अनेक मधुर प्रार्थना अंत:स्फूर्तीने गाणारे हजरत शेख नुरुद्दीन वली केवळ संतच नव्हते तर काश्मीरचे लोककवी ठरले. हिंदूंनी ‘सहजानंद’ म्हटलं. तर मुसलमानांनी त्यांना ‘शेख-उल-आलम’ म्हटलं, तर सर्वसामान्यांसाठी ते ‘आलमदारे-कश्मीर’ ठरले. त्यांची कविता ईश्वरी प्रेमाने ओथंबून जेवढी गोड झाली आहे तेवढीच स्वार्थावर, ढोंगावर, विसंगतींवर भाष्य करताना कठोरही
झाली आहे.
हजरत शेख नुरुद्दीन वली हे चौदाव्या शतकात काश्मीरमध्ये होऊन गेलेले एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय संत. ते वली तर होतेच, पण लोकनायक होते, कुशल संघटक होते आणि प्रतिभाशाली कवीही होते. काश्मिरी भाषा आणि साहित्याला नवसंजीवन देणाऱ्या ऋषिपरंपरेचे ते थोर अग्रणी होते. ‘काश्मीरचं कुराण’ म्हणून त्यांचं काव्य प्रतिष्ठा पावलं आहे.
‘नुंदऋषी’ हे त्यांचं आणखी एक नाव. पण काश्मिरी जनतेनं त्यांना अनेक नावांनी गौरवलं आहे. मुसलमानांनी त्यांना ‘शेख-उल-आलम’ म्हटलं, तर हिंदूंनी ‘सहजानंद’ म्हटलं. सूफींनी त्यांना ‘शमसुल आरिफिन’ म्हणजे सूफी संतांचे सूर्य म्हटलं तर काश्मीरच्या सर्वसामान्य जनतेसाठी ते ‘आलमदारे-कश्मीर’ ठरले.
‘नुंद’ म्हणजे परमप्रिय. तान्ह्य़ा नुरुद्दीनला त्याचे आई-वडील ‘नुंद’ म्हणत. पुढे स्वत: शेखसाहेबांनी तेच नाव आपलं म्हणून स्वीकारलं. ‘ऋषी’ हे नाव काश्मीरमधल्या एका विशिष्ट आध्यात्मिक संप्रदायाशी जोडलं गेलं आणि ते केवळ संस्कृत शब्दाच्या पारंपरिक अर्थाचं राहिलं नाही.
काश्मीर हे प्राचीन काळापासून शैव संप्रदायाचं एक प्रख्यात क्षेत्र होतं आणि बौद्ध मताचा प्रभावही त्या भूमीवर काही शतकं गाजत राहिला होता. शेख नुरुद्दीन वलींचं अवतरण झालं तो चौदाव्या शतकाचा कालखंड असा होता, की स्थानिक शैवांमध्ये कर्मकांड आणि मिथ्याचार यांनाच महत्त्व आलं होतं आणि बौद्धांनी उत्साह आणि अभिमान गमावला होता. इस्लाम आणि सूफी मताचा फैलाव सहज व्हावा असं अनुकूल वातावरण तयारच झालं होतं.
सूफी गुरू काश्मीर खोऱ्यात उतरले, तेव्हा त्यांचे विचार बौद्ध मतानं थोडय़ाफार प्रमाणात प्रभावित केले होते आणि तिथल्या शैव मताचीही थोडी छाया त्यांच्यावर पडली होती. त्यातून एक नवीच आध्यात्मिक परंपरा काश्मीरच्या भूमीवर प्रकट झाली. या विचारपरंपरेची बैठक समन्वयाची होती. शेकडो सैयद, विद्वान आणि प्रभावशाली सूफी संत त्या वेळी काश्मीरमध्ये दाखल झाले होते आणि धर्मपरिवर्तन मोठय़ा प्रमाणावर सुरू झालं होतं. अशा वेळी प्रारंभी संभ्रमित झालेले काश्मिरी पंडित नंतर मात्र धर्माभिमानानं धगधगून उठले होते. संघर्ष अटळ होता आणि तो केवळ धार्मिक क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता तर त्याला सामाजिक आणि राजकीय पदरही होते.
अशा पाश्र्वभूमीवर शेख नुरुद्दीन वलींनी काश्मिरात आधीपासून अस्तित्वात असलेल्या ऋषिसंप्रदायाचं पुनर्जागरण केलं. रिशुत किंवा ऋषियत या नावानं हा संप्रदाय लोकप्रिय झाला आणि त्यानं संघर्ष मिटवून समन्वयाचा पुरस्कार करणारी एक नवी धार्मिक व्यवस्था निर्माण केली. काश्मीरमधल्या जवळपास प्रत्येक परगण्यात शेखसाहेबांनी या परंपरेची केंद्रं स्थापन केली. या केंद्रांमधून मुख्यत: नीतीचा प्रचार होत राहिला.
ऋषिपरंपरेची लोकप्रियता शेखसाहेबांमुळे किंवा नुंदऋषींमुळे फार झपाटय़ाने वाढत गेली. मद्य-मांसाचा त्याग, सरळसोपी आचरणाची तत्त्वं आणि चिंतन-मननाचा उपदेश त्यांच्याद्वारा नुंदऋषींनी मुस्लीम नसलेल्या स्थानिक समाजालाही आपल्याकडे ओढून घेतलं. त्यांच्या शिष्टमंडळात ब्राह्मण होते, ठाकूर होते, पंडित होते आणि सैयदही होते. त्या सगळ्यांवर त्यांनी मुलांसारखं प्रेम केलं.
एका जाड खरबरीत चादरीपासून बनवलेला पायघोळ अंगरखा-काश्मिरी फिरन हा त्यांचा पोशाख होता. सारा काश्मीर प्रांत त्यांनी तीन वेळा पायाखालून घातला होता. त्यांची वचनं काश्मिरी जनतेनं सुभाषितांसारखी मनी-मुखी सांभाळली होती. त्यांच्यानंतर कित्येक दशकं आणि खरेतर शतकंही काश्मीरचं सामाजिक-धार्मिक वातावरण शेखसाहेबांच्या काव्यानं प्रभावित राहिलं. धार्मिक वेदीवर त्यांचं काव्यपठण, सांस्कृतिक मंचावर त्यांच्याच काव्यानं सुरू होणारं गायन, गावांमधल्या घराघरात मायबहिणींकडून होणारी म्हणी-वाक्प्रचारामधली किंवा गाण्यांमधली त्यांच्याच उद्गारांची आठवण – ते खरोखरच लोकनायकाचं रूप पावले होते.
इंधन चंदनासारखं दुर्मीळ होईल
साखरेपेक्षा मिठाची किंमत वाढत जाईल
खाद्यतेल अत्तरापेक्षाही महाग असेल
येणाऱ्या दिवसांचा नूर काही वेगळाच दिसेल!
एखाद्या भविष्यवाणीसारखे उच्चारलेले त्यांचे शब्द काळाच्या ओघात प्रत्यक्षाचं रूप पावत होते आणि त्यांच्या द्रष्टेपणानं त्यांचं लोकमानसातलं स्थान आणखी दृढ होत होतं. त्यांची क्रत्आत म्हणजे पदं, नज्म आणि श्रुक् म्हणजे श्लोक या सगळ्यांचं नातं थेट काश्मीरच्या मातीशी होतं. तिथून उगवलेली रूपकं आणि उपमा, तिथून झरणाऱ्या लयी आणि छंद, तिथे बहरलेले शब्द आणि अलंकार यांनी त्यांच्या कवितेलाही घडवलं होतं. चौदाव्या शतकातल्या काश्मीरचं सामाजिक-सांस्कृतिक जीवन सगळ्या रस-रूप-गंधासह कवितेत उतरलं होतं.
सगळ्याच मध्ययुगीन भक्तकवींप्रमाणे हजरत शेखसाहेब लोकभाषेत रचना करीत राहिले. ती लोकांच्या विचार-भावनांना बदलण्याची सर्वात जवळची, थेट आणि अचूक वाट होती.
अल्ला एकच एक
जरी त्या नावे असति अनेक।।
अणुरेणू या विश्वामधला
त्याच्या स्मरणी लीन सदा।
जो जो त्याच्या द्वारी तिष्ठत
त्याला अमृत देई स्वत:।।
वेगवेगळी दृश्ये असती
नाटक असले सुरू इथे।
कलाकार परि एकच आहे
पाहिल त्याला उमजतं ते।।
अशा त्यांच्या उपदेशांत धर्मातीत अशा ईश्वरी रूपाची झलक होती. संगीतमय होती त्यांची कविता. म्हणून पुढेही कित्येक र्वष ती काश्मीरमधल्या प्रार्थनाघरांमधून लोक गात राहिले.
तूच उसाला मधुर बनविले
मधमाशीला मधू दिला
हलत्या-लवत्या फांदीला तू
द्राक्षघडांचा बहर दिला
अरण्यातल्या हरणाला तू
दिव्य कस्तुरीगंध दिला
तुझ्या कृपेचा चमत्कार हा
हे मौला, मी शरण तुला
अशा मधुर प्रार्थना अंत:स्फूर्तीनं गाणारे हजरत शेखसाहेब केवळ संतच नव्हते तर काश्मीरचे लोककवी ठरले. अर्थात त्यांची कविता ईश्वरी प्रेमाने ओथंबून जेवढी गोड झाली आहे तेवढीच स्वार्थावर, ढोंगावर, विसंगतींवर भाष्य करताना कठोरही झाली आहे. मुल्ला मशिदींमधले व्यापारी बनले, पंडितांनी मंदिरांमधून मूर्तीच काढून टाकल्या, हजारो आहेत हे ढोंगी – यांच्यामधल्या एकाला तरी मुक्ती मिळेल का? सगळे मायेचे दास आहेत, असं सुनावणारे, अहंकारानं सगळं आयुष्य वाया गेलं म्हणून जागं करणारे आणि धार्मिक एकतेचा पाया मजबूत करण्याचा कसोशीनं प्रयत्न करणारे हजरत शेख शतकभरानं ‘मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे,’ या वचनाला महाराष्ट्रात प्रत्यक्ष करणाऱ्या तुकारामांची आठवण देतात.
काश्मिरात प्रचलित असलेली एक आख्यायिका अशी आहे, की जन्मल्यानंतर तीन दिवस आईचं दूध न प्यायलेल्या नुरुद्दीनला लाल देद किंवा लल् अरिफा हिनं आपल्या छातीशी धरलं आणि म्हटलं, की या जगात आलाच आहेस तर जगण्याचं सुख घेण्यात शरम कसली? आणि नुरुद्दीन पुढे आईचं दूध पिऊ लागला. ही कथा प्रतीकात्मकही आहे. ज्या लल्लेनं काश्मिरी माणसांच्या हृदयात खऱ्या धर्मतत्त्वांचा उदय व्हावा म्हणून आयुष्य वेचलं, हिंदू-मुसलमान भेदांपलीकडे जाणारं तत्त्वज्ञान सांगितलं, चारित्र्य आणि नैतिक मूल्यांचा आग्रह धरला आणि त्याच वेळी अंतरात्म्याचं गूढ गहन सौंदर्य प्रकट करताना काश्मिरी भाषेला शक्तिमंत केलं, त्या लल्लेचं स्तन्य पिऊन हजरत शेख नुरुद्दीन वलींनी ऋषियत मोठी केली. धर्माच्या प्रांगणातली ही भेदातीत माणुसकीची विरासत फार मूल्यवान आहे.
डॉ. अरूणा ढेरे -aruna.dhere@gmail.com