आजचे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच मला मिळाले आहे. आज मी जी काही आहे ती फक्त माझ्या आईमुळेच आहे. मी या समाजापुढे जे काही माझे अस्तित्व निर्माण करू शकले ते माझ्या आईमुळे.
मला आजही आठवतेय, मी दुसरीत असताना माझ्या शाळेत माझं बालगीतावर नृत्य होतं आणि मी खूप घाबरले होते. तेव्हा आईने मला सांगितले की, तू नृत्य करताना असे समजू नको की, तुझ्यासमोर जे बसले आहेत ते तुला पाहत आहेत. असं समज की, तू त्यांना काय तरी दाखवीत आहेत आणि ते बघत आहेत. तेव्हापासून जेव्हा कुठेही माझं नृत्य असतं तेव्हा मी अजिबात घाबरत नाही. मला माझ्या आईने धीटपणाने राहण्यास शिकिवले आहे.
माझ्या आईने आमच्यासाठी स्वत:ची सुखाची कधीही काळजी केली नाही. ज्या जन्मदात्याने आम्हाला स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा फक्त आणि फक्त माझ्या आईने ठामपणे सांगितले की, मी माझ्या मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. तुझ्यासारख्या व्यसनाधीन झालेल्या माणसांसोबत मला ना संसार करायचा आहे ना माझ्या मुलांचं आयुष्य खराब करून द्यायचं आहे. त्या वेळी माझ्या आईचे मला दुसरेच रूप पाहायला मिळालं.
माझी आई दिवसरात्र खूप मेहनत करते. मला आणि माझ्या भावंडांना काही कमी पडू देत नाही. आमचे शिक्षण पुढे सुरू राहो, त्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ती दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करते. आम्हाला पोषक आहार मिळावा यासाठी ती स्वत: उपाशी राहते, पण आम्हाला तोच तुकडा आधी खायला देते.  मी स्वत:ला भाग्यवान समजते की, मला अशी आई मिळाली. ज्या मुलांना आई नसते ते जगातली सर्वात मोठय़ा धनापासून वंचित राहतात. म्हणून तर कवी  म्हणतात की, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा