डॉ. मोहन देस – mohandeshpande.aabha@gmail.com

स्त्री देहाकडे कसं बघावं याचे संस्कार आपण जेव्हा १३-१४ वर्षांचे असतो तेव्हापासून होत असतात. सुरुवातीला कसंतरीच वाटतं. छानही वाटतं आणि घाणही वाटतं. फ्रेशही वाटतं आणि थकायलाही होतं. आपली नजर अजून सरावलेली नसते आणि आक्रमकही नसते. एक नवी लिंगकेंद्री सुखाची संवेदना तयार होत असते. पण कुठून तरी आपल्याला हेही कळतं, की असं राजरोस बघायचं नसतं.  मग आपण चोरून बघतो. नंतर आपण त्या नजरेला हळूहळू सरावतो. तसं बघण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असंही मनोमन ठरवलं जातं.

एखाद्या वेळी एखादी धीट मुलगी ‘‘काय रे..ए मुडद्या, तुझ्या घरी आईबहीण नाहीत का रे?’’ असं विचारते तेव्हा आपण जरा जमिनीवर येतो. पण आपली आई-बहीण सोडून इतर कोणत्याही स्त्रीकडे आपण ‘तसं’ बघूच शकतो, असा संदेशही तेव्हाच मिळतो. स्त्रीदेहाची वस्तू करून उपभोगी नजरेनं बघण्याचा अधिकार आपल्याला कोणत्या तत्त्वानं मिळतो? पुरुषलिंग हेच तत्त्व. ते जन्मसिद्ध म्हणून अधिकारही जन्मसिद्ध! कधी कधी हे लिंग  शस्त्रासारखं भासतं. ‘शस्त्रीय’ विचाराची नजर तयार होते. (सीमेनला ‘वीर्य’ म्हणतात याचाही अभिमान वाटू लागतो.) पुरुषलिंग आपल्या डोळ्यात ‘मुसळ’ होऊन बसतं. त्याचा अर्थ स्वत:ला कळत नाही. पण स्त्रियांना अचूक कळतो. त्या कधी-कधी घाबरतात. कधी त्या विरोध करतात. मग आपण ते आवरून घेतो. संधी मिळाली की ते वाढतं. या वाढलेल्या मुसळाला साध्या ओळखीचीही गरज भासत नाही, प्रेम वगैरे दूरच. निष्प्रेम वृत्तीनं आपण दुरून जवळून स्त्रीदेह उपभोगू लागतो. पुढे पुरुष शरीरात ‘टेस्टॉस्टिरॉन’ नावाच्या हार्मोनमुळे पुरुषाची एकूण लैंगिक व्यवस्था घडते हे कळतं. ते खरंही आहे. त्यामुळे पुरुषदेहाची बाह्य़ रचनाही बदलते. दाढी, मिशा वगैरे. शिवाय निसर्गत: लैंगिक आकर्षण निर्माण होतं. हे बरोबर! पण आक्रमकता, शौर्य हेही रक्तातच असतं असं आपण छान ठरवून टाकतो. पुरुषाच्या ठायी असलेली आक्रमकता, ‘पॉवर’ वगैरे, आणि त्याचंच ‘एक्स्टेन्शन’ म्हणून विनयभंग, बलात्कारसुद्धा ‘टेस्टॉस्टिरॉन’च्या वाढीव पातळीमुळे घडतात असं वाटायला लागतं. अर्थात त्यावर ‘कंट्रोल’ असायला हवा असं आपल्याला सांगण्यात येतं. पण तो तसा कधी कधी राहातच नाही .

या संदर्भात वैज्ञानिकांनी अनेक अभ्यास केले आहेत. या हार्मोनची रक्तातली पातळी आणि बलात्कारी वृत्ती यामध्ये काही कार्यकारणसंबंध तपासण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले. या प्रयोगांमध्ये असा संबंध काही आढळला नाही. पुरुषी आक्रमकता ही मूलभूत म्हणजे जैविक नाही. पुरुष म्हणून वाढताना कळत नकळत झालेला हा केवळ संस्कार असतो. आणि हीच एक गोष्ट खरं तर खूप दिलासा देणारी आहे. तो संस्कार असल्यानं काढून टाकता येतो.  कितीही जुना झाला तरी. अलीकडच्या काळात स्त्रीची ‘ताकद’ वाढली, तिचा आत्मविश्वास वाढला, तिची स्व-प्रतिमा उंचावली. पुरुष मंडळींना असुरक्षितता जाणवू लागली. ‘स्त्री एम्पॉवर ’ झाली की आपली ‘पॉवर’ कमी होते असं वाटू लागलं. या परिस्थितीतून काही पुरुष मार्ग काढतात. तो महाभयंकर आहे. ‘‘ही पोरगी शिकली होय, वर तोंड करून बोलते काय, ७७७  म्हणे सक्षम झाली. हिला सरळ करतो.’’ (म्हणजे लैंगिक अत्याचार करतो.) यात ‘गिल्ट’ नाही. भीती नाही. कायद्याला कोण भीक घालतो? कु णाला कळणार आहे मी काय करतोय ते? पुरावाच नष्ट करायचा. समूळ!

स्त्रीच्या सक्षमतेचा हा सूड घेतलेला असतो. लिंगसूड! सगळ्या अत्याचारांमध्ये सत्तेचाच संबंध असतो. केवळ लैंगिक ऊर्मी आली आणि ती आवरत नाही म्हणून बलात्कार केला जात नाही. जिथे बळ चालतच नाही तिथे नांगी टाकली जातेच नं? मुलगी जातीनं ‘कनिष्ठ’ असेल, वयानं लहान असेल, मूक असेल,अपंग असेल, तर काही पुरुषांची ‘रेपपॉवर’ वाढते. स्त्री जर परधर्माची असेल, तर तिच्या समुदायावर सूड घेण्यासाठी सामूहिक ‘रेपपॉवर’  वाढते!  आपण पुरुष आहोत म्हणजे काय आहोत, याचा शोध खरं तर वयात यायच्या आधीपासून सुरू होतो. परंतु या विचाराचा पुढे  विकासच होत नाही. पडलेल्या प्रश्नांची अशास्त्रीय सोपी आणि साचलेली उत्तरं हमखास मिळतात. असे साचलेले विचार डोक्यात घेऊन बसलेले नवतरुण माझ्यासमोर अनेकदा असतात. एका शिबिरात मी त्यांना असं सांगत होतो, की हस्तमैथुन वाईट नसतं. सांगता सांगता मी विचारलं, की हस्तमैथुन करताना आपल्या डोळ्यांसमोर काय कल्पना असते, ते लिहाल का प्रामाणिकपणे? अनेकांनी जे लिहिलं त्यात चक्क भयाण हिंसा होती. ‘‘आपल्या ‘धसमुसळ्या’ आक्रमकतेमुळे ती स्त्री पूर्णपणे शरण आलेली असते. तिला आपण चुरगळून टाकलेलं असतं. आणि त्यातच तिलाही समाधान असतं. ’’ हे वाचल्यापासून हस्तमैथुनदेखील भयानक चुकीचं असू शकतं, असं मी सांगू लागलो.

एकदा राजस्थानच्या आदिवासी भागात एका कार्यशाळेत मी सांगत होतो, की स्त्रियांना, मुलींना आंघोळ करण्यासाठी नीट आडोसा हवा, दाराला कडी हवी इत्यादी इत्यादी. नंतर माझा आदिवासी मित्र म्हणाला, ‘‘मोहनभाई, आपण उद्या सकाळी नदीवर फिरायला जाऊ या.’’  सकाळी नदीवर दृश्य पाहिलं. स्त्री-पुरुष एकाच ठिकाणी कपडे काढून नदीच्या पात्रामध्ये नहात होते. कु णी कु णाकडे ‘तसं’ पाहात नव्हतं. ते दृश्य मला अतिशय सुसंस्कृत वाटलं.

पुरुषपणाचं ‘हार्मोनल देणं’ जे निसर्गानं दिलं आहे, ते काढून टाकता येत नाही. त्यात वाईटही काही नाही, पण संस्कारांनी म्हणून जे दिलं आहे ते काढून टाकता येईल. एक सुंदर, सक्षम, सन्मानाचं, परस्पर सुखाचं नातं जोडता येईल. सर्व लहान मुलग्यांशी, तरुण होणाऱ्या आणि प्रौढ पुरुषांशीही यावर बोलायला हवं नीट सविस्तर.

Story img Loader