‘आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं’ पण हे अस्तित्वच आम्हाला बेघर करून गेलं. आईच झाली आमच्या घराचं मांगल्य आणि अस्तित्वसुद्धा!
संसाराचं देखणं चित्रं घेऊन माझी आई सासरी गेली, पण संसाराच्या देखण्या चित्रातले हे रंग विस्कटायला लागल्याची जाणीव मात्र माझ्या आईला चार मुलं झाल्यानंतर व्हायला लागली. खरं तर हे रंग लग्नानंतर लगेचच विस्कटले होते. कारण ज्याच्याबरोबर सप्तपदी चालली तोच व्यसनी होता. मारझोड करणे, शिव्या देणे, अपमानास्पद वागणूक नित्याचीच झाली होती. अशा वेळी भेदरलेली आम्ही भावंडं आईच्या कुशीत शिरायचो. आईच्या अश्रुंचा अभिषेक आम्हा भावंडांवर व्हायचा. धाकटा भाऊ तर हृदय पिळवटून जाईल इतक्या जोरात रडायचा. ‘रम्य ते बालपण’ माझ्यासाठी ही कवी कल्पना राहिलीच. आमचे बालपण हरवले, शेवटी माझ्या आईच्या शोषिकतेची शक्ती संपली आणि ती आम्हा भावंडांना घेऊन घराबाहेर पडली. माहेर तोलामोलाचं नव्हतं. सुट्टीत आनंदाने मामाच्या गावाला जाणारे आम्ही भावंडे आईसोबत कायमचे राहिला आलोत. घराला लागूनच पडवी हेच आमचं घर झालं आणि सुरू झाली आईची एकाएकी झुंज.
आज माझी आई दुसऱ्याच्या घरची धुणी-भांडी, तसेच स्वयंपाक करते. यातून येणाऱ्या कमाईतूनच आम्हा चारही भावंडांचे शिक्षण सुरू आहे. आमच्या शिक्षणात काही कमतरता राहू नये म्हणून ‘ज्ञानदीप स्त्री जागृती मंच’सारख्या संस्थांकडून वेळोवेळी मदत स्वीकारतो. ती दिवसातले १८ तास फक्त आमच्यासाठी राबत असते. आमच्यापुढे तिच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने ती स्वत:च विसरून गेली आहे. थकुनमागून घरी आली की तिच्याकडे पाहून आतडी अगदी पिळवटतात आणि मनात येतं हिला काहीतरी मदत करावी. आम्ही तिघी बहिणी तुझ्याबरोबर कामावर येऊ का? असे विचारतो. तेव्हा नेहमी शांत असणारी माझी आई दुर्गेचे रूप धारण करते व म्हणते, ‘मी जे भोगलंय तेवढं पुरे!’ तुमच्या वाटय़ाला हे भोग येऊ नये म्हणून तुम्हाला शाळेत टाकलंय.
एक प्रसंग माझ्या स्मरणात आहे. मी चौथीच्या वर्गात असेन, व्यसनाने सैतान झालेल्या वडिलांनी एकदा आमच्या घरी येण्याचा प्रयत्न केला. दरवाजा बंद करून आम्ही सर्व थरथर कापत घरात बसून होतो. तर त्यांनी कौले काढून घरात घुसून आईला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या वेळी आम्हा मुलांना व स्वत:ला वाचविण्यासाठी अबला असणारी आमची आई वाघिणीसारखी तुटून पडताना मी पाहिली.
आईने दुहेरी जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली. तरीसुद्धा चौकोनी सुखी कुटुंब बघितल्यावर आईबद्दल कणव निर्माण होते. वैवाहिक जीवनातला तो गोडवा, सहचराचा विश्वास तिला नाही, पण याबाबत तिने कधीही चकार शब्द काढला नाही. त्याबद्दल विचारले तर हसून उत्तर देण्याचे टाळते, पण त्या हास्यात एक वेदना चमकून जाते अन् मन विव्हळ होते, पण मनात दृढनिश्चय होतो हिचे पांग फेडायचे. सगळ्या सुखांना आईच्या पायाशी लोळण घ्यायला लावायची.
दुधाने तोंड भाजले म्हणून ताकही फुंकून पिण्याच्या तिच्या सवयीमुळे सतत आमची काळजी करणे. मुलांमध्ये वडिलांचे दुर्गुण येऊ नये म्हणून आमच्यावर सतत पहारा ठेवणे. सातच्या आत घरात हा नियम असणे, या तिच्या गोष्टी मात्र मला खटकतात, पण ती एक व्याकुळ एकटी पक्षिणी आहे. त्यामुळे हे होणारच आम्ही समजून घेतो. वेळात वेळ काढून ती वर्तमानपत्रे वाचते. तिच्यासारख्या समदु:खी स्त्रियांना तिने एकत्रित केले आहे. त्यांचा एक बचत गट स्थापन करून ‘समर्थ मी’ म्हणून ती स्वत:ला सिद् करीत आहे!’ तिच्याबद्दल एकच ओळ म्हणावीशी वाटते, आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही – उरतही नाही.
आई घराचं मांगल्य
‘आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं’ पण हे अस्तित्वच आम्हाला बेघर करून गेलं. आईच झाली आमच्या घराचं मांगल्य आणि अस्तित्वसुद्धा! संसाराचं देखणं चित्रं घेऊन माझी आई सासरी गेली, पण संसाराच्या देखण्या चित्रातले हे रंग विस्कटायला लागल्याची जाणीव मात्र माझ्या आईला चार मुलं झाल्यानंतर व्हायला लागली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-05-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My mother is great