मनोज जोशी

हिंसाचाराचा आणि वांशिक तणावाचा अनुभव घेतल्याने दुसऱ्याप्रति द्वेष, तिरस्कार मनात रुजलेल्या, उनाड, ‘वाया गेलेल्या’ मुलामुलींचा वर्ग आणि त्यांना आपल्या प्रयोगशील शिक्षणाने नवा दृष्टिकोन देणारी त्यांची शिक्षिका एरिन यांची, ‘फ्रीडम रायटर्स’ची गोष्ट त्यातील ‘अ‍ॅन फ्रँक परिणामा’साठी पाहायला हवी.

academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
autoriksha
‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral
parag sonarghare paintings exhibition,
कलाकारण : माणसाने माणसाला अमूर्तासम पाहणे…
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांवर संस्कार केल्याची, त्यांना घडवल्याची आणि जीवनात योग्य दिशा दाखवल्याची उदाहरणे अनेक आहेत. मात्र मुलांच्या आयुष्यात रंग भरताना शिक्षिकेला स्वत:च्या आयुष्याचा अर्थ गवसण्याचा मनोहारी प्रवास ‘फ्रीडम रायटर्स’ या अमेरिकेच्या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे.  ही कहाणी एरिन ग्रुवेल या आदर्शवादी शिक्षिकेची आहे, तिने एका शाळेतील पूर्वग्रहदूषित वातावरणात घडवून आणलेल्या बदलाची आहे, मुलांच्या आयुष्यातील परिवर्तनाची आहे आणि सामान्य व्यक्तींना जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी आहे. एक तरुण शिक्षिका तिच्या ‘वाया गेलेले’ असं ठरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना सहनशीलता शिकवते, त्यासाठी ती सहनशीलता स्वत:मध्ये जाणीवपूर्वक आणते आणि शाळेच्या पलीकडील शिक्षणाचा पाठपुरावा करायला लावते, असा हा चढउतारांचा प्रवास आहे. चित्रपटाला प्रत्यक्ष घटनांचा आधार असल्याने हा प्रवास जिवंत झाला आहे.

एरिन ग्रुवेल ही न्यूपोर्ट बीच हे तिचं मूळ गाव सोडून कॅलिफोर्नियातील लाँग बीच इथे शिक्षिकेची तिची पहिलीच नोकरी सुरू करते. या गावानं दोन वर्षांपूर्वी टोळय़ांच्या हिंसाचाराचा आणि वांशिक तणावाचा अनुभव घेतला आहे. व्रुडो विल्सन हायस्कूलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांला इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी तिच्यावर येते. ‘विभागात उत्कृष्ट’ ठरलेल्या या शाळेनं दोन वर्षांपूर्वी ऐच्छिक एकात्मिक कार्यक्रम सुरू केलाय. सामाजिक पार्श्वभूमीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या मुलामुलींना शिक्षणाची चांगली संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र अनेक शिक्षकांच्या मते, यामुळे शाळेचं नुकसान झालंय. शाळेतील ७५ टक्क्यांहून अधिक हुशार मुलं शाळा सोडून गेलीत. एरिनला काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी आहे. पण ज्या प्रकारचा वर्ग तिच्या वाटय़ाला आलाय, तो तिच्यासाठी अनपेक्षित आहे. तेरा-चौदा वर्षांची ही मुलं, पण ‘कुठल्याही परिस्थितीत स्वत:चं संरक्षण करायचंच’ याचे अनेक पिढय़ांचे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत. त्यांच्यापैकी अनेकजण ‘गँग’मध्ये आहेत आणि काही बालसुधारगृहातून नुकतेच बाहेर पडले आहेत. त्यांचे वर्गातच वंशानुसार गट आहेत. त्यांच्या मारामाऱ्या होतात. सगळे एकमेकांचा  द्वेष करतात. मात्र सगळे मिळून सर्वात जास्त द्वेष करतात तो नव्यानं आलेल्या एरिनचा. शाळेचा पहिला दिवस. एरिनच्या मनात उत्सुकता आहे. मुलं येतात, पण कुणी तिची दखलही घेत नाही. सारे आपल्याच गुर्मीत. उनाड, शाळा चुकवणाऱ्या, अभ्यासात रस नसणाऱ्या मुला-मुलींचा वर्ग आपल्या वाटय़ाला आलाय, हे एरिनला लवकरच लक्षात येतं. पण तरीही ती विद्यार्थ्यांशी नातं जोडण्याचा प्रयत्न करते. तिची विभागप्रमुख मार्गारेट तिला फक्त शिस्त आणि आज्ञाधारकपणा यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देते. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याबद्दल आदराची भावना रुजवण्याचा एरिन प्रयत्न करते, पण ते तिच्याकडे दुर्लक्ष करत राहतात आणि वर्गाची घडी मोडत राहतात.

एक दिवस मधल्या सुटीत एरिन शाळेच्या आवारात नजर टाकते, तेव्हा संपूर्ण शाळा वांशिक आधारावर विभागलेली असल्याचं दृश्य तिला दिसतं. मग ती वर्गात मुलांसाठी काही खेळ घेते, मुलांच्या आवडीच्या विषयांवर प्रश्न विचारते. यातून मनं दुभंगली गेलेली मुलं त्यांच्याही नकळत एकमेकांजवळ येतात. आपण सगळेच क्लेशकारक अनुभवांमधून गेलेलो आहोत, हे कळून त्यांचे बंध घट्ट होऊ लागतात. यातून एरिन हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करू लागते. एक दिवस इव्हा बेनिटेझ (एप्रिल ली हर्नाडिझ) ही विद्यार्थिनी तिच्या गँगमधील मित्रांना शाळेत घुसवते, तेव्हा मोठा गोंधळ होतो. अनेक मुले अगदी ‘फ्रीस्टाइल’ मारामारी करतात. याचवेळी, आपल्या वर्गातील एका मुलानं कमरेला पिस्तुल खोचून ठेवलं असल्याचं एरिन पाहते. हे सगळं पाहून ती घरी जाते, तेव्हा निराशा तिच्या मनात शिरलेली असते. एका रात्री इव्हा तिच्या बॉयफ्रेंड, पाकोबरोबर  डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाते, त्या वेळी पाकोनं जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या एका विद्यार्थ्यांला- ग्रँट राइसला मारलेली गोळी इव्हाची वर्गातील प्रतिस्पर्धी सिंडी हिच्या मित्राला लागते आणि तो मरतो. दुसऱ्या दिवशी वर्गात एका मुलानं काढलेलं वंशवादी व्यंगचित्र एरिनच्या हाती पडतं आणि ती त्याचा उपयोग मुलांना ज्यूंच्या वंशसंहाराबद्दल सांगण्यासाठी करते. तुम्ही असेच जगत राहिलात, तर लोक तुम्हाला विसरून जातील. तुम्ही मेल्यानंतर कोणीही तुमची आठवण काढणार नाही, याचीही जाणीव ती विद्यार्थ्यांना करून देते.

नंतर एरिनच्या सांगण्यानुसार डायरी लिहिण्यातून मुलं त्यांचं मन मोकळं करतात. समाजात त्यांच्या वाटय़ाला येत असलेली उपेक्षा, त्यांच्या प्रियजनांचा डोळय़ांदेखत झालेला मृत्यू, इत्यादी मनात साठून राहिलेल्या गोष्टी व्यक्त करण्याची त्यांना पहिल्यांदाच संधी मिळते. तिच्या इतरही प्रयत्नांमुळे विद्यार्थी तिच्याशी आदरानं वागण्यास आणि तिच्या शिकवण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद द्यायला सुरुवात करतात.  लवकरच ती त्यांची ‘मिस जी’ होते. यादरम्यान, योग्यप्रकारे शिकवण्यासाठी संसाधनं मिळावीत म्हणून एरिन अधिकाधिक प्रयत्न करते. शाळेतील वरिष्ठांकडून प्रतिसाद मिळत नाही म्हणून ती दोन अर्धवेळ नोकऱ्या करून पैसे मिळवते. मात्र तिला अधिकाधिक विरोधाचा सामना करावा लागतो- विशेषत: तिची विभागप्रमुख मार्गारेट कँपबेलकडून.  नियमांनुसार चालणारी मार्गारेट अशी संसाधनं म्हणजे अपव्यय मानते. शैक्षणिक बोर्डानं आम्हाला अधिकार दिले आहेत, याची जाणीव ती एरिनला करून देते.

या सगळय़ांतून विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तनाची बीजं रोवली जातात. त्यांच्यासाठी तर हा अनोखा अनुभव असतोच, पण एरिनही या सुरवंटांचं फुलपाखरांमध्ये रूपांतर होण्याची साक्षीदार होत असते. यातून हुरूप वाढून ती नवनवे प्रयोग करते. कधीच गावाची सीमा न ओलांडलेल्या मुलांना ती सहलीला नेते. ‘म्युझियम ऑफ टॉलरन्स’मध्ये लहान मुलांची छायाचित्रं, ज्यूंची चित्रं मुलं गंभीर होऊन बघतात. त्यांच्या छळांच्या करुण कहाण्या मुलांच्या हृदयाला हात घालतात. यानंतर, ज्यूंच्या वंशसंहारातून बचावलेल्या काही ज्यूंशी एरिन मुलांची भेट घालून देते. या साऱ्यांचा परिणाम होऊन, वर्गातील सतत जवळ पिस्तुल बाळगणारा मुलगा त्याच्या पिस्तुलाची विल्हेवाट लावतो. सुटय़ा संपून दुसरं सत्र सुरू होतं. शाळेच्या घट्ट रूढ चौकटीला धडका देत एरिनचे निरनिराळे प्रयोग सुरू असतात. पहिल्याच दिवशी एरिन मुलांना स्वत:तील परिवर्तनाची इच्छा (टोस्ट फॉर चेंज) व्यक्त करायला लावते. इकडे विद्यार्थ्यांना रोजनिशी लिहिण्यातून स्वत:चीच वेगळी ओळख होत असते. मग एरिन स्वत: पैसे खर्चून आणलेलं ‘दि डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’ मुलांच्या हाती देते. मुलं भान हरपून हे पुस्तक वाचतात, ज्यूंची दु:खं समजून घेतात आणि वाचलेल्या मजकुराबाबत एरिनला प्रश्नही विचारत राहतात. 

या पुस्तक वाचनाची टिपणं लिहायला मुलांना सांगायचं, असा एरिनचा विचार असतो. पण मार्कस या विद्यार्थ्यांनंच सुचवलेल्या कल्पनेनुसार ती त्यांना अ‍ॅन फ्रँक व तिच्या कुटुंबीयांना लपायला मदत करणाऱ्या मीप गिस यांना पत्र लिहायला सांगते. मग एकजण आपण मीप गिस यांना आपल्याशी बोलायला आमंत्रित करूया, असं सुचवतो. युरोपात राहणाऱ्या वयोवृद्ध मीप गिस यांना लाँग बीचमधील शाळेत बोलावण्याची कल्पना सारेजण उचलून धरतात. यासाठी बराच खर्च लागणार असल्यामुळं मुलं पैसे उभे करण्याची तयारी करतात. या अभिनव उपक्रमाची स्थानिक वर्तमानपत्रंही दखल घेतात. लाँग बीचमधील हॉटेल्सच्या मदतीनं मुलं खाद्यपदार्थाचे स्टॉल लावतात. उत्साहानं फसफसणारी मुलं ‘डान्स कॉन्सर्ट’ आयोजित करतात. एरिन स्वित्र्झलडमधील ‘अ‍ॅन फ्रँक फाऊंडेशन’शी संपर्क साधून मीप गिस यांचा ठावठिकाणा काढते. आणि एक दिवस वर्तमानपत्रात बातमी झळकते: ‘अ‍ॅन फ्रँकला लपायला मदत करणारी महिला विल्सन हायस्कूलला भेट देणार!’ यावर मुलांची प्रतिक्रिया असते: ‘मिस जीने एखादी गोष्ट करायची ठरवली, की त्यांना कोणीही थांबवू शकत नाही हे नक्की!’

मीप गिस मुलांना स्वत:चे अनुभव सांगतात. ते ऐकून भारावलेला मार्कस म्हणतो, ‘‘मला आतापर्यंत कुणी हीरो नव्हता, पण आता तुम्ही माझ्या हिरो आहात.’’ त्यावर गिस यांचं उत्तर असतं, ‘‘त्या वेळी जे करणं योग्य होतं. तेच मी केलं. आपण सारेच सामान्य आहोत, पण एखादी सामान्य व्यक्ती त्याच्या आवाक्यात असलेल्या मार्गानं अंधाऱ्या खोलीत छोटासा दिवा उजळवू शकते. मी तुमची पत्रं वाचली आणि तुमच्या शिक्षिकेनं तुमच्या अनुभवांबद्दल अनेक गोष्टी मला सांगितल्या. तुम्हीच हीरो आहात!’’ गिस यांच्या प्रांजळ कथनामुळे इकडे विद्यार्थिनी इव्हा कोर्टात खोटी साक्ष देण्याचा विचार बदलते आणि पाकोनेच सिंडीच्या मित्राला मारल्याचं सांगते. तिच्या साक्षीमुळे निर्दोष ग्रँट राइस सुटतो आणि पाको अडकतो. यामुळे पाकोच्या गँगचे लोक तिला मारायलाही येतात, पण तिच्या वडिलांना असलेल्या प्रतिष्ठेमुळे तिचा जीव वाचतो. 

विद्यार्थ्यांसाठी जणू आयुष्य वाहून घेतलेल्या एरिनच्या संसाराची घडी मात्र हळूहळू विस्कटत असते. तिचा नवरा स्कॉट कॅसे (पॅट्रिक डेम्प्सी) याच्या मनात कसलीच महत्त्वाकांक्षा नाही. त्याला जास्तीत जास्त वेळ त्याच्याबरोबर घालवणारी पत्नी हवी असते. एरिन विद्यार्थ्यांना जास्त वेळ देत असल्यामुळे, अनेकदा रात्री उशिरा घरी येत असल्यामुळे तो नाराज होत जातो. तो त्याच्या परीनं एरिनला ते सांगूही पाहतो, पण इच्छा असूनही एरिन त्याला अपेक्षित असं वागू शकत नाही. अखेर विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीसाठी चार वर्षांपूर्वीच सुरू झालेल्या एरिनच्या संसाराचा बळी जातो. स्कॉट तिला घटस्फोट देतो.

एरिनची शाळेतली प्रयोगशील वाटचालही सुखकर नसते. आपलं महत्त्व कमी होत असल्याच्या जाणिवेमुळे तिची विभागप्रमुख मार्गारेट कँपबेल (इमेल्डा स्टाँटन) सतत तिच्या प्रयत्नांत अडथळे आणते. एरिनच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून नवी पुस्तकं न मिळू देणं, तिची सहलीची कल्पना उडवून लावणं, इत्यादी गोष्टींतून ती एरिनला शक्य तितका विरोध करत असते. त्यावर उपाय म्हणून एरिन थेट शैक्षणिक बोर्डाचे अध्यक्ष डॉ. कार्ल कोन (रॉबर्ट विज्डम) यांच्याशीच संपर्क साधते आणि आपल्या अडचणी कमी करवून घेते. मुख्याध्यापक बॅनिंग हेही मार्गारेटलाच पाठिंबा देत असतात. नियमांनुसार आणि ज्येष्ठतेच्या निकषामुळे एरिन पुढील वर्षी आपल्याला शिकवणार नाही हे विद्यार्थ्यांना कळतं, तेव्हा ते त्यांची अस्वस्थता तिला बोलून दाखवतात. एरिननं मुलांसाठी जीव तोडून केलेल्या मेहनतीला फळं आल्याची दखल बोर्डाचे पदाधिकारीही घेतात. परिणामी, एरिन आणि तिचे विद्यार्थी ज्युनियर आणि सीनियर अशी पुढची दोन वर्ष सोबत राहतील, असा निर्णय होतो. मुलांच्या आनंदाला भरतं येतं!

हा निर्णय होण्यापूर्वी ‘माझा शेवटचा प्रकल्प’ म्हणून एरिन मुलांनी लिहिलेल्या रोजनिशींचं ‘डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक सारखं’ पुस्तक तयार करण्याची कल्पना मांडते. त्यासाठी संगणकांच्या स्वरूपात त्यांना एक उद्योजक मदतही करतो. हे पुस्तक- ‘फ्रीडम रायटर्स डायरी’- १९९९ मध्ये प्रकाशित झालं. एरिननं केलेल्या प्रयत्नांची कायमस्वरूपी लेखी नोंद झाली. याच पुस्तकावर हा ‘फ्रीडम रायटर्स’ चित्रपट तयार करण्यात आला आहे. रिचर्ड लेग्रेवेनीज हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मात्र चित्रपटभर व्यापून राहाते ती समाजातील उपेक्षित मुलांचं सळसळत्या उत्साही मुलांमध्ये रूपांतर करणारी एरिनच- अर्थात अभिनेत्री हिलरी स्वँक. जणू ती खरीखुरी शिक्षिका असावी, इतका सहजसुंदर अभिनय तिनं केला आहे. ही स्त्री काहीशी भोळी आहे, पण तितकीच खंबीरही. मुलांच्या मनांमध्ये शिरण्याच्या तिच्या प्रयत्नांत कुठेही अभिनिवेश नाही आणि शाळेतल्या वरिष्ठांशी सतत संघर्ष होत असूनही त्यात आक्रमकता शिरलेली नाही. या साऱ्यामुळे हा चित्रपट जिवंत वाटतो.  हा चित्रपट ‘ब्रह्मे ग्रंथालया’च्या सौजन्यानं त्यांच्या संकेतस्थळावर तसंच ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर पाहता येईल.

Story img Loader