंदणरहित मुलींच्या चेहऱ्याकडे पाहून असूया वाटायला लागली. हे गोंदण माझा पिच्छा सोडत नव्हतं..
   मी उच्चशिक्षित होते, कमावती होते, या सकारात्मक बाजूऐवजी मी गोंदणाच्या नकारात्मक बाजूनेच विचार करायचे आणि खिन्न व्हायची. भाद्रपद महिन्यात माझ्या नवऱ्याचे स्थळ आले. मुलगा गोरा, देखणा, मॉडर्न कॉलेजला कामाला होता. हा मला कशाला हो म्हणेल असेच पूर्वानुभवाने वाटले. पण त्याचा होकार आल्यानंतर मला धक्काच बसला. आणि मनात शंका निर्माण झाल्या, ‘याने मला नीट पाहिले असेल ना?’ एक दिवस आम्ही भेटायचे ठरले. त्या भेटीत ‘तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे गोंदण पाहिले आहे का?’ असा प्रश्न चक्क विचारून टाकला. त्याने होकार दिला. लग्न झाले. मी प्राध्यापक म्हणून बारामतीला रुजू झाले. संपूर्ण कॉलेजमध्ये तोंडभर गोंदण असलेली मी एकमेव प्राध्यापिका. सुरुवातीला तर शिकवताना विद्यार्थी माझ्याकडे पाहायचे त्यावेळी माझ्या गोंदणाकडे तर पाहात नाही ना? अशी शंका यायची आणि मी दचकायची.
 असा हा गोंदण भरल्या चेहऱ्याचा प्रवास चालू होता.. आता मी हळूहळू माझा गोंदणविषयीचा न्यूनगंड कमी व्हायला लागला. मी पीएच.डी. करायचे ठरवले. विषय आदिवासी स्त्रीचा निवडला. आदिवासींचा अभ्यास करताना आदिवासी संस्कृतीची अनेक दालनं माझ्यासमोर खुली झाली. त्यात या संस्कृतीत गोंदणाला किती महत्त्व आहे, का महत्त्व आहे. त्यापाठीमागे किती उदात्त हेतू आहे,  याची जाणीव झाली आणि माझीच मला लाज वाटायला लागली. या संस्कृतीमुळे माझ्यामध्ये कितीतरी सकारात्मक गोष्टी आहेत, ऊर्जा आहे.  हीच ऊर्जा मी या न्यूनगंडापायी इतकी वर्षे घालविली असे वाटले. आणि त्याक्षणी मी माझा न्यूनगंड मुळापासून उपटून टाकला. त्यावेळी चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास उमटून आला. हे मला पूर्वीच का कळलं नाही याचा खेद वाटला.
 आज मी त्या न्यूनगंडापासून पूर्णत: मुक्त आहे. माझा तोच गोंदण भरला चेहरा मी आज अभिमानाने मिरवते
   

Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Maharashtra kesari woman wrestling marathi news
महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीचा रंगणार फड, येणार नामवंत मल्ल
Laurene Powell Jobs in Mahakumbh
Laurene Powell Jobs: स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांना काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग शिवू दिले नाही; कारण काय?
Image Of Tim Cook Apple CEO
Apple CEO Salary : टिम कूक यांच्या पगारात घसघशीत वाढ, २०२४ मध्ये अ‍ॅपल कंपनीकडून मिळाले ६४३ कोटी रुपये
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Story img Loader