ऑस्ट्रेलियात मिळणारी नवजात शिशूसाठीची मलमली कपडय़ांची मझलिन स्वाड्ल ब्लँकेट अमेरिकेत  मिळत नसल्याची उणीव तिला जाणवली. तिथल्या नवजात शिशूंचं बालपण उबदार करण्याच्या निश्चयाने अफाट मेहनत, जिद्दीच्या जोरावर तिने या  वेगळ्याच व्यवसायात उडी घेतली आणि त्यात घवघवीत यश मिळवले. एखादी उणीव हीच संधी असते, असा संदेश नव्या उद्योजकांना देणाऱ्या  रेगन मोया जोन्सविषयी..

रेगन मोया जोन्स अठरा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातून अमेरिकेत आली. ‘द इकॉनॉमिस्ट’ या वृत्तपत्राच्या विपणन विभागात ती काम करत होती. तिच्या पहिल्या मुलीच्या-अ‍ॅनेसच्या जन्मानंतर तिला प्रथमच जाणीव झाली की, ऑस्ट्रेलियात बाळांसाठी वापरली जाणारी मलमलीची दुपटी- मझलिन स्वाड्ल ब्लँकेट अमेरिकेत मिळतच नाहीत. स्वॉड्ल म्हणजे लहान अर्भकांना दुपटय़ात घट्ट गुंडाळून ठेवण्याचा मलमली रुमाल. जगभरातील प्रसूतिगृहातील आया-दाया बाळांना त्यात गुंडाळून ठेवतात. मऊ दुपटय़ाच्या आश्वासक आणि ऊबदार स्पर्शामुळे नवजात अर्भकांना मातेच्या गर्भात असल्याप्रमाणे सुरक्षित वाटतं. ऑस्ट्रेलियात बाळाच्या जन्मानंतर अशी मलमलीची मऊ-मऊ दुपटीच वापरली जातात. रेगनला वाटलं की अमेरिकेतील आयांचीसुद्धा अशा नरम दुपटय़ांशी ओळख करून दिली, तर त्यादेखील त्यांचा आनंदाने वापर करतील. ऑस्ट्रेलियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आणि नुकत्याच पहिल्या मुलाला जन्म दिलेल्या तिच्या मैत्रिणीला- क्लॉडिया श्वार्ट्झला रेगनची कल्पना मनापासून आवडली. आणि त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.
पुढले अठरा महिने त्यांनी मलमल पुरवून दुपटी तयार करून देणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेतला. कापसापासून बनवलेलं अतितलम-मृदू असं मलमलीचं कापड अमेरिकेतील कुणीही पाहिलं-ऐकलं नव्हतं. शेवटी चीनमधल्या एका कापड उत्पादकानं नमुन्याबरहुकूम तलम मलमल बनवून दिली आणि त्याची दुपटी स्वॉड्ल ब्लँकेट्स- बनवून द्यायला सुरुवात केली. २००६ मध्ये या दोघींनी आपापल्या पहिल्या अपत्याच्या नावे या ब्लँकेट्सचा ‘एडन अँड अ‍ॅनेस’ हा ब्रँड तयार केला. सुरुवातीला टॅक्सीच्या डिकीतून विक्रीला सुरुवात करत, त्यांनी अनेक बूटीक स्टोअर्समध्ये अशी मझलिन ब्लँकेट्स ठेवायला सुरुवात केली. दरम्यान, अ‍ॅडम सँडलर आणि त्याची पत्नी या ब्लँकेटमध्ये त्यांच्या बाळाला गुंडाळून मॅलिबू बीचवर फिरतानाचा फोटो ‘यूएस वीकली’ मध्ये छापून आला आणि या उत्पादनाला ‘स्टार व्हॅल्यू’ लाभली. परंतु रेगननं मात्र सर्वसाधारण ग्राहक केंद्रस्थानी ठेवला होता. या ब्लँकेट्सचा खप प्रचंड वाढला पण, अजूनही हे उत्पादन उच्चभ्रूंमध्येच लोकप्रिय होतं. सर्वसामान्य माणसाला ते महाग वाटत होतं. या सुमाराला ‘टार्गेट’ डिपार्टमेंट स्टोअरनं रेगनकडे विचारणा केली की, याहून थोडीशी कमी जाडीची ब्लँकेट्स, थोडय़ा कमी किमतीला पुरवू शकाल का? रेगनपुढे हा पेचच होता. परंतु तिनं धाडसी निर्णय घेतला आणि त्यांना होकार दिला. आज थोडी कमी जाड अशी मलमलीची ब्लँकेट्स ‘टार्गेट’, ‘बेबीज आर अस’ आणि ‘बाय बाय बेबी’ यासारखी दुकानं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेलशा भावात उपलब्ध करून देत आहेत, तर अधिक सरस दर्जाचा माल बूटीक स्टोअर्समधून उच्चभ्रू ग्राहकांपर्यंत पोहोचतो आहे. २००९ मध्ये तिची भागीदार मैत्रीण- क्लॉडिया श्वार्ट्झ, आपला धंद्यातला हिस्सा विकून बाहेर पडली.
रेगन फक्त मलमलीच्या स्वॉड्ल ब्लँकेट्सवरच थांबली नाही. तिनं ऑस्ट्रेलियात वापरलं जाणारं, ‘पॉपॉ’ (paw paw) या फळापासून बनवलं जाणारं मलम अमेरिकी ग्राहकाला उपलब्ध करून द्यायचं ठरवलं. हे मलम फुटलेले ओठ, पायांच्या भेगा, बाळांचा डायपर-रॅश, एक्झिमा (इसब) या सर्व गोष्टींवर अत्यंत गुणकारी ठरतं. ऑस्ट्रेलियातील ‘लुकास’ कंपनी हे मलम बनवते. प्रथम रेगननं त्यांच्याकडे प्रस्ताव मांडून हे मलम वेगळ्या वेष्टनात अमेरिकी ग्राहकांसाठी भागीदारीत पुरवण्याची विचारणा केली. त्यांनी नकार दिला. त्यांच्या मलमात पेट्रोलियम जेली वापरली जाते हे कळल्यावर, त्याबद्दलची अमेरिकी लोकांची नापसंती लक्षात घेता, रेगननं एका संशोधकाच्या मदतीनं मेणाचा वापर करून नव्या कृतीनं हे पॉपॉ मलम, बॉडीवॉश आणि लोशन बनवलं. पुढे या गोष्टी अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत.
परंतु आजच्या या नेत्रदीपक यशामागे रेगनच्या अपार कष्टांचा पाया आहे. सुरुवातीला ती दिवसा पूर्णवेळ ‘द इकॉनॉमिस्ट’साठी काम करत असे. घरी आल्यावर संध्याकाळी सहा ते नऊ हा वेळ तिच्या तीन मुलींसाठी आणि पतीसाठी राखून ठेवत असे आणि त्यानंतर पहाटे तीन वाजेपर्यंत आपल्या ‘एडन अँड अ‍ॅनेस’ कंपनीसाठी काम करत असे. अवघे तीन तास झोप घेऊन ती कामाला जुंपून घेत असे. ती म्हणते की त्या काळात मुली तिला त्यांच्या नॅनीच्या नावानंच हाक मारू लागल्या होत्या आणि तिचं हृदय विदीर्ण होत होतं. सुरुवातीला धंद्यासाठी फिरतं भांडवल उभं करणं, हीसुद्धा प्रचंड मोठी समस्या बनली होती. तिनं २००६ साली लहान प्रमाणावर धंदा सुरू केला. मागणी प्रचंड वाढली, तेव्हाच २००८ सालची प्रचंड मोठी जागतिक आर्थिक संकट उभं ठाकलं. त्यापूर्वी तिला फिरतं भांडवल कर्जरूपात सहज मिळवता आलं असतं. आता ते अशक्य बनलं होतं. आप्त-मित्रांपुढे याचना करून तिनं मोठय़ा प्रयासांनी पैसे उभे केले आणि तो अडचणीचा काळ धकवला. आज तिची कंपनी अमेरिकेखेरीज ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये नोंदणीकृत झाली आहे. पाच वेगवेगळ्या देशांत तिच्या कंपनीचे वितरक आहेत आणि जगभरातील ३५ देशांतील तब्बल दहा हजार दुकानांत तिचा माल विकला जातोय. फक्त अमेरिकेतच १८०० बूटीक स्टोअर्स तिच्या या ब्लॅकेट्स विकत आहेत. त्याखेरीस टार्गेट, बेबीज आर अस यांसारखी प्रचंड मोठी डिपार्टमेंट-स्टोअर्ससुद्धा तिचा माल विकत आहेत.
तिच्या मालाची नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु तिच्या मालाच्या दर्जाची, गुणवत्तेची नक्कल करता न आल्यामुळे त्यांचे प्रयत्न फसले. तिच्या ब्लँकेट्सवर पारंपरिक प्रकारची कोंबडीची पिलं, बदकं, अस्वलं अशी चित्र नसतात. ती आकर्षक रंग आणि आगळीवेगळी डिझाइन्स छापते. यात तिच्या चार मुलीसुद्धा तिला मोलाचा सल्ला देत असतात. ‘माझ्या घरात जो माल रुचेल-पटेल, तोच माल मी ग्राहकांपुढे ठेवते,’ असं ती सांगते.
तिच्या मझलिन स्वॉडल ब्लँकेट्सवरून तिला ‘मझलिन-एव्हँजेलिस्ट’ (मलमलीची प्रचारक) असं बिरुद बहाल करण्यात आलंय. नवजात अर्भकांना तलम मलमलीच्या दुपटय़ात घट्ट लपेटून ठेवण्याची कृती तिला परम विश्वासू वाटते. त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तिनं ‘स्वॉड्ल लव्ह’ नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. विकसनशील देशातील अनाथ-आश्रमात वाढणाऱ्या अर्भकांना मातेच्या उबदार, रेशमी स्पर्शाची उणीव भासू नये, म्हणून त्यांना मऊ वस्त्रात गुंडाळून ठेवावं, हा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिनं एक सेवाभावी संस्थेचीही स्थापना केली आहे. तिच्या कंपनीने अलीकडेच ‘हेडन्स हार्ट’ या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. ‘हेडन्स हार्ट’ ही सेवाभावी संस्था, हेडन नावाच्या जन्मत:च हृदय-विकृती असलेल्या मुलाच्या आईनं सुरू केली. तिच्या बाळाचा मृत्यू झाल्यावर तिनं रेगनला पत्रानं कळवलं की, तिच्या बाळाला रेगनची ‘एडन अ‍ॅण्ड अ‍ॅनेस’ ब्लँकेट्स अतिशय आवडत असत. हे ऐकल्यावर रेगननं तिच्या ब्लँकेट्सवर ‘हेडन्स हार्ट’ प्रिंट छापायला सुरुवात केली आणि अशा ब्लँकेट्सच्या विक्रीतून उभे राहिलेले पैसे ‘हेडन्स हार्ट फाऊंडेशन’ला देणगी स्वरूपात द्यायला प्रारंभ केला. अशाच अनेक माता  तिला ई-मेल पाठवून आवर्जून कळवतात की, आता हयात नसलेली त्यांची बाळं, या दुपटय़ांमध्ये अतिशय आश्वस्त राहत असत. अशी पत्रं रेगनचं हृदय हेलावून टाकतात.  व्यवसायातल्या नफ्याइतकंच अशा प्रतिसादाचं मोलही तिच्या लेखी मोठं आहे.
या व्यवसायासाठी तिचा ‘द इकॉनॉमिस्ट’ मधला विपणनाचा अनुभव अत्यंत मोलाचा ठरला. ती आपला माल घेऊन नि:शंकपणे वेगवेगळ्या दुकानांची दारं ठोठावत जात असे. काही लोक तिचा माल ठेवत- काही नाकारत. पण २० वर्षांच्या विक्रीच्या अनुभवामुळे अशा नकारांमुळे तिला काहीही दु:ख होत नसे. तिचा तिच्या मालाच्या दर्जावर विश्वास होता. त्यामुळे आज माल नाकारणारे उद्या स्वत:हून तिच्याकडे मागणी घेऊन धाव घेतील, याची तिला खात्री वाटत होती. सुरुवातीच्या काळात तिच्या पतीनं तिच्या धंद्याची आर्थिक बाजू सांभाळली.
या व्यवसायात प्रगती गाठायची असेल तर काही गोष्टी तिने स्वत:साठी नक्की केलेल्या आहेत. ती सांगते, मी स्वत:वर विश्वास ठेवायला शिकते आहे, पण त्याच बरोबर अंतर्मनाचा कौल माझ्यासाठी महत्वाचा आहे. या क्षेत्रातलं मला काय माहीत नाही याची पक्की जाण मला आहे. त्यात मी इतरांचा सल्ला घेते. धंद्यासाठी अंगी ‘थिक स्किन’ (टीका पचवायची शक्ती) लागते, ती मी माझ्यात आणली आहे.  चांगली माणसं मिळणं फार अवघड असतं. तशी माणसं मिळाली, तर त्यांना सांभाळायला हवं. मी तो पर्यंत जाणीवपूर्वक करते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी अफाट वेळ आणि ऊर्जा खर्ची घालावी लागते याची मला पुरेपुर जाण आहे.
चार कन्यांच्या कर्तबगार आईची ही उद्बोधक कहाणी! ‘काहीही अशक्य नसतं’ असा संदेश देणारी!!
(‘अर्नशॉय’ज् आणि ‘वर्किंग वुमन’ मधील लेख-मुलाखतीच्या आधारे)    

Story img Loader