‘‘ड्रम, झेंबे, कोंगो, बोंगो, पॅड आदी वाद्य्ो वाजवायला मला कोणी शिकवली नाहीत. मीच शिकलो. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे पाहतो तेव्हा त्यांच्यातील चतन्य मला जाणवतं. वाटतं, अरे या वाद्यांच्या मध्यावर काही बोल अडकून पडले आहेत, त्यांना बाहेर यायचं आहे, बाजूला कडेवर काही बोल आहेत, पट्टीवर काही बोल, वाद्यांच्या खोडावर काही बोल आहेत. त्यांना लोकांपर्यंत पोचायचं आहे. एका अनावर ओढीनं मी त्या वाद्यांवर प्रेमानं, विश्वासानं थाप देतो आणि ती वाद्य्ो बोलू लागतात.. त्यावेळी जे नादब्रह्म उभं राहतं ते ती वाद्यंच जन्माला घालत असतात. मी निमित्तमात्र असतो..’’ सांगताहेत प्रसिद्ध तालवादक  उस्ताद तौफिक कुरेशी.
३ फेब्रुवारी २००७.
षण्मुखानंद हॉल खचाखच भरलेला. अब्बाजींची सातवी बरसी. दुपारचं सत्र सुरू झालेलं. समोर रसिकांमध्ये खुद्द उस्ताद झाकीर हुसेन, पं. सुरेश तळवलकर, पं. अरिवद मुळगावकर, विभव नागेशकर, योगेश सम्सी, नीलाद्रीकुमार असे दिग्गज बसलेले. वातारणात निरव शांतता!  लेहरा सुरू झाला आणि माझी झेंबेवर पहिली थाप पडली. मी पहिल्यांदाच परकीय झेंबेसारख्या वाद्यावर शास्त्रोक्त तबल्याचे ताल वाजवणार होतो. तो पहिलाच प्रयोग होता. तरलो तर यशस्वी नाही तर..  
वादनाला सुरुवात झाली, पण मन अचानक स्तब्ध झालं.. काहीच सुचेना, सम चुकली. काय करू कळेना.. हार्मोनियम एकीकडे जातंय आणि मी दुसरीकडे अशी स्थिती. मी डोळे मिटले. डोळ्यांसमोर उभे राहिले अब्बाजी, उस्ताद अल्लारखांसाहेब. त्या मूर्तीने रंगमंच व्यापला, षण्मुखानंद व्यापलं. जग व्यापलं. ते आणि मी. मी आणि ते. अशी स्थिती काही क्षण राहिली. अचानक मला रस्ता दिसला. लेहरा सापडला. आपसूक तिहाई आली आणि मी सम साधली.. समोरून टाळ्यांचा कडकडाट झाला. जाणकारांची दाद आली. झेंबेवरून शिखर ताल त्या सभागृहात गुंजू लागला. नादभर झाला. नादब्रह्माच्या तीरावर मी वावरू लागलो..
‘‘झाकीरभाई, मला तबल्याऐवजी दुसरी तालवाद्य्ो वाजवायची आहेत. काही तरी नवं करायचं आहे.’’ १९८८ मध्ये केव्हातरी मी माझे मोठे बंधू झाकीरभाईंना विनंती केली. झाकीरभाईंना माझ्या मनाची ओढ माहिती होती. मी तबला चांगला वाजवत होतो. पण बडी रिच (विख्यात ड्रमर) आणि अब्बाजी यांची ‘रिच -अल्लारखां’ ही एल्. पी. रेकॉर्ड लावण्यासाठी लहानपणचा तीन-चार वर्षांचा छोटा तौफिक, खुर्शीद आपाच्या मागे हट्ट करायचा व दिवसात दहा-पंधरा वेळा ती रेकॉर्ड रोज लावून वेडा होऊन ऐकत रहायचा हे त्यांनी पाहिलं होतं. माहीमच्या बाबा मगदुमशहा दग्र्याच्या उरुसात बेभान होऊन स्वत: झाकीरभाई ढोल वाजवायचे, त्यावेळी त्यांच्या खांद्यावरचा तीन वर्षांचा तौफिक त्या ढोलाच्या तालात तितकाच बेभान व्हायचा हे त्यांनी अनुभवलं होतं. त्यांनीच मला दहा-बारा वर्षांपूर्वी बोंगो हे वाद्य दिलं होतं. त्यांचा एक वाद्यवृंद होता; त्या वाद्यवृंदात हेमलता, सुलक्षणा पंडित, नरेंद्र चंचल, महेशकुमार गायचे; झाकीरभाई स्वत:ही किशोरकुमारचं  ‘‘एक चतुर नार’’ रंगून गायचे; त्या वाद्यवृंदात सात-आठ वर्षांचा तौफिक अगदी रंगून जाऊन खंजिरी वाजवायचा! माझी तबल्याखेरीज अन्य तालाची आवड झाकीरभाईंना विनंती करत होती. त्यांनी मला परवानगी दिली. मला म्हणाले, ‘‘जा प्रयत्न कर, नाही यश मिळालं तर ‘दाया-बायाची’ (तबला डग्ग्याची) साथ आहेच.’’ मग मी अब्बाजींकडे दबकत गेलो. अब्बाजींनी थोडय़ा नाखुशीने मला परवानगी दिली (नंतर ते त्यांच्या एका मित्राजवळ बोलले की,‘‘A good pair of hands is wasted!)’’  त्यावेळी त्यांचा होकार मला दशदिशांतून आलेल्या परमेश्वराच्या हुंकारासारखा वाटला!
  मग माझा चाचपडत प्रवास सुरू झाला. मी सिने म्युझिक असोसिएशनचं कार्ड काढलं. पण दोन वष्रे मला कामच नव्हतं. मी त्यावेळी ऑर्केस्ट्रा वाजवायचो, दांडिया वाजवायचो आणि पसे मिळवायचो. कॉलेजमध्ये असतानाच मी घरून पसे घेणे थांबवले होते. आणि एक दिवस मला आनंद-मििलद यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली एका चित्रपटाच्या गाण्यात ऑक्टोपॅड वाजवायचं निमंत्रण मिळालं आणि मग प्रवाह वाहता झाला. कुणालाही माहीत नव्हतं की मी अल्लारखांसाहेबांचा मुलगा आहे आणि उस्ताद झाकीरभाईंचा भाऊ आहे. मी सांगितलंही नाही. लोकांना हळूहळू ते कळलं!
 तुम्हाला सांगतो, ही सर्व तालवाद्य्ो माझ्याशी बोलतात. ड्रम, झेंबे, कोंगो, बोंगो, पॅड आदी वाद्य्ो मला वाजवायला कोणी शिकवली नाहीत. माझी मीच वाजवायला शिकलो. ती नुसती ठेवलेली असतात तेव्हा निर्जीव वस्तू वाटतात. पण मी त्यांच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्यांच्यातील चतन्य मला जाणवतं. मला वाटतं, अरे या वाद्याच्या मध्यावर काही बोल अडकून पडले आहेत, त्यांना बाहेर यायचं आहे, बाजूला कडेवर काही बोल आहेत, पट्टीवर काही बोल, वाद्यांच्या खोडावर काही बोल आहेत त्यांना लोकांपर्यंत पोचायचं आहे. एका अनावर ओढीनं मी त्या वाद्यांवर प्रेमानं, विश्वासानं थाप देतो आणि ती वाद्य्ो बोलू लागतात. त्यावेळी जे नादब्रह्म उभं राहतं ते मी नाही निर्माण करत, ते ती वाद्यंच जन्माला घालत असतात. मी निमित्तमात्र असतो. कधी कधी तर मीच अचंबित होऊन जातो व त्या वाद्यांना ऐकू लागतो!
अम्मीला वाटायचं की, ‘‘अब्बाजी, झाकीरभाई, फजल सारेच तबलानवाझ आहेत. माझा एक तरी मुलगा सरकारी अफसर व्हावा.’’ अब्बाजींनी ते मान्य केलं. पण मी मात्र, शाळेतून दुपारी तीनच्या सुमारास घरी आलो की, शागीर्दाच्याबरोबर असायचो. त्याचं तबलावादन ऐकायचो, त्यांच्यासमवेत वाजवायचो. आठवडय़ातून सहा दिवस दिवसाला चार-सहा तास हे चालायचंच. सपाट पृष्ठभाग दिसला की माझी बोटं चालायचीच. शाळेत, वर्गात हे सुरू असायचं, अगदी डबाही वाजवायचो. दोन-चार ताकिदी मिळायच्या, मग वर्गातून हकालपट्टी. बाहेर नोटीस बोर्ड वाटच पाहात असायचा. मी तोही वाजवत बसायचो. हेडमास्तर म्हणायचे, ‘‘हा कधी सुधारायचा नाही.’’ घरीही चमचे, वाटय़ा, ताटं, पेले, तांब्या जे मिळेल त्यावर मी ताल धरायचो. त्यातून निघणारे नाद मला मोहवायचे. अभ्यासात मला फारशी गती नव्हती, पण नापासही झालो नाही. अखेर अब्बाजींनी अम्मीकडून परवानगी घेऊन मला तबला शिकवायला सुरुवात केली. मला घरात संगीताची दोन विद्यापीठं मिळाली होती. त्यामुळे रियाझ चोवीस तास सुरूच. घरी मोठमोठे कलाकार यायचे. पं. रविशंकरजी, पं. हरिप्रसादजी, पं. शिवकुमारजी, उस्ताद अमजद अलीजी, उस्ताद अली अकबर खांसाहेब असे. त्यांना नुसते पाहणे, त्यांच्या चर्चा ऐकणे, हाही मोठा रियाझ होता.
मी सिनेसृष्टीत अनेक वष्रे विविध तालवाद्य्ो वाजवत होतो. विख्यात संगीतकार बोलवत होते आणि एक दिवस गीतिका, माझी पत्नी मला म्हणाली, ‘‘तौफिक किती दिवस तू हे काय करतोयस? तू अल्लारखांसाहेबांचा मुलगा आहेस, झाकीरभाईंचा भाऊ आहेस. दुसऱ्यांचं संगीत किती काळ वाजवणार आहेस? नवीन काही करणार की नाहीस?’’ मी सर्द झालो. हतबुद्ध झालो. ‘‘गीतिका, पसे कसे मिळवायचे? जगायचं कसं?’’ ती म्हणाली, ‘‘नंतर पाहू. आता आधी हे थांबव.’’ मी थांबलो. रियाजाला सुरुवात केली, अगदी तास न् तास.
त्यापूर्वी मी, अब्बाजी आणि झाकीरभाईंसोबत अनेक कार्यक्रमात तबला वाजवला होता. पण माझी छाप पडत नसे, याचं कारण माझा रियाज कमी पडत होता. मी आधी तबल्यावर, नंतर नवनव्या तालवाद्यांवर नव्याने रियाज सुरू केला. झेंबेसारख्या वाद्यावर मी तबल्याचे बोल आरूढ करून काही नवे करता येते का, याचे प्रयोग करू लागलो आणि यातून एक नवा तौफिक जन्माला आला. २००० मध्ये माझा ‘ऱ्हिधून’ हा नवा अल्बम आला. त्यात मी ‘ऱ्हिदमचे, तालाचे वेगळे प्रयोग केले आहेत. अब्बाजींनी त्यात अनेक वर्षांनी गायन केले आहे. २७ जानेवारी २००० रोजी त्यांनी रेकॉìडग केलं. ते आजारी होते, पण, त्या दिवशी ते प्रसन्नचित्त होते. मजेत गायले, अचूक सम गाठली. तबला वाजवणं सोडलेला आपला मुलगा आता प्रयोगशील संगीतकार होतोय व नवं करतोय याचंच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. त्यानंतर लगेच ३ फेब्रुवारी २००० रोजी ते पगंबरवासी झाले. पण जाता जाता त्यांनी या तौफिकला पसायदान दिलं. ‘ऱ्हिधून’ ने इतिहास घडवला व तौफिक कुरेशी या नावाची जगाने दखल घेतली..
आजही मी रंगमंचावर जाताना अस्वस्थ असतो. मी नीट वादन करू शकेन का, याविषयीची अधीर अस्वस्थता मनात असते. एकदा झाकीरभाईंबरोबर मी व सेल्वा गणेश अमेरिकेच्या दौऱ्यावर होतो. आधी झाकीरभाई वाजवणार व मग आम्ही दोघे!. सेल्वा व मी, दोघेही अस्वस्थ होतो. रंगमंचावर उद्घोषणा सुरू झाली. आमची स्थिती झाकीरभाईंनी बघितली व म्हणाले, ‘‘नव्‍‌र्हस आहात का?’’ मी हळूच पुटपुटलो, ‘‘त्याहून बिकट परिस्थिती आहे.’’ झाकीरभाई हसले व म्हणाले, ‘‘अरे, नव्‍‌र्हस असणं केव्हाही चांगलं. आपण वाजवताना त्यामुळे सावध राहतो. पण फार नव्‍‌र्हस होऊ नका. जास्त नव्‍‌र्हस झालात तर चुका कराल आणि अतिआत्मविश्वास आला तर अधिक चुका कराल. नव्‍‌र्हसनेसचा सकारात्मक उपयोग करा. मी तर आताही नव्‍‌र्हस आहे.’’ तो अल्लाचा आवाज होता. आमचा ताण दूर झाला व मफिलीचं एक इंगित गवसलं. आम्ही मफिलीवर लक्ष केंद्रित करू लागलो.
मी अब्बाजी आणि झाकीरभाईंबरोबर अनेक दौरे केले होते. कॉलेजमध्ये शिकत असतानाच मी युरोप अन् अमेरिका पाहिली होती. १९८६ मध्ये जर्मनीत स्टुटगार्डला कार्यक्रम होता. अडीच हजार लोकांनी सभागृह काठोकाठ भरलं होतं. नेहमी अब्बाजी आणि झाकीरभाई विलंबित लयीमध्ये सुरू करायचे, मध्य लयीवर यायचे आणि मग मी त्यांच्या सोबत वादनासाठी जायचो. पण त्या दिवशी काही वेगळेच घडले. तयारी सुरू असताना झाकीरभाईंनी मला बोलावले. मला वाटलं, नुसतं बसायचं आहे. पण लेहरा सुरू झाला अन् झाकीरभाई मला म्हणाले, ‘‘तू सुरू कर.’’ मी हादरलो, अब्बाजींनाही आश्चर्य वाटलं. ‘‘तू सुरू तर कर.’’ झाकीरभाई पुन्हा म्हणाले. लेहरा सुरू झाला होता, पाच हजार डोळे माझ्याकडे पाहात होते. मी कव्हर्स काढली, छोटी पेशकाराची उपज केली. पुढचं मला आजही आठवत नाही, आठवतं ते समेवर आल्यावर समोरून आलेली दाद! त्या क्षणी माझ्यात आत्मविश्वास आला. अब्बाजी आणि झाकीरभाईंचा समाधानी चेहरा मला सुखावून गेला. ती वेळ निभावली गेली. कारण माझ्या धमन्यांत अब्बाजींनी ताल भरला होताच! ताल हा माझा ध्यास आहे, ती माझ्या जीवनाची आस आहे, नव्हे तो माझ्या जगण्याचा श्वास आहे.
पण मला आजही असं वाटतं की, वादन करताना एकरूप भावावस्था वा समाधी अवस्था प्राप्त होते ना त्यापर्यंत मी अजूनही पोहोचलेलो नाही. त्याबाबत मी थोडासा दुर्दैवी आहे, म्हणा ना! पण एकदा पुण्याला ओशो आश्रमात पंडित रविशंकरजी आणि झाकीरभाई यांची एक मफल ऐकताना तशी समाधी लागली होती. मी स्वत:ला विसरून गेलो होतो..
‘ऱ्हिधून’ने माझी नवी ओळख निर्माण झाली. नवनवे अल्बम येऊ लागले. यामागे गीतिकाची प्रेरणा असते. प्रत्येक वेळी मी वादनासाठी उभा राहतो तेव्हा रंगमंचाला नमस्कार करतो. हजारो वर्षांच्या सांगीतिक परंपरेला तो नमस्कार असतो. डोळे मिटतो तेव्हा मन:चक्षूंसमोर अब्बाजी उभे राहातात! त्यांचे मनोमन आशीर्वाद घेतो. थोडय़ा साशंकतेने मी वाद्यावर पहिली थाप देतो. मला मनात उत्सुकता असते की ते वाद्य आता काय बोलणार आहे. ते वाद्य आधी माझ्याशी बोलते, मग रसिकांशी. मी नादब्रह्माच्या मध्यावर पोहचायला निघालेलो असतो. मफल संपल्यावर जाणवतं, अरे, आपण अजून किनाऱ्यावरच आहोत..
.. पण मला नादब्रह्माच्या मध्यावर जायचंच आहे! एकदा तरी!!
शब्दांकन – प्रा. नितीन आरेकर
‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील शनिवारी (२० एप्रिल) सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर-काटकर

Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण