आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना फसवणारे आपल्या समाजात खूप आहेत. आज २१व्या शतकातही अनेक स्त्रियांची चेटकीण म्हणून हत्या केली जाते. अंधश्रद्धेचा बाजार मांडून बसलेल्या लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळते, पण काबाडकष्ट करून आपल्याच शेतात राबणाऱ्या धोंडीबाईला मात्र चेटकीण ठरवलं जातं. आशादायी गोष्ट म्हणजे तिच्याच गावातल्या काही लोकांच्या पुढाकार आणि पाठपुराव्यामुळे तिला अभयही मिळालं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माणूस बुद्धीच्या जोरावर विज्ञानाच्या साहाय्याने चंद्रावर पोहोचला. चंद्रावर वस्ती करण्याचं स्वप्न पाहाणारा आपला समाज दुसरीकडे डाकीण, भुताळी, चेटकीण या गोष्टींवर विश्वास ठेवत स्त्रियांचं जगणं कठीण करतो. गेल्याच वर्षी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव येथे चेटकीण ठरवून स्त्रियांना जिवे मारण्याचे प्रयत्न झाले, परंतु हे फक्त नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातच घडतं असं नाही. तर हे कुठेही घडू शकतं.
वाद कोणताही असो, स्त्रीला लक्ष्य केलं की प्रकरण सोपं होतं, ही समाजाची धारणा आजही कायम आहे. स्त्रीचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल तर तिच्या चारित्र्यावर बोट ठेवा. त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करा. कुटुंबाचा बदला घ्यायचा असेल तर त्या कुटुंबातील तिचं चारित्र्य भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करा. तिच्यावर लैंगिक अत्याचार करा, तिच्यावर अॅसिड हल्ला करा किंवा मग तिला सरळ चेटकीण ठरवून जिवंत जाळा, हे प्रकार आजही होत आहेत.
आणखी वाचा-रिकामटेकडी
नाशिक जिल्ह्यातील, तालुक्याच्या गावापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावरील गावात राहणारी धोंडीबाई. तिच्या कुटुंबीयांसमवेत मळ्यात वस्तीवर राहात होती. गावातील रंगनाथ व सोमनाथ ढोबळे हे धोंडीबाईंच्या कुटुंबीयांना नेहमीच त्रास देत होते. शेतीचा बांध कोरणे (त्यांचं शेत कमी करत आपल्या शेतात त्याचा समावेश करणं), पिकांचे नुकसान करणे असे प्रकार सुरू होते. धोंडीबाई या त्रासाला न जुमानता शेती पिकवत होती. समाजावर, नातेवाईकांवर, गावकऱ्यांवर प्रभुत्व गाजविण्यासाठी, स्वत:ला वेगळं सिद्ध करत समाजात, दहशत निर्माण करण्यासाठी सोमनाथने नामी युक्ती शोधली. त्याने ‘नवनाथ’ माझ्या स्वप्नात येतात ते मला म्हणतात की, ‘मला जागा दे, माझं मंदिर बांध, गावावर येणारं संकट दूर कर.’ अशी अफवा पसरविली. सोमनाथने त्याच्या राहत्या घराजवळ नवनाथांच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. देवाचे काम असल्यामुळे मदतीचा ओघ सुरू झाला. गावातल्या दुकानदाराने विटा, कुणी वाळू तर कुणी सिमेंट पुरविले. मंदिर उभे राहिले. सोमनाथने मोठा समारंभ साजरा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पंचक्रोशीतील लोक हजर होते. कार्यक्रमाच्या वेळीच सोमनाथच्या अंगात नवनाथांचं वारं आलं.
अमावास्या, पौर्णिमेला व दर गुरुवारी सोमनाथच्या अंगात वारं येऊ लागलं. अंगात आल्यावर सोमनाथ पंचक्रोशीतील लोकांचे प्रश्न सोडवायला लागला. मुलीचं लग्न जमत नाही, नोकरी नाही, तर कुणी आजारी आहे. लोक साकडं घालत होते, मोठी बिदागी देत होते. सोमनाथची आर्थिक स्थिती सुधारली. समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. पत्र्याचे घर जाऊन मोठा बंगला उभा राहिला, दारासमोर चारचाकी गाड्या आल्या, जमिनी विकत घेतल्या. शेजारीच राहणारी धोंडीबाई मात्र सोमनाथचं हे वर्चस्व मानत नव्हती. स्वत:च्या जमिनीलगत असलेल्या धोंडीबाईच्या शेतात तिचे कुटुंबीय भरघोस उत्पन्न घेत होते.
सोमनाथने मध्यस्थ पाठवून धोंडीबाईचे पती सुदाम यांच्याकडे त्यांच्या शेतजमिनीची मागणी केली. धोंडीबाईने विरोध केला. आता सोमनाथची वहिनी सविता हिच्या अंगातही देवीचा संचार झाला. सविताकडेही लोकांची रीघ लागली. एकदा तिनं, देवीने धोंडीबाईच्या शेतात मंदिर बांधण्यास सांगितल्याचं सर्वांना सांगितलं. धोंडीबाईने अर्थातच विरोध केला. एक दिवस गावातल्या एकनाथ ढोबळे यांची मुलगी आशा घरातून गायब झाली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह एकनाथच्याच विहिरीत आढळला. त्यानंतर पंधरा दिवसांनी एकनाथची पत्नी मुलीचा प्रश्न घेऊन सविताकडे आली. सविताने अंगात आल्यावर सांगितलं, ‘‘धोंडीबाई सुदाम ढोबळे ही ‘चेटकीण’ आहे, तिनेच आशाला खाल्लं.’’ सविताच्या पुतण्याने या प्रसंगाचं रेकॉर्डिंग केलं आणि ग्रामस्थांना ऐकवलं. सोमनाथच्या अंगात आल्यावर पुन्हा तोच प्रश्न सोमनाथला विचारला गेला तेव्हा सोमनाथनंही सांगितलं, ‘‘धोंडीबाई ‘चेटकीण’ आहे, आशाला धोंडीबाईनंच खाल्लं.’’
सविताने सांगितलेल्या गोष्टीवर सोमनाथच्या बोलण्याने शिक्कामोर्तब केलं. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली. भाऊबंदांनी एकत्र येऊन धोंडीबाईच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला. धोंडीबाईच्या कुटुंबास कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जात नव्हतं. एखाद्या दु:खाच्या प्रसंगी धोंडीबाईचे कुटुंबीय स्वत:हून गेले तर त्यांना लोक दुर्लक्षित करत किंवा हाकलून देत. सोमनाथची धोंडीबाईच्या कुटुंबाकडे तिच्या शेतीची मागणी सुरूच होती.
आणखी वाचा-बारमाही : असले जरी तेच ते…
सोमनाथ वारं अंगात आल्यावर सांगत असे की, ‘धोंडी जिवंत राहिली तर गाव संपेल.’धोंडीबाईच्या भावकीतले लोक संतापले होते. त्यांनी धोंडीबाईलाच संपविण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा रात्रीच्या वेळी मोठा जमाव धोंडीबाईच्या घरावर चाल करून आला. धोंडीबाईचं कुटुंब अंधाराचा फायदा घेत घरातून पळून गेलं. संतापलेल्या जमावाने घरातील सामानाची फेकाफेक व मोडतोड केली. त्यानंतर धोंडीबाईनं गावातील तंटामुक्ती समितीकडे तक्रार दाखल केली. धोंडीबाई ‘चेटकीण’ आहे, हे तंटामुक्ती सदस्यांच्या मनावरही बिंबलेलं होतंच. त्यांनी ते गांभीर्यानं न घेता ‘यापुढे कोणीही भांडायचे नाही’ असं सांगून प्रकरण संपवलं. धोंडीबाईला ‘चेटकीण’ ठरवलं गेलंय हा खरा मुद्दा तसाच राहिला.
आग धुमसतच होती. २-३ दिवस मध्ये गेले. तोच पुन्हा रात्रीच्या वेळी गावातील सुमारे १५-२० लोक धोंडीबाईच्या घरावर चाल करून आले. ते म्हणत होते की, ‘‘धोंडी चेटकीण आहे. आम्ही तिला जिवंत राहू देणार नाही.’’ बाहेरचा कोलाहल ऐकून धोंडीबाईच्या सुनेनं तिला घरात लपवलं आणि बाहेर जाऊन सांगितलं की, ‘‘माझी सासू गावात गेली आहे, जमावानं धोंडीबाईच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली आणि ते शिव्या देत, कधीतरी आमच्या तावडीत धोंडी सापडेलच’’, असं म्हणत वस्तीवरून निघून गेले. रात्रभर संपूर्ण कुटुंब दहशतीखाली होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडीबाईच्या माहेरच्या लोकांना हा प्रकार समजला. धोंडीबाईचे भाऊ तिला माहेरी घेऊन आले. त्याच दिवशी त्यांनी आमचं कार्यालय गाठलं. घडलेली सर्व घटना त्यांनी कथन केली. ती ऐकून मी सुन्न झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी धोका पत्करून धोंडीबाई व तिच्या कुटुंबीयांसोबत मी तिच्या गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आले. गावातील लोक संशयी नजरेनं आमच्याकडे पाहात होते. काही गोष्टी समजावून घेतल्या. त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदण्यासाठी आम्ही गेलो असता नेहमीप्रमाणे अधिकारी जागेवर नाहीत म्हणून अन्य लोक तक्रार नोंदवून घेत नव्हते. अधिकारी आल्यानंतर त्यांना सर्व बाबी समजावून सांगितल्या. कायद्याची पुस्तिका संबंधित अधिकाऱ्यास दिली. शेवटी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही धोंडीबाईच्या जीविताला धोका होता. तिला असुरक्षित वाटत होते. ती भावाच्या घरी येऊन राहिली होती. तिला पोलीस संरक्षण मिळावे म्हणून अर्ज दिला. अर्जाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना पोलीस सुरक्षा मिळाली. सोमनाथ-सविताच्या ‘दरबारा’चे पंचनामे-जप्ती झाली. आरोपींना अटक झाली. दोन दिवसांनंतर ते जामिनावर सुटले, परंतु कायद्याच्या धाकाने आरोपी वरमले. दरबार बंद झाला होता, मात्र दीर्घकालीन उपाययोजना होण्यासाठी एवढंच पुरेसं नव्हतं. दरम्यान, मी परिसरातील ओळखीच्या, हितचिंतक, समविचारी लोकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडूनही काही बारीक-सारीक तपशील मिळवला. गावातील लोकांची माहिती मिळवली. त्या लोकांशी अंधश्रद्धा निर्मूलन कामाबाबत जाणीवपूर्वक फोनवर बोलले.
जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभाव याबाबत सतत लोकांशी बोलत होते. ही चर्चा गाव कट्ट्यावर कशी पोहचेल या दृष्टीने प्रयत्नशील होते. त्या भागात असलेल्या माझ्या काही नातेवाईकांशीही मी संपर्क साधला. काही परिचितांमार्फत गावातील सुशिक्षित तरुणांपर्यंत पोहचले. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यांच्यापैकी एकाला चळवळीसंबंधित थोडी माहिती होती आणि तो मलाही ओळखत होता. त्यामुळे संपर्क वाढवता आला. सविस्तर बोलता आलं. त्याच तरुणांच्या मदतीने गावात प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचं ठरलं. गावातच राहायचं असल्यानं हे तरुण थोडे घाबरत होते, परंतु त्यांनी आणखी सोबती जोडले. काही ज्येष्ठांचा विरोध असतानाही गावात कार्यक्रम घेण्याचे ठरले. दिवसा-उजेडी सकाळी आठ वाजता शाळेसमोरच्या पटांगणात सप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. त्यात भूत-भानामती-चेटूक-डाकीण प्रथा-अंगात येणे या विषयावर मी सविस्तर प्रबोधनपर बोलले.
आणखी वाचा-स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
जादूटोणाविरोधी कायदा, कायद्याचा हेतू, कारवाईवर बोलले. गावात कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पोलीस स्टेशनला तसं लेखी कळवलं होतं. संबंधितांनी चांगलं सहकार्य केलं. दोन पोलीस गावात हजर होते. कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद लाभला. सकाळची वेळ असूनही मोठ्या संख्येनं स्त्रिया व मुली कार्यक्रमाला उपस्थित होत्या. प्रयोग दाखवताना जाणीवपूर्वक अनेक स्त्रिया व मुलींना त्यात सामील करून घेतलं. दरम्यानच्या काळात विविध लोकांशी संपर्क करून चर्चा घडवून आणण्याचा खूप फायदा झाला. पंचक्रोशीतील दहशत, अंधश्रद्धामूलक वातावरण, सोमनाथ-सविताचं ढोंग हे सर्वच नष्ट करण्यासाठी गावातील व पंचक्रोशीतील लोकांची मानसिकता बदलण्यासाठी शेजारच्या गावांमध्येही कार्यक्रम घेतले. कायद्याच्या छोट्या पुस्तिका वाटल्या. इकडे कोर्ट-कचेरीत चकरा मारून आरोपी हैराण झाले होते. हे सर्व गावातील व परिसरातील लोक पाहात होते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही कायद्याचा वचक निर्माण झाला. कायद्याच्या बडग्यामुळे सोमनाथ-सवितासोबतच त्यांच्या जवळच्या लोकांनाही धडा मिळाला. त्यानंतरही २-३ वेळा त्या गावात मी स्वत: जाऊन आले. आजही तेथील काही लोक संपर्कात आहेत.
या प्रकरणामुळे परिसरात अंधश्रद्धामूलक गोष्टींवर खूप चर्चा झाली. मध्ये काही काळ गेल्यानंतर मी थेट सविता व सोमनाथ कुटुंबीयांशीही संवाद साधला. त्यांच्या कुटुंबातील शाळेत जाणाऱ्या मुलांना काही छोट्या पुस्तिका वाचायला दिल्या. सविता-सोमनाथचा दरबार बंद झालाच, परंतु जगणं मुश्कील झालेल्या धोंडीबाईला चळवळीची ऊब व कायद्याचा आधार मिळाला. सविता-सोमनाथ आता चुकूनही तिच्या वाटेला जात नाहीतच, पण गावकरीही अदबीने वागतात.
आज २१व्या शतकातही अनेक स्त्रियांची चेटकीण म्हणून हत्या केली जात आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. अंधश्रद्धेचा बाजार मांडून बसलेल्या सोमनाथ व सविताला गावकरी, नातेवाईक आणि समाजात प्रतिष्ठा मिळते, पण काबाडकष्ट करून आपल्याच शेतात राबणाऱ्या धोंडीबाईला लबाडांनी चेटकीण ठरवल्यामुळे तिच्या जिवावर लोक उठतात, हे समाजाच्या अज्ञानाचं लक्षण आहे. त्यांचं हे अज्ञान कसं दूर करता येईल?
( लेखातील नावे बदललेली आहेत.)
ranjanagawande123@gmail.com