गो. अ. नाखरे

‘पन्नास वर्षांपूर्वी सहकाऱ्यांनी परस्पर जरी आमची जोडी जमवून टाकली होती, तरी शारीरिक आकर्षणाचा विषय आमच्या मैत्रीत कधी आला नाही. आमच्यात एकमेकांशी बोलायची ओढ होती, एखाद्या गोष्टीचा आग्रह करणं होतं, प्रसंगी हक्कानं रागे भरणंही होतं. अगदी मनातलं, आतलं बोलून दाखवण्याचा हळवा प्रसंगही आला, पण आमची मैत्री निखळ मैत्रीच राहिली. आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही भेट होण्याच्या विचारानं मनाचा फुलोरा फुलतो, अशी मैत्री!’

दारात भला थोरला टेम्पो उभा होता. इतक्या वर्षांच्या सहवासातली आपली स्वत:ची वास्तू आता पाडली जाऊन तिथे नवी इमारत उभी राहणार होती. सारं सामान खाली आणलं जात होतं. घराच्या या निरोपाच्या प्रसंगी सुखदु:खाचे भावविभोर, हळवं करणारे अनेक प्रसंग डोळ्यांसमोर चित्रपटासारखे तरळत होते. घालमेल होण्याच्या त्या अवस्थेतही मनाचा एक बारीकसा कोपरा मात्र आनंदानं थुई-थुई नाचत होता! कारण मुंबईच्या उपनगरातून आम्ही थेट शहराच्या ‘हृदया’तच राहायला जात होतो. आणि… तिथे माझी जिवाभावाची सखी अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर राहत होती! इतकी वर्षं लांब राहत असल्यामुळे मनसोक्त भेटणं जमत नव्हतं. आता भेटायला मिळणार, या विचारानं मला घर रिकामं करायचा तो प्रसंगही तितका गंभीर वाटत नव्हता.

नवीन घरात दोन दिवसांत सगळं सामान लावून झालं आणि विचार करता करता नकळत मी मनानं तिच्या घरी पोहोचलोसुद्धा! माझ्या घर बदलण्याची मी तिला काहीही पूर्वकल्पना दिली नव्हती. तिचा चेहरा कसा खुलेल? तिला किती आनंद होईल… असं मनात कल्पून मी नव्या घराचं लॅच ओढून घेतलं नि आनंदानं तरंगतच तिच्या दारी आलो. बेसनाचा लाडू अति तूप झाल्यावर कसा फत्कन बसतो, तसा माझा पोपट झाला! तिच्या दाराला भलं मोठं कुलूप! फोन केल्यावर कळलं, की बाईसाहेब दुसऱ्या शहरात मुलाकडे कायमसाठी राहायला गेल्या आहेत. निराश मनानं मी तसाच समुद्रावर गेलो. सूर्य अजून बराच वर होता. त्याच्या साक्षीनं तिचा नि माझा गेल्या अर्ध्या शतकाच्या मैत्रीचा बंध आठवणींत उलगडत गेला.

आणखी वाचा-स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न

मला बँकेत लागून काही वर्षं झाली होती. नवीन आलेल्या शाखा प्रबंधकांनी ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी म्हणून ‘बेस्ट इम्प्लॉयी’ पुरस्कार द्यायचं जाहीर केलं. सर्व कसोट्या पारखून त्या वेळचा पुरस्कार मला मिळाला… आणि मी एकदम बँकेत ‘राजेश खन्ना’च झालो! त्यातूनच मला माझी ही मैत्रीण मिळाली.

सव्वापाच फूट उंच, गोरीपान आणि कबड्डीपटू. अगदी गुडघ्यापेक्षाही लांब, काळेभोर असे दाट केस! मोकळं, खळाळतं हसू आणि निरागस डोळे. पहिल्या भेटीतच ‘युगायुगाचे अपुले नाते’ असा फील आला. मीही सहा फूट उंच. सर्वांनी बँकेत आमची जोडी जमवूनही टाकली! पण ती विवाहित होती. माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठी. अगदी साध्या-साध्या गप्पांतून आम्ही परस्परांना कळत गेलो आणि भावबंध कधी जुळले ते कळलंच नाही. एकाच शाखेत असल्यानं रोजची भेट आणि रोजच्या गप्पा होत. दोघांच्याही घरी आमची मैत्री ठाऊक होती. पण शाखेत मात्र अशी सुंदर मैत्रीण मिळाल्यानं माझ्या सहकारी वर्गाला माझा काहीसा हेवा वाटे! मात्र इतरांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळच नसे. पुढे आमच्या शाखेलासुद्धा ‘उत्कृष्ट शाखा’ म्हणून गौरवण्यात आलं. यानिमित्तानं आयोजित केलेल्या कॅरमच्या मिश्र दुहेरी सामन्यात आम्हा दोघांची टीम अंतिम फेरीत पोहोचली. प्रतिस्पर्ध्यांची एक चूक आम्ही मोठ्या मनानं माफ केली. त्यामुळे ते जिंकले, आम्ही हरलो! पण आमच्या त्या वागण्यानं सहकाऱ्यांच्या मनात मात्र आमच्याबद्दल आदराची जागा निर्माण झाली; आमचा भाव वधारला. मला क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. बँकेतून मी खेळत असे. हे कळल्यावर खूपदा अगदी उन्हातही माझी मॅच बघायला यायची. उन्हात तिचे गोरे गाल लालबुंद होत. घामाघूम झाली तरीपण माझ्या प्रेमापोटी दाद द्यायला येणं तिनं सोडलं नाही.

ऑफिसर होण्यासाठी शाखेत परीक्षेचं सर्क्युलर आलं. तिनं गांभीर्यानं अभ्यासाला सुरुवात केली. माझा पाय मात्र मैदानातून निघत नसे. त्या वेळी तिनं मला चांगलाच दम भरला. तिच्या आग्रहामुळेच मी अभ्यास करायचं ठरवलं. खूपदा शाखा संपल्यावर शाखेत बसून, तर कधी समुद्रावर वाळूत बसून अभ्यास केला. आनंदाची बाब म्हणजे आम्ही दोघंही ऑफिसर झालो. मात्र कधीही आमच्या मैत्रीला वेगळा रंग चढला नाही. ती निखळ आणि पारदर्शीच राहिली.

आणखी वाचा-‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!

अधिकारी झाल्यानं आमच्या मैत्रीला काहीशी खीळ बसली. आम्ही वेगवेगळ्या शाखेत रुजू झालो. पण रोज फोनवर तरी भेट व्हायचीच. वाढदिवसाला हमखास भेटायचं, ठरलेल्या ठिकाणी एकत्र जेवायचं आणि एकत्र सिनेमा बघायचा, हे चालू राहिलं. असाच एकदा आम्ही ‘तृष्णा’ हा सिनेमा पाहिला. त्या दिवशी घरच्यांबद्दल फारशी न बोलणारी ती, प्रथमच खूप खूप बोलली… स्वत:बद्दल, स्वत:च्या आयुष्याबद्दल! अशा वेळी फक्त कोणी तरी मन लावून आपलं ऐकणारं हवं असतं. हातात हात धरून अलगदपणे थोपटणारं कोणी हवं असतं. त्या दिवशी ती भूमिका मी बजावली. फक्त मोकळेपणी व्यक्त होऊ दिलं तिला. त्यानंतर मात्र परत कधी असं झालं नाही. एखादाच क्षण असतो असा. त्या वेळी दोघांनीही सावरून घ्यायचं असतं परस्परांना! तिचे यजमान कामानिमित्त बऱ्याचदा बाहेरगावी असत. ही वेदना त्या दिवशी मला कळली. घरी तिच्या सासूबाई असायच्या. परंतु अशा परिस्थितीचा आपण गैरफायदा घ्यावा, असं स्वप्नातही माझ्या मनात आलं नाही. कारण शारीरिक आकर्षण हा आमच्या मैत्रीचा हेतू नव्हता.

एकदा तिनं फोनवर लाजत-लाजत गोड बातमी सांगितली. ती आई होणार होती. माझ्याही आनंदाला पारावार राहिला नाही. बाळ झाल्यानंतर व्यापात वेळ मिळत नाही म्हणून लांबलचक केस कापायचा निर्णय तिनं घेतला. मला सांगितल्यावर प्रथमच मी तिच्यावर वैतागलो. ‘एवढी गोष्ट कधी करू नकोस,’ असं मी सुचवलं आणि तिनं ते पाळलं. त्यानंतर मीही माझं लग्न ठरवलं. ही बातमी प्रत्यक्ष सांगण्यासाठी मी तिच्या घरी गेलो. मला पाहून तिच्या सासूबाई नेहमीच खूश होत. यापूर्वीही अनेकदा त्यांच्या हातचा बेसनाचा लाडू माझ्यासाठी राखून ठेवलेला असे. मी लग्नाची बातमी दिल्यावर बाळाला मांडीवरून खाली ठेवत तिनं माझ्या तोंडात पेढा कोंबला. पण मी लग्न नोंदणी पद्धतीनं करणार आहे हे समल्यावर मात्र ती खट्टू झाली. ‘आता मला मिरवता येणार नाही,’ म्हणून तिनं माझं मन वळवायचा प्रयत्न केला. अर्थात सहसा एकदा ठरवल्यावर मी कधीही विचार बदलत नाही, याची तिला खात्री होती. मग माझ्या भावी वधूची भेट मी या सखीशी करून दिली. लग्नानंतरही आपल्या मित्राची बायको शिकणार आहे, कारण तिला स्कॉलरशिप मिळणार आहे, हे कळल्यावर मैत्रिणीला अतीव आनंद झाला.

पुढे माझ्या मैत्रिणीला आणखी एक अपत्य झालं आणि ती संसारात खूपच गुंतली. इकडे मीही माझ्या संसारात व्यग्र झालो. तरी ठरावीक दिवशी भेट मात्र कधी शक्यतो चुकली नाही. पुढे-पुढे मात्र मुलांच्या शाळा, सासूबाईंचं आजारपण, यात तिला वेळ काढणं जमेनासं झालं. दूरस्थ संवाद राहिला. मात्र कधीही अनावश्यक चौकशा न करणं आणि उगीचच मतप्रदर्शन न करणं, या गोष्टी आम्ही दोघांनी कटाक्षानं पाळल्या.

आणखी वाचा-स्त्रियांचे न्याय्य प्रतिनिधित्व हवे

तिला ऋषीची भाजी अत्यंत प्रिय. माझी आई ऋषी पंचमीला ऋषीची भाजी करायची आणि मी वेळ काढून, तासभर प्रवास करून तिला डबाभर भाजी घेऊन जायचो. आईनंतर माझी पत्नीही तशीच भाजी करू लागली आणि आग्रहानं तिच्यासाठी डबा भरून द्यायला लागली. आम्ही नवीन जागेत राहायला जायचं नक्की झाल्यावर माझ्या पत्नीचं पहिलं वाक्य होतं, ‘आता गरम-गरम भाजी तिला नेऊन देता येईल!’ मनात असेच मांडे रचवून आज मी तिच्या घरी मोठ्या खुशीनं गेलो होतो आणि…

आता सूर्य अगदी पाण्यात टेकला होता. आजूबाजूला काहीसा अंधार दाटला. माझ्या मनातल्या आनंदावरही अशीच अंधारी साय पसरली होती. इतक्यात खिशातला मोबाइल वाजला. अर्धांगिनी विचारत होती, ‘‘पत्ता काय तुमचा? न सांगता आज दौरा कुठे? ती भेटली वाटतं?… भेटली असेल तर माझी अजिबात घाई नाही. सावकाश घरी या.’’

असं झालं असतं तर किती छान झालं असतं… व्यवहारात मात्र मी नुसतं फोनवर ‘आलो-आलो’ म्हणालो. फोन ठेवला आणि रुमालानं डोळे टिपले. अजून काही दिवसांनी मी पंचाहत्तराव्या वर्षांत प्रवेश करीन आणि आमच्या मैत्रीला पन्नास वर्षं पूर्ण होतील. सहज भेटणं जरी शक्य होणार नसलं, तरी अक्षय आनंदाचा प्याला भरून वाहत राहील.
shobha.nakhare@yahoo.co.in