वाटलं होतं की मुक्त होताच ही पिल्लं टुणकन् उडी मारून धावत सुटतील, पण तसे झाले नाही. चारही गोंडस बाळं माझ्या पायाशी खेळू लागली. आपल्या गोल इवल्याशा पाणीदार डोळ्यांनी माझ्याकडे आशेने पाहू लागली..
पाळीव प्राण्यांची आमच्या घरी तशी कुणालाच आवड नाही. मांजर आले किंवा अंगणात भटके कुत्रे आले की आमच्या लहानग्या अपर्णासकट सगळीजणं हातात काठी घेऊन मागे लागतात आणि त्या प्राण्यांना हुसकावून देतात.
एक दिवस एक गुबगुबीत मांजर ‘म्याव म्याव’ करीत घरात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागली. या खोलीतून त्या खोलीत, परसदारी, अडगळीच्या जागी, पोर्चमध्ये गाडीखाली इकडून तिकडे धावू लागली. किती म्हणून हाकलले तरी ती थोडा वेळ बाहेर जाई आणि पुन्हा परसदारातून घरी प्रवेश करी. काय मांजराने भंडावून सोडले आहे म्हणून काठी हाती घेऊन मांजरीच्या मागे लागून मी थकलो.
 माडीवर जायच्या जिन्याखाली आमचे अडगळीचे सामान पडलेले आहे. जे टाकायचे नाही पण समोरही नको अशा प्रकारचा सगळा पसारा या पायऱ्यांखाली पडून असतो. सकाळी ब्रश करीत माडीवरून खाली आलो तर अंधाऱ्या जिन्याखालून मांजरीचा खोल आवाज कानी आला. मी काठी शोधू लागलो तर आई म्हणाली, ‘‘नको हाकलू तिला. तिला बाळ होणार आहे.’’ मग मी मांजर हाकलून देण्याची मोहीम सोडून दिली. अपर्णाला आजीने सांगितले होते की मांजरीला गोंडस पिले होणार आहेत. अपर्णाला या बातमीने विलक्षण आनंद झाला. तासा-दोन तासांत गल्लीतील सगळ्या मैत्रणींकडे तिने ही आनंदवार्ता पोहोचवली. मुली वरचेवर जिन्याखालच्या अंधारात डोकावू लागल्या. कोणी जवळ गेले की मांजर फिस्कारून अंगावर धावून येऊ लागली. मुली घाबरून दूर पळू लागल्या. पण मांजरीच्या तब्बेतीची विचारपूस हा मुलींच्याही रोजच्या गप्पांमधला विषय होऊन बसला.
काही दिवसांनी, रात्रीच्या वेळी अंधारातून थोडीशी धुसफुस आणि किलबिल आवाज येऊ लागला. बॅटरीचा प्रकाश झोत पाडून मी पाहिले. डोळे टवकारून झेप घेण्याच्या पवित्र्यात मनीमाऊनं माझ्याकडे पाहिलं. तिच्या अंगाखांद्यावर तीन-चार कापसाचे गोळे खेळत होते. आईच्या अंगाला ढुशा देत होते.
भूक तहान विसरून अपर्णाच्या मैत्रिणी तळहातावर गाल टेकवून पिलांचे बागडणे पाहात तासन्तास बसू लागल्या. आईही मांजर जातीवरील राग विसरून सकाळ-संध्याकाळ बशीत थोडे थोडे दूध मनीमाऊसमोर ठेवू लागली. दिवसागणिक पिले मोठी होऊ लागली. त्यांचा हैदोस वाढला. एकसारखी ती परस्परांशी भांडत, फिस्कारत, धक्के देऊन भांडताना एकमेकांना खाली पाडत. पिलांना जागेवर ठेवून मांजर बाहेर गेली की पिल्ले ओरडून ओरडून घर डोक्यावर घेऊ लागली. व जिन्याखालची जागा ओलांडून घरभर निर्भयपणे बागडू लागली. कुठे किचन कट्टय़ावरील भांडी कलंड, कुठे डायनिंग टेबलवरील काचेचे ग्लास खेळता खेळता धक्का लावून पाड, किंवा कशातही तोंड खुपस, असे प्रकार सुरू झाले. एव्हाना अंथरुणातील चारपाच उशा पिलांनी आपल्या नखांनी फाडून टाकल्या होत्या. अखेर आई म्हणाली, ‘‘पिल्लं पिशवीत घाल व बाहेर नेऊन सोड.’’
पिशवी घेऊन मी पकडायला लागलो तर घरभर ती हुंदडू लागली. रॅकवर कुठे कुठे उडय़ा मारू लागली. एकाला पकडावे तर दुसरे पसार. दुसऱ्याला पकडावे तर पहिले टुणकन् उडी मारून धावत जायचे, ही पकडापकडी सुरू होती तेव्हा बाहेरून फिस्कारत मांजरी आली. एरव्ही गरीब वाटणारी मनीमाऊ वाघिणीसारखी नखे काढून माझ्या अंगावर धावून आली. घाबरून मी पिशवी टाकून पळालो. मोहीम इथेच थांबवावी या विचारापर्यंत आलो.
  पण आई म्हणाली, ‘एक युक्ती कर. मांजर बाहेर गेली की घराची दारे खिडक्या घट्ट बंद कर आणि मगच पिल्ले पकड.’ त्याप्रमाणे बऱ्याच प्रयत्नांनंतर चारही पिले पकडली. पिशवीचे तोंड बांधले. आई म्हणाली, ‘‘मांजराची जात भारी हुशार असते. जवळ कुठे सोडून देशील तर पुन्हा लगेच परत येतील. दूर जा. स्कूटरने मैल दोन मैलांवर शेतात सोडून ये. सगळ्या गाद्या, उशा, रेशमी कपडय़ांची पिलांनी वाट लावली आहे. विरजणाला दुधाचा थेंब म्हणून शिल्लक ठेवत नाहीत. रात्रभर भांडी पाडून हैदोस घालतात. दयामाया दाखवू नकोस. सोडून ये त्यांना.’’
पायाशी पिशवी ठेवली व स्कूटरला किक् मारली. जिवाच्या आकांताने पिल्ले चिवचिवत होती. पिशवीचे तोंड बंद केल्याने बहुधा ती भयभीत झाली असावीत. मात्र, काहीही झाले तरी भावनाप्रधान व्हायचे नाही. मन घट्ट करायचे असे मी मनाशी एकसारखा म्हणत होतो. अशा विचारातच मी स्कूटरला गती दिली. गावातली वस्ती संपली. पाठोपाठ रिकामे माळरान लागले. माझी स्कूटर अजून धावतच होती. उताराला एक उसाचे शिवार लागले. मी स्कूटर थांबविली. पिशवीतून पिलांना बाहेर काढलं.
वाटलं होतं की मुक्त होताच पिले टुणकन् उडी मारून धावत सुटतील. पण तसे झाले नाही. चारही गोंडस बाळं माझ्या पायाशी खेळू लागली. आपल्या गोल इवल्याशा पाणीदार डोळ्यांनी माझ्याकडे आशेने पाहू लागली. मला दया आली. तिन्हीसांज होत होती. अंधार पसरत होता. ही भयाण जागा, हे इवले निरागस जीव काय करतील? कोठे आश्रय शोधतील? रानमांजरे, कोल्हा शेतातून बाहेर येतील आणि या पिलांच्या चाहुलीने दबा धरतील का? कोवळे जीव ते फाडून खातील का? नुसत्या कल्पनेने माझा थरकाप झाला. गलबलून आले. पिलांच्या करुणामय डोळ्यांतून जणू ती मला व्याकूळ विनवणी करीत होती. या अरण्यात आम्हाला टाकून जाऊ नका. माझ्या आईपासून आम्हाला तोडू नका.
अपार करुणेनी मी ती पिले पुन्हा उचलली, पिशवीत घातली आणि घरी घेऊन आलो. दारात पोचलो तोच अपर्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. स्पंजचे ते उबदार गोळे तिने गालाशी धरले. कोपऱ्यात मनीमाऊ कृतज्ञतेने माझ्याकडे पाहात होती..

Story img Loader