एके दिवशी दारूच्या नशेत माझ्या वडिलांनी माझ्या आईला जाळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आईने ते घर सोडलं. त्या घरातून निघताना काहीपण घेतलं नाही, तिनं नोकरी सोडली आणि मार्केटिंगचं काम चालू केलं. आम्ही पश्चिमेला राहत होतो. तिथून पूर्वेला शाळेत सोडायला एक तास जायला आणि यायला एक तास लागत होता. तरीसुद्धा माझी आई साडेचार वाजता उठून, जेवण बनवून मला आणि माझ्या भावाला घेऊन शाळेत जायची, शाळा सुटली की मला घेऊन डोंबिवली ते ठाणे, घाटकोपर, कुर्ला अशा ठिकाणी मालाची विक्री करायची, सगळीकडे बिल्डिंगमध्ये चढून उतरण्याचं काम करून थकत होती, मला ते पाहावत नव्हतं, मी पण एक पिशवी आणि माझं दप्तर सांभाळत आईबरोबर चालायची, कधी माल विकला तरच पैसे मिळायचे नाहीतर कधी मिळत नव्हते, तरी आम्हाला तिने कधीच कशाची उणीव भासू दिली नाही. कधी कधी शाळेला सुट्टी असली की आई मला व माझ्या भावाला कुलूप लावून कामाला जायची. बोलायची, ‘तू भावाला सांभाळ, मी तुला खाऊ आणेन.’ संध्याकाळी येताना एक रुपयाचे चणे आणून दिले तरी आम्ही खूष असायचो. आम्ही तिघंच राहत असल्यामुळे मला खूप भीती वाटायची. कारण रात्रीचं कुणीपण येऊन दार वाजवायचं. त्यामुळे कुणी नाही, उंदीरमामा असेल, असं सांगून मला मांडीवर घेऊन ती रात्रभर जागत बसायची. दरवर्षी घर बदलणं, कधी कधी तर चार दिवस पाणी नसायचं. कामावरून घरी येऊन कुठून तरी पाणी घेऊन यायची, पण माझ्या आईने वडिलांची उणीव आम्हाला जाणवू दिली नाही, आई-वडिलांची दोन्ही कर्तव्ये पार पाडत होती.
‘खरंच आई म्हणजे उन्हाची सावली’ आई म्हणजे सुखाचा सागर, पण त्या माऊलीने माझ्या वाटय़ाला कधी दु:खच दिलं नाही. स्वत: उपाशी राहायची, पण मला व माझ्या भावाला, रात्रंदिवस कष्ट करून लहानाचं मोठं केलं, प्रत्येक ठिकाणी भाडय़ाचं घर घेताना कितीतरी संकटांना तिनं धीरानं तोंड दिलं, ते सर्व आठवलं की मन गहिवरून येतं, घरभाडे, शाळेची फी हे सगळं भागवता, भागवता नाकीनऊ यायचे. शेवटी त्या सर्वाचा विचार करून माझ्या आईने घरकाम करायचं ठरवले, ती सकाळ-संध्याकाळ घरकाम करायची, आल्या परिस्थितीला तोंड देत होती. माझं शिक्षण पूर्ण करत होती. मी १० वी पास झाल्यावर मला रेशनिंग कार्डाची अत्यंत गरज होती. माझं त्याशिवाय अॅडमिशन होत नव्हतं, मला व माझ्या भावाला घेऊन आई वडिलांकडे गेली. त्यांना विनवण्या केल्या. पण माझ्या वडिलांनी कार्ड दिलं नाही. उलट शिव्याशाप देऊन हाकलून दिलं, तरीपण माझी आई डगमगली नाही, मला घेऊन ती नगरसेवककडे गेली. त्यांचं पत्र लिहून घेतलं आणि अॅडमिशन मिळालं, माझ्या आईने माझ्या केलेले कष्ट मी वाया जाऊ देणार नाही, तिचा तो संघर्ष नेहमी डोळ्यासमोर ठेवेन.
माझ्या आईला, एकदा एका बाईने फार त्रास दिला. शाळेला सुट्टी असली की आई मला कुलूप लावून कामाला जायची, पण शेजारची बाई म्हणायची ही बाई कुठे जाते. बाहेर धंदा करत असेल, माझी आई कामावरून यायच्या वेळेला ती आमच्या दरवाजात येऊन बसली आणि म्हणाली, तुला मी घरात जाऊ देणार नाही, तू कुठे धंदा करून आलीस सांग, असं म्हणत तिनं माझ्या आईला आमच्याच घरात येऊ दिलं नाही, हाताला धरून बाहेर खेचलं. मी व भाऊ रडायला लागलो. माझ्या आईला काही सुचत नव्हतं, ती खूप रडायला लागली. संध्याकाळची वेळ होती, घरमालकाकडे गेली, पण घरमालक घरी नव्हते काय करावं, सुचत नव्हतं. कुणाकडे जाऊ कुणाला सांगू असा प्रश्न पडला? मला व माझ्या भावाला घेऊन शेजारीच असलेल्या बिल्डिंगच्या आवारात रात्रभर बसून राहिली, हातात पैसे नव्हते, घर भाडय़ाचं असून घरात जाता येत नव्हतं. पाच रुपयांचा वडापाव घेतला तो आम्हा दोघांना भरवला. स्वत: मात्र उपाशी राहिली, सकाळपर्यंत मांडीवर दोघांना घेऊन रडत बसून राहिली. सकाळ होताच, जिथं काम करत होती, तिथं गेली. झालेला सगळा प्रकार तिनं सांगितला. कामावरची माणसं चांगली होती. त्यांनी माझ्या आईला धीर दिला. ते माझ्या आईला घेऊन पोलीस स्टेशनला गेले, त्या बाईला पकडून आणलं. माझी आई काय काम करते ते तिला दाखवून दिलं, पण माझ्या आईला बदनामी सहन होत नव्हती. तिनं ते घर सोडलं. असे कितीतरी प्रसंग माझ्या आईच्या वाटेला आले. त्यातच माझ्या आईला स्त्री जागृती मंचचा सहारा मिळाला, तिथं गेल्यावर तिला समजलं, जगात सगळ्याच स्त्रिया तशा नसतात. आपल्या बाजूने लढणाऱ्या साथ देणाऱ्या असतात. स्त्री जागृती मंचाकडून माझ्या, शिक्षणासाठी, तसेच एका आजींकडून ‘मोलाचं सहकार्य’ मिळालं. त्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे मी आतापर्यंत एवढं शिक्षण घेऊ शकले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा