गणेश मतकरी

स्त्रीवादी-स्त्रीकेंद्री चित्रपट गंभीर किंवा सामाजिक सद्य:स्थिती मांडणारेच असावेत असा रूढ समज आहे. परंतु भयपटासारख्या लोकप्रिय चित्रपट प्रकारामध्येही स्त्रीवादी चित्रपट झाले आहेत.  ‘अ गर्ल वॉक्स होम अलोन अ‍ॅट नाइट’ हा २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला कृष्णधवल इराणी चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण! व्हॅम्पायरपटांची ‘ड्रॅक्युला’पासून तयार झालेली पुरुषप्रधान चौकट हा चित्रपट मोडतो. अन्याय करणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या विरोधात उभी राहणारी ही व्हॅम्पायर तरुणी स्त्रीच्या आत्मशक्तीचं आगळंवेगळं, अतिमानवी दर्शन घडवते.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका

स्त्रीवादी किंवा स्त्रीकेंद्री चित्रपट म्हटलं, की त्याकडे एका अतिगंभीर चष्म्यातून पाहण्याची आपली खोड आहे. मग त्यात समाजाचं जिवंत चित्र हवं, वास्तववाद हवा. हे चित्रपट शोकांत असल्यास उत्तमच; पण नसले, तरीही भय/विनोद यांसारख्या लोकप्रिय चित्रपट प्रकारांपासून त्यांनी चार हात लांबच राहावं, वगैरे. हे असं असायचं कारण नाही. आणि खरं म्हणजे जगभर सर्व चित्रपट प्रकारांतून स्त्रीवादी दृष्टिकोन येऊन गेलेला आहे. भयपटांमधे तर स्त्रियांबद्दलचा गंभीर विचार अनेक पातळय़ांवर झालेला आहे. ‘एलिअन’ (१९७९), ‘द क्राफ्ट’ (१९९६) पासून ‘मिडसॉमर’ (२०१९) पर्यंत अशा चित्रपटांची अनेक उदाहरणं पाहता येतात. आपल्याकडे आलेला ‘स्त्री’ (२०१८) चित्रपट हे याचंच एक पुसट उदाहरण आहे. पुसट अशासाठी, की मुळातच त्यात तर्काचे अनेक घोळ आहेत आणि चित्रपटात त्यातल्या अतिमानवी शक्तीचं पुरुषद्वेष्टेपण साकारणं अधोरेखित होत असलं, तरीही मुळात ती पुरुषांचीच साहसकथा आहे. ‘स्त्री’ नाव असूनही, स्त्रीची भूमिका त्यात जुजबी आहे. मी वर सांगितलेल्या उदाहरणांत तसं नाही.

भयपटांमधे स्त्री व्यक्तिरेखांचा वापर प्रभावी ठरू शकतो, तो मानवी इतिहासात स्त्रियांवर वेळोवेळी होत गेलेल्या अत्याचारांच्या संदर्भानं. स्त्रियांची ताकद, विचार दाबून ठेवण्याचे जे अनेक प्रयत्न झाले, त्यात जरा वेगळय़ा, प्रगत विचारांच्या, वा बंडखोर स्त्रियांना चेटकीण घोषित करून समाजाबाहेर काढण्या-मारण्यापासून अनेक भीषण प्रकार झालेले आहेत. या अत्याचारांचा थेट वा प्रतीकात्मक बदल, हा अनेक भयपटांचा विषय झालेला आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय तो ढोबळमानानं त्या वर्गात येऊ शकेल, पण शैली, पार्श्वभूमी आणि मांडणी, या कोणत्याच बाबतीत त्याला परिचित भयपटाचं लेबल लावता येणार नाही. भयपटासह तो अनेक चित्रपट प्रकारांशी नातं सांगतो.

नावापासूनच या चित्रपटाचा वेगळेपणा सुरू होतो. ‘अ गर्ल वॉक्स होम अलोन अ‍ॅट नाइट’ हे लांबलचक नाव काही प्रमाणात दिशाभूल करणारं आहे. ते जी प्रतिमा उभी करतं, ती बळीची आहे. ‘रात्रीच्या वेळी घरी निघालेली एकटीच मुलगी’ म्हटल्यावर आपल्याला त्या मुलीची काळजी वाटायला लागते. तिला काहीतरी होणार आहे, तिच्यावर एखादं संकट येऊ घातलंय, असं या शीर्षकातून अप्रत्यक्षपणे सूचित होतं. प्रत्यक्षात त्या मुलीला धोका नाही, तर मुलीपासूनच धोका आहे.

‘व्हॅम्पायर’ जॉन्र हे थेट ‘काउंट ड्रॅक्युला’पासून पुरुष व्हॅम्पायर्सनी प्रचंड प्रमाणात ग्रासून टाकलेलं आहे. यात स्त्रियांचं रूपांतर व्हॅम्पायर्समध्ये होत नाही असं नाही, पण प्रामुख्यानं त्यांचा वापर हा मुख्य व्यक्तिरेखेच्या बळी, हस्तक आणि प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून सांगायचं, तर ‘सेक्स सिम्बॉल’ असल्यासारखा झालेला दिसतो. (या गणिताला उलटवून टाकणारं अमेरिकन टेलिव्हिजनवरचं एक लोकप्रिय उदाहरण म्हणजे ‘बफी द व्हॅम्पायर स्लेअर’ मालिका, ज्यात तरुणीच्या मागे व्हॅम्पायर लागण्याऐवजी तरुणीचीच योजना शिकाऱ्याच्या भूमिकेत केली गेली.) ‘अ गर्ल वॉक्स होम अलोन अ‍ॅट नाइट’मधली मुलगी ही व्हॅम्पायर आहे. चित्रपटात ‘गर्ल’ यापलीकडे तिची फार ओळख आपल्याला करून दिली जात नाही. पण अणकुचीदार सुळे आणि बळींवर झडप घालण्याची वृत्ती या दोन घटकांपलीकडे जाणारी व्हॅम्पायर्सची जी वैशिष्टय़ं सर्वसाधारणपणे अशा कथानकात दाखवली जातात, ती आपल्याला ‘गर्ल’मध्ये पाहायला मिळत नाहीत. ती एखाद्या रहस्यमय वास्तूत राहात नाही किंवा शवपेटीत झोपत नाही. तिचं घर एखाद्या सर्वसाधारण तरुण मुलीचं वाटावं असंच आहे. रेकॉर्डस, भिंतीवर लावलेली पोस्टर्स, एकटीनं केलेलं नृत्य आणि तरुण नायकाबद्दल वाटणारं आकर्षण, या साऱ्याच गोष्टी पाहता ती इतर चार मुलींसारखीच आहे. तिच्यातलं व्हॅम्पायर जागं होतं, ते केवळ ती रक्तपिपासू आहे म्हणून नाही, तर समोर झालेला एखादा अन्यायच तिच्यात हा बदल अपरिहार्यपणे घडवून आणतो. ती शिकार करते त्यामागचं कारण एखादी आदिम ओढ नाही, तर त्यामागे तिची नैतिक जाण, स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचा बदला घेण्याची गरज, हेच आहे. तिनं केलेली बळींची निवड, त्यांना मारण्यासाठी निवडलेला क्षण, यातून हेच सुचवलं जातं. चित्रपटात एका लहान मुलाबरोबर ‘गर्ल’चा संवाद होतो, ज्यात तो चांगला आहे का वाईट, असा प्रश्न ती करते. तो चांगला आहे, अशी खात्री पटल्यावरही ‘माझं तुझ्यावर कायम लक्ष असणार आहे,’ अशी धमकीवजा सूचना त्याला द्यायला ती विसरत नाही.

या कृष्णधवल चित्रपटाची प्रसिद्धी करताना  ‘द फस्र्ट इराणीयन व्हॅम्पायर वेस्टर्न’ अशी करण्यात आली होती, हे लक्षात घेतलं तर तिचा दृश्यभाग अमेरिकी हॉरर चित्रपटांप्रमाणे नसणार हे स्पष्ट होतं. यात गमतीची गोष्ट ही, की चित्रपटाचं कथानक जरी इराणमधे घडणारं असलं, तरी चित्रपट अमेरिकेतच चित्रित करण्यात आला आहे. इराणचे कायदे आणि सेन्सॉरशिप यांना बगल देण्यासाठी तसं करण्यात आलं. ते फारसं कठीण नाही, कारण चित्रपटाला इराणमधली परिचित स्थळं दाखवायची नाहीत. एक लहानसं, बरंचसं निर्मनुष्य गाव, तिथला एक औद्योगिक प्रकल्प, काही घरं आणि गल्लीबोळ वगळता इथे फारसं काही दिसत नाही. चित्रपटात वातावरणनिर्मितीला जरूर महत्त्व आहे, पण ती करताना नेपथ्यापेक्षा अधिक महत्त्व छायाप्रकाशाच्या खेळाला आहे. चित्रपटाला ‘वेस्टर्न’ का म्हटलं असावं, ही गोष्ट अंदाज करायला कठीण नाही. वेस्टर्न चित्रपटांमधल्या आगापिछा नसलेल्या, पण न्यायाची चाड असलेल्या लढाऊ नायकाला आपण अनेकदा पाहतो. ‘अ गर्ल वॉक्स..’मधली एकाकी नायिका हे त्या प्रकारच्या व्यक्तिरेखेचंच बदललेलं रूप आहे असं म्हणता येईल. तिचा लढा चालला आहे तो समाजात तिला आढळणाऱ्या दुष्प्रवृत्तींशी.

‘गर्ल’चं प्रमुख पात्र (शीला वांड) एक निरीक्षक असल्यासारखं आहे. पारंपरिक अर्थानं कथानायक आहे, तो अराश (अराश मरांडी) हा आपल्या ड्रग अ‍ॅडिक्ट वडिलांबरोबर राहणारा तरुण. कथानकातल्या मुख्य घटना अराशच्या आयुष्यात घडतात. त्याच्या वडिलांनी केलेली र्कज चुकवायला पैसे नसल्यामुळे ड्रग पुरवणाऱ्या सईद (डॉमनिक रेन्स) या दलालानं अराशची गाडी ताब्यात घेणं, ही या घटनांची सुरुवात म्हणावी लागेल. सईद अराशच्या गाडीत एका वेश्येबरोबर रममाण झाला असताना ‘गर्ल’च्या नजरेला पडतो आणि तिचा या कथेत प्रवेश होतो. ‘गर्ल’ची अराशबरोबर ओळख होते, तेव्हा तो तिच्या पाहण्यातल्या इतरांसारखा नाही, हे तिच्या लक्षात येतं. त्याच्या जवळ येऊनही ती त्याला मारण्याचा मोह टाळते. त्याच्याशी मैत्री वाढवते.

सामान्यत: इराणी चित्रपटांत आपल्याला दिसणाऱ्या व्यक्तिरेखांसारख्या या व्यक्तिरेखा नाहीत. विशेषत: ‘गर्ल’ आणि अराश यांचं वळण वेगळं आहे. ‘गर्ल’ बाहेर फिरताना हिजाब वापरते, पण त्या पेहरावाचा परिणाम हा काहीसा रहस्यमय आहे. तिचं सावल्यांमधे मिसळून जाणं त्या वेशानं स्वाभाविकपणेच घडतं. तिच्या घरातली सजावट, तिचा पट्टय़ापट्टय़ांचा टीशर्ट, अराशच्या वेशभूषेचं बंडखोर प्रतिमेचा लोकप्रिय अमेरिकेचा  अभिनेता जेम्स डीनशी असलेलं साम्य, त्याची ‘फोर्ड थंडरबर्ड’ गाडी, यांमुळे त्या दोघांमध्येही इराण आणि अमेरिका यांचं फ्यूजन दिसतं. या दोघांचंही इराणी समाजाचा भाग असून नसणं या गोष्टींनी सुचवलं जातं. त्याची विचारशैली पारंपरिक पुरुषी वर्चस्ववादी धर्तीची नाही आणि ती तर नीतिमूल्यांशी फारकत घेणाऱ्याला शिक्षा देणारी ‘आउटसायडर’च आहे.

‘अ गर्ल वॉक्स..’ घटनांच्या बाबतीत विरळ आहे. रंजनप्रधान चित्रपटांना जसं काहीतरी घडवत राहण्याची हौस असते तशी त्याला नाही. ज्या गोष्टी घडतात त्या थोडक्या आणि त्यांनाही एक निश्चित कार्यकारणभाव लागू पडत नाही. चित्रपटाची दृश्य बाजू भक्कम आहे. ‘गर्ल’चं व्हॅम्पायर असणं हे आपल्या कल्पनाशक्तीवर सोडलेलं नाही, पण त्यात व्हिज्युअल इफेक्ट्सचा भडिमार करून घाबरवण्याचा प्रयत्नही नाही. अनेकदा अतिशय साध्या गोष्टींमधून चित्रपट अस्वस्थ करणाऱ्या जागा शोधतो. सईदच्या मृत्यूकडे नेणारे काही क्षण, अराशचे वडील कुठेतरी जात असताना समोरच्या फुटपाथवर ‘गर्ल’ दिसणं आणि ते करतायत त्या सगळय़ा गोष्टींची तिनं नक्कल करणं, भिंतीपुढून स्केटबोर्डवर जाताना ‘गर्ल’ तरंगत असल्याचा होणारा भास, अशा अनेक जागा म्हटलं तर अगदी साध्याशाच आहेत, पण तरीही त्या प्रभावी ठरतात.

या चित्रपटाचा बराचसा परिणाम दिग्दर्शिका आना लिली आमिरपोरच्या तो कृष्णधवल करण्याच्या निर्णयामुळेही वाढत गेलेला आहे. लाईल व्हिन्सेन्टच्या छायाचित्रणाचा यात मोठा वाटा आहे. काही विशेष न करताही ‘गर्ल’ अतिमानवी असल्याचं सूचन, गावातल्या औद्योगिक प्रकल्पाचा वातावरणावरला पगडा, निर्मनुष्य जागांना आणून दिलेलं व्यक्तिमत्त्व, हे सारं या काळय़ा पांढऱ्या दृश्यांमधून शक्य होतं. ड्रॅक्युलाचीच एक आवृत्ती असलेल्या दिग्दर्शक एफ. डब्ल्यू. मुर्नाव यांच्या ‘नॉसफेरातू’ (१९२२) या मूकपटाचा प्रभाव या छायाचित्रणावर आणि एकूणच या चित्रपटावरही आहे.

 ‘अ गर्ल वॉक्स होम अलोन अ‍ॅट नाइट’मध्ये स्त्रियांची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या काही पुरुषी समाजाच्या बळी आहेत, काही पुरुषांचा आपल्या सोयीसाठी वापर करणाऱ्या आहेत, तर काही ‘गर्ल’सारख्या समाजातल्या भल्याबुऱ्याच्या तोलावर लक्ष ठेवून आहेत. या चित्रपटाचा शेवट हा भयपट ज्या प्रकारे संपतात तसा नाही. तो फारसा नाटय़पूर्णही नाही, पण अर्थपूर्ण मात्र आहे. ‘गर्ल’चं बहिष्कृतासारखं जगणं कदाचित पुढेमागे संपू शकेल असं या शेवटात सूचित होतं. कदाचित तसं समजणं हा निव्वळ आशावादही असेल, पण या गडद चित्रपटाला तो एक सकारात्मक किनार आणून देतो. एवढं मात्र खरं.

Story img Loader