श्रावण सरत आला. जनमानसात चैतन्य पसरलं. वृक्ष-वेली हिरवाईनं नटली. एक-एक करीत पिकं घरात येणार. वाडय़ातला सोपा, पडवी शेंगा, कडधान्यांनी भरणार म्हणून एक अनामिक आनंद वाडय़ात भरून राहिला. तात्या मोठमोठय़ानं अभंग आळवू लागले. दोन लेकींची बाळंतपणं जवळ आलेली होती. वाडय़ातल्या मालकिणीची तयारीही झालेली होती. कोणत्याही क्षणी एका निरोपावर त्या गाडीत पाय ठेवणार होत्या.
दुपारची बाराची वेळ. नेहमीप्रमाणे तात्यांचं जेवण दहाच्या ठोक्याला झालेलं. काठी टेकत, पाय घासत तात्या सोप्यातल्या कॉटवर येऊन बसले. अभंग गुणगुणतच त्यांचा स्वर टिपेला गेला. अन्नाच्या सुस्तीनं त्यांच्या डोळ्यांवर झापड आली. ते तिथंच आडवे झाले. तेवढय़ात टांग्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. बाळू टांगेवाला पडवीत आला. त्याच्या एका हातात वळवटी नि दुसऱ्या हातात पत्र्याची रंगहीन ट्रंक. ‘‘आज्जा! उठा, पाव्हणं आल्याती.’’
तात्या उठून बसले. ‘‘बाळू, कोण रे आलंय!’’
‘‘आज्जी हायत्या!’’
बाळूच्या पाठोपाठ काठी टेकत, आलवण नेसलेल्या डोकीवरून पदर घेतलेल्या चिंगूआत्यांना पाहून, तात्या म्हणाले, ‘‘चिंगूबाई! तू!’’
‘‘होय बाबा. आले.’’
चिंगूआत्या दमल्या होत्या. त्यांनी सोप्याच्या पायरीवर बैठक मारली. ‘चिंगूबाई, केव्हा निघाली होतीस बेडगसून?’’
‘‘दम, दम सांगते.’’
तात्यांनी एका हातात वळकटी नि दुसऱ्या हातातून ट्रंकची रवानगी स्वयंपाकघरात केली. ते पाहून घरमालकीण चरफडू लागली. ‘‘आली मला छळायला! ही कशाला आली आता?’’
तात्या काय बोलणार? बायकांच्या पुढं पुरुष पामर होतात हे याबाबतीत खरंच होतं.
सोप्यात बसलेल्या चिंगूआत्या, आतापर्यंत शांत झालेल्या होत्या. ‘‘चिंगूबाई, हातपाय धुऊन घे.’’
‘‘घेते रे! सकाळी अंग धुतलं. चहा घेतला नि एस.टी.त बसले मिरजेच्या गाडीत, तुकानं सामान आणून ठेवलं आणि आले मी मिरजेतनं! मला म्हातारीला बघून एकानं कोल्हापूरच्या गाडीत बसवलं. हातकणंगल्याला उतरले आणि बाळूच्या टांग्यातनं आले.’’ आत्यांनी सांगितलं.
ताट तयार होतं. चिंगूआत्या जेवल्या.
‘‘वन्स, तुम्ही आलाय पण, आम्ही उद्या निघालोय गावाला! दोघींची बाळंतपणं आहेत ना! तुमचं करणार कोण? सून नवीन आहे. मधुकर नोकरीला सांगलीला जातो. सकाळी जातो नि रात्री येतो.’’
चिंगूआत्या गप्पच बसल्या. सारंच अधांतरी. करणार काय! तात्यांच्या हातात काहीच नव्हतं. तेही वार्धक्यातलेच! आपलं आपण करीत असले तरी परावलंबी. ते नि:शब्द झाले. चिंगूआत्या काही न बोलत्या बसून राहिल्या. दुसऱ्या दिवशी तात्या पत्नीसह, त्यांच्या आधारानं लेकीकडे जाणार होते.
दुसरा दिवस उजाडला. चहा-पाणी झालं. तात्यांची निघायची वेळ झाली. तसे चिंगूआत्यांच्या कानावर शब्द आदळले, ‘‘तुम्ही तुमच्या गावाला जा. इथं तुमचं करायला कोणी नाही. मधुकर, त्यांची बायको करायला तयार असेल तर बघा, नाहीपेक्षा गावी परत बेडगला जा. बघा, काय करताय ते!’’ असं म्हणत तात्यांच्या पत्नी त्यांच्यासह टांग्यात बसल्या.
दुपार झाली. मधुकरला आज सुट्टी होती. त्यामुळं तो घरात होता. ‘‘मधुकर, ए मधुकर! इकडं ये रे जरा!’’
त्याने ऐकून न ऐकलंसं केलं. पुन्हा हाक दिल्यावर म्हणाला, ‘‘काय आत्या! मला ऐकू येतेय.’’
‘‘हे बघ, मी इथं कायमची राह्य़ला आलेय. मी काही मोकळी आलेली नाही. ट्रंक उघडत त्यांनी एक चंची बाहेर काढली. हे घे, यात मी तीन हजार रुपये आणलेत. ते घे आणि मला सांभाळ. माझी भांडीपण आणलेत. तीही तूच घे, पण मला सांभाळ. माझे आता कमी दिवस राहिलेत. मला कोण आहे रे तुमच्याशिवाय.’’ चिंगूआत्या रडवेल्या झाल्या. आता त्यांचं लक्ष मधुकर काय बोलतो, इकडं होतं. तो म्हणाला, ‘‘आत्या, तुमचे आम्हाला काहीही नको आहे. तुम्ही तुमची इस्टेट जरी माझ्या नावावर करून दिली तरी ती नको आहे. बालपणी तुम्ही आमच्यावर अन्याय केलाय. आश्रमात राहत असताना, मी भुकेलेला असायचो. तुम्ही गावाकडून काहीबाही गोडधोड करून आणायचा नि एकटय़ा नारायणाला खाऊ घालायचात, त्याची वास्तपुस्त करायचा आणि गावी परतायचात. तोपण तुमच्या भावाचा मुलगा, मीपण तुमच्या भावाचा मुलगाच ना? मग दर वेळी सणावाराला येऊन तुम्ही मला उपाशी ठेवलात. त्या वेळी मला गरज होती ती अन्नाची. भुकेनं मी व्याकूळ व्हायचो, पण तुम्ही जे त्या वेळी माणुसकीहीन वागलात ही गोष्ट माझ्या पुरती लक्षात आहे. तुम्हाला इथं या वार्धक्यातही आसरा द्यायची माझी काडीमात्र इच्छा नाही. तुम्ही आलात तशा निघून जा.’’ आत्या, काय बोलणार. त्यांना बोलताच येईना. तरुण वयातल्या चुका त्यांच्या कदाचित ध्यानात आलेल्या असाव्यात, परंतु आता त्याचा उपयोग शून्य होता.
त्या दिवशी आत्या राहिल्या. दुसरा दिवस उजाडला. आत्यांनी अंग धुतलं. समोर आलेलं ताट त्या जेवल्या. मधुकरने बाळू टांगेवाल्याला बोलावलं. त्याला सांगितलं, ‘‘या आज्जीबाईंना मिरजेच्या गाडीत बसवून दे. त्यांचं सामान व्यवस्थित गाडीत, त्यांच्या शेजारी ठेवून दे.’’ बाळू टांगेवाल्याच्या हातावर मधुकरने पैसे ठेवले.
आत्या टांग्यात बसल्या, पण काहीच बोलल्या नाहीत; परंतु त्यांच्या सुरकतलेल्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना होती. बघता-बघता टांगा निघालासुद्धा. आस्ते-अस्ते घोडय़ांच्या टापांचा आवाज येईनासा झाला.
संध्याकाळपर्यंत बाळूचा निरोप आला. आज्जीबाईंना व्यवस्थित मिरजेच्या एस.टी.त बसवून दिलं म्हणून. तिथून पुढं त्या ‘बेडग’ गाडीला कुणाच्या तरी मदतीनं बसल्या असतील. हा अंदाज केला गेला; परंतु त्यांच्याबद्दल जे नंतर कधी तरी कळालं. ते फारच मनाला चटका लावणारं होतं.
चिंगूआत्या मिरजेपर्यंत सुखरूप पोचल्या. पण पुढे या म्हाताऱ्या आज्जीबाईंना पाहून कोणी तरी एक जण आला. ‘‘आज्जी, कुठं जाणार हाय?’’
‘‘बेडगला!’’
‘‘मीपण तिकडंच जाणार हाय.’’ चिंगूआत्यांना आधार मिळाल्यागत झालं.
‘‘चला आज्जी, गाडी लागंल आता. तिकिटाला पैसं द्या. मी तुमचं सामान घेऊन पुढं जातो. एस.टी.त जागा धरतो. तुम्ही हळूहळू या तिकडं! एका लांबच्या एस.टी.च्या बाजूनं त्याने बोट दाखवलं आणि तो सामान घेऊन गेला. तो गेलाच. चिंगूआत्याने त्याला शोधायचा प्रयत्न केला असेल, पण व्यर्थ. त्या त्यांच्या गावाला पोहोचल्या फक्त अंगावरच्या आळवणानिशी.
एक दिवशी साधं अर्धवट लिहिलेलं पोस्टकार्ड तात्यांच्या हातात पडलं. त्यात दोन ओळींचा मजकूर होता. ‘चिंगूबाईंचे निधन अमक्या अमक्या तारखेस झाले. उत्तरकार्य या दिवशी आहे.’
तात्या अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता तात्यांना दिवसभर कुरतडत राहिली.
पेरले ते…
श्रावण सरत आला. जनमानसात चैतन्य पसरलं. वृक्ष-वेली हिरवाईनं नटली. एक-एक करीत पिकं घरात येणार. वाडय़ातला सोपा, पडवी शेंगा, कडधान्यांनी भरणार
आणखी वाचा
First published on: 14-12-2013 at 05:21 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My blog what sown