माझी आई माझ्यासाठी फक्त आई नव्हती, ती माझ्यासाठी माझे बाबापण होती. आजही आहे. सर्वसाधारण कुटुंबामध्ये आई आणि बाबांची भूमिका ठरलेली असते, पण माझ्या कुटुंबात फक्त आम्ही दोघंच होतो. मी आणि माझी आई. ती आई आणि बाबा या दोन्ही भूमिका बजावीत आहे. पण त्याहूनही जास्त ती माझी मैत्रीण आहे.
माझं आयुष्य बरंच वेगळं होतं. कारण मला कधीही मैत्रिणींची गरज भासली नाही, किंबहुना मला माझ्या आईबरोबर वेळ घालवायला जास्त आवडतं. बहुतेक आई-बाबा त्यांच्या मुलांच्या आयुष्याचे निर्णय स्वत:च घेतात. माझ्या आईने माझ्या बाबतीत तसे कधी केले नाही. ती नेहमी मला काय चांगलं व काय वाईट व कुठल्या गोष्टीचे काय परिणाम होतील, हे सांगते. पण निर्णय माझ्यावर सोपवते. हे निर्णयस्वातंत्र्य प्रत्येक मुला-मुलींच्या आयुष्यात महत्त्वाचे असते. कारण जर ते चुकले तर त्याची जबाबदारीपण आपलीच असते, हेपण लक्षात येते. पण कधी योग्य निर्णय आपला आत्मविश्वास वाढवितात की आपल्यातसुद्धा योग्य निर्णय घ्यायची क्षमता आहे.
मुलगी म्हणून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. कारण माझ्या आईने मला मुलगी असूनही मुलासारखं स्वातंत्र्य दिलं. तिने कधीही मला मुलीच्या जातीने असे करावे, तसे करू नये किंवा घरातील सगळी कामं आलीच पाहिजेत, असा उपदेश केला नाही किंवा असा अट्टहासही धरला नाही. आमच्या आयुष्यातसुद्धा खूप आर्थिक अडचणी आल्या, पण आईने मला कधी त्याची तीव्रता जाणवू दिली नाही.
माझ्या आयुष्यात एक प्रसंग असा घडला होता जेव्हा माझ्या आईचा माझ्यावर किती विश्वास आणि प्रेम आहे, हे मला जाणवून गेले व तिच्यातला कणखरपणा व योग्य निर्णय घेण्याची क्षमता याची जाणीव झाली. मी इयत्ता सहावीत शिकत असताना सुट्टीमध्ये मला आईने एक कॉम्प्युटर क्लास लावला होता. क्लासची फी जास्त होती म्हणून क्लास घेणाऱ्या संचालकांना आईने आमची घरची खरी परिस्थिती सांगितली व फीमध्ये सवलत देण्याची विनंती केली. त्यांनी फीमध्ये आम्हाला सवलतही दिली. मी क्लासला दररोज जाऊ लागले. एके दिवशी त्या सरांनी माझ्याबरोबर गैरव्यवहार करायचा प्रयत्न केला. मी तेव्हा काही बोलले नाही कारण मी लहान होते आणि मला फक्त एवढंच कळत होतं की, त्यांनी जे माझ्याबरोबर करायचा प्रयत्न केला ते बरोबर नव्हतं. मी घरी गेल्यावर आईला सगळं सांगितलं व आई लगेच माझ्याबरोबर त्या सरांकडे आली व तिने कुठल्याही प्रकारचं भांडण न करता त्या सरांना अतिशय सभ्य शब्दात वॉर्निग दिली व त्यांना त्यांची चूक कबूल करायला लावली. हा सगळा प्रसंग घडल्यानंतरही आईने माझ्यावर कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही लावली व माझं स्वातंत्र्यसुद्धा हिरावून नाही घेतलं व तो क्लासही पूर्ण करायला सांगितला. मीसुद्धा तो क्लास नंतर कोणत्याही प्रकारचा त्रास न होता पूर्ण केला. आजही जेव्हा मी हा प्रसंग आठवते तेव्हा मला असं वाटतं की, ती माझी आई होती म्हणून तिने इतक्या विचारपूर्वक तो प्रसंग हाताळला. दुसऱ्या कुणाची आई असती तर तिने आधी मुलीलाच बोल लावले असते व मुलीलाच घराबाहेर येणं-जाणं बंद केलं असतं. योग्य वेळेला योग्य कृती करणं आणि न चिडून शांतपणे एखाद्या प्रसंगाला तोंड देणं हे मला माझ्या आईने शिकवलं. काही गोष्टी आई-बाबांनी मुलांना आपल्या कृतीतून शिकवायच्या असतात, हेही मला कळलं.
बऱ्याचदा आई-वडील आपले निर्णय मुलांवर लादतात. ते त्यांची अपूर्ण स्वप्न मुलांच्या माध्यमातून पूर्ण करु पाहतात. माझी आई मात्र याला अपवाद आहे. तिलासुद्धा वाटत होते मी डॉक्टर व्हावे. बारावीला आणि मेडिकलच्या प्रवेश परीक्षेलासुद्धा मला चांगले गुण मिळाले होते. मेरिटमध्येपण आले होते, पण मला डॉक्टर व्हायचे नव्हते. मला तर शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती. तेव्हा मी आईला ठामपणे मला डॉक्टर व्हायचं नाही म्हणून सांगितलं. माझ्यातला हा ठामपणासुद्धा मला माझ्या आईने दिला आहे आणि माझ्या आईने माझ्यावर कुठलीही जबरदस्ती न करता माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा तो खूप लोकांना (नातेवाईकांना) मूर्खपणाचा वाटला होता. कारण ‘पैसे कमविण्यासाठी शास्त्रज्ञ होण्यापेक्षा डॉक्टर होणं कधीही चांगलं,’ हे मला तेव्हा खूप लोकांनी ऐकविलं. पण आईने मला एकदाही मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असं वाटू दिलं नाही. मला शास्त्रज्ञ व्हावसं वाटतं यामागच कारणपण आईच आहे. कारण आजकालचे आई-वडील आपल्या मुलांना असं करियर करायला सांगतात ज्यात ‘स्कोप’ जास्त आहे. म्हणजेच पैसे चांगले मिळतील, पण आईने लहानपणापासून एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे लोकांसाठी असे काहीतरी करायचे जे कायमसाठी त्यांच्या उपयोगाचे ठरेल.
खरं तर आमची आर्थिक परिस्थिती पाहता सगळ्यांचे असे म्हणणे होते की, मी लवकरात लवकर नोकरी करावी, पण माझी आई माझ्या पाठीशी ठाम उभी राहिली. तिने मला सांगितलं, तुला हवे तेवढे शिक. कमवायचे म्हणून शिक्षणाबरोबर तडजोड करू नकोस.
समाजात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळायला हवा म्हणून नुसतं आरक्षण मागून होणार नाही. त्यासाठी बायकांनी/ मुलींनी स्वत:ची मानसिकता बदलायला हवी. आपण दुय्यम आहोत, हे वाटून न घेता आपल्यातही पुरुषांएवढी क्षमता आहे आणि आपल्याला हो हक्क आहे हे स्त्रियांच्या मनात रुजले पाहिजे आणि हे काम आईनेच करायला हवे, जसे माझ्या आईने केले.
माझी ‘असामान्य’ आई
माझी आई माझ्यासाठी फक्त आई नव्हती, ती माझ्यासाठी माझे बाबापण होती. आजही आहे. सर्वसाधारण कुटुंबामध्ये आई आणि बाबांची भूमिका ठरलेली असते, पण माझ्या कुटुंबात फक्त आम्ही दोघंच होतो. मी आणि माझी आई. ती आई आणि बाबा या दोन्ही भूमिका बजावीत आहे. पण त्याहूनही जास्त ती माझी मैत्रीण आहे.
आणखी वाचा
First published on: 11-05-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My mother is extraordinary