अविनाश दिगंबर धर्माधिकारी
प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात त्याची आई, बहीण आणि पत्नी या जवळच्या स्त्रियांव्यतिरिक्तही जवळची वाटावी, अशी मैत्रीण असायला हवी. किती वर्षांपासून मैत्री आहे, यापेक्षा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता केलेली अशी मैत्री आयुष्य व्यापणारी आणि अविस्मरणीय अनुभव देणारी ठरू शकते.
माझ्यासारख्या सत्तरीच्या वयातल्या आणि ज्याचं शाळा-कॉलेजचं शिक्षण कोल्हापुरातच झालंय, अशा पुरुषाला आयुष्यात कधी मैत्रीण मिळेल आणि तीही परदेशी, असं म्हटलं तर कुणालाही हसू येईल. पण माझ्या बाबतीत ते वास्तवात घडलं. कोल्हापूर हे गाव जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी, १९६०च्या दशकात त्याचं वळण खेडेगावासारखंच होते. ते पुण्या-मुंबईसारखं शहरी नव्हतं. ज्यांची जडणघडण कोल्हापुरात झालीय त्या कुणालाही माझं हे म्हणणं पटेल.
मुलींशी मैत्री ही खूप पुढची गोष्ट झाली. मुलींशी साधं बोललं तरी त्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जायचं. त्यात माझी शाळा मुलग्यांची. त्यामुळे बहीण आणि आमच्या घरी येणाऱ्या तिच्या मैत्रिणी याशिवाय इतर मुलींशी मी कधी बोललोच नव्हतो. कॉलेजमध्ये मुली असल्या तरी त्यांचा ग्रुप वेगळा, मुलांचा ग्रुप वेगळा असायचा. नाटक, वक्तृत्व स्पर्धा यानिमित्ताने जी देवाणघेवाण व्हायची ती तात्पुरतीच असायची. त्यामुळे मुलीशी मैत्री हे पर्व कोल्हापुरात असताना ‘गावी’ही नव्हतं.
पुढे शिक्षणासाठी पुणे विद्यापीठ आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) होतो. हॉस्टेलला राहात होतो. त्या वेळीही मुलींपासून दूरच होतो. पुण्यात असताना आम्ही कोल्हापूर-साताऱ्याची मुलंसुद्धा एकमेकांना ‘अहो-जाहो’ करायचो. त्यामुळे एक मुलगी, ‘‘अरे, तुझी वही बघू जरा,’’ असं म्हणत बोलायला आली तेव्हा ही मुलगी आपल्याला ‘अरे-तुरे’ कशी करते? या विचारानं नखशिखान्त थरथरलो होतो, हे अजूनही आठवतंय. तर अशा माझ्यासारख्या पामराला मैत्रीण कुठून मिळणार?
आणखी वाचा-माझी मैत्रीण : कृतज्ञता
पुढे पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदावर काम करत असताना १९८४-८५ मध्ये मॅनिटोबा युनिव्हर्सिटी, विनिपेग (Winnipeg) आणि १९९४-९५ मध्ये वॉटरलू युनिव्हर्सिटी या कॅनडामधल्या विद्यापीठांत व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जाण्याचा योग आला. त्या वेळी बॅडमिंटनचे छान ग्रुप जमले आणि अध्यापन, संशोधन आणि खेळ यामध्ये वेळ मजेत गेला. नंतर १९९९ मध्ये राइट स्टेट युनिव्हर्सिटी डेटन, ओहायो इथं व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून गेलो. मात्र त्या वेळी असा ग्रुप नव्हता. एकटेपण जाणवू लागलं. कारण माझं कुटुंब पुण्यात होतं. हा एकटेपणा कमी करणारा योग जुळून आला. भारतीय योग आणि रेकीचा सराव करणाऱ्या माईक व सॅण्डी या दाम्पत्याशी कर्मधर्मसंयोगानं माझी गाठ पडली, ओळख वाढली. त्यांनी मला रेकी शिकवलं. मी रेकी मास्टर झालो. त्या दोघांनी मला त्यांच्या रेकी ग्रुपमध्ये सामील करून घेतलं. त्यामुळे सर्वसामान्य अमेरिकी कुटुंबाचं जीवन जवळून पाहायला मिळालं. मला रेकीमुळे हा एक वेगळाच अनुभव मिळाला. नव्या जगाची खिडकी किलकिली झाली होती.
नंतर सहा महिन्यांनी मला अमेरिकेतील ईस्ट लान्सिंग या गावात मिशिगन विद्यापीठात ‘व्हिजिटिंग प्रोफेसरशिप’ मिळाली. मी व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून रुजू झालो. विद्यापीठाने मला राहायला क्वार्टर दिलं होतं, तेच माझं तिथलं घर. ईस्ट लान्सिंग हे ज्याला ‘युनिव्हर्सिटी टाऊन’ म्हणतात तसं गाव होतं. म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचीच संख्या तिथं जास्त होती. त्या काळी असे ४० हजार लोक त्या गावात होते. शिवाय तिथलं थंड हवामान, बर्फ, धुकं, ढगाळ वातावरण यामुळे एकदा शुक्रवारी काम संपवून घरी आलो की सोमवारी पुन्हा कामावर जाईपर्यंत माणूस नावाचा प्रकार रस्त्यावर दिसणं कठीण. पहिल्याच दिवशी मी चर्च आणि होलिस्टिक सेंटर ( holistic center)शी संपर्क साधला व चर्चचा मेंबर झालो. कुणाला रेकीची गरज असेल तर मी देईन, असे त्या सेंटरला सांगून आलो. त्याप्रमाणे फोन आला की मी जायचो. चर्च आणि ते सेंटर अशा दोन्ही ठिकाणी माझं येणं-जाणं सुरू झालं. अशाच एका रविवारी चर्चमध्ये माझी आणि अॅनेची ओळख झाली. अॅने पन्नाशी ओलांडलेली अमेरिकी स्त्री होती. तिच्या नावाचं स्पेलिंग ‘anne’ असं आहे. त्यामुळे सगळ्यांनी अॅनेच म्हटलं पाहिजे हा तिचा आग्रह नव्हे, तर हट्ट असायचा. ही अॅने अगदी टिपिकल अमेरिकन म्हणजे तिथंच जन्मलेली, वाढलेली अशी स्त्री होती. अतिशय बोलघेवडा स्वभाव आणि नवीन माणसांशी ओळखी करून घेऊन गप्पा मारण्याची तिला भयंकर हौस. समोरचा माणूस अमेरिकन असलाच पाहिजे असा आग्रह मुळीच नाही. याउलट इतर देशांतल्या लोकांशी बोलायला तिला फार आवडायचं. संवादातून ती समोरच्या माणसाच्या जगण्याची पद्धत, त्याच्या देशातल्या चालीरीती यांची माहिती करून घ्यायची.
आणखी वाचा-माझी मैत्रीण : विसाव्याचे असू द्यावे एखादे ठिकाण…
माझ्याशी ओळख होताच तिने गप्पा सुरू केल्या. मला तिच्या घरी घेऊन गेली. तेव्हा ती एकटीच राहत होती. तसं तिने दोनदा लग्न केलं होतं, पण दुर्दैवानं तिचे दोन्ही नवरे जिवंत नव्हते. दोन्ही नवऱ्यांपासून तिला एकेक मुलगा होता. मोठ्याचं नाव ‘कर्ट’ तर धाकट्याचं नाव ‘डेव्हिड’. कर्ट त्या वेळी तिशीचा आणि डेव्हिड विशीचा होता. स्वत: अॅने मिशिगनच्या विधानसभेतल्या नेत्यांची भाषणं लिहून द्यायचं काम करायची. यासाठी तिला भरपूर माहिती लागत असे. इतर देशांबद्दलची माहिती मिळवण्याचा तिचा आणखी एक मार्ग होता, तो म्हणजे त्या त्या देशांत बनलेले चित्रपट बघणं. भारताबद्दलही सिनेमातून तिने थोडी माहिती जमवली होती. मला ती ‘असंच असतं का?’ असा प्रश्न विचारून त्यावर शिक्कामोर्तब करायची. तिच्या घरी चित्रपटांच्या खूप सीडीज होत्या. शिवाय एका लायब्ररीतून ती नियमित सीडी आणायची. तिनेच मला ‘सेव्हिंग प्रायवेट रायन’, ‘एरिन ब्रोकोविच’ इत्यादी उत्तमोत्तम सिनेमे दाखवले. इंग्लिश नाटक बघायचा अनुभव मी तिच्याबरोबर घेतला. त्यावर बोलणं हा आमचा आनंदाचा ठेवा असायचा. तसेच प्रत्यक्ष मैदानात जाऊन बेसबॉलची मॅच बघितली.
मी बऱ्याचदा विचार करायचो की, ‘या आमच्या मैत्रीतून आम्हाला एकमेकांकडून काय मिळतंय? हे मी एकदा तिलाच विचारलं. तर म्हणाली, ‘‘दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव यांना जसं परस्परांचं आकर्षण असतं तसं आहे हे. तुझ्यासारखा प्रोफेसर, नेहमी गंभीर संशोधनात मग्न असणारा माणूस एरव्ही कसं वागत बोलत असेल, रोजच्या जगण्यातल्या गोष्टींवर कसा विचार करत असेल, याचं मला फार कुतूहल होतं. अशी माणसं मला मित्र म्हणून कधी भेटलीच नव्हती. शिवाय मला भारत देशाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल आकर्षण आहे. भारताला भेट द्यायची इच्छा आहे. तुझ्यामुळे तिथला एक तरी माणूस माझ्या ओळखीचा झाला.’’ यात स्त्री पुरुष आकर्षण असं काही नव्हतं. पूर्वी अशाच एका चिनी माणसाशी अॅनेची मैत्री झाली. त्याला भेटायला ती चीनला जाऊन आली होती. तिथली वर्णनं तिच्या बोलण्यात नेहमी असायची.
माझी ती अमेरिकेला जाण्याची पहिलीच वेळ होती. तिथल्या चालीरीती जाणून घेण्याचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा माझा प्रयत्न असायचा. यात मला अॅनेची चांगलीच मदत व्हायची. एकदा असेच आमचं हॉटेलात जेवायला जायचं ठरलं. मी ‘कपडे बदलून येतो’ म्हणालो तर अॅने म्हणाली, ‘‘अविनाश, ही अमेरिका आहे. हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालून इथे सर्रास बाहेर जातात.’’
एकदा ती म्हणाली, ‘‘आपण रविवारी एका हॉटेलात ब्रेकफास्ट घेऊ.’’ त्याप्रमाणे मी गेलो. तिचा मुलगा आणि सूनही आले होते. खाणं संपल्यावर अॅनेने वेटरला प्रत्येकाचं वेगळं बिल आणायला सांगितलं. हा माझ्यासाठी मोठाच धक्का होता. पण अॅनेला मला हीच अमेरिकेची रीत आहे, हे शिकवायचं होतं. अशा तऱ्हेनं समाजात वागण्याच्या पद्धती मला तिच्यामुळे कळल्या आणि त्यामुळे माझा देशीपणा बराच कमी झाला. माझ्याशी झालेली मैत्री अॅनेनं माझ्यापुरतीच ठेवली नाही. अशा सर्व गोष्टींचा एकत्र आनंद घेत असताना आमच्यात मैत्रीचे बंध केव्हा निर्माण झाले हे कळलंच नाही. अर्थात यात मोठा वाटा अॅनेचा आहे.
आणखी वाचा-माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
अॅने एवढ्यावरच थांबली नाही. डिसेंबर महिन्यात माझी बायको रजा घेऊन ईस्ट लान्सिंगला येणार होती. तेव्हा अॅनेनं तिच्यासाठी तिकडच्या थंडीत लागणारे गरम कपडे, बूट, स्टॉकिंग्स असे भरपूर काही माझ्या घरी आणून ठेवलं. आम्हा दोघांना तिच्या गाडीतून नाताळसाठी शहरभर लावलेले दिवे दाखवत लहान मुलांच्या उत्साहात हिंडली. नाताळच्या रात्री तिनं आम्हा दोघांना चर्चमध्ये नेलं आणि तिच्या भरपूर मित्र-मैत्रिणींशी आमची ओळख करून दिली. प्रत्येकाला ती सांगायची, ‘‘हा अविनाश, ही अमिता. दोघंही भारतात स्टॅटिस्टिक्सचे प्रोफेसर आहेत.’’ पुढं एक वाक्य ती आवर्जून जोडायची. ते असं, ‘‘हे दोघं नवरा-बायको म्हणून गेली १८ वर्षं एकत्र राहतात.’’ भारतात नवरा-बायको हे जन्मभराचं नातं असतं ही गोष्ट तिला प्रत्यक्ष बघायला मिळत होती. तिच्यासाठी ही गोष्ट विशेष होती.
त्यांच्यासाठी ही गोष्ट विशेष होती. नाताळच्या जेवणासाठी तिचे दोन्ही मुलगे, सून येणार होती. तेव्हा आम्हालाही तिनं जेवायला बोलावलं. टर्की, मॅश पोटेटो असे पदार्थ खाण्याचा आग्रह केला. आम्ही घरातून दम आलू करून नेले होते. तिला ते तिखट लागले, पण मुलांनी ताव मारला.
तिचा स्वभाव अतिशय भावनाप्रधान असल्यानं सिनेमात कुणाचं दु:ख बघितलं तरी ती अस्वस्थ व्हायची. यामुळे तिचं पोट बिघडायचं. अशा प्रकारे मी तिथं असेपर्यंत प्रत्यक्ष भेटीगाठी आणि मी भारतात परत आल्यावर फोन किंवा ई-मेलद्वारे आम्ही संपर्कात होतो. खरी गंमत यापुढे आहे. २००८ मध्ये उन्हाळ्यात दोन महिने मला पुन्हा अमेरिकेला जाण्याचा योग आला. बायको बरोबर होती. आम्ही अमेरिकेत पोहोचल्याबरोबर अॅनेचा फोन आला की, तिचा धाकटा मुलगा डेव्हिडचं लग्न ठरलं असून ते १५ मेला होणार आहे, तुम्ही दोघांनी यायचं आहे. आम्हाला एकाच वेळी आनंद आणि आश्चर्य वाटलं. जणू डेव्हिडच्या लग्नाचे वऱ्हाडी म्हणून आम्ही नेमके त्या वेळी तिकडे गेलो होतो. लग्न समारंभ छान झाला. डेव्हिडने त्याच्या बायकोसाठी एक छान गाणं म्हटलं. अॅने मात्र रडत होती. नंतर भेटल्यावर मी तिला रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा म्हणाली, ‘‘आता माझा मुलगा दुसरीचा झाला. मला दुरावला.’’ एका अमेरिकन आईची ही भावना होती.
इतकी भावनाप्रधान असलेली अॅने तेवढीच व्यवहारी होती. तिच्या दोन्ही मुलांच्या वडिलांनी ठेवलेले पैसे तिने त्या त्या मुलाच्या नावावर राखून ठेवले होते. २००८ मध्ये तिचं खरं वय ६३ वर्षांचं होतं. पण मिश्कीलपणानं ती ५७ सांगायची, कारण आपल्याला एखादा बॉयफ्रेंड मिळावा असं तिला वाटत होतं. हे तिनंच मला अगदी निरागसपणे सांगून टाकलं होतं.
अशी ही माझी मैत्रीण. आता ८० वर्षांच्या वयात तिचा सोशल मीडियावरचा वावर कमी झाला आहे. पण माझ्या आयुष्यात माझी आई, बहीण आणि बायको या जवळच्या स्त्रियांव्यतिरिक्त जवळची वाटावी अशी मैत्रीण मला अॅनेच्या रूपात मिळाली. माझ्या आयुष्याची मोजकीच वर्षं तिच्या मैत्रीने व्यापून टाकली. हा एक वेगळाच अनुभव मला तिच्यामुळे मिळाला.
Avinash.dh@gmail.com
(‘माझी मैत्रीण’ हे सदर वाचकांसाठी खास प्रसिद्ध केलं गेलेलं यंदाचं महत्त्वाचं सदर ठरलं. नितळ मैत्रीचा अनुभव सांगण्याचं आवाहन आणि तेही फक्त पुरुषांना, केलं गेलं होतं. याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, कोणत्याही स्वार्थाशिवाय खरीखुरी मैत्री असू शकते हे अनेकांनी आपल्या अनुभवांतून मांडलं. परंतु काही लेखनियमात बसू न शकल्याने प्रसिद्ध करता आले नाहीत तर काही जागेअभावी प्रसिद्धहोऊशकले नाहीत. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद)
(सदर समाप्त)